ॲलुनाइट: (ॲलमस्टोन). खनिज. स्फटिक समांतरषट्फलकीय. घनाकार दिसणारे समांतरषट्फलक[→स्फटिकविज्ञान]. सामान्यतः संपुंजित खडकाच्या व कधीकधी तंतुमय व कणमय पुंजांच्या स्वरूपात आढळते. पाटन : (0001) स्पष्ट[→ पाटन]. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. ठिसूळ. कठिनता ३·५ – ४. वि.गु २·५८–२·७५. चमक काचेसारखी. रंग पांढरा, किंचित करडा किंवा तांबूस. कस पांढरा. सल्फ्यूरिक अम्‍लात विरघळते [→खनिजविज्ञान]. रा. सं. K2Al6(OH)12·(SO4)4. बरेच पोटॅश फेल्सपार असलेल्या खडकांवर ज्वालामुखीपासून आलेल्या सल्फ्यूरिक अम्‍लाच्या विद्रावाची किंवा वाफेची विक्रिया होऊन व सामान्यत: उच्च तापमानाच्या व दाबाच्या परिस्थितीत ॲलुनाइट तयार होते. ॲलुनाइटाचे लहानसे साठे ज्वालामुखींच्या धूममुखालगतच्या (ज्वालामुखीच्या टेकडीच्या कडांवर किंवा प्रत्यक्ष ज्वालामुखी विवरात असणाऱ्या व वायुरूप पदार्थ बाहेर टाकणाऱ्या नळालगतच्या) खडकांत किंवा सल्फाइडी खनिजे असलेल्या खडकातही तयार होतात. हे ⇨तुरटी  करण्यासाठी वापरतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या उटातील मेरिझव्हिल येथील ॲलुनाइटापासून पोटॅशियम व ॲल्युमिनियम मिळविली जातात. हे इटली, फ्रान्स, मेक्सिको, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इ. देशांत सापडते. नाव तुरटी या अर्थाच्या लॅटिन शब्दावरून पडले आहे.

 

ठाकूर, अ. ना.