कॅनझस सिटी: अमेरिकेतील ह्याच नावाच्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. मिसूरी राज्यातील कॅनझस सिटीपासून फक्त राज्य सीमेने विभक्त. तेही त्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. लोकसंख्या १,६८,२१३ (१९७०). मिसूरीतील कॅनझस सिटीची लोकसंख्या ५,०७,३३० (१९७०). येथे कॅनझस नदी मिसूरीला मिळते. ही शहरे सेंट लूईसच्या पश्चिमेस ४५९ किमी. अंतरावर  आहेत. ही शहरे गोमांसाकरिता प्रसिद्ध असून येथे गुरांचे मोठमोठे कळप व पुष्कळ कत्तलखाने आहेत.  गोमांस डबाबंद करण्याचे अनेक लहान-मोठे कारखाने येथे आहेत. येथे अमेरिकेतील गुरांचे वार्षिक  प्रदर्शन भरते. आसमंतात गव्हाचे व मक्याचे पीक भरपूर येते. शहरात कृषी अवजारे, अन्नपदार्थ, पिठाच्या गिरण्या, दुभत्याचे पदार्थ, पोलाद व लोखंड, तेलविहिरी, तेल शुद्ध करणे, कपडे, छापखाने, विमाने व त्यांचे सुटे भाग, मोटारी व त्यांचे सुटे भाग, फर्निचर, इमारती लाकूड, साबण, सिमेंट, वगैरेंचे लहान मोठे उद्योग आहेत. येथे विद्यापीठ, कलाकेंद्र, महाविद्यालये, संगीत अकादमी,  कला संग्रहालये, ग्रंथालये इ. असून हे लोहमार्गाचे महत्त्वाचे केंद्र आहे. कॅनझस नदीच्या १९५१  मधील पुराने शहराचे बरेच नुकसान झाले. 

लिमये, दि. ह.