लिनेसी : (अतसी वा अळशी कुल). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित (बियांत दोन दलिका असलेल्या) वनस्पतींचे एक लहान कुल. याचा अंतर्भाव ⇨जिरॅनिएलीझ अथवा भांड गणात केला जातो परंतु जे. हचिन्सन यांनी मालपीगीएलिझमध्ये (माधवी गणात) याचा अंतर्भाव केला आहे. या कुलात एकून बारा प्रजाती आणि दोनशे नव्वद जाती (ए. बी. रेंडेल व जी. एच्.  एम्. लॉरेन्स : नऊ प्रजाती व सु. दोनशे जाती) असून त्या ⇨ओषधी व क्वचित ⇨क्षुपे (झुडपे) आहेत व त्यांचा प्रसार सर्वत्र आहे पण विशेषतः शीत कटिबंधात जास्त आहे. पाने साधी, एकाआड एक अगर समोरासमोर कधीकधी सोपपर्ण (पानांच्या तळाशी लहान उपांगे असलेली) फुलोरा कुंठित, द्विशाखवल्लरी [→ पुष्पबंध] आणि फुले द्विलिंगी, नियमित, बहुधा पंचभागी असतात संदले व प्रदले प्रत्येकी पाच, क्वचित प्रत्येकी चार व सुटी केसरदले (पुं-केसर) पाच, दहा किंवा वीस, तळाशी एका वलयात जुळलेली असतात. काही केसरदले वंध्य असतात. किंजदले (स्त्री-केसर) २-३-५, जुळलेली व किंजपुट ऊर्ध्वस्थ व अनेक कप्प्यांचा असतो कधीकधी अतिरिक्त पडद्यांनी अधिक कप्पे त्यात बसतात प्रत्येक कप्प्यांत १-२ अधोमुख व लोंबती बीजके असतात [→ फूल]. फळ (बोंड) पडद्यांच्या रेषेत तडकणारे किंवा आठळीयुक्त असते. बियांत पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) मांसल असून गर्भ बहुधा सरळ असतो. जी. बेंथॅम व जे डी. हूकर यांनी याच कुलात एरिथ्रोझायलेसी कुलाचा [→ कोका] अंतर्भाव केला आहे.⇨अळशीच्या संस्कृत ‘अतसी’ या नावावरून मराठी कुलनाम दिले आहे. कारण लिनम प्रजातीतील भारतातील चार जातींपैकी ही जाती सामान्य व महत्त्वाची आहे. ‘अबई’ अथवा ‘बसंती’ ह्या नावाची एक लहान झुडुपवजा वनस्पती (लॅ. रेनवर्डिया इंडिका) हिमालयात काश्मीर ते सिक्किमपर्यंत सु. २, १०० मी. उंचीपर्यंत आणि गंगेचे वरचे मैदान, आसाम, बिहार, ओरिसा, दख्खन, सह्याद्री, अबूचा पहाड इ. प्रदेशांत आढळते. मोदिरकण्णी या कानडी नावाने ओळखली जाणारी व समोरासमोरच्या अंकुशांच्या साहाय्याने वर चढणारी केसाळ वेल (लॅ. ह्युगोनिमा मिस्टॅक्स) दक्षिणेत सर्वत्र आढळते. अळशी अगर लायनम युसिटॅटीसिमम (इं. फ्लॅक्स) हिची भारतभर लागवड असून शीत कटिबंधातही अनेक ठिकाणी हिची लागवड करतात तिच्यापासून धागे व कापड (लिनन) बनवितात. बियांपासून जवस तेल मिळते.

पहा : अळशी.

संदर्भ : 1. C. S. L. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. Vlll, New Delhi, 1962 .

           2. Desai, V. G. The Materia Medica and Therapeutics of Indian Medicinal Plants, Bombay, 1975.

           3. Rendle. A. B. The classification of Flowering Plants, Vol. ll, Cambridge, 1963.

परांडेकर, शं. आ.