लेगहॉर्न : (इटालियन भाषेत लीव्हॉरनॉ). मध्य इटलीतील तस्कनी विभागात मोडणाऱ्या लीव्हॉरनॉ प्रांताची राजधानी व देशातील एक प्रमुख सागरी बंदर. लोकसंख्या १,७५,३७१ (१९८१).लीव्हॉरनॉ या नावाने ते अधिक परिचित आहे. ते लिग्यूरियन समुद्रकिनाऱ्यावर आर्नो नदीच्या मुखापासून दक्षिणेस सु. १६ किमी. व फ्लॉरेन्सच्या नैॠत्येस ९६ किमी.वर वसले आहे. कालवे, रस्तेआणिलोहमार्ग यांनी ते अन्य शहरांशी जोडले असून जवळच्या स्टॅन्यो येथील विमानतळावरून हवाई वाहतूक चालते.
मुळात हे मच्छीमारी बंदर असून चौदाव्या शतकापर्यंत एक छोटे गाव होते. नंतर त्याची मालकी सतत बदलत राहीली. सुरुवातीस ते पिसा येथील चर्चच्या ताब्यात होते (११०३). त्यानंतर व्हीस्कोन्ती कुटुंबाच्या ताब्यात इटलीचा बराच भाग होता (१३९९). पुढे जेनोआने ते विकत घेतले (१४०७) आणि नंतर फ्लॉरेन्सच्या ताब्यात आले (१४२१). या सत्ताधीशांपैकी मेदीची या तस्कनीच्या सरदार कुटुंबाच्या काळापासून त्याचे महत्त्व वाढले. त्या घराण्यातील पहिला कॉझीमो याने बंदर बांधले(१५७१). पुढे त्याचा मुलगा पहिला फर्डिनँड (कार. १५८७-१६०९) याने रोमन कॅथलिक, ज्यू, मूर इ. लोकांना येथे आश्रय दिला आणि व्यापारी वर्ग संघटित करून या गावास शहराचा दर्जा दिला. पवित्र रोमन सम्राट दुसरा लिओपोल्ड (१७४७-९२) हा मेदीचीच्या गादीवर आला. त्याने शहराचा विस्तार करून परदेशी व्यापाऱ्यांना खास सवलती दिल्या आणि लेगहॉर्नला खुल्या बंदराचा दर्जा दिला बंदरात उभ्या राहणाऱ्या बोटींच्या सुरक्षिततेसाठी समुद्रात भव्य गोलाकार भिंत बांधली. तस्कनी प्रदेश संयुक्त इटलीचा भाग होईपर्यंत (१८६०) लेगहॉर्नने खुल्या बंदराचा दर्जा उपभोगला. पहिल्या नेपोलियनच्या वेळी (१७९२-१८१४) झालेल्या युद्धात बंदराचे नुकसान झाले. फॅसिस्ट राजवटीच्या काळात (१९२२-३९) आणखी काही सुधारणा करण्यात आल्या. दुसऱ्या महायुद्धात बंदराचेही खूप नुकसान झाले. त्यानंतर देशातील भूमध्य समुद्राकडे माल पाठविण्याचे ते एक प्रमुख केंद्र बनले आहे. तेथून शुद्ध तेल, तैलजन्य पदार्थ, काच, संगमरवर , मद्य, ऑलिव्ह तेल, तांबे व त्याचे मिश्रधातू आणि सोडियम कार्बोनेट सोडियम हायड्रेट यांसारखी रसायने निर्यात होतात.
विसाव्या शतकात बंदराचा औद्योगिक विकास झाला. येथे जहाजबांधणी व दुरूस्ती, यंत्रनिर्मिती तसेच ॲल्युमिनियम, पोलादव तांबेनिर्मिती, तेलशुद्धीकरण व रसायने यांचे कारखाने इ. उद्योग चालतात. यांशिवाय मोटारींची यंत्रसामग्री, साबण व काचनिर्मिती हे उद्योगही आढळतात. येथील कलाकुसरीच्या वस्तू व गवती हॅट प्रसिद्ध आहेत. नगराच्या दक्षिण भागात आर्डेन्झा आणि अँटिग्नानो येथे पर्यटक निवासस्थाने व पुळणी आहेत.
प्राचीन शहर पंचकोनाकृती असून तेथे अनेक ऐतिहासिक अवशेष आहेत. त्यांत जुना व नवा किल्ला, फर्डिनँड याचा चबुतरा, ग्रँड ड्यूकचा संगमरवरी पुतळा, चार मूर गुलामांचा ब्राँझचा पुतळा, सोळाव्या शतकातील कॅथीड्रल आणि मध्ययुगीन प्रॉटेस्टंट दफनभूमी आढळतात. शेली व बायरन हे प्रसिद्ध इंग्रज कवी १८१८ ते १८२२ पर्यंत येथे राहिले होते. त्यांची निवासस्थाने आणि नगर वस्तुसंग्रहालय ही पर्यटकांची खास आकर्षणे होत. मत्स्यालय आणि इटालियन नाविक अकादमी यांमुळे शहराचे महत्त्व वाढले आहे. येथे फार मोठ्या प्रमाणावर मच्छीमारीचा व्यवसाय चालतो.
फडके, वि. शं.