क्रांति – १ : खस्थ ज्योतींचे विषुववृत्तापासून कोनीय अंतर म्हणजे क्रांती होय. ज्याप्रमाणे पृथ्वीवरील ठिकाणाचे निश्चित स्थान दाखविण्यासाठी अक्षांश व रेखांश हे सहनिर्देशक वापरतात त्याप्रमाणे खस्थ ज्योतींचे खगोलावरील स्थान निश्चित करण्यासाठी विषुवांश किंवा होरा व क्रांती असे वैषुव पद्धतीतील सहनिर्देशक आहेत. क्रांतीची तुलना अक्षांशाबरोबर करता येईल. पूर्वी क्रांतिवृत्तापासूनच्या (पृथ्वीच्या कक्षेची पातळी खगोलास ज्या वर्तुळात छेदते त्या वर्तुळापासूनच्या) कोनीय अंतरालाच क्रांती म्हणत असत. परंतु हल्ली क्रांती विषुववृत्तापासूनच मोजतात. खस्थ ज्योती व उत्तर ध्रुव यांमधून जाणाऱ्या होरावृत्तावर अंश, मिनिटे व सेकंद या एककांत आणि विषुववृत्ताच्या उत्तरेस धन (+) व दक्षिणेस ऋण (–) ०° ते ९०° अशी क्रांती मोजतात. याप्रमाणे विषुववृत्तावरील खस्थ ज्योतीची क्रांती शून्य अंश, दक्षिण ध्रुवाची – ९०° किंवा ९०° द. आणि उत्तर ध्रुवाची + ९०° किंवा ९०° उ. अशी असते. क्रांतीमुळे खस्थ ज्योती कोणत्या गोलार्धात आहे हे चटकन समजते. संपातचलनामुळे अगदी हळूहळू व अल्प प्रमाणात क्रांतीमध्ये बदल होत जातो [→ संपातचलन]. मात्र सूर्यकुलातील ग्रहादी खस्थ ज्योतींची क्रांती लक्षात येण्याइतकी सारखी बदलत असते. याम्योत्तर दूरदर्शकाने किंवा उन्नतिदिगंशमापकाने क्रांती मोजतात.

पहा : उन्नतिदिगंशमापक ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति विषुवांश.

ठाकूर, अ. ना.