लिथ्युएनिया : बाल्टिक समूहातील १९९१ मध्ये स्वतंत्र झालेले प्रजासत्ताक. पूर्वीचे अधिकृत नाव लिथ्युएनियन सोव्हिएट सोशॅलिस्ट रिपब्‍लिक असे असून लिथ्युएनियन ‘लायटूव्हा’ किंवा रशियन ‘लिट्व्हा’ या नावानेही हा प्रदेश प्रसिद्ध होता. विस्तार ५४ ते ५६ उ. अक्षांश व २१ ते २६ पूर्व रेखांश क्षेत्रफळ ६५,२०० चौ. किमी. लोकसंख्या ३६,५८,००० (१ जुलै १९८७). या आयताकृती प्रजासत्ताकाच्या पश्चिमेला बाल्‍टिक समुद्र, उत्तरेला लॅटव्हिया प्रजासत्ताक, पूर्वेस व दक्षिणेस बेलोरशिया व दक्षिणेला पोलंड आणि कालीनिनग्राड हे प्रदेश आहेत. शासकीय ठाणे व्हिल्‍निअस (व्हिल्‍ना) असून त्याची लोकसंख्या ५,६६,००० (अंदाज १९८७) होती.

भूवर्णन : भूरचनेच्या दृष्टीने लिथ्युएनियाची सखल प्रदेश म्हणून गणना करता येईल. येथील तळखडक गाळाचे असून पृष्ठभागावर हिम-नदीच्या भरणकार्यामुळे तयार झालेल्या हिमोढ टेकड्या, ड्रमलिन, पाण्याची डबकी यांसारखी तृतीय हिमयुगाच्या उत्तर-काळात तयार झालेली भूरूपे आहेत. किनाऱ्यापासून अंतर्भागात महत्त्वपूर्ण प्राकृतिक स्थित्यंतरे आढळतात. लांबचलांब व सरळसोट समुद्रकिनारा बारीक वाळूच्या पुळणीचा बनलेला असून त्याच्या पार्श्वभागात सुरुवातीस अस्थिर व नंतर स्थिर वाळूच्या टेकड्या आहेत. त्यांपैकी श्वेन्सीओनिऊ-नॅरोसिअस आणि ॲश्मिनॉस टेकड्या – हा समूह उंच असून त्यातील नॅरोसिअस सर्वांत उंच (सस. पासून २९४ मी.) आहे. मैदानात हिमनद्यांच्या भरणकार्यामुळे झालेला उंचसखलपणा जाणवतो. येथील छोटेछोटे उंचवटे अस्ताव्यस्त पसरलेले असून पाण्याच्या प्रवाहाची दिशा ओळखणे फारच कठीण जाते. काही भागांत पाण्याचा निचरादेखील व्यवस्थितपणे होत नाही. तळाशी असलेल्या गाळाच्या खडकात हिमयुगात गाडल्या गेलेल्या गेलेल्या सूचिपर्णी वृक्षांपासून तयार झालेला पिवळ्या रंगाचा रोळेसारखा चिकट पदार्थ (अंबर) सापडतो. त्यामुळे किनार भागाला ‘अंबर कोस्ट ’ असे नाव पडले आहे.

नेमन ही प्रजासत्ताकातील सर्वांत मोठी व लांब नदी. तिच्या म्यिर्किस, निरयीस, नेव्हेझीस, दूबीसा, जुरा, मिनिजा, शेशूपे या प्रमुख उपनद्या असून बहुतेक सर्व नद्या नागमोडी प्रवाहांच्या आहेत आणि त्या बाल्टिक समुद्राला मिळतात. नद्यांची एकूण लांबी २,७२० किमी. असून एक – पंचमांश भाग नौकावाहतूकीस योग्य आहे. त्यातून लाकडी तरफ वाहून नेतात. लिथ्युएनियात लहानमोठी ३,००० सरोवरे असून ती प्रामुख्याने पूर्व व आग्‍नेय भागांत आहेत.

हवामान : बाल्टिक समुद्रसान्निध्यामुळे या प्रदेशाचे हवामान सौम्य व आर्द्र आहे. हिवाळी तापमान किनारी भागात – १से. ते १ से. असून जानेवारी हा अत्यंत थंड महिना असतो. त्यावेळी सरासरी तापमान – ४.८ से. असते. उन्हाळे सौम्य असतात. जुलै महिन्यात हवामान उष्ण असते. उन्हाळ्यात सरासरी तापमान १४.५ते १७.२०से. यांदरम्यान असते. पर्जन्यवृष्टीचे प्रमाण सरासरी ६३० मिमी. असून अंतर्गत भागात ते सापेक्षतः कमी होत जाते. ऑगस्टमध्ये जास्त पाऊस पडतो. हिवाळ्यात हिमवर्षाव होतो परंतु हिमथरांची जाडी कमी असते. तरीदेखील बर्फ बराच काळ साठून उन्हाळ्यात वितळू लागल्यानंतर ते पाणी वाहून नेण्यास येथील अपरिपक्व जलप्रणाली असमर्थ ठरते व सखल भागात दलदलीचे साम्राज्य आढळते. 

वनस्पती व प्राणी : लिथ्युएनियाचा सु. १६% भाग जंगलांखाली असून त्यापैकी जवळजवळ दोन- तृतीयांश भागात सूचिपर्णी वृक्ष आढळतात. टेकड्यांच्या भागात फर जातीची झाडे असून मैदानी भागात भूर्ज व मिश्र वृक्ष आढतात जंगले प्रामुख्याने टेकड्यांच्या भागात उतारावर आढळतात रानटी राय (एक प्रकारचे गवत) व विविध प्रकारची झुडुपे वालुकामय प्रदेशात दिसतात याशिवाय रेताड भागात, विशेषतः किनाऱ्यालगत, पाइन वृक्ष व इतर सखल भागात फर, भुर्ज, ओक आणि ॲल्डर ही वृक्षराजी आढळते. पूर्वेकडील फर जातीची वृक्षवल्ली टेकड्यांना एक विशिष्ट छटा आणते. प्रजासत्ताकाची सु. २२% जमीन कुरणांखाली व गुरूचरणांखाली आहे. जंगले ही या भागातील महत्त्वाची साधनसंपत्ती मानण्यात येते. येथील प्राणिजीवन विभिन्न असून सस्तन वर्गातील सु. साठ प्रकारच्या जाती येथे आढळतात. जंगलात कोल्हे, लांडगे, पाणमांजर, रानडुक्कर, बिजू, अनेक फरधारी तसेच हरीण, काळवीट, बीव्हर, मिंक, सांबर इ. प्राणी आढळतात. यांशिवाय घुशी, विविध प्रकारचे उंदीर व खारी यांच्या अनेक जाती आहेत. सुमारे तीनशे जातींचे विविध पक्षी असून त्यांपैकी श्वेत करकोचा, विभीन्न बदके, हंस, क्रौंच, बगळे आणि पारवे यांच्या अनेक जाती आढळतात. सरोवरे आणि समुद्र यांतील पाण्यातून सु. पन्नास प्रकारच्या माशांच्या जाती असून त्यांपैकी सामन, वाम, कार्प, ब्रीम, ट्राउट हे गोड्या पाण्यातील मासे खाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यांशिवाय कॉड, प्लेस, हेरिंग इ. प्रकारही आढळतात.

इतिहास : लिथ्युएनियाच्या प्रागितिहास अस्पष्ट आहे. या प्रदेशावर अनेक आक्रमणे होऊनही तो इतर बाल्‍टिक शेजाऱ्यांपेक्षावेगळा आणि प्राचीन भाषा व संस्कृती टिकवून राहिलेला आहे. इतिहासज्ञांच्या मते इ. स. पू. १५०० मध्ये लिथ्युएनियनांनी नेमन नदीकाठी प्रथम वस्ती केली आणि फर, अंबर व मासे यांचा व्यापार सुरू झाला. पुढे या प्रदेशावर गॉथ, पोलिश, जर्मन, रशियन आदींनी अधुनमधून आक्रमणे केली. त्यांतून संकर होऊन मिश्र समाजव्यवस्था निर्माण झाली पण लिथ्युएनियन मूळ स्त्रोत नष्ट झाला नाही. टॅसिटस या रोमन इतिहासकाराने येथील लोकांचा प्रथम उल्लेख इ. स. १०० मध्ये केला. त्याच्या मते रोमन लोक मूल्यवान दागिने बनविण्यासाठी लिथ्युएनियाकडून अंबर खरेदी करीत असत. पुढे व्हायकिंग या रानटी टोळ्यांनी इ. स. सात ते अकरा या शतकांदरम्यान लिथ्युएनियावर अनेक आक्रमणे केली. 

इ. स. बाराव्या शतकात ट्यूटॉनिक या लष्करी व धार्मिक जर्मन संप्रदायातील सरदारांनी या प्रदेशांवर आक्रमण करून काही भाग काबीज केला. याच सुमारास लिव्होनिअन या दुसऱ्या जर्मन सांप्रदायातील सरदारांनी लिथ्युएनियावर आक्रमण केले. लिथ्युएनियनांनी शाउलाई येथे लिव्होनिअन सरदारांचा दारुण पराभव केला (१२३६). तेव्हा ते ट्यूटॉनिक संप्रदायात सामील झाले. या सरदारांनी येथे यूरोपीय संस्कृती रुजविण्याचा व ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्‍न केला तथापि लिथ्युएनियाने आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवले आणि पेगन धर्माचे (पेगनिझम) संगोपन केले. मिंडाउगॉस (१२५१-६३) हा लिथ्युएनियाचा पहिला राजा. त्याने छोट्या संस्थानिकांना, सरदारांना एकत्र आणून एकसंध राज्य निर्माण केले. त्याचा त्याच्याच सरदारांनी खून केला. यानंतर यागेलो वंशातील राजांनी पोलंड व लिथ्युएनियावर १३८६ ते १५७२ दरम्यान सत्ता गाजविली. या वंशाची स्थापना लॅडिस्लास यागेलो (कार.१३८६-१४३४) याने केली. त्याने पोलिश राजकन्या यॅडव्हीगा हिच्याशी विवाह करून ख्रिस्ती धर्म अंगिकारला आणि तो पोलंड व लिथ्युएनिया या संयुक्त राज्याचा राजा झाला परंतु लिथ्युएनियात पारंपरिक धर्म व चालीरीती धरून होत्या. १५ जुलै १४१० च्या ग्रून्‍व्‍हाल्ट-टॅननबर्गच्या लढाईत लिथ्युएनियन व पोलिश फौजांनी ट्यूटॉनिक सरदारांचा पराभव केला आणि त्यांच्या प्रदेश विस्तारास पायबंद घातला. तार्तरांच्या आक्रमणासही त्यांनी विरोध केला. यावेळी लिथ्युएनियाचे राज्य बाल्टीक समुद्रापासून काळ्या समुद्रापर्यंत पसरले होते. लॅडिस्लासचा मुलगा तिसरा लॅडिस्लास (कार. १४३४-४४) हा या संयुक्त गादीवर आला. त्याने तुर्कांविरूद्धच्या दोन धर्मयुद्धांत भाग घेतला. व्हार्ना येथील लढाईत तो मरण पावला. त्यानंतर त्याचा धाकटा भाऊ चौथा कॅझिमिर (कार. १४४४-९२) याची राजा म्हणून निवड झाली. त्याने टॉरून्याच्या शांतता तहाने (१४६६) ट्यूटॉनिक सरदारांबरोबर (तेरा वर्षे) चाललेला संघर्ष मिटविला. यामुळे काही प्रदेश या संयुक्त राज्याला मिळाला. त्याच्यानंतर अनुक्रमे जॉन (१४९२-१५०१), पहिला अलेक्झांडर (१५०१-१५०५) आणि पहिला सिगिसमंड (१५०६-४८) हे तीन मुलगे गादीवर आले. या संयुक्त राज्यात पोलंडचे वर्चस्व होते, त्यामुळे साहजिकच पोलिश संस्था आणि ख्रिस्ती धर्म यांचा प्रसार झाला. रोटी-बेटी व्यवहार वाढला आणि समाजात उच्च वर्ग व शेतकरी कामगार असे दोनच वर्ग पडले. 


अठराव्या शतकात पोलंडचे अनुक्रमे तीन वेळा विभाजन झाले. त्यावेळी साहजिकच लिथ्युएनिया रशियाच्या ताब्यात गेला आणि त्याचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले (१७९५). तेथील प्रजेने अनुक्रमे १८३१ व १८६३ मध्ये स्वातंत्र्यासाठी दोन अयशस्वी उठाव केले. झारने तेथे रशियन संस्कृती रुजविण्यासाठी लिथ्युएनियन छापखान्यांवर बंदी घातली आणि विद्यालये बंद केली परंतु स्थानिक लोकांनी गुप्तरीत्या भाषा, चालीरीती. रोमन कॅथलिक चर्च इ. चालू ठेवले. काही लिथ्युएनियन झारशाहीला कंटाळून अमेरिकेत स्थलांतरीत झाले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात येथे राष्ट्रीय चळवळ संघटित झाली. १९०५ मध्ये त्यांच्या प्रतिनिधींची परिषद भरून त्यांनी स्थानिक स्वराज्याची मागणी केली, ती नाकारण्यात आली. पहिल्या महायुद्धात जर्मन लष्कराने लिथ्युएनिया व्यापला आणि जर्मन सम्राट हा त्याचा राजा, असे जाहीर करून त्याला मर्यादित स्वायत्तता दिली. आंटानास स्मॅटॉना हा संसदेचा (डायट) अध्यक्ष झाला. त्यानंतर जर्मनीचा पराभव होताच लिथ्युएनिया जर्मनी व रशियापासून अलग होऊन स्वतंत्र झाला (६ फ्रेब्रुवारी १९१८) ऑगस्टस व्हॉल्डेमर पंतप्रधान झाला. त्याने धडाकेबाज कार्यकम आखला आणि ल्युथिएनियन संस्कृतीचे पुनरुज्‍जीवन केले. पहिल्या महायुद्धानंतर रशियाने ल्युथिएनिया घेण्याचा अयशस्वी प्रयत्‍न केला. त्यातून शांतता तह होऊन सीमा निश्चित झाल्या परंतु पोलंडने त्यावेळी फ्रान्सच्या मदतीने मागील सर्व तह धुडकावून देऊन व्हिल्निअस हे शहर आणि सु.एक तृतीयांश प्रदेश घेतला (१९२२). पुढे व्हिल्निअस जवळजवळ दुसऱ्या महायुद्धापर्यंत म्हणजे १९३९ पर्यंत पोलंडच्याच ताब्यात राहिले.

काही लष्करी अधिकाऱ्यांनी व राजकीय पुढाकाऱ्यांनी १९२६ मध्ये अवचित सत्तांतराद्वारे लिथ्युएनियाची सत्ता काबीज केली. आंटानास स्मॅटॉना हळूहळू हुकूमशहा बनला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी (१९३९) जर्मनीने ल्युथिएनियाचा काही भूप्रदेश व्यापला. पुढे रशिया व जर्मनी यांत समझोता होऊन बाल्टिक प्रदेश रशियाच्या अधिपत्याखाली आला. त्यावेळी रशियाने ल्युथिएनियात लष्करी तळ बांधले. दिनांक ३ ऑगस्ट १९४० रोजी जोझेफ स्टालिनने सक्तीच्या खुशीने लिथ्युएनिया संघराज्यात सामील केला आणि त्याला सोव्हिएट प्रजासत्ताकाचा दर्जा दिला. जर्मनीने १९४१ मध्ये रशिया पादाक्रांत करताच लिथ्युएनियन लोकांनीच पुन्हा क्रांती करून स्वायत्तता मिळविली परंतु जर्मनीने पुन्हा तोही प्रदेश घेऊन १९४४ पर्यंत तेथे सत्ता गाजविली. महायुद्धानंतर तो आपततः रशियाच्या ताब्यात गेला. १९४४-५२ दरम्यान लिथ्युएनियन गनिमांनी रशियन सत्ताधाऱ्यांना बेजार केले. तेव्हा रशियाने सु. साडेतीन लाख लिथ्युएनियनांना सायबीरियातील छलगृहांत डांबले आणि लिथ्युएनियातील रोमन कॅथलिक चर्चचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्‍न सुरू केला. यातून त्यांची चळवळ तीव्रतर झाली. १९७२ मध्ये सतरा हजार ल्युथिएनियनांनी संयुक्त राष्ट्रांकडे धर्मस्वातंत्र्यासाठी विनंती अर्ज केला. विद्यार्थ्यांनी रशियन शासनाविरुद्ध निदर्शने करून निषेध केला, काहींनी आत्मदहन केले. रशियन शासनाने लिथ्युएनियात औद्योगिकीकरणाचा धूमधडाका लावला असून अनेक सुधारणा झाल्या तथापि प्राचीन इतिहास, भाषा, संस्कृती, वंश यांमुळे लिथ्युएनियन लोकांची राष्ट्रीय अस्मिता अद्यापि टिकून राहिली आणि स्वातंत्र्याची ऊर्मी दबली नाही. याचाच परिणाम म्हणजे रशियन शासनाविरुद्धची राष्ट्रीय चळवळ, हा होय. परिणामतः या प्रजासत्ताकाने १२ मार्च १९९० रोजी सोव्हिएट रशियाचे वर्चस्व झुगारून देऊन स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र म्हणून घोषणा केली आणि सु. एक वर्षाने दिनांक ५ फेब्रुवारी १९९१ रोजी जनमतपृच्छा घेऊन संघराज्य की स्वातंत्र्य असे मतदान घेतले. या निर्णयात ९०.४७ टक्के लोकांनी संघराज्यातून फुटून निघण्यास संमती दर्शविला आहे मात्र सोव्हिएट अध्यक्ष म्यिखइल गार्बाचॉव्ह यांनी हे मतदान अवैध असल्याचे जाहीर करून रशियाच्या एकात्मतेसाठी युद्धाची धमकी दिली आहे. गार्बाचॉव्ह यांच्या सत्तेला निर्माण झालेले हे एक आव्हान आहे. रशियन संघराज्याच्या दृष्टीने ही गोष्ट हानिकारक व नामुष्कीची असून इतर बाल्टिक प्रजासत्ताकांनीही तसाच निर्णय घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे रशियाचा अटलांटिक महासागराला जोडणारा महत्त्वाचा दुवा नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. या सर्व संघर्षातून सोव्हिएट युनियनने लिथ्युएनिया प्रजासत्ताकाच्या स्वातंत्र्याला ६ सप्टेंबर १९९१ रोजी अधिकृत मान्यता दिली.  

 

राजकीय स्थिती : २५ ऑगस्ट १९४० रोजी स्वीकारलेल्या संविधानानुसार प्रजासत्ताकाची शासनापद्धती असून राजकीय सत्ता कामगार आणि शेतकरी यांत विभाजित झाली आहे. ते स्थानिक कामगार मंडळांच्या (सोव्हिएट्‍स) प्रतिनिधींद्वारे शालन चालवितात. दर चार वर्षांनी निवडणूक होते. तीतून निवडलेले मंत्रिमंडळ हे सर्वोच्च कायदेमंडळ-सुप्रीम सोव्हिएट–निवडले जाते. रशियाच्या अध्यक्षमंडळासारखे त्याच्याकडे कार्यकारी अधिकार असतात. स्थानिक पातळीवर छोटी सोव्हिएटे असून त्यांची निवडणूक दोन वर्षांकरिता होते. प्रजासत्ताकात सर्वोच्च न्यायालय असून स्थानिक पातळीवर पाच व दोन वर्षांकरिता नेमणूक केलेले न्यायाधीश असतात. प्रजासत्ताकाचा मुखत्यार हा कायद्याची अंमलबजावणी करतो. त्याची पाच वर्षांकरिता नियुक्ती होते. लिथ्युएनियन कम्युनिस्ट पक्ष हा सोव्हिएट रशियाच्या कम्युनिस्ट पक्षाचाच एक घटक असून तीच प्रजासत्ताकातील मोठी राजकीय संघटना आहे.

आर्थिक स्थिती : येथील अर्थव्यवस्था ही नियोजनबद्ध व सामुदायिक आणि शासकीय मालकीच्या तत्त्वावर आधारित असून उत्पादन लक्ष्ये ही विकासात्मक योजनेच्या चौकटीत आहेत. कृषी हा अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. सुमारे २५ टक्के लोक कृषिव्यवसायात गुंतलेले असून सु. ४९ टक्के जमीन लागवडीखाली आणण्यात आली आहे. प्रजासत्ताकात ७४० सामूहिक शेतवाड्या आणि ३१० शासकीय शेतवाड्या आहेत. शेतीचा विकास हा मुख्यत्वे पुन:प्रापण आणि दलदलीतील पाणी काढणे या योजनांतर्गत धोरणांशी संलग्‍न आहे. मांस आणि दूध यांचे उत्पादन वाढविण्यावर भर असून या धंद्यांना पूरक अशी पिके घेतली जातात. येथे घायपाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्याखालोखाल द्विदलधान्ये आणि फळभाज्या, त्यांत बटाटे हे प्रमुख उत्पन्न असून राय, ओट, सातू, गहू ही अन्य पिके घेतली जातात. यांशिवाय फ्‍लॅक्स, साखर-बीट ही पिकेही होतात. पशुपालन हा कृषिव्यवसायातील एक प्रमुख उद्योग असून गुरे व डुकरे यांच्या पैदाशीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहुतेक सर्व शेती यंत्रांद्वारे केली जाते, फक्त हिवाळ्यात सुगीच्या हंगामात मानवी श्रमांची गरज भासते. सुरुवातीच्या विखुरलेल्या तुकड्यांचे एकत्रीकरण करून कृषिक्षेत्र विस्तृत करण्यात आले आहे. त्यामध्ये आधुनिक यंत्र सामग्री आणि सुधारित खते व बी-बियाणे यांचा वापर करून उत्पादनात भरीव प्रगती करण्यात आली आहे. प्रजासत्ताकात १९८७ मध्ये पुढील उत्पादन झाले (आकडे मे. टनांत): अन्नधान्ये ३,५५४.४ बटाटे १,३९७.३ बीट ८३७.२ भाज्या ३१७.१ आणि फ्‍लॅक्स धागा १६.३. १९८८ मध्ये येथे पुढीलप्रमाणे पशुधन होते. : गुरे २४,९४,००० डुकरे २,७०,३०० मेंढ्या व शेळ्या ९१,०००. १९८७ साली प्राणिज उत्पादने हजार मे. टनांत पुढीलप्रमाणे होती: मांस (कापल्यानंतर वजन) ५२७ दूध ३,१०० अंडी १२,५२० लक्ष. 


खनिज संपत्तीच्या बाबतीत लिथ्युएनिया संपन्न आहे. गंधकाम्‍लातील खनिजांशिवाय प्रामुख्याने डोलोमाइट, जिप्सम, ज्वलनशील शेल, खडू, चिकणमाती चुनखडी, रेव (सोन्याचे कण असलेली माती), पीट (कोळसा), लोहधातू, फॉस्फोराइट, खनिजयुक्त पाणी, अंबर इ. काही खनिजे विपुल प्रमाणात उपलब्ध असून अंबरपासून दागिने बनवितात. किनारपट्टीच्या प्रदेशात तेलसाठे असल्याचे निदर्शनास आले आहे, परंतु त्यांचे अद्यापि पूर्ण संशोधन झालेले नाही. 

लिथ्युएनियन अर्थतज्ञांनी पर्यावरण अवस्था, आर्थिक साधनसंपत्ती आणि वाहतूक व्यवस्था या निकषांवर प्रजासत्ताकाचे चार आर्थिक विभाग केले आहेत. त्यांपैकी पूर्व लिथ्युएनियात (व्हिल्‍निअस राजधानीसह) मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाले असून धातूकाम आणि यांत्रिक अभियांत्रिकी व लाकूडकाम यांचे कारखाने तेथील प्रमुख शहरांतून विखुरलेले आहेत. ही शहरे रशियातील प्रमुख शहरांशी महामार्गांनी जोडलेली असून शहरांतून आरोग्यधामे आहेत, तर मध्य प्रजासत्ताकाचा २५ टक्के भूप्रदेश जलसिंचन योजनांनी व्यापलेला आहे आणि यात वीजनिर्मितीचे अनेक प्रकल्प कार्यरत झालेले आहेत. त्यामुळे धातूकाम, यांत्रिक अभियांत्रिकी यांबरोबरच अन्नप्रक्रिया करण्याचे कारखाने विकसित झाले असून पशुसंवर्धन आणि साखर बीटपासून साखर काढणे हे उद्योग चालतात. उत्तर लिथ्युएनियातील ३० टक्के प्रदेशात, विशेषतः टेकड्यांत, डोलोमाइट, जिप्सम व चुनखडी यांचे साठे असून त्या प्रदेशात सामूहिक शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यातून गहू, बीट आणि फ्‍लॅक्स ही पिके येतात. येथे फारसे कारखाने नाहीत मात्र पश्चिम लिथ्युएनियातील किनारपट्टीच्या १५ टक्के भूप्रदेशात जहाजबांधणी व दुरुस्ती, मासे-प्रक्रिया व तेल शुद्धीकरण यांचे मोठे उद्योग चालतात. यांशिवाय येथे गवताची मोठी कुरणे असून पशुपालन, कुक्‍कुटपालन व दुग्धव्यवसाय हे उद्योगही भरभराटलेले आहेत. हिमभंजकांच्या साहाय्याने हिवाळ्यातदेखील मासेमारीसाठी बंदरे खुली ठेवता येतात. बाल्टिक समुद्र, उत्तर समुद्र तसेच अटलांटिक महासागरातील आइसलँड , ग्रीनलंड, लॅब्रॅडॉर, न्यू फाउंडलंड इ. भूभागांजवळ मासेमारी चालते. अटलांटिक महासागरात हेरिंग, कॉडसारखे मासे, तर स्थानिक समुद्रात चपटे मासे, पिलचर्ड, ईल इ. मासे पकडले जातात. मच्छीमार बोटी व साधने, माशांवर प्रक्रिया करण्याची यंत्रसामग्री प्रजासत्ताकातच तयार होते आणि मासे हवाबंद डब्यात भरण्याचे उद्योगही तेथे चालतात. 

लोकर, कृत्रिम धागे यांवर आधारित वस्त्रोद्योग प्रजासत्ताकात असून सूचिपर्णी जंगलांतून मिळणाऱ्या कच्च्या लगद्यापासून कागद तयार करण्याचे कारखानेही आहेत. यांशिवाय गंधकाम्‍लासारखी आधारभूत रसायने, सिमेंट, प्लॅस्टिक, खते, रंग, रबरी माल, पादत्राणे, इतर जीवनोपयोगी वस्तू, कृषी साधने, लेथ, बाष्पित्र, दूरचित्रवाणी संच, रेडिओ, गणकयंत्रे, कॅमेरा-दुर्बिणी इत्यादींची निर्मिती येथे होते. १९८७ मध्ये राज्यातील उत्पादन पुढीलप्रमाणे होते (हजार मे. टनांमध्ये) : कागद १२०, प्लॅस्टिक ९१.८, कृत्रिम धागे व सूत १४.३, गधकाम्‍ल ४४०, रासायनिक खते ९१९ (हजारांत) दूरचित्रवाणी संच २३८, लेथ यंत्रे २०.२ (१९८५). प्रजासत्ताकात २,०१० किमी. लांबीचे लोहमार्ग व २९,१०० किमी. लांबीचे रस्ते असून जलवाहतूकही मोठ्या प्रमाणात बंदरांतून तसेच नद्यांमधून चालते. व्हिल्निअस येथील विमानतळावरून देशातील प्रमुख शहरांशी हवाई वाहंतूक होते. या वाहतुकीच्या जाळ्यासोबतच नैसगिक वायूची नळयोजना केली असून युक्रेनमधून येणारा वायू त्यातून घेतला जातो. तसेच पश्चिम सायबीरियातील तेलसाठ्यांतून अशुद्ध तेल शद्धीकरणासाठी माझेकियाई येथे नळांवाटे येते. संच, रेडिओ, गणकयंत्रे, कॅमेरा-दुर्बिणी इत्यादींची निर्मिती येथे होते. १९८७ मध्ये राज्यातील उत्पादन पुढीलप्रमाणे  होते (हजार मे. टनांमध्ये) : कागद १२०, प्लॅस्टिक ९१.८, कृत्रिम धागे व सूत १४.३, गंधकाम्ल ४४०, रासायनिक खते ९१९ (हजारांत)  दूरचित्रवाणी संच २३८, लेथ यंत्रे २०.२ (१९८५). प्रजासत्ताकात २,०१० किमी. लांबीचे लोहमार्ग व २९,१०० किमी. लांबीचे रस्ते असून जलवाहतूकही मोठ्या प्रमाणात बंदरांतून तसेच नद्यांमधून चालते. व्हिल्निअस येथील विमानतळावरून देशातील प्रमुख शहरांशी हवाई वाहंतूक होते. या वाहतुकीच्या जाळ्यासोबतच नैसर्गिक वायूची नळयोजना केली असून युक्रेनमधून येणारा वायू त्यातून घेतला जातो. तसेच पश्चिम सायबीरियातील तेलसाठ्यांतून अशुद्ध तेल शद्धीकरणासाठी माझेकियाई येथे नळांवाटे येते.

लोक व समाजजीवन : पश्चिमेकडील स्कँडिनेव्हिया व जर्मनी यांच्याशी असलेले सांस्कृतिक संबंध व पूर्वेकडील सोव्हिएट संघराज्याचा आर्थिक प्रभाव यांच्या कैचीत सापडलेल्या लिथ्युएनियाने आपली पूर्वापार संस्कृती जतन करण्यात यश मिळविले आहे. ही गोष्ट लोकांची प्रादेशिक अस्मिता, रोमन कॅथलिक चर्च, लोककला, त्यांची भाषा व चालीरीती यांवरून प्रत्ययाला येते. सोव्हिएट संघराज्यात सामील झाल्यानंतर येथील काही लोकांना बाहेर जावे लागले असले व इतर प्रजासत्ताकांतील लोक येथे येऊन राहिले, तरी लिथ्युएनियन लोकांचे वर्चस्व लोकसंख्येतील लोक प्रमाणावरून निदर्शनास येते. प्रजासत्ताकाच्या एकूण लोकसंख्येत ८०.१% लिथ्युएनियन, ८.६% रशियन, ७.७% पोलिश, १.५% बेलोरशियन व २.१% इतर लोक राहतात. लोकसंख्येची घनता चौ. किमी.ला ५६ लोक अशी असून ६६% लोक शहरी विभागात राहतात. सुमारे ९०% रोमन कॅथलिक असून उर्वरित काही ल्यूथरन चर्चचे अनुयायी आहेत. लिथ्युएनियाची संस्कृती मुख्यत्वे रोमन कॅथलिक प्रभावाखाली वृद्धिंगत झाली असून तीत कॅथलिक परंपरा व रूढी दृग्गोचर होतात. रशियाने येथील धार्मिक सणसमारंभांवर बंदी घातली होती.

लिथ्युएनिया संगीत, कला, खेळ, साहित्य इत्यादींच्या बाबतीत समृद्ध आहे. येथील लोककथा, लोकगीते, लोककला, लोकसंगीत आणि पारंपरिक सण-समारंभ यांतून त्याच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडते. ग्रीष्म ऋतृतील वार्षिक सोहळ्यात समूहगान व नृत्याचा कार्यक्रम होतो. त्यात सहस्रावधी लोक सहभागी होतात. लिथ्युएनियन लोकगीतांचे Giesmes आणि Dainos असे दोन प्रकार आहेत. पहिला बॅलड रचनेशी जवळ असून दुसरा भावकवितेशी निकटचे नाते असणारा आहे. त्यात आत्मपरता दिसून येते. त्यांच्या लोककथा मौखिक परंपरेने जतन करण्यात आल्या आहेत. प्रजासत्ताकात एकूण अकरा नाट्यगृहे असून त्यांतून संगीतिका, नाटके, बॅले इ. प्रयोग होतात.

यांशिवाय चलत्‍चित्रपट उद्योगही येथे भरभराटीत आहे. फुटबॉल, मुष्टियुद्ध, होड्यांच्या शर्यती हे प्रजासत्ताकातील काही लोकप्रिय खेळ आहेत. शिक्षणक्षेत्रातही लिथ्युएनियाने आघाडी मारलेली असून तेथे विद्यापीठांसह १२ उच्च शिक्षणसंस्था होत्या (१९८७-८८). व्हिल्ना शहरातील व्ही. काप्सुकासस्टेट युनिव्हर्सिटी (स्था. १५७९) हे रशियातील एक प्राचीन विद्यापीठ आहे. प्रजासत्ताकाची भाषा जरी लिथ्युएनियन असली, तरी रशियन भाषेची शैक्षणिक संस्थांतून सक्ती करण्यात येते आणि दूरचित्रवाणीवरील बहुसंख्य कार्यक्रम रशियन भाषेतच प्रक्षेपित करतात तथापि प्रमुख नियतकालिके, वृत्तपत्रे आणि साहित्यकृती ह्या लिथ्युनियन भाषेतच प्रसिद्ध होतात. येथील लोककलांत, विशेषतः चित्रकलेत, सौम्य रंगछटा आणि भौमितिक या पुष्परचनाबंध हे भेददर्शी गुणविशेष आढळतात. व्हिल्निअस येथील चित्रकला विद्यालयाचा (स्था.१९६६) येथील ललित कलेच्या परंपरेवर प्रभाव जाणवतो.

प्रेक्षणीय स्थळे : व्हिल्निअस हे राजधानीचे शहर लोहमार्गावरील एक महत्त्वाचे प्रस्थानक असून ते विलिया नदीकाठावर वसले आहे. त्यामुळे या शहराला व्यापारी दृष्ट्या फार महत्त्व आले आहे. पूर्वी येथे लाकूड व फ्लॅक्स यांचा मोठा बाजार भरत असे. आता तेथे बुद्धिप्रधान असे अनेक उद्योगधंदे निघाले आहेत. यंत्रसामग्री, गणकयंत्रे, प्रकाशयंत्रे, इलेक्ट्रॉनिकीय वस्तू अशी अनेक प्रकारची उत्पादने तयार होतात. कौनास (४,१७,०००-१९८७) हे ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे व लिथ्युएनियन प्रजासत्ताकातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. विलिया व नेमन या नद्यांच्या संगमावर वसलेले हे बंदर कृत्रिम धागे, वस्त्रे विद्युत् उपकरणे व रसायने यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. मांस हवाबंद डब्यात भरण्याचा उद्योगदेखील येथे चालतो. क्लाइपेडा (२,०१,०००) हे समुद्रकिनाऱ्यावरील बंदर मासेमारीच्या बोटींचा तळ म्हणून वापरले जाते. हिमभंजकांच्या साहाय्याने ते संपूर्ण हिवाळाभर बर्फमुक्त ठेवले जाते. लाकूड कापणी गिरण्या, सेल्यूलोज व कागदनिर्मिती, वस्रोद्योग व मत्स्यप्रक्रिया हे तेथील प्रमख उद्योग होत.

पहा : पोलंड बाल्टिक भाषासमूह रशिया.

संदर्भ :  1. Cressey, G. B. Soviet Potentials: A Geogrjphic Appraisal, New York, 1962.

            2. Gregory, J. S.  Russian Land, Soviet Peoples, London, 1968.

            3. Howe, G. M. The Soviet Union, London, 1983.

फडके, वि. शं.