लिलिएसी : (पलांडु कुल). फुलझाडांपैकी [→ वनस्पती, आवृतबीज उपविभाग]⇨लिलिएलीझ या गणातील हे एक मोठे कुल असून यात सु. २५० प्रजाती व ३,७०० जाती (ए. बी. रेंडेल : २०० प्रजाती व २,६०० जाती जी. एच्. एम्. लॉरेन्स : २४० प्रजाती व ४,०००जाती) समाविष्ट केल्या आहेत. बहुतेक वनस्पती बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या)⇨ओषधी, लहान व मोठी झुडपे, लहान वृक्ष व वेली असून कित्येकांना भूमिस्थित (जमिनीतील) खोड असते. पाने मूलज (जमिनीतील खोडापासून किंवा मुळाच्या टोकापासून आलेली) किंवा स्कंधोद्भव (जमिनीवरच्या खोडावर आलेली) अथवा दोन्ही प्रकारची व विविध आकारांची , पातळ किंवा जाड (उदा., युका, कोरफड इ.) असतात. फुलोरे चवरी, कणिश, मंजरी [→ पुष्पबंध] अशा विविध प्रकारचे असतात. फुले नियमित व बहुधा द्विलिंगी असून परिदले सहा कधी सर्व सारखी तर कधी संवर्त व पुष्पमुकुट ओळखण्यासारखे व प्रत्येकी तीन पुष्पदलांचे असतात दले सुटी किंवा जुळलेली असतात. केसरदले (पुं-केसर) प्रत्येकी तीनच्या दोन वर्तुळांत व परिदलासमोर, अंशतः जुळलेली किंवा सुटी असतात. परागकोश दोन कप्प्यांचा असून तीन किंजदले (स्त्री-केसर) जुळून एक ऊर्ध्वस्थ किंजपुट बनतो त्यात तीन कप्पे व प्रत्येकात अनेक बीजके (अविकसित बीजे) असतात [→ फूल]. फळे शुष्क (बोंडे) किंवा मांसल (मृदुफळे) असतात. ह्या कुलात कांदा व लसूण यांसारखी खाद्य आणि शतावरी, कोरफड, चोपचिनी व गुटी यांसारखी औषधी तसेच युका, दर्शना, रस्कस, कळलावी, लिली इ. शोभेच्या वनस्पती आहेत. यातील लिली ऑफ द व्हॅली (कॉन्व्हलॅरीया मॅजॅलिस ) ही जंगली वनस्पती आकर्षक आहे [→ लिली].
पहा : कळलावी लिलिएलीझ.
जगताप, अहील्या पां.