लिंड, रॉबर्ट : (२० एप्रिल १८७९-६ ऑक्टोबर १९४९). आयरिश निबंधकार. वाय् वाय्. ह्या टोपणनावाने इंग्रजीतून लेखन. जन्म बेलफास्ट येथे. रॉयल अकॅडेमिकल इन्स्टिट्यूशन आणि क्विन्स युनिव्हर्सिटी येथे त्याचे शिक्षण झाले. १८९९ च्या सुमारास तो लंडनमध्ये स्थायिक झाला. न्यूज क्रॉनिकल ह्या नियतकालिकाच्या वाङ्‍मयीन विभागाचा तो संपादक होता. न्यूज क्रॉनिकलमध्ये तसेच डेली न्यूज, न्यू स्टेट्‍समन ह्या नियतकालिकांतून अनेक वर्षे चटकदार लघुनिबंध लिहून त्याने मोठी लोकप्रियता मिळविली. त्याच्या आनंदी, उदार स्वभावाचा आणि विनोदप्रियतेचा प्रत्यय त्याचा लघुनिबंधांतून वाचकांस येतो. त्याच्या लेखनावर चार्ल्स लँब आणि चेस्टरटन ह्यांचा प्रभाव असला तरी त्याचे स्वतंत्र वाङ्‍मयीन व्यक्तीमत्व आपला ह्यांचा प्रभाव असला, तरी त्याचे स्वतंत्र वाङ्‍मयीन व्यक्तीमत्त्व आपला ठसा वाचकांवर उमटवते. द प्‍लेझर्स ऑफ इग्‍नरन्स (१९२१) आणि द ब्‍लू लायन (१९२३) हे त्याचे प्रमुख ग्रंथ होत. 

बापट, गं. वि.