लेव्हेनहूक, आंतॉन व्हान : (२४ ऑक्टोबर १६३२ – २६ ऑगस्ट १७२३). डच सूक्ष्मदर्शकीविज्ञ व जीववैज्ञानिक. सूक्ष्मजंतू व आदिजीव (एकाच कोशिकेचे-पेशीचे-बनलेले सजीव प्रोटोझोआ) यांचे त्यांनीच प्रथम निरीक्षण केले. त्यांनी खालच्या दर्जाच्या प्राण्यांविषयी केलेल्या संशोधनामुळे त्या काळी प्रचलित असलेल्या स्वयंजननाच्या (अजैव पदार्थांपासून आपोआप सजीव निर्माण होण्याच्या) सिद्धांताचे खंडन झाले व त्यांच्या निरीक्षणांमुळे सूक्ष्मजंतुविज्ञान आणि आदिजीवविज्ञान यांचा पाया तयार होण्यास मदत झाली.
लेव्हेनहूक यांचा जन्म नेदर्लंड्समधील डेल्फ्ट येथे झाला. त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्यांचे वडील वारल्याने फारसे शिक्षण न मिळता ते १६४८ मध्ये ॲम्स्टरडॅमला गेले व तेथे कापडाच्या दुकानात साहाय्यक म्हणून काम करू लागले. लवकरच १६५२ मध्ये ते डेल्फ्टला परत गेले व तेथे त्यांनी स्वत:चा कापडाचा व्यवसाय सुरू केला. १६६० मध्ये त्यांना तेथील नगरपालिकेत नोकरी मिळाली व १६७७ मध्ये ते प्रमुख अधीक्षक झाले. या नोकरीतून मिळणारे उत्पन्न व त्यांच्या वैज्ञानिक कार्याच्या गौरवार्थ नगरपालिकेने वृद्धापकाळी त्यांना दिलेले निवृत्तिवेतन यांमुळे त्यांना आर्थिक सुरक्षितता लाभली आणि त्यामुळे अखेरपर्यंत आपले वैज्ञानिक कार्य चालू ठेवणे त्यांना शक्य झाले.
त्यांनी आपल्या वैज्ञानिक कार्यास वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी प्रारंभ केला. त्याकाळी कापडाची गुणवत्ता तपासण्यासाठी दुकानदार वापरीत असलेल्या काचांची कल्पना विकसित करून त्यांनी स्वत:चा पहिला साधा सूक्ष्मदर्शक म्हणजेच बृहत्दर्शक भिंग बनविले. याकरिता त्यांनी काचेचा गोळा घासून सूक्ष्म भिंग तयार केले व ते भोके पाडलेल्या धातूच्या दोन लहान पट्टिकांमध्ये बसविले. याला तीन प्रतलांत फिरू शकेल असा निरीक्षण करावयाच्या वस्तूचा नमुना धारक त्यांनी जोडला. आयुष्यभरात त्यांनी सु. ५५० भिंगे तयार केली परंतु ती तयार करण्याचे तंत्र त्यांनी गुप्त ठेवले. या भिंगांची विवर्धनक्षमता ३० ते ३०० पर्यंत होती. यांपैकी बहुतेक भिंगे अतिशय लहान आकारमानाची (काही टाचणीच्या डोक्याएवढी) व अतिशय कमी केंद्रांतराची होती. त्यांच्या अद्यापही सुस्थितीत असलेल्या भिंगांपैकी सर्वोत्तम भिंग उत्रेक्त विद्यापीठाच्या संग्रहालयात असून त्याची विवर्धनक्षमता २७० आहे व ⇨ विभेदनक्षमता १.४ मायक्रॉन (१ मायक्रॉन=१०–६ मी.) आहे. वर्णविपथनाच्या वाढत्या समस्येमुळे [⟶प्रकाशीय व्यूहांतील विपथन] संयुक्त सूक्ष्मदर्शकाऐवजी [⟶सूक्ष्मदर्शक] त्या काळी साधे उच्च प्रतीच्या एकाच भिंगाचे सूक्ष्मदर्शक अधिक प्रचारात होते. एकोणिसाव्या शतकापर्यंत लेव्हेनहूक यांचीच उपकरणे सरस होती.
लेव्हेनहूक यांनी केलेल्या अभ्यासाला रूढ वैज्ञानिक संशोधनाचे सुसंघटित स्वरूप नसले, तरी काळजीपूर्वक निरीक्षण करण्याच्या त्यांच्या असामान्य क्षमतेमुळेच मूलभूत महत्त्वाचे शोध लावणे त्यांना शक्य झाले. १६७४ मध्ये त्यांनी पावसाचे पाणी, डबक्यातील व विहिरीतील पाणी, मानवी मुख व आतडे यांसारख्या विविध उगमांतील सूक्ष्मजंतू व आदिजीव वेगळे करून त्यांच्या निरीक्षणास व त्यांची आकारमाने काढण्यास सुरुवात केली. लेव्हेनहूक यांनी या सजीवांना अतिशय लहान सूक्ष्म प्राणी (ॲनिमलक्यूल्स) असे संबोधले होते. १६७७ मध्ये त्यांनी कीटक, कुत्रे व मानव यांच्या शुक्राणूंचे (पुं.जनन कोशिकांचे) प्रथमच वर्णन केले. स्टीफन हॅम हेही कदाचित शुक्राणूंचे सहशोधक असावेत परंतु ते कुजण्याच्या क्रियेने निर्माण झालेले असावेत, असा त्यांचा समज होता. लेव्हेनहूक यांनी मात्र ते सर्व प्राणीसृष्टीत वीर्याचे सर्वसामान्य घटक आहेत असे मानले. त्यांनी डोळ्याच्या भिंगाची संरचना, स्नायूंतील आडव्या रेषा, कीटकांचे मुखभाग व वनस्पतींची सूक्ष्म संरचना यांचा अभ्यास केला. मार्चेल्लो मालपीगी यांनी केशिकांतील (सूक्ष्म रक्तवाहिन्यांतील) रक्ताभिसरणाचा १६६१ मध्ये शोध लावला होता, पण १६८४ मध्ये लेव्हेनहूक यांनी त्याचा स्वतंत्रपणे शोध लावला. रक्ताचे सूक्ष्म अभिसरण आणि रोहिण्या व नीला यांतील केशिका जोडणी यांचे त्यांनी केलेले निरीक्षण हे शरीरक्रियाविज्ञानातील त्यांचे एक महत्त्वाचे कार्य आहे. त्यांनी रक्तातील तांबड्या कोशिकांचेही वर्णन केले आणि पक्षी, मासे व बेडूक यांच्या रक्तातील तांबड्या कोशिका अंडाकृती (दीर्घवर्तुळाकार) असतात, तर मानव व इतर सस्तन प्राण्यांच्या रक्तातील तबकडीच्या आकाराच्या (वर्तुळाकार) असतात, असे दाखविले. कोचिनियल रंग देणाऱ्या सजीवांचे कीटक स्वरूप, तसेच कोळ्यांचे जाळ्याचे धागे व विष निर्माण करणारे अवयव यांचे त्यांनी काळजीपूर्वक निरीक्षण केले. कीटकांच्या संयुक्त डोळ्यासंबंधीचे [⟶डोळा] त्यांचे कार्य लक्षणीय होते. त्यांनी वनस्पतींच्या ऊतकांतील (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांतील) संकेंद्री स्टार्च कणांचे आणि एकदलिकित व द्विदलिकित वनस्पतींच्या खोडांच्या भागांचे निरीक्षण केले. यीस्ट हे सूक्ष्म गोलाकार कणांचे बनलेले असते, अशी १६८० मध्ये त्यांनी नोंद केली होती. डोळा, त्वचा, दात व स्नायू यांच्या सूक्ष्मदर्शकीय संरचनेचे त्यांनी उत्तम वर्णन केले. मावा या कीटकांच्या वैशिष्ट्यांकडे व वनस्पतींवर होणाऱ्या त्यांच्या अपायकारक परिणामांकडे त्यांनी लक्ष वेधले आणि त्यांच्या अनिषेकजननाचा (शुक्राणू व अंडे यांचा संयोग न होता होणाऱ्या प्रजोत्पादनाचा) शोध लावला. गोड्या पाण्यातील रोटिफर, हायड्रा व व्हॉल्व्हॉक्स या सूक्ष्म प्राण्यांचेही त्यांनी वर्णन लिहिले होते. रोटिफरांसंबंधी १७०२ मध्ये लिहिताना हे सूक्ष्म प्राणी पडणाऱ्या पावसाच्या पाण्यात, गटारातून येणाऱ्या पाण्यात व इतर सर्व प्रकारच्या पाण्यात आढळतात, कारण हवेत तरंगणाऱ्या धुळीच्या कणांबरोबर ते वाहून नेले जाऊ शकतात, असे प्रतिपादन त्यांनी केले होते.
खालच्या दर्जाच्या विविध प्राण्यांच्या जीवनक्रमासंबंधी त्यांनी केलेले संशोधन, हे प्राणी उत्स्फूर्तपणे निर्माण होणे वा कुजलेल्या पदार्थांपासून त्यांची निपज करणे शक्य आहे या त्या काळी प्रचलित असलेल्या सिद्धांताच्या विरोधी होते. गव्हाच्या साठवणीतील टोके किडे गव्हापासून तसेच गव्हात उत्पन्न होतात असा समज होता पण हे किडे म्हणजे प्रत्यक्षात पंखयुक्त कीटकांनी घातलेल्या अंड्यांपासून तयार झालेले डिंभक (मऊ जाड अळ्या) असतात, असे लेव्हेनहूक यांनी दाखविले. पिसवांच्या संरचनेचे व त्यांच्या संपूर्ण जीवनातील रूपांतरणाचे वर्णन करून त्यांनी पिसवा या वाळू, धूळ इत्यादींपासून तयार होणारे सूक्ष्म व तिरस्करणीय जीव आहेत हे मत चुकीचे आहे, असे दाखविले. कोणत्याही मोठ्या प्राण्याप्रमाणेच पिसवांत अनुरूप परिपूर्णता आहे व पंखयुक्त कीटकांच्या नेहमीच्या मार्गानेच त्यांची निपज होते, असे त्यांनी सिद्ध केले. अशाच प्रकार मुंगी, ईल तसेच खाऱ्या व गोड्या पाण्यातील कालव या प्राण्यांच्या जीवनक्रमाचा त्यांनी काळजीपूर्वक अभ्यास केला आणि स्वयंजननाचा सिद्धांत चुकीचा असल्याचे दाखवून दिले.
लेव्हेनहूक यांनी एका मित्राद्वारे लंडनच्या रॉयल सोसायटीशी संपर्क साधला आणि १६७३ ते १७२३ या काळात अनौपचारिक पत्रांतून त्यांनी आपले बहुतेक शोध या संस्थेला कळविले. या संस्थेचे सदस्य म्हणून १६८० मध्ये त्यांची निवड झाली. या संस्थेच्या फिलॉसॉफिकल ट्रँझॅक्शन्स या प्रकाशनात लेव्हेनहूक यांचे बहुतेक शोध ३७५ पत्रांद्वारे प्रसिद्ध झाले. सूक्ष्मजंतूचे पहिले प्रतिरूप १६८३ मध्ये या प्रकाशनात प्रसिद्ध झालेल्या लेव्हेनहूक यांच्या रेखाचित्रात आढळते. पॅरिस ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचेही ते १६९९ मध्ये पत्रव्यवहारी सदस्य झाले व या संस्थेच्या संस्मरणिकेत त्यांची २७ पत्रे प्रसिद्ध झाली. त्यांच्या आयुष्यातच त्यांचे कार्य एकत्रित स्वरूपात डच भाषेत (१६८५-१७१८) व लॅटिन भाषेत (१७१५-२२) प्रसिद्ध झाले. यांपैकी काही निवडक कार्याचे एस्. हूल यांनी इंग्रजीत भाषांतर केले (१७९८-१८०७). त्यांच्या शोधांच्या नाट्यपूर्ण स्वरूपामुळे त्यांना जागतिक कीर्ती मिळाली आणि इंग्लंडच्या राणी, पीटर द ग्रेट यांसारख्या अनेक मान्यवर व्यक्तींनी त्यांच्या भेटी घेतल्या. बेल्जियममधील लूव्हाँ विद्यापीठाने त्यांना सन्मानार्थ रौप्य पदक दिले. ते डेल्फ्ट येथे मृत्यू पावले.
कुलकर्णी, नी. बा. गोडबोले, श्री. ह.
“