लॉक्यर, सर जोसेफ नॉर्मन : (१७ मे १८३६-१६ ऑगस्ट १९२०). इंग्रज खगोल भौतिकीविद. त्यांनी हीलियम हे मूलद्रव्य शोधून काढले. त्यांचा जन्म रग्बी (इंग्लंड) येथे झाला. त्यांचे शिक्षण घरी तसेच यूरोपातील निरनिराळ्या देशांत झाले. १८५७ – ६९ या काळात ते युद्ध खात्यात लिपिक म्हणून नोकरीला होते. फावल्या वेळात ते ज्योतिर्विद म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. त्यामुळे काही काळ त्यांनी शास्त्रीय शिक्षण समितीचे कार्यवाहक म्हणून काम केले. १८६९ साली त्यानी शास्त्रीय विषयांना वाहिलेले नेचर हे नियतकालिक सुरू केले व जवळजवळ मृत्यूपर्यंत (१९१९) ते त्याचे संपादक होते. १८८१ साली त्यांची रॉयल कॉलेज ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. १८८५ साली त्यांची साउथ केझिंग्टन येथील भौतिकीय वेधशाळेचे संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आणि १९११ साली ही वेधशाळा केंब्रिज येथे हलविण्यात येईपर्यंत ते या पदावर होते.
लॉक्यर यांनी आपल्या १६ सेंमी. व्यासाच्या दुर्बिणीस एक वर्णपटमापक बसवून त्याच्या साहाय्याने सूर्याच्या वर्णपटांचे निरीक्षण केले. सूर्यग्रहण नसतानाही सूर्याच्या तेजःशृंगांच्या [सूर्याच्या वर्णगोलाच्या –सूर्याच्या वातावरणातील दिप्तिगोलाबाहेरील पारदर्शक, पातळ थराच्या-बाहेरील भागात दिसणाऱ्या तेजस्वी, मुख्यत्वे हायड्रोजन वायूचे युक्त भागांच्या ⟶ सूर्य] वर्णपटांचे वेध घेण्याचे तंत्र त्यांनी शोधून काढले. अशा अनेक वेधांवरून तेजःशृंग सूर्याच्या वातावरणातील उचलले गेलेले वायुरूप द्रव्य आहे, असे त्यांनी सुचविले (पी.जे.सी. झांसेन यांनीही हा शोध स्वतंत्रपणे लावला होता.) सूर्यांच्या वर्णंपटाचा अभ्यास करताना १८ ऑगस्ट १८६८ रोजी लॉक्यर यांना तेजःशृंगांच्या वर्णपटाच्या पिवळ्या रंगाच्या भागात एक स्पष्ट रेषा दिसली. प्रयोगशाळेत वर्णपटांमध्ये अशी रेषा पूर्वी कधीही आढळली नव्हती. यामुळे ही रेषा सूर्यांमधील अज्ञात मूलद्रव्याची निदर्शक असावी असे मानून त्यांनी या मूलद्रव्याला हीलियम हे नावही दिले. पुढे हे मूलद्रव्य पृथ्वीवरही आढळले. सूर्याच्या वर्णगोलाच्या वर्णपटांतही ही रेषा आढळते. टोकाचे तापमान व दाब यांच्यामुळे सूर्यावर मूलद्रव्ये अधिक साध्या घटकांत विभागली जाऊन या घटकांचे वर्णपट पृथ्वीवर मिळत नसावेत, असे त्यानी या संदर्भात १८७३ साली सुचविले होते.
सूर्यावरील डागांच्या वर्णपटचा अभ्यास १८६६ पासून करण्यात येत होता. या सौरडागांचे चक्र (आवर्तन) व पृथ्वीच्या वातावरणातील व पर्यायाने हवामानातील बदल यांच्यामध्ये परस्परसंबध असावेत, याची लॉक्यर यांना कल्पना आली होती. त्यांनी याची कारणमीमांसा पुढीलप्रमाणे केली होती. सौरडागांच्या चक्रामध्ये सूर्यांच्या वर्णपटामतील काही रेषांची रुंदी वाढते. या वाढीने सूर्यावरील घटकांत होणारे बदल दर्शंविले जातात. अशाच तहेचे काही फेरफार पृथ्वीच्या वातावरणाच्या घटकांमध्ये होऊन पृथ्वीच्या हवामानात बदल घडून येतात. मात्र वेधशाळेचे केंब्रिजला स्थलांतर झाल्यावर त्याच्या या अभ्यासात खंड पडला.
इ. स. १९१३ साली सेवानिवृत्त झल्यावर त्यानी पत्नीच्या सहकार्यांने घरापासून जवळजवळ स्वत:ची खाजगी हिल वेधशाळा उभारली व येथे ताऱ्यांच्या उत्क्रांतीविषयीची उपपत्ती मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मृत्यूनंतर या वेधशाळेचे नामकरण ‘नॉर्मन लॉक्यर ऑब्झर्व्हेटरी’ असे करण्यात आले व नंतर ही वेधशाळा एक्सेटर विद्यापीठाशी संलग्न करण्यात आली.
इ. स. १९१३ साली सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी पत्नीच्या सहकार्याने घरापासून जवळच स्वतःची खाजगी हिल वेधशाळा उभारला व तेथे ताऱ्यांच्या उत्क्रांतीविषयीची उपपत्ती मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मृत्यूनंतर या वेधशाळेचे नामकरण ‘नॉर्मल लॉक्यर ऑब्हर्व्हेटरी’ असे करण्यात आले व नंतर ही वेधशाळा एक्सेटर विद्यापीठाशी संलग्न करण्यात आली.
ताऱ्यांच्या उत्क्रांतीविषयीच्या लॉक्यर यांच्या उपपत्तीनुसार आकाशातील तेजस्वी गोल (तारे) हे अशनींचे [⟶ उल्का व अशनि] समूह किंवा प्रचंड उष्णतेने अशनींचे बाष्प होऊन बनलेले ढग होत. वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये घेतलेल्या वर्णपटांच्या आधारे त्यांनी हा निष्कर्ष काढला होता. अशनींचे फार मोठे समूह म्हणजे तेजोमेघ [⟶ अभ्रिका] असून त्यांच्या केंद्रभागी तारा निर्माण होतो. आकुंचनाने तारा अधिकाधिक तप्त होत जातो त्याच्या पृष्ठभागावरील द्रव्याचे बाष्प होऊ लागते आणि उष्णतेने उत्सर्जन होऊन शेवटी थंड पिंडाच्या रूपात तारा मागे राहतो. या उपपत्तीनुसार ताऱ्याची आरंभीची व अखेरची अवस्था शीत असते. त्यामुळे नवा शीत तारा व जुना शीत तारा असा फरक करावा लागतो. दोन्ही अवस्थांच्या विशिष्ट गुरुत्वांमधील फरक तसेच त्यांच्या वर्णपटांतील तपशील यांच्यावरून या अवस्था वेगळ्या ओळखता येतात, असे त्याचे मत होते. सर्वमान्य उपपत्तीनुसार तारे अतिशय तप्त रूपात निर्माण होतात व पुढील जीवनयात्रेत ते थंड होत जातात, असे मानण्यात येते. एका पाठोपाठ ताऱ्यांचे वर्णपट घेण्यात आले. असून त्यावरूनही या मताला पुष्टी मिळते. यामुळे लॉक्यर यांच्या या उपपत्तीस पुष्कळ विरोध झाला. यानंतर आपल्या निकषांनुसार त्यांनी थंड ताऱ्यांच्या वर्गीकरणाचे काम केले. त्याच्या ताऱ्यांच्या उत्क्रांतीविषयीच्या कल्पनेला विरोध झाला असला, तरी थंड ताऱ्यांचे वर्गीकरण करण्यासाठी त्याचे विशिष्ट गुरुत्व व तापमान या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात, हे त्यांचे मत मान्य झाले.
सूर्याचे स्वरूप ठरविण्यासाठी तसेच प्रयोगशाळेत वर्णपटांवर आधारलेल्या कल्पनांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी १८७० ते १९०५ या काळात त्यानी सूर्यग्रहणाच्या निरीक्षणांसाठी आखण्यात आलेल्या आठ मोहिमांचे नेतृत्व केले होते.
रॉयल सोसायटीचे फेलो (१८६९), रम्फर्ड पदक (१८७४), सोसायटी ऑफ लंडनचे उपाध्यक्षपद (१८९२-९३), ‘सर’ ही पदवी (१८९७), विज्ञान प्रसाराचे कार्यं करणाऱ्या ब्रिटिश ॲसोसिएशनचे अध्यक्षपद वगैरे बहुमान लॉक्यर यांना मिळाले होते. ते उत्तम वक्ते होते व त्यांनी ज्योतिषशास्त्रावर पुष्कळ व्याख्याने दिली. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यांपैकी काही उल्लेखनीय पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत : काँट्रिब्युशन टू सोलर फिजिक्स (१८७४), द स्पेक्ट्रोस्कोप (१८७३), स्टर ग्रेझिंग (१८७८), केमिस्ट्री ऑफ द सन (१८८७), द मिटीऑरिटीक हायपोथिसिस (१८९०), द डॉन ऑफ ॲस्टॉनॉमी (१८९४), रीसेंट अँड कमिंग एक्लिप्सेस (१८९७), द सन्स प्लेस इन नेचर (१८९७), इनऑर्गॅनिक इव्होल्यूशन (१९००). ते सॉल्कम रेगिस (डेव्हनशर) येथे मृत्यू पावले.
ठाकूर, अ. ना.