लैंगिक अपमार्गण : ज्या मनोलैंगिक समस्यांना काही वर्षांपूर्वी ‘लैगिंक विकृती’−सेक्शुअल डीव्हिएशन्स−संबोधले जात असे, तयांना १९८० पासून ‘अमेरिकन सायकिॲट्रिक असोसिएशन’ ह्या मानसचिकित्सकांच्या बहुमान्य संस्थेने डी.एस्.एम्. III ह्या नवीन विकार-वर्गीकरणात ‘सेक्शुअल डीव्हिएशन’ च्या ऐवजी ‘पॅराफिलिआ’ म्हणजेच वेगळी ‘लैंगिक कामुकता’ वा ‘लैंगिक अपमार्गण’ ही संज्ञा लागू केली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बदलत्या काळातील बदल्या विचारांमुळे−विशेषतः सध्या प्रचलित असलेल्या मुक्ताचारी समाजनीतीमुळे−अशा समस्यांकडे पाहण्याच्या दृष्टीत झालेले परिवर्तन. दृष्टिकोणात झालेल्या परिवर्तनामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती विकसित पाश्चात्त्य देशांत जितकी आढळून येते, तितकी भारतात आज तरी आढळत नाही. समलिंगी कामुकतेसारख्या अपमार्गणाला काही पाश्चात्त्य देशांत कायद्याने परवानगी दिल्यामुळे तिला काही पाश्चात्त्य तज्ञ अपमार्गण न मानता ती केवळ एक लैंगिक विभिन्नता (व्हेरिएशन) आहे असे मानतात. १९८० च्या डी.एस्.एम्.III ह्या वर्गीकरणात ‘समलिंगी कामुकता’ ही संज्ञा वगळून फकत एगो डिस्टॉनिक होमोसेक्शुॲलिटी म्हणजे अहम्‌ ला न रुचणाऱ्या समलिंगी कामुकतेला विकार म्हणून स्थान दिले. अहमला जी समलिंगी कामुकता रुचते, ती ‘एगो सिंटॉनिक होमोसेक्शुॲलिटी’ असे मानले गेले. पुढे १९८७ मध्ये डी.एस एम्. III आर् ह्या सुधारलेल्या विकार−वर्गीकरणात समिलिंगी कामुकता पूर्णपणे वगळण्यात आली. लैंगिक अपमार्गणाचे बहुतेक प्रकार पुरुषांतच आढळतात.

लैंगिक अपमार्गणाचे मूलभूत वर्ग तीन आहेत : (१) लिंगभूमिका अपमार्गण (सेक्शुअल रोल डिस्‌ ऑर्डर्स), (२) रतिवस्तुविकल्पविषयक अपमार्गण (सेक्शुअल ऑब्जेक्ट चॉइस डिस्‌ ऑर्डर्स), (३) रतिभावसंबंधित अपमार्गण (डिस्‌ ऑर्डर्स ऑफ सेक्शुअल सिच्युएशन). पहिल्या प्रकारात लिंगभूमिका विषमलिंगी असलेले काही अप्रचलित विकार येतात. उदा. प्रतिलैंगिकता (ट्रान्ससेक्शुॲलिटी) आणि आंतरलैंगिकता (इंटरसेक्शुॲलिटी). दुसऱ्या वर्गात समलिंगी कामुकता आणि अगम्य आप्तसंभोग (इन्‌सेस्ट) ह्यांचा समावेश होतो., तर तिसऱ्या वर्गात वस्तुकामुकता (फेटिशिझम), बालकामुकता (पेडोफिलिआ), वेषांतरणविकृती (ट्रान्सव्हेस्टिझम), लिंगदर्शकन किंवा प्रदर्शनप्रवृत्ती (एक्झिबिशनिझम), लिंगदर्शन सुखकामुकता (व्हॉयरिझम), परपीडन रती (सॅडिझम), स्वपीडन रती (मॅसॉकिझम) [⟶ परपीडन व स्वपीडन विकृती], लिंगस्पर्श-कामुकता (फ्रॉटरिझम इ. विकृती येतात.  

कारणचिकित्सा : लिंगभूमिका अपमार्गण ह्या प्रकारात लहानपणीच परलिंगी पालकाऐवजी समलिंगी पालकाची लिंगभूमिका आत्मसात केली जाते. ह्याचे प्रमुख कारण पालकांनी, भावंडांनी व समवयस्क मुलांनी चेष्टेने किंवा हौसेखातर मुलाला विरुद्ध लिंगप्रतिमा बहाल केलेली असते. त्यामुळे पुढे वयात आल्यावर स्वतःच्या शारीरिक लिंगाचे अस्तित्व झिडकारून परलिंगी भूमिका स्वीकारली जाते. लिंगस्पर्श−कामुकता ह्या अपमार्गणात उपजत कारक प्रवर्तके किंवा शरीरक्रिया शास्त्रीय घटक ह्यांचा निश्चित असा परिणाम आढळून आलेला नाही. रतिवस्तुविकल्प अपमार्गणात कौटुंबिक पार्श्वभूमी विकृतीजनक असते. विशेषतः उदासीन वडील आणि फाजील लक्ष देणारी कामुक आई यांच्या युतीमुळे मुलगा आईची लैंगिक भूमिका उचलतो. पुढे त्याच्या समलिंगी कामुक वर्तनाला एखाद्या पुरुषाकडून मिळालेले उत्तेजन कारणीभूत ठरते. बहुतेक लैंगिक विकृतींमध्ये प्रौढ परलिंगी संभोगाबद्दल नाकारार्थी भावना निर्माण झालेली दिसते. ह्याचे कारण कुमारावस्थेत स्वतःची शरीरप्रतिमा (बॉडी इमेज) अस्पष्ट असते, तसेच मुळात शिश्नाच्या आकाराबद्दल व कार्याबद्दल शंका निर्माण होते. तसेच यौवनावस्थेत परलिंगी व्यक्तीशी संबंधित असलेल्या वस्तू वा तिच्याशी संबंधित अशी काही विक्षिप्त वाटा अनैसर्गिक पद्धत तसेच असाधारण परिस्थिती ह्यांचा सहयोग होऊन अपसामान्य पद्धतीचे कामुक आकर्षण निर्माण होऊ शकते. पुढे अपसामान्य पद्धतीने सतत मिळणाऱ्या लैंगिक सुखाची सवय लागते. साहजिकच ह्या कारणांमुळेही परलिंगी संभोगाबद्दल अनास्था निर्माण होते. काही वेळा परलिंगी संभोग करण्याबद्दल वाटत असलेला गैरविश्वास व भीती (फ्रॉइड यांच्या सिद्धांताप्रमाणे कॅस्ट्रेशन अँग्‌झायटी म्हणजेच खच्चीकरणाची चिंता) अशा विकृत सवयी प्रबळ करतात. 

लक्षणे : (१) प्रतिलैंगिकता हा विकार बहुधा पुरुषांत आढळतो. असा पुरुष स्वतःला स्त्री समजून (तशी लैंगिक भूमिका घेऊन) स्त्रियांचे वेष, हावभाव व आवडी-निवडी पतकरतो. त्यामुळे पुढे त्याला आवडलेल्या काही पुरुषांकडे तो आकर्षित होतो. परंतु स्वतःचे पुल्लिंगी शरीर याच्या कामवासने अडथळा आणत असल्याने तो त्या शरीराचा द्वेष करतो. पुढे अवांतर वाचनामधून तशी माहिती मिळाल्यास आपल्या शरीरात शस्त्रक्रियेने व प्रवर्तक औषधाने लिंगबदल करून घेण्यासाठी तो तज्ञांची याचना करतो परंतु लिंगबदल झाल्यानंतरसुद्धा स्त्रीजीवन पूर्णपणे जगणे अशक्य ठरल्यामुळे-विशेषतः पुरुषाचे प्रेम टिकवणे कठीण झाल्यामुळे–बहुतेकांना वैफल्य येऊन काही वेळा त्यांना उदासीनतेचा विकार जडतो. (२) अगभ्य आप्तसंभोग विकृतीत पिता-कन्या, भाऊ-बहीण व क्वचितच माता-पुत्र ह्यांच्यात लैंगिक चाळे अथवा संबंध करण्याची प्रवृत्ती दिसून येते. ह्या विकृत संबंधांत अतिकामुक अशी प्रौढ व्यक्ती बहुतेक वेळा पुढाकार घेत असते आणि बऱ्याच वेळा कन्या, धाकटी बहीण अथवा मुलांना त्यांच्या अज्ञानामुळे तसेच असहायतेमुळे अशा विकृत संबंधांत सहकार्य देणे भाग पडते. (३) लैंगिक वस्तुकामुकतेत सहज हाती पडणाऱ्या परलिंगी व्यक्तींच्या अंतर्वस्त्रांच्या स्पर्शाने उद्दीपित होऊन हस्तमैथुन करणे हा कुमारांचा, न मिळणाऱ्या नैसर्गिक रतिसुखाला पर्याय म्हणून स्वीकारलेला चाळाच पुढे अंगवळणी पडून त्याचीच सवय जडते आणि काही वेळा तर ती परलिंगी संभोगापेक्षाही अधिक प्रिय होऊन बसते. (४) बालकामुकतेची सवय काही प्रौढ व्यक्तींना जडलेली असते. ह्या व्यक्ती समवयस्कांऐवजी लहान मुलांशी लैंगिक चाळे करतात अथवा त्यांच्याशी जबरी संभोग करण्याची विशेष प्रवृत्ती दर्शवितात. ही प्रवृत्ती एकाकी पडलेल्या वृद्धांत अथवा विकृत व्यक्तित्व असलेल्या व्यक्तींत अधिक प्रमाणात आढळून येते. (५) वेषांतरण ही विकृती लैंगिक वस्तुकामुकता, समलिंगी कामुकता आणि प्रतिलैंगिकता यांच्याशी संलग्न आहे. ह्या विकृतींची निदानमीमांसा करणे कठीण असले, तरी महत्त्वाचे आहे. कारण त्यावर त्या विकृतीचा उपचार अवलंबून असतो. वेषांतरणात बहुधा काही पुरुष स्त्रियांचा वेष परिधान करून आपल्या सान्निध्यात एक स्त्री आहे, असे कल्पनारंजन करून घेतात आणि काही वेळा हस्तमैथुनही करतात. असे असले तरी त्या पुरुषाची पुल्लिंगी भूमिका मात्र अबाधितच राहते. (६) लिंगप्रदर्शनविकृती : ही बहुधा समाजविघातक व्यकतींत आढळते. बालकामुकतेशी ती निगडित आहे. तथापि असले विकृत पुरुष लहान मुलींना अथवा स्त्रियांना आपलें लिंग चोरून दाखवत असले, तरी संधी असतानासुद्धा त्यांच्याशी ते संभोगाचा प्रयत्न सहसा करत नाहीत. कारण बहुधा त्यांना आपल्या लैंगिक क्षमतेबद्दल खात्री नसते. (७) लिंगदर्शन सुखात/ कामुकतेत विकृत व्यक्ती परलिंगियांचे नग्न शरीर इतरांच्या प्रणयचेष्टा अथवा संभोग चोरून वा लपून पाहण्यातच सुख मानतात आणि आपली लैंगिक इच्छा हस्तमैथुन करून तृप्त करून घेतात. अशा व्यक्तींनादेखील स्वतःच्या संभोगक्षमतेबद्दल एक प्रकारची न्यूनता जाणवत असते. ही विकृती पुरुषात जास्त प्रमाणात आढळते. (८) परपीडनरती या विकृतीत लैंगिक जोडीदाराला प्रणयचेष्टेत वेदना देऊन अथवा इजा करून त्यातून लैंगिक सुख मिळवले जाते. साध्या सरळ संभोगापेक्षा त्यांना असा जोडीदारास दुः ख देणारा संभोग जास्त पसंत असतो. (९) स्वपीडनरती ही विकृती परपीडन विकृतीपेक्षा अधिक प्रचलित असून तीत आपल्या लैंगिक जोडीदाराकडून स्वतःला वेदना होतील अशा तऱ्हेने वर्तन करायला त्याला भाग पाडले जाते. उदा., पाय बांधून फटके मारायला लावणे. बहुधा वेश्याच अशा विक्षिप्त चाळ्यांना तयार होतात. (१०) लिंगस्पर्श कामुकता ह्या विकृतीत बस किंवा रेल्वेमध्ये गर्दीचा फायदा घेऊन लिंग टेकविणे अथवा स्त्रियांच्या इंद्रियांना चोरून स्पर्श करणे आणि गर्दीत नाहीसे होणे, ह्याची सवय लागलेली असते. (११) गुदमैथुनात गुदद्वारातून संभोग घेतला जातो. ही पद्धत समलिंगी कामुक पुरुषांना प्रिय असते परंतु काही वेळा स्त्रियांवरही असेच प्रयोग केले जातात. (१३) पशुसंभोग ह्या अप्रचलित प्रकारात प्राण्यांच्या सान्निध्यात जीवन घालविणारे लोक तसेच काही वेळा इतरही, एकाकीपणामुळे या विकृत सवयीला बळी पडतात आणि पाळीव प्राण्यांवरसुद्धा गुदमैथुन अथवा योनिसंभोगासारखे प्रयोग करतात. 

उपचार व प्रतिबंधन : बहुतांश लैगिंक अपमार्गण विकृतींवर उपचार करणे कठीण असते. कारण ह्या विकृत सवयी बहुधा लहानपणीच जडतात, तसेच रुग्णाचे सहकार्यही सहसा मिळत नाही. प्राकृत लैंगिक जीवन अंगीकारण्याच्या प्रयत्नाबाबत अशा व्यक्ती उदासीन असायचे कारण त्यांचे कौटुंबिक व सामाजिक संबंध त्यांच्या विकृत व्यक्तिमत्त्वामुळे बिघडलेले असतात आणि त्यामुळे त्यांचा विवाह रीतसरपणे होण्याची शक्यताही कमीच असते. 

उपचारांत प्रथम व्यक्तीचे सर्व सामाजिक संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी कुटुंबियांचे गैरसमज आधी दूर करून त्यांची रुग्णाबद्दल सहानुभूती व त्याच्या उपचारांसाठी सहकार्य मिळवणे जरूरीचे असते. उपचार चालू असताना ते पूर्ण झाल्यावर रुग्णपुनर्वसनाच्या दृष्टीने लागणाऱ्या प्रयत्नांसाठी समाजसेवेचे कार्य करणाऱ्या संस्थांच्या मदतीचीही गरज असते. वैयक्तिक मानसोपचारांपेक्षा समूह मानसोपचारांचे प्रयोग जास्त यशस्वी होतात कारण आपल्यासारखेच इतर विकृत पाहिल्यावर रुग्णातील अपराधीभावना व संकोच कमी होऊन त्याचे सहकार्य मिळवणे सोपे जाते. जेव्हा विकृती वैयक्तिक मनोगतिकीमुळे (सायकोडायनॅमिक्स) उद्‌ भवलेली असते, तेव्हा मनोविश्लेषण हा मानसोपचार जासत प्रभावी ठरतो. हल्ली समलिंगी कामुकता, वस्तुकामुकता, वेषांतरण, लिंगप्रदर्शन विकृती ह्या अपमार्गणांचा उपचार वर्तनोपचारातील क्रियावलंबी अभिसंधान (ऑपेरंट कंडिशनिंग)−विशेषतः विमुखता अभिसंधान (ॲव्हर्सिव्ह कंडिशनिंग) –ह्या पद्धतीने यश्स्वीपणे करता येतो. मात्र त्यासाठी रुग्णाचे सहकार्य अत्यावश्यक असते. विमुखता अभिसंधान उपाचरात रुगणाला रतिवस्तूंचे चित्र वा फोटो दाखविला जातो. ते चित्र वा फोटो पाहून त्याला लैंगिक सुख मिळत असतानाच एका खास यंत्राद्वारे त्याच्या हाताला विजेचा सौम्य झटका दिला जातो. उत्तेजित करणाऱ्या रतिवस्तू आणि त्रासदायक झटका ह्यांच्यात एक प्रकारचे (अवलंबीकरण) निर्माण होऊन त्या रतिवस्तू नकोशा वाटू लागतात.

विकृत पुरुषांच्या फाजील लैंगिक वासना कमी करण्यासाठी स्त्रीमदजन (इस्ट्रोजेन) हे प्रवर्तक (हॉर्मोन) वापरल्यास काही अतिरेकी व आक्रमक लैंगिक विकृतींना−उदा., परपीडनरती−आळा घालणे सोपे जाते. मात्र प्रवर्तकांचे दुष्परिणाम त्रासदायक असल्यामुळे त्यांचा वापर मर्यादित राहिला आहे. 

प्रतिलैंगिकतेवर उपचार करणे फारच कठीण असते. परंतु आपले शरीरिक लिंग वेगळे आहे, ह्या भावनेमुळे अत्यंत उदासीन व आत्महत्येस प्रवृत्त होणाऱ्यांना शस्त्रक्रियेने लिंगबदल करून घेण्याची मुभा आजकाल दिली जाते आणि त्यासंबंधीचे बरचे अतिरंजित वृत्तांत नियतकालिकांमधूनही आपणास वाचायला मिळतात. मात्र शस्त्रक्रियेने एकदा लिंगबदल केल्यावर पुन्हा मूळ लिंग प्राप्त करून देणे सर्वस्वी अशक्य असते. म्हणून अशी शस्त्रक्रिया करण्याआधी दोन वर्षे तरी विषमजननग्रंथीपोषक प्रवर्तके देऊन शारीरिक बदल करून (उदा., पुरुषांना स्तर व स्त्रियांना मिशा व घोगरा आवाज) विषमलिंगी भूमिका जास्त प्रभावीपणे वठविणे सुलभ केले जाते. ह्या संक्रमणकाळात पुरुषांनी स्त्रीलिंगी भूमिका आत्मसात करण्यास तसेच पुढील स्त्रीजीवन सामाजिक दृष्ट्या सुलभपणे जगण्यास संधी मिळते. ह्या एका काळात त्या व्यक्तीला एक तर स्त्रीसुलभव्यवसाय अथवा पुरुषजीवनसाथी मिळाला , तरच तो प्रयोग यशस्वी होणार ह्या विश्वासाने शस्त्रक्रिया केली जाते. अशा लिंगबदल केलेल्या प्रतिलैंगिक व्यक्तींचे उर्वरित जीवन कितपत समाधानी व यशस्वी झाले आहे, ह्याचा विश्वसनीय शास्त्रीय अनुभव व पुरावा अजून गोळा व्हायचा आहे.  

पहा : मानसिक आरोग्य मानसोपचार लैंगिक शिक्षण. 

संदर्भ : 1. Arieti, S. Brody, E. B. Ed. American Handbook of Psychiatry, New York, 1974.

           2. Deuisch, Albert Fishman, Helen, Ed. The Encyclopaedia fo Mental Health, Vol. V, New York, 1963.

           3. Freedman, A. M. Kaplan, H. J. Saddock, B. J. Modern Synopsis of Comprehensive Textbook of Psychiatry, IV, Baltimore, 1981.

           4. London, L. S. Caprio, F. S. Sexual Deviation, Washington, 1950.

           5. Rosen, J. The Pathology and Treatment of Sexual Deviation, London, 1964.

           6. Wolpe, J. The Practice of Behaviour Therapy, New York, 1973.

          7. Gregory, l. Smeltzer, D. J. Psychiatry, Singapore, 1983.

 

शिरवैकर, र. वै.