लेअव्हि-माँतॅल्चिनी, रीता : (२२ एप्रिल १९०९- ). इटालियन-अमेरिकन महिला जीववैज्ञानिक. १९८६ चे शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यक विषयातील नोबेल पारितोषक त्यांना व अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ स्टॅन्ली कोएन यांना त्यांच्या अनुक्रमे तंत्रिका (मज्जा) व अधिचर्म वृद्धी घटकांच्या शोधाबद्दल विभागून देण्यात आले.
लेअव्हि-माँतॅल्चिनी यांचा जन्म तूरिन (इटली) येथे झाला. १९३६ मध्ये त्यांनी तुरिन विद्यापीठाची एम्.डी. पदवी संपादन केली. तंत्रिकाविज्ञान आणि मनोदोष-चिकित्सा या विषयांतील तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून १९४० मध्ये त्याच विद्यापीठाची विशेषत्वाची पदवी त्यांनी मिळविली. १९३६-३८ मध्ये त्यांची तूरिन विद्यापीठाच्या तंत्रिकाविज्ञान व मनोदोष चिकित्सा विभागत साहाय्यिका म्हणून नेमणूक झाली. त्या ज्यू धर्मीय असल्याने त्यांना या पदावरून काढून टाकण्यात आल्यावर १९३८-४० मध्ये ब्रूसेल्स (बेल्जियम) येथील तंत्रिकाविज्ञान संस्थेत त्यांनी काम केले परंतु जर्मनीने बेल्जियमवर आक्रमण केल्यावर त्या इटलीला परत आल्या व १९४०-४३ या काळात त्यांनी पिमाँत येथील आपल्या राहत्या घरीच एक छोटे संशोधन केंद्र सुरू केले. १९४३-४४ मध्ये जर्मनीने इटलीचा ताबा घेतला तेव्हा त्या फ्लॉरेन्समध्ये भूमिगत झाल्या होत्या. त्यांनी १९४४-४५ मध्ये इटालियन निर्वासितांच्या छावणीत अमेरिकन लष्कराबरोबर वैद्य म्हणून काम केले. युद्ध संपल्यावर १९४५-४७ मध्ये त्या तूरिन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ ॲनॉटॉमी या संस्थेत साहाय्यिका होत्या. १९४७-५१ मध्ये त्यांनी अमेरिकेतील सेंट लूइस येथील वॉशिंग्टन विद्यापीठातील प्राणिविज्ञान विभागात व्हिक्टर हॅम्बर्गर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन साहाय्यिका म्हणून काम केले. त्यानंतर १९५१-५८ या काळात त्या तेथेच सहयोगी प्राध्यापिका व पुढे १९५८-६१ मध्ये प्राध्यापिका झाल्या. १९५६ मध्ये त्या अमेरिकेच्या नागरिक झाल्या परंतु १९१ मध्ये त्या इटलीला परत गेल्या व तेथे इन्स्टिट्यूट ऑफ सेल्यूलर बायॉलॉजी या संस्थेत ज्येष्ठ वैज्ञानिक म्हणून काम करू लागल्या. १९६१-६९ मध्ये त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठ व रोम येथील इन्स्टिट्यूटो डी सॅनिता यांच्या संयुक्त विद्यमाने एक संशोधन कार्यक्रम प्रस्थापित केला. पुढे १९६९-७९ या काळात त्या रोम येथील नॅशनल कौन्सिल ऑफ रिसर्चच्या कोशिका जीवविज्ञान प्रयोगशाळेच्या संचालिका होत्या आणि १९६९-७७ मध्ये वॉशिंग्टन विद्यापीठातील जीवविज्ञान विभागात प्राध्यापिकाही होत्या व तेथेच १९७७ पासून गुणश्री प्राध्यापिका आहेत. १९७९-८४ मध्ये त्या नॅशनल कौन्सिल ऑफ रिसर्चच्या कोशिका (पेशी) जीवविज्ञान प्रयोगशाळेत पूर्ण वेळ संशोधिका होत्या व १९७९ पासून तेथेच पाहुण्या प्राध्यापिका आहेत.
हॅम्बर्गर यांनी १९४८ च्या सुमारास कोंबडीच्या भ्रुणातील परिसरीय तंत्रिका तंत्रामधील [èतंत्रिका तंत्र]कोशिकांच्या परिपक्व प्राण्यातील ज्या इंद्रियांवर त्या पुढे प्रभाव पाडतील त्यांच्याशी संबंध जोडण्याच्या प्रक्रियेसंबंधी संशोधन सुरू केले होते. १९४८ मध्ये दुसऱ्या एका शास्त्रज्ञांना असे आढळले की, उंदरांच्या संयोजी ऊतकावर (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहावर) परिणाम करणाऱ्या विशिष्ट मांसकर्काच्या (भ्रूणमध्यस्तरापासून बनणाऱ्याऊतकांत उद्भवणाऱ्या मारक अर्बुदाच्या म्हणजे नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे होणाऱ्या गाठीच्या) तुकड्याचे कोंबडीच्या तीन दिवसांच्या भ्रूणात रोपण केले, तर भ्रूणाचे तंत्रिका तंतू त्यावर झपाट्याने आक्रमण करतात. १९५२ मध्यो लेअव्हि-माँतॅल्चिनी यांनी या प्रयोगाचा विस्तार केला आणि अर्बूदाने सोडलेल्या व रक्तप्रवाहातील भ्रूणाकडे वाहून नेल्या जाणाऱ्या विद्राव्य (विरघळणाऱ्या) पदार्थामुळे ही तंत्रिका वृद्धी होते, असे सिद्ध केले. भ्रूणापासून अलग केलेल्या व संवर्धन माध्यमात जिवंत ठेवलेल्या तंत्रिका तंतूंचीही मांसकर्काने उत्पन्न केलेल्या द्रव्यामुळे अशीच झपाट्याने वाढ होते, असे त्यांनी १९५३ मध्ये दाखविले. हा विद्राव्य घटक १९५४ पासून तंत्रिका वृद्धी घटक (नर्व्ह ग्रोथ फॅक्टर, एनजीएफ) म्हणून ओळखला जाऊ लागला आणि अखंड अंड्यांऐवजी संवर्धनांचा वापर करण्याची लेअव्हि-माँतॅल्चिनी यांची पद्धत या घटकाच्या अभ्यासाकरिता अनेक प्रयोगशाळांत व्यावहारिक èजैव आमापनाची एक प्रमाणभूत पद्धत म्हणून स्वीकारण्यात आली. कोएन यांचा १९५३ मध्ये हॅम्बर्गर यांच्या संशोधक गटात समावेश झाल्यावर लेअव्हि-माँतॅल्चिनी यांनी त्यांच्या सहकार्याने एनजीएफ वरील पुढील संशोधन केले. मांसकर्कातील कोशिकांमधून एनजीएफ अलग करणे व ते शुद्ध करणे, हे कोएन यांचे प्रारंभिक उद्दिष्ट होते. अर्बुद कोशिका अलग केलवर त्यांनी त्यांचे अनेक निरनिराळे भाग केले आणि प्रथिने व èन्युक्लिइक अम्ले यांनी बनलेल्या एका घटकामुळे तंत्रिका वृद्धीची क्रिया होते, असे त्यांनी दाखविले. यांपैकी कोणते द्रव्य तंत्रिका वृद्धीला कारणीभूत असते याचा शोध घेण्यासाठी लेअव्हि-माँतॅल्चिनी व कोएन यांनी या मिश्रणावर अल्पशा सर्पविषाची प्रक्रिया केली. सर्पविषामुळे न्यूक्लिइक अम्लांचे अपघटन (घटक द्रव्ये अलग होण्याची क्रिया) झाले पण प्रथिनांवर काही परिणाम झाला नाही. या प्रक्रियेमुळे अर्बुद अर्काच्या क्रियेत विलक्षण वाढ झाल्याचे दिसून आले. या विस्मयजनक परिणामामुळे अर्बुदापेक्षा सर्पविष हा एनजीएफचा अधिक विपुल उद्गम असल्याचे समजले. या शोधाचा उपयोग करून कोएन यांनी सर्पविषातील घटक अलग करून शुद्ध केला व तो प्रथिन आहे हे सिद्ध केले. कृंतक (भक्ष्य कुरतडणाऱ्या) प्राण्यांतील अधोहनू लाला ग्रंथी हा अर्बुद आणि सर्पविष यांच्यापेक्षाही एनजीएफचा अधिक विपुल उद्गम असल्याचे १९५९ मध्ये दिसून आले. लेअव्हि-माँतॅल्चिनी व कोएन यांचे शोध हा विकसन तंत्रिका जीवविज्ञानातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. यामुळे तंत्रिका विकासातील यंत्रणांचा शोध घेण्यासाठी रासायनिक निश्र्चिती केलेला संकेत पदार्थ प्रथमच वापरणे शक्य झाले. लेअव्हि-माँतॅल्चिनी यांनी नंतरही एनजीएफ संबंधीचे संशोधन पुढे चालू ठेवले. १९७५ नंतर इतर अनेक वृद्धी घटक (उदा., इंटरल्युकीन-२, सोमॅटोमेडीन वगैरे) निरनिराळ्या संशोधक गटांनी शोधून काढले आणि त्यांनी लेअव्हि-माँतॅल्चिनी व कोएन यांनी विकसित केलेल्या मार्गाचाच त्याकरिता उपयोग केला.
नोबेल पारितोषिकाखेरीज लेअव्हि-माँतॅल्चिनी यांना एफ्. ओ. श्मिट पुरस्कार (१९८१), लूइस रोझेनटिएल पुरस्कार (१९८२), इमॅजिन इटॅलिया (१९८३), लुइझा ग्रॉस हॉरविट्झ पुरस्कार (१९८३), ॲल्बर्ट लास्कर पुरस्कार (१९८६)वगैरे सन्मान मिळाले आहे. तसेच त्यांना अप्साला विद्यापीठ (स्वीडन, १९७७) व्हाईट्समान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (इस्त्राएल, १९७८), सेंट मेरी कॉलेज (इंडियाना, १९८०) व वॉशिंग्टन विद्यापीठाची वैद्यकीय शाळा (१९८२) यांनी सन्माननीय डॉक्टरेट पदव्या दिलेल्या आहेत. अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९६८) व ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस (१९६६), फ्लॉरेन्स ॲकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस (१९८१) तसेच इतर कित्येक परदेशी मान्यवर वैज्ञानिक संस्थांच्या त्या सदस्या आहेत.
जमदाडे, ज. वि.