लिथ्युएनियन भाषा : इंडो-यूरोपियन भाषाकुलात बाल्टिक भाषांचे एक उपकुल आहे. त्यात दोनच भाषा आज विद्यमान आहेत. लिथ्युएनियन आणि लॅटव्हियन. लिथ्युएनियन भाषा लिथ्युएनियाची राजभाषा १९१८ पासून झाली असली (१९७० साली २५,०७,००० बोलणारे, शेजारील देशात व युनायटेड स्टेट्‍समध्ये एकूण अंदाजे ५,००,०००), तरी तिचे उल्लेख सुमारे इ. स. १००० पासून, लिखित नमुने सोळाव्या शतकापासून (प्रॉटेस्टंट पंथीय धर्मशिक्षणासाठी प्रश्नोत्तरी) मिळतात. यॉनास याब्‍लोन्स्किस (१८६१-१९३०) याला अर्वाचीन लिथ्युएनियन भाषेचा जनक मानण्यात येते. 

ही अर्वाचीन इंडो-यूरोपियन भाषांपैकी सगळ्यांत जुन्या वळणाची समजली जाते. सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत तिच्यामध्ये शब्दसुर (वैदिक संस्कृतमधील उदात्तादि स्वरविशेषांसारखे) टिकून होता. द्विवचन, अपादान सोडून सात नामविभक्ती, काही जुने प्रत्ययही तिच्यात सापडतात. तिच्यावर स्लाव्हिक भाषांचा प्रभाव दिसतो. 

हिच्या मैदानी (पश्चिमेची), पहाडी पूर्व, पहाडी पश्चिम अशा तीन बोली आहेत. आजची साहित्यिक भाषा पहाडी पूर्व बोलीवर आधारलेली आहे. ती रोमन लिपीत लिहिली जाते. भेदक चिन्हांचा वापर करून लेखन उच्चारानुसारी बनवण्याचा प्रयत्‍न केला आहे (उदा., a, e, u खाली अनुनासिकत्व दाखविण्यासाठी c जोडतात) वाक्यातला शब्दांचा क्रम फार बांधील नाही.

संदर्भ : 1. Dambriunas, Leonardas Klimas, Antanas Schmalstieg, William R. Introdction to Modern Lithuanian, 1966.

            2. Endzelins, Janis, Balta Kalbu garsai ir formos, 1957. Trans, Comparative Phonology and Morphology of the Baltic Languages, 1971.

            3. Magner, Thomas F. Schmalstieg, William R. Ed., Baltic Linguistics, New York, 1970.

केळकर, अशोक रा.