लॉती, प्येअर : (१४ जानेवारी १८५०-१० जून १९२३). विख्यात फ्रेंच कादंबरीकार. मूळ नाव झ्यूल्याँ व्हियो. जन्म फ्रान्समधील रॉशफॉर येथे झाला. नाविकाचे शिक्षण त्याने घेतले आणि फ्रेंच नाविक दलात नोकरी केली. १९१० साली ह्या नोकरीतून तो निवृत्त झाला. ह्या नोकरीच्या निमित्ताने देशोदेशींचा प्रवास त्याला घडला. विविध देशांतील रहिवासी त्यांची राहणी त्यांचे स्वभावविशेष ह्यांचे निरीक्षण करण्याची संधी त्याला मिळाली. ह्या निरीक्षणाचा परिणाम त्याच्या कादंबरीलेखनावर अपरिहार्यपणे झाला.

लॉतीची पहिली कादंबरी आझ्यादे १८७९ साला प्रसिद्ध झाली. त्यानंतर मारियाज द लोती (१८८०). ल रॉमँ दॉ स्पाही (१८८१), मादाम क्रिसाँथॅम (१८८८) इ. कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. उपर्युक्त कादंबऱ्यांना अनुक्रमे कॉन्स्टँटिनोपल, सेनेगल आणि जपान ह्या देश-प्रदेशांची पार्श्वभूमी लाभलेली आहे. ह्याखेंरीज माँ फ्रेर इव्ह (१८८३) व ल पेशर दिस्लांद (१८८३) ह्या त्याच्या उत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या कादंबरऱ्याही उल्लेखनही आहेत. त्यांतील कथानके व व्यक्तिरेखा ब्रिटनीमधल्या आहेत.

त्याच्या कादंबऱ्यांना लाभलेली देशोदेशींची वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी, वाचकांच्या मनाची पकड घेणारी विलक्षण कथानके आणि चित्रमय वर्णनशैली ह्या गुणांमुळे त्याच्या काळी त्याच्या कादंबऱ्या खूप गाजल्या होत्या. १८९१ साली फ्रेंच अकादमीचे सदस्यत्वही त्याला देण्यात आले. तथापि आज त्याची कीर्ती बरीच ओसरलेली आहे.

फ्रान्समधील आँदी येथे तो निधन पावला.

संदर्भ : D’Auvergne, Edmond B. Pierre Loti : The Romance of a Great Writer, 1926.

टोणगावकर, विजया