लुयव् : (११२५-१२१०). श्रेष्ठ चिनी कवी. जजिआंग प्रांतातील शान-यिन येथे जन्मला. त्याच्या काळातला चीन दुबळा होता आणि त्या देशाचा जवळजवळ अर्धा भाग परकीयांनी व्यापलेला होता. लु यवने निर्वासितपणाचा अनुभव घेतला होता. लढण्याचे शिक्षण घेतले होते. वीस वर्षे तो सैन्यात होता. त्याची देशभक्ती प्रखर होती आणि शत्रूचा अनुनय करणे त्याला आवडत नसे. त्याच्या देशप्रेमाचे प्रतिबिंब त्याच्या कवितांत पडलेले आहे. ८५ वर्षांच्या आपल्या दीर्घायुष्यात त्याने नऊ हजारांहून अधिक कविता लिहिल्या. चिनी भाषेतील उत्कृष्ट देशभक्तिपर कवितांत त्याच्या कवितांचा अंतर्भाव केला जातो. ‘माझ्या मृत्यूनंतरही माझा हा देश विभक्तावस्थेत आहे, हेच माझे एकमेव दु:ख असेल. राजाच्या फौजा जेव्हा उत्तरेकडचा प्रदेश पुन्हा मिळवतील, तेव्हा तुमच्या प्रार्थनेतून मला तो निरोप कळवावयास विसरू नका’ अशा आशयाच्या त्याच्या काव्यपंक्ती प्रसिद्ध आहेत. लोकभाषा, लोकजीवन आणि लोकांच्या भावना ह्यांबद्दल त्याला अत्यंत आदर होता. त्याचे निसर्गप्रेमही त्याने त्याच्या कवितेतून व्यक्त केले आहे
थान जुंग (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)