लिओनॉव, लिओनिद : (२१ मे १८९९-  ) सोव्हिएट कादंबरीकार आणि नाटककार. जन्म मॉस्को येथे. त्याचे वडील कृषकवर्गातून आलेले एक कवी होते. १९२०-२१ मध्ये त्याने लाल सैन्यात (रेड आर्मी) नोकरी केली. १९२२ पासून त्याचे साहित्य प्रसिद्ध होऊ लागले. त्यानंतर त्याने स्वतःला साहित्यालाच वाहून घेतले. १९२४ साली प्रसिद्ध झालेल्या बारसुकी (इं. शी. द बॅजर्स) ह्या त्याच्या कादंबरीमुळे त्याला प्रसिद्धी प्राप्त झाली. व्होर (१९२७, इं. शी. द थीफ), सोत (१९३०, इं. शी. द रिव्हर सोत), दरोगा ना अकिआन (१९३५, इं. शी, रोड टू द ओशन), स्कुतारेव्हस्की (१९३७), रूस्की ल्येस (१९५३, इं. शी. द रशियन फॉरेस्ट) आणि येवगेनिया इवानवना (१९३८-६३) ह्या त्याच्या नंतर प्रसिद्ध झालेल्या कादंबऱ्या. ह्या कादंबऱ्यांपैकी ‘द रशियन फॉरेस्ट’ ही विशेष उल्लेखनीय होय. एका सोव्हिएट नागरिकाच्या जीवनातील अर्धशतकाचे चित्रण ह्या कादंबरीत करण्यात आले आहे आणि ह्या निमित्ताने जीवन, लोक, इतिहास आणि रशियाचे भवितव्य अशा विषयांवरील लिओनॉवचे विचारही तीत प्रतिबिंबित झालेले आहेत. ह्या कादंबरीस १९५७ साली लेनिन पारितोषिक देण्यात आले.

त्याने नाटकेही लिहिली. उन्तिलोव्ह्‍स्क (१९२५-२९), नाशे-स्तवीये (१९४२, इं. शी. इन्‍व्हेजन), जलताया कारेता (१९४६, इं. शी. द गोल्डन कोच) ही त्यांपैकी काही होत. 

समाजवादी सदसद्‍विवेकबुद्धी निर्माण करणे ही त्याच्या साहित्यनिर्मितीमागील मुख्य प्रेरणा होय. 

पांडे, म. प. (इं) कुलकर्णी, अ. र. (म.)