लिपमान, फ्रिट्स आल्बर्ट : (१२ जून १८९९-२४ जुलै १९८६). जर्मन-अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. कोशिकीय चयापचयात (पेशीत सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींत) महत्त्वाच्या असलेल्या कोएंझाइम-ए या उत्प्रेरक (रासायनिक विक्रियेचा वेग बदलणाऱ्या) पदार्थाचा शोध लावल्याबद्दल त्यांना⇨सर हान्स आडोल्फ क्रेब्ज यांच्याबरोबर शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यक या विषयातील १९५३ सालच्या नोबेल परितोषिकाचा बहुमान विभागून मिळाला.

लिपमान यांचा जन्म जर्मनीतील कोनिग्जबर्ग येथे झाला. त्यांनी कोनिग्जबर्ग, बर्लिन व म्यूनिक या विद्यापीठांत वैद्यकीय शिक्षण घेऊन १९२४ मध्ये बर्लिन विद्यापीठाची एम्. डी. पदवी मिळविली. बर्लिन येथील कैसर व्हिल्हेल्म इन्स्टिट्यूटमध्ये ओटो मायरहोफ यांच्या प्रयोगशाळेत साहाय्यक म्हणून काम करून १९२७ मध्ये त्यांनी पीएच्. डी. पदवी संपादन केली. नंतर हायडल्‍बर्ग विद्यापीठातील मायरहोफ यांच्याच प्रयोगशाळेत १९२७-३० मध्ये त्यांनी संशोधन केले. १९३० मध्ये ते कैसर व्हिल्हेल्म इन्स्टट्यूटमध्ये संशोधन साहाय्यक म्हणून परत गेले. १९३१-३२ मध्ये त्यांनी न्यूयॉर्क येथील रॉकफेलर इन्स्टिट्यूमधील पी. ए. लेव्हीन यांच्या प्रयोगशाळेत रॉकफेलर अधिछात्र म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी कोपनहेगन येथील कार्ल्‍सबर्ग प्रतिष्ठानाच्या जीवरसायनशास्त्रीय प्रयोगशाळेत १९३२-३९ मध्ये काम केले. राजकीय कारणास्तव जर्मनीला परत जाणे अशक्य झाल्यावर त्यांनी अमेरिकेत स्थलांतर करून न्यूयॉर्क येथील कॉर्नेल मेडिकल स्कूलमधील जीवरसायनशास्त्रीय विभागात संशोधन साहाय्यक पदावर काम केले (१९३९-४१). १९४४ मध्ये ते अमेरिकेचे नागिरक झाले. बॉस्टन येथील मॅसॅचूसेट्‍स जनरल हॉस्पिटलमध्ये १९४१ पासून शस्त्रक्रियाविद्या विभागात संशोधन सहयोगी व पुढे तेथील जीवरसायनशास्त्र संशोधन प्रयोगशाळेत एका संशोधन गटाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. १९४९ मध्ये बॉस्टन येथील हार्व्हर्ड मेडिकल स्कूलमध्ये ते जीववैज्ञानिक रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. त्यानंतर १९५७ मध्ये न्यूयॉर्क येथील रॉकफेलर इन्स्टिट्यूटमध्ये (आता रॉकफेलर विद्यापीठ) ते प्राध्यापक झाले व १९७० मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर तेथेच गुणश्री प्राध्यापक झाले. तेथेच त्यांनी एका प्रयोगशाळेत मृत्यूपावेतो संशोधनकार्य पुढे चालू ठेवले होते.

लिपमान यांचे जीवरसायनशास्त्रातील महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी मांडलेले ऊर्जा संक्रामणाच्या जीवतंत्रविद्येचे व्यापक नियम हे होय. १९४१ मध्ये त्यांनी ऊर्जानिर्मिती व ऊर्जा उपयोजन यांतील ॲडिनोसीन ट्राय फॉस्फेट (एटीपी) हा सर्वसाधारण दुवा असलेल्या चयापचय जनित्राची संकल्पना मांडली. युग्मक यंत्रणेद्वारे उच्च-ऊर्जायुक्त फॉस्फेट बंध चयापचयात्मक रीतीने निर्माण केले जातात व एटीपीमध्ये दोन फॉस्फोरिल गट म्हणून ते स्थापित होतात. शरीरातील निरनिराळ्या उपयोजन केंद्रांकडे ते ऊर्जा वाहून नेतात. जैव संश्लेषणासाठी (साध्या संयुगांच्या वा मूलद्रव्यांच्या संयोगाने जटिल संयुगे तयार होण्याच्या जैव विक्रियेसाठी अथवा प्रक्रियेसाठी) चयापचयात्मक रीत्या निर्माण झालेल्या फॉस्फेट बंधांचा उपयोग करणाऱ्या अनेक यंत्रणांचे विश्लेषण करून लिपमान यांनी या नियमाच्या उपयुक्ततेची उदाहरणे दाखवून दिली. कार्बोहायट्रेटांच्या ⇨ऑक्सिडीभवनातील मध्यस्थ आणि लिपिडांचे (स्निग्ध पदार्थ, मेणे वगैरेंचे) रचनात्मक घटक असलेल्या क्रियाशील ॲसिटेटांच्या रासायनिक स्वरूपांसंबंधी संशोधन करीत असताना त्यांना कबुतराच्या यकृताच्या अर्कात उत्प्रेरण दृष्ट्या क्रियाशील असलेला व उष्णता दिली, तरी स्थिर राहणारा एक घटक आढळला. हा ॲसिटिल वाहक घटक १९४७ मध्ये त्यांनी अलग केला. त्याला कोएंझाइम-ए. हे नाव दिले आणि त्याची रेणवीय संरचना १९५३ मध्ये निर्धारित केली. हे कोएंझाइम ॲसिटिल किंवा इतर ॲरिल गट संक्रामित करण्यात आणि वसाम्लां च्या संश्लेषणात व ऑक्सिडीभवनात कार्य करते. लिपमान यांनी त्यानंतर प्रामुख्याने पेप्टाइडे व प्रथिने यांच्या संश्लेषणातील जैव यंत्रणांच्या विकासासंबंधी संशोधन केले.

लिपमान हे अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, फॅराडे सोसायटी, डॅनिश रॉयल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, लंडनची रॉयल सोसायटी वगैरे अनेक वैज्ञानिक संस्थांचे सदस्य होते. नोबेल पारितोषिकाखेरिज त्यांना अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान पदकाचा सन्मान मिळाला वाँडरिंग्ज ऑफ ए बायोकेमिस्ट हे त्यांचे आत्मचरित्र १९७१ मध्ये प्रसिद्ध झाले. ते पकिप्सी (न्यूयॉर्क राज्य) येथे मृत्यू पावले.

भालेराव, य. त्र्यं.