ली, त्र्यूग्व्हेर हाल्व्हदान : (१६ जुलै १८९६-३० डिंसेबर १९६८). नॉर्वेमधील एक मुत्सद्दी, संयुक्त राष्ट्रे या संघटनेचा पहिला महासचिव व परराष्ट्रनीतिज्ञ. त्याचा जन्म संयुमान्य कामगार कुटुंबात ऑस्लो (नार्वे) येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव जॉयनर. तरुणपणीच मजूर पक्षाच्या कार्यालयात त्याला नोकरी मिळाली. नोकरीत असतानाच त्याने ऑस्लो विद्यापीठातून बार ॲट लॉ पदवी घेतली. (१९१९) व्यापारी संयुक्त संघाचा कायदा सल्लागार आणि मजूर पक्षाचा तो सचिव झाला. पुढे नार्वेच्या संसदेवर निवडून आल्यावर (१९३५), त्याच वर्षी तो योहान न्यूगोर्सव्होलच्या नेतृत्वाखाली मजूर मंत्रिमंडळात विधिमंत्री झाला. त्याच्याकडे व्यापार-उद्योग, जहाजबांधणी, मच्छीमारी ही खाती सुपूर्त करण्यात आली (१९३९) आणि नंतर तो परराष्ट्रमंत्री झाला (१९४०). जर्मनीने युद्धकाळात (१९४०-४५) नॉर्वे पादाक्रांत केला, तेव्हा हद्दपारीत त्याने नार्वेचा परराष्ट्रमंत्री म्हणून काम केले. युद्धानंतर नार्वेचा प्रतिनिधी म्हणून तो सॅन फ्रॅन्सिस्को येथील परिषदेला हजर राहिला. या परिषदेतच संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सनदेचा मसुदा (स्थापन करण्याबाबतचा) तयार करण्यात आला. जागतिक युद्धसमाप्तीनंतर आणि नॉवला पुन्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तो गेअरहर्डसेनच्या मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री होता (१९४५).

लंडन येथील संयुक्त राष्ट्रे या संघटनेच्या पहिल्या आमसभेत त्याची पहिला महासचिव म्हणून पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली (१ फेब्रुवारी १९४६). संयुक्त राष्ट्रे या संघटनेने त्याच्या मार्गदर्शनाखाली चीनचा प्रवेश, बर्लिनची नाकेबंदी, कोरियन युद्ध इ. वादग्रस्त प्रश्नांवर चर्चा घडवून आणली. अरब-इझ्राएल संघर्षात युद्धविराम-तह (१९४८) घडवून आणण्यात त्याने पुढाकार घेतला व इंडानेशियाची पारतंत्र्यातून मुक्तता करण्याचे प्रयत्न केले (१९५०). त्याने उत्तर कोरियावर दोषारोप केले आणि दक्षिण कोरियाला संयुक्त राष्ट्रांनी मदत द्यावी, असे आवाहन केले. यामुळे साम्यवादी देशांत त्याच्याविषयी नाराजी व्यक्त झाली.

हिवाळी अधिवेशनात १९५० मध्ये सुरक्षा समितीपुढे फेरनिवडणुकीचा प्रश्ना उभा राहिला. त्याला रशियाने रोधाधिकार वापरला तथापि आमसभेने तीन वर्षांकरिता त्यास मुदतवाढ दिली (१९५४). ही गोष्ट ली याला खटकली, त्याने या पदाचा राजीनामा दिला (१९५२). आणि कम्युनिस्ट राष्ट्रांचा विरोध निदर्शनास आणला. त्यानंतर डाग हामारशल्ड महासचिव झाला. उर्वरित जीवन त्याने देशसेवेत व्यतीत केले. त्याची ऑस्लो व ऑकर्सह्यूस प्रांतांचा अनुक्रमे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.

त्याने विपुल (६१ ग्रंथ) ग्रंथलेखनही केले. त्यापैकी इन द कॉझ ऑफ पीस (१९५४), टू लिव्ह ऑर टू डाय (१९५५),विथ इंग्लंड इन द फ्रन्ट लाइन (१९५६) इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत.

गिलो येथे तो मरण पावला. ली हा निःपक्षपाती, न्यायप्रिय महासचिव व विधिज्ञ होता. त्याने परिस्थित्यनुसार जागतिक शांतता व सुरक्षा यांसाठी पक्षपाती भूमिका घेतली. परिणामतः त्यास रशिया धार्जिणा, अमेरिका धार्जिणा इ. आरोप सहन करावे लागले आणि अखेर रशिया व त्याच्या अंकित राष्ट्रांनी त्याच्या महासचिवपदालाच विरोध केला.

संदर्भ : 1. Cordier, A. W. Foote, Wilder, Ed. Public Papars : 1946-1956, New York, 1969.

            2. Schwebel, Stephen, The Secretary General of the United Nations, Harvard, 1952.

घाडगे, विमल