लुंगलेई : भारताच्या मिझोराम राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व त्याच जिल्ह्याचे मुख्यालय. लोकसंख्या १७,७७३ (१९८१). ते मिझो टेकड्यांत ऐजालच्या दक्षिणेस सु. ९३ किमी. वर आणि सैहा शहराच्या उत्तरेस सु. ४३ किमी. वर राज्याच्या मध्यवर्ती वसले आहे. त्याचा परिसर उत्तर-दक्षिण पसरलेल्या उंच-सखल पर्वतश्रेणी आणि त्यांमधून वाहणाऱ्या ढालेश्वरी (त्लावंग) व तुइव्हावल या नद्यांच्या दऱ्याखोऱ्यांनी बनला आहे. त्यामुळे येथील हवामान वर्षभर आल्हाददायक असते. हिवाळ्यात सरासरी तापमान ११० से. ते २४० से. यांदरम्यान, तर उन्हाळ्यातील सरासरी तापमान १८० से. ते २९० से. यांदरम्यान आढळते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३५० सेंमी. असून बांबूची वने (जंगले) आणि हिरवीगार वनश्री सर्वत्र दृष्टोत्पत्तीस येते. लुंगलेई येथे धान्याची मोठी बाजारपेठ असून त्याच्या परिसरात भात, कापूस, मका, भूईमूग तेलबिया ही प्रमुख पिके होतात.
शहरात पारंपरिक कुटिरोद्योग चालतात. त्यांत प्रामुख्याने हस्तव्यवसाय, हातमागव वेतकाम यांचा अंतर्भाव होतो. बांबूकामासाठी लुंगलेई प्रसिद्ध असून चटया, टोपल्या, वेताचे फर्निचर, हॅट इ. वस्तू येथे तयार होतात आणि या कलाकुसरयुक्त वस्तूंची येथून निर्यात होते. यांशिवाय शहरात रेशीम उत्पादन, भात सडण्याच्या गिरण्या, फळांवरील प्रक्रिया हे व्यवसायही चालतात. कापसाच्या पिकामुळे कापडउद्योगास प्रोत्साहन मिळाले आहे. सभोवतालच्या जंगलातून लाकूडफाटा, मध-मेण, रबर, डिंक, कात इ. वस्तू गोळा करून आदिवासी विकतात. शहरात पारंपरिक पध्दतीचे कपडे तयार करण्याचे छोटे धंदे आहेत.
देशपांडे, सु. र.