बारिसाल : बांगला देशाच्या खुलना विभागातील बाकरगंज जिल्ह्याचे प्रमुख ठाणे आणि महत्वाचे नदीबंदर. लोकसंख्या ९८,१२७ (१९७६ अंदाज). हे शहर गंगेच्या त्रिभुज प्रदेशात डाक्क्याच्या दक्षिणेस सु. ११२ किमी. वर बारिसाल नदीच्या पश्चिम तीरावर वसलेले आहे. देशातील डाक्का व चितगाँग या प्रमुख बंदरांशी हे जलमार्गाने जोडलेले आहे.

शहराला बारिसाल हे नाव बहुधा ‘बारिसाल गन्स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अद्‌भुत प्रकारावरूनच पडले असावे. या त्रिभुज प्रदेशात वरकरणी समुद्रावरून यावा असा वाटणारा झडणाऱ्या बंदुकांचा आवाज ऐकावयास येतो. त्याचे रहस्य अजूनही उलगडलेले नसले, तरी भूकंपाशी या आवाजाचा संबंध असावा, असे मानले जाते.

अठराव्या शतकाच्या मध्यास येथे मिठाच्या करवसुलीचे जकातनाके होते. येथे नगरपालिका (स्था. १८७६) असून डाक्का विद्यापीठाशी संलग्न अशी नऊ महाविद्यालये शहरात आहेत. येथील रस्ते प्रशस्त असून सार्वजनिक ग्रंथालय व उद्यान उल्लेखनीय आहेत.

ताग आणि तांदूळ यांच्या व्यापाराचे बारिसाल हे प्रमुख नौकांतर केंद्र असून पोफळी व मासळी यांची मोठी बाजारपेठ आहे. शहरात आटा तयार करणे, भात सडणे, तेल काढणे आणि ताग प्रक्रिया यांच्या गिरण्या असून विटा तयार करणे, चटया विणणे, बांबूवरील कलाकाम इ. कुटिरोद्योगही चालतात.

कापडी, सुलभा