लिंबुर्गाइट : काचमय द्रव्य विपुल असलेला गडद रंगाचा अग्निज ज्वालामुखी खडक. हा खडक बेसाल्टाप्रमाणे दिसतो पण याच्यात फेल्स्पार खनिज थोडेच असते अथवा नसते. संरचना व खनिज संघटनाच्या बाबतीत याचे माँचिकाइटाशी पुष्कळ साम्य असले, तरी माँचिकाइटाचा आधारक याच्याप्रमाणे काचमय नसतो. लिंबुर्गाइटामध्ये ऑलिव्हिन व ऑजाइट या खनिजांचे चांगल्या आकाराचे पुष्कळ मोठे स्फटिक असतात. ऑजाइटाच्या स्फटिकात मंडलित रचना आढळते म्हणजे स्फटिकाच्या गाभ्याशी डायॉप्साइड तर कडेशी टिटॅनियम विपुल असलेले पायरोक्सीन असते. यांशिवाय लिंबुर्गाइटात फेल्स्पॅथॉइड, हॉर्नब्लेंड, कृष्णाभ्रक वा ॲनॉर्थोक्लेज या खनिजांचे मोठे स्फटिक अल्प प्रमाणात असू शकतात. टिटॅनियमयुक्त लोह ऑक्साइडे व अपेटाइट ही यातील गौन खनिजे असून यांचे कण यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात विखुरलेले असतात. लिंबुर्गाइटाचा आधारक तपकिरी काचमय असून त्यात कधीकधी अजाइट पण आढळते. कधीकधी लिंबुर्गाइटात पुष्कळ पोकळ्याही आढळतात.
लिंबुर्गाइट विरळाच आढळतो. हा लाव्हा प्रवाह, तसेच भित्ती, शिलापट्ट यांच्यासारख्या छोट्या अंतर्वेशी (घुसलेल्या) राशी इ. रूपांत आढळतो. बेसानाइट, नेफेलाइट, ल्यूसाइट बेसाल्ट, बेसाल्ट माँचिकाइट इ. खडकांबरोबर हा आढळतो. बेसाल्टी शिलारस किंवा लाव्हा यामधील ऑलिव्हीन व पायरोक्सीन (उदा., ऑजाइट) यांचे स्फटिक गुरुत्वाकर्षणाने एकत्र आणले जाऊन लिंबुर्गाइट निर्माण होत असावा. अशा प्रकारे खडकांची लिंबुर्गाइट, ओशनाइट ते बेसाल्ट अशी प्रतवारी झालेली आढळते. जर्मनी, चेकोस्लोव्हाकिया, स्कॉटलंड, फ्रान्स, स्पेन, किलिमांजारो (आफ्रिका), ब्राझील इ. प्रदेशांत, तसेच भारतात गिरनार टेकड्यात (बेसाल्टबरोबर) लिंबुर्गाइट आढळतो. सध्या बेल्जियममध्ये असलेल्या लिंबर्ट प्रदेशातील अशा खडकाचे प्रथम अध्ययन करण्यात आल्याने त्यावरून या खडकाचे लिंबुर्गाइट हे नाव पडले आहे.
पहा : अग्निज खडक बेसाल्ट.
ठाकूर, अ. ना.