बाल कंपवात : प्रामुख्याने बालवयात आढळणाऱ्या, अनियमित, अंगग्रही (स्नायूंचे आकस्मिक, अनैच्छिक व जोराने आकुंचन होणाऱ्या), अनैच्छिक शारीरिक हालचाली हे मुख्य लक्षण असलेल्या, विषाक्त संसर्गी विकृतीला बालकंपवात म्हणतात. हातापायाच्या किंवा चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये या हालचाली दिसतात. ही विकृती तीव्र संधिवाताच्या तंत्रिका तंत्राच्या (मज्जासंस्थेच्या) काही भागावरील परिणामांमुळे उद् भवत असावी, असा समज आहे. या विकृतीला टॉमस सिडनम (१९२४-८९) या इंग्रज वैद्यांच्या नावावरून ‘सिडनम बालकंपवात’, विशिष्ट हालचालींमुळे व सेंट व्हायटस नावाच्या संतांच्या चर्चमध्ये प्रार्थना केल्याने बरा होतो अशा समजुतीमुळे ‘सेंट व्हायटस नृत्य’, ‘संधिवातजन्य बालकंपवात’, व ‘गौण बालकंपवात’ अशी दुसरी नावे आहेत.

सर्व जातीजमातींत आढळणारी ही विकृती मुलांपेक्षा मुलींमध्ये दुप्पट प्रमाणात आढळते. व ती बहुतकरून ५ ते १५ वर्षे वयाच्या दरम्यान आढळते. या विकृतीचा विशिष्ट आजार म्हणून विचार करण्याऐवजी एक लक्षणसमूह म्हणून विचार केल्यास ही लक्षणे इतर काही आजारांतही आढळतात. गती व हालचाल यांसंबंधी प्रमुख लक्षण असलेल्या आजारांना ‘अपगतिमुक्त आजार’ असे म्हणतात. अपसामान्य अनैच्छिक हालचाली असलेल्या विकृतीमध्ये अनियमित, अंगग्रही, एकाएकी उद् भवणाऱ्या, शरीरातील एका दुसऱ्या स्नायुगटात यदृच्छ अथवा स्वैर फिरणाऱ्या हालचालींचा समावेश असलेला एक गट आढळतो व या गटात बालकंपवाताचा समावेश होतो. या गटात पुढील विकृतींचा समावेश होतो. (१) हंटिंग्टन कंपवातः जी. एस्. हंटिंग्टन (१८५१-१९१६) या अमेरिकन वैद्यांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या या विकृतीलाच आनुवांशिक किंवा चिरकारी कंपवात म्हणतात. मध्यम वयात उद् भवणारी ही विकृती मनोभ्रंशयुक्त असून सतत वाढत जाते. लक्षणे सुरू झाल्यापासून सर्वसाधारणपणे पंधरा वर्षांच्या आत रोगी दगावतो. (२) अवटुविषाक्तता : या विकृतीला ‘अत्यवटुत्व’ असेही म्हणतात [⟶ अवटु ग्रंथि]. (३) सार्वदेहिक आरक्तचर्मक्षय : त्वचेतील संयोजी ऊतकात (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहात) शोथ (दाहयुक्त सूज) उत्पन्न होऊन निरनिराळी लक्षणे उत्पन्न करणारी, बहुधा तरुण स्त्रियांत उद् भवणारी अज्ञातहेतुक (कारण अज्ञात असलेली) विकृती. (४) रक्तकोशिकाधिक्य-रक्तता : रक्तातील तांबड्या कोशिकांची संख्या वाढणे. अस्थिमज्जेची (हाडांच्या मधील पोकळीत असणाऱ्या मऊसर पदार्थाची) अतिवृद्धी, प्लीहावृद्धी (पानथरीची वाढ) व यकृतवृद्धी ही लक्षणे असलेली विकृती. (५) औषधजन्य कंपवात : फेनीटॉइन सोडियम अथवा डायलँटीन नावाचे औषध ⇨अपस्मार या रोगात पुष्कळ दिवस घ्यावे लागते आणि त्यामुळे कधीकधी कंपवात उद् भवतो. स्त्रियांमध्ये संततिप्रतिबंधक गोळ्यांच्या सेवनामुळेही कंपवात होण्याचा संभव असतो. (६) अर्धांग कंपवात : मस्तिष्काघात (मेंदूतील रक्ताघाती आघातजन्य विकृती), मेंदूतील अर्बुद (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणारी गाठ), डोक्याच्या कवटीवरील आघात किंवा मेंदूतील अमिवाही मस्तिष्क केंद्रावरील शस्त्रक्रियेनंतर एक हात व एक पाय जोराने फेकल्यासारख्या होणाऱ्या हालचाली.

वरील विकृतींशिवाय डांग्या खोकला, घटसर्प, कॅल्शियम न्यूनत्व, गर्भारपणातील कंपवात इ. विकृतींतही कंपवात हे लक्षण आढळते. प्रस्तुत नोंदीत फक्त बालकंपवाताविषयीच माहिती दिली आहे. ‘कंपवात’ अशी स्वतंत्र नोंद असून तिच्यात प्रौढ वयामध्ये उद् भवणाऱ्या स्वतंत्र विकृतीचीच माहिती दिलेली आहे. बालकंपवाताच्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांत या आजाराबरोबरच, आजारापूर्वी किंवा नंतर, संधिज्वरातील हृद् दाह, ह्दयातील झडपांची विकृती किंवा संधिशोथ ही लक्षणे आढळतात. यामुळे बालकंपवात व संधिज्वर यांचा संबंध असल्याचे मानले जाते. बालकंपवात झालेला रुग्ण क्वचितच मृत्यूमुखी पडतो व या कारणामुळे शवविच्छेदनाची पुरेशी संधी न मिळून या विकृतीचा विकृतिविज्ञानविषयक सखोल अभ्यास झालेला नाही. मेंदूमध्ये प्रसृत मस्तिष्कशोथ (निरनिराळ्या भागांत कमीअधिक प्रमाणात रोहिणीशोथ व कोशिकांचे विघटन झालेले) आढळतो.

लक्षणे : रोगाची सुरुवात बहुधा हळूहळू होते. क्वचितच रोग एकाएकी सुरू होतो. सुरुवातीची लक्षणे ही चिडखोरपणा, क्षोभ, दुर्लक्ष, अवज्ञा, क्षुल्लक कारणावरून रडणे अशी मानसिक असतात. त्यानंतर वस्तू नीट धरता न येणे, हातपाय वेडेवाकडे ठेवणे व विपरीत गती ही हालचालविषयक लक्षणे उद् भवतात. शाळेतील मागासलेपणा, वर्तणुकीतील थंडपणा, चेहरा वेडावाकडा करणे इत्यादींमुळे मुलास मानसिक विकृती झाल्याचा संशय येण्याचा संभव असतो. हेतुविहीन, अनैच्छिक आणि विनाकारण केलेल्या हालचालींमुळे बालकंपवाताची शंका येते. या हालचाली विश्रांती घेत असताना म्हणजे स्थिर असतानाही होतात आणि कोणताही ऐच्छिक प्रयत्न त्यात भर घालतो. झोपेत त्या थांबतात. कधीकधी हालचाली शरीराच्या अर्ध्या भागात मर्यादित असतात. गंभीर रोगात स्नायूंचे शैथिल्य व अशक्तपणा जाणवतो. मुलास जीभ बाहेर काढण्यास सांगितले असता ती आतबाहेर होत राहते.

निदान व चिकित्सा : बालकंपवाताच्या निदानासाठी कोणतीही प्रयोगशालीय परीक्षा उपलब्ध नाही. वरील लक्षण समुच्चयावरून निदान करतात. ही विकृती स्वमर्यादित स्वरूपाची असून दोन ते सहा महिन्यांत पूर्ण बरी होते. तीवर विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. पूर्ण विश्रांती, सहानुभूतिपूर्ण वातावरण आजार बरा करण्यास मदत करतात. डायझेपाम, फिनोथायाझोन यांसारखी मनःशांती राखणारी औषधे उपयुक्त असतात. एकचतुर्थांश रोग्यांत रोग पुन्हा उद् भवण्याची शक्यता असते. एकतृतीयांश रोग्यांत संधिवातजन्य हृद् रोग आढळतो आणि त्याच प्रमाणात चिरकारी (दीर्घकालीन) हृद् रोग होण्याची शक्यता असते. स्ट्रेप्टोकोकाय या सूक्ष्मजंतूंमुळे होणाऱ्या विकृतीच्या प्रतिबंधाकरिता पेनिसिलीन उपयुक्त असते. ते वयाच्या विशीपर्यंत तोंडाने घेणे हितावह असते.

संदर्भ : Scott, R. B., Ed., Price’s Textbook of Practice of Medicine, Oxford, 1977.

कुलकर्णी, श्यामकांत भालेराव, य. त्र्यं.