लिमोझ : फ्रान्समधील लीमूर्झी प्रदेशाची तसेच ओट-व्ह्येन विभागाची राजधानी आणि महत्त्वाचे औद्योगिक व व्यापारी केंद्र. लोकसंख्या १,४०,४०० (१९८२). हे पश्चिम-मध्य फ्रान्समध्ये, बॉर्दोच्या ईशान्येस २१० किमी. व्ह्‍येन नदीच्या उजव्या तीरावर वसलेले आहे. प्राचीन काळी ‘लेमव्हाइसीझ’ या गॅलिक जमातीचे हे राजधानीचे ठिकाण होते. रोमन काळात हे ‘ऑगस्टाराइटम’ या नावाने प्रसिद्ध होते. इ.स. तिसऱ्या  शतकात सँ मॅर्स्यॅल संताने या नगरात ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला. त्याच्या चमत्कारांविषयीच्या दंतकथा झपाट्याने पसरल्याने वायव्य स्पेनमध्ये जाणाऱ्या  प्रमुख मार्गावरचे लोकांचे हे धार्मिक  आकर्षण स्थान बनले. सँ मॅर्स्यॅलचे स्मारक व थडगेही येथे आहे. नॉर्मनांनी हे शहर दोनदा लुटले होते. त्यानंतर नवव्या शतकात सीटे व शाटो असे याचे दोन स्वतंत्र भाग विकसित झाले. १७९२ मध्ये त्यांचे एकत्रीकरण झाले. इंग्लंड व फ्रान्स यांच्यातील शतवार्षिक युद्धात(१३३७-१४५३) हे दोन्ही भाग एकमेकांच्या विरोधात होते. १३७० मध्ये इंग्रजांनी जोरदार हल्ला करून ह्या शहराची लुटालूट केली. सोळाव्या शतकापर्यंत आग, प्लेग, व दुष्काळ यांमुळे नगराची अनेकदा हानी झाली. अठराव्या शतकातील चिनी मातीच्या भांड्यांच्या उद्योगामुळे या शहराला पूर्वीची प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त झाली.

मृत्तिकाशिल्पे, चिनी मातीची भांडी तयार करण्याच्या उद्योगासाठी लिमोझ जगप्रसिद्ध असून अठराव्या शतकापासून येथे हा उद्योग आहे. अलीकडे या उद्योगात नैसर्गिक वायूचा व उत्पादनाच्या आधुनिक तंत्रांचा अवलंब केला जातो. मीनाकारी उद्योगासाठीही हे विशेष प्रसिद्ध आहे लिमोझँ, पेनीको, लॉडीन, अलॉउड यांसारखे मीनाकारी उद्योगातील अनेक प्रसिद्ध कलाकार या शहराने निर्माण केले आहेत. यांशिवाय चामड्याच्या वस्तू, कागद, लाकडी सामान, मद्यनिर्मिती, ओतकाम, बंदुकीचे साहित्य, वस्रोद्योग, विद्युत् उपकरणे, मोटारी, यंत्राचे सुटे भाग, छपाई, मांस डबाबंदीकरण इ. उद्योगधंदे शहरात चालतात. शहराच्या आसमंतातून युरेनियम उत्पादन होते. शहरात मृत्तिका-कामाचे विद्यालय आहे. एड्रीएन-डबॉच हे वस्तुसंग्रहालय येथे असून मृत्तिका-वस्तूंच्या संग्रहासाठी ते जगप्रसिद्ध आहे. शहरात हवामानशास्रविषयक वेधशाळा तसेच लिमोझ विद्यापीठही (१८०८) आहे. ते १८४० मध्ये बंद करण्यात आले होते. परंतु १९६५ मध्ये पुन्हा सुरू करण्यात आले. येथील तेराव्या शतकातील रोमनेस्कगॉथिक कॅथीड्रल, तसेच चौदाव्या-पंधराव्या शतकांतील सँ मीशेलदेसलीआँ चर्च इ. वास्तू प्रसिद्ध आहेत.

चौधरी, वसंत