लाव्हा : ज्वालामुखीचे निर्गमद्वार किंवा जमिनीला पडलेल्या भेगा यांच्यातून भूपृष्ठावर येऊन पोहोचणाऱ्या शिलारसाला (वितळलेल्या खडकाला) लाव्हा म्हणतात. तसेच या प्रकारचे प्रवाही वा वितळलेले द्रव्य थिजून बनलेल्या अग्निज खडकालाही लाव्हा म्हणतात. अशा खडकांना (उदा., बेसाल्ट, पमीस) ज्वालामुखी खडक म्हणतात [→ ज्वालामुखी – २] व त्यांच्यात छोटे स्फटिक किंवा काचमय द्रव्य अथवा दोन्ही असतात. वितळलेल्या खडकाचा रस भूपृष्ठाखाली असतो तेव्हा त्याला सामान्यपणे शिलारस असे संबोधिण्यात येते. शिलारस सावकाश थिजून ग्रॅनाइट, गॅब्रो यांसारखे भरडकणी खडक निर्माण होतात आणि त्यांच्यातील खनिजे लाव्ह्यातील खनिजांपेक्षा काहीशी वेगळी असतात. अशा तऱ्हेने शिलारस व लाव्हा हे परस्परांशी निगडित असून ते दोन्ही मुख्यत्वे ॲल्युमिनियम, लोह, मँगॅनीज, कॅल्शियम, पोटॅशियम व सोडियम यांनी युक्त अशी सिलिकेटी खनिजे व कमीअधिक प्रमाणात विरघळलेले वायू यांचे बनलेले असतात. [→ शिलारस १ ].

अधःपृष्ठीय परिस्थितीत शिलारसावर जास्त दाब असतो. भूपृष्ठाशी आल्यावर त्याच्यावरील दाब कमी होतो. त्यामुळे त्यात विरघळलेले वायू प्रसरण पावून तरल ( प्रवाही ) लाव्ह्यात बुडबुडे निर्माण होतात. असा लाव्हा चटकन खिजल्यास हे बुडबुडे मोठ्या प्रमाणात त्यात अडकून राहतात. परिणामी अतिशय सच्छिद्र खडक निर्माण होतो (उदा., स्पंजासारखा पमीस किंवा याहून मोठी छिद्रे असणारा धातुमळीसारखा स्कोरिया). कधीकधी अशा पोकळ्यांत नंतर खनिजे साचून स्फट ग्रंथी तयार होतात. अशा प्रकारे भृपृष्ठावर आल्यावर शिलारसातील वाफ व वायू (उदा., कार्बन डाय-ऑक्साइड, सल्फर डाय-ऑक्साइड इ.) पुष्कळ प्रमाणात निघून जातात.

द्रवरूप लाव्ह्याच्या तापमानात ७००ते १,२०० से. एवढी तफावत आढळते. मात्र लाव्ह्याचे तापमान सहसा १,२०० से. पेक्षा जास्त नसते. सिकत (सिलिकेचे प्रमाण अधिक असलेल्या) रायोलाइटी लाव्ह्यापेक्षा (९००से.) अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेले) बेसाल्टी लाव्हे (१,१०० से.) बहुधा जास्त उष्ण असतात. लाव्ह्याची श्यानता (दाटपणा) मुख्यत्वे त्याचे तापमान, संघटन व त्यातील वायुरूप पदार्थांचे प्रमाण यांच्यावर अवलंबून असते. बेसाल्टी लाव्हे सर्वाधिक प्रवाही ( तरल ) असून अगदी मंद उतारावरही ते अनेक किमी. अंतरापर्यंत वाहत जाऊ शकतात. अशा प्रकारे भेगांमधून बाहेर पडलेले बेसाल्टी लाव्हे बहुधा विस्तृत भागांवर पसरलेले आढळतात (उदा., दक्षिण ट्रॅप, कोलंबिया पठार ).

हवाई बेटांवरील अल्पसिकत लाव्हा प्रवाह सामान्यपणे ताशी ३.२ किमी. वेगाने वाहतात व तीव्र उतार असणाऱ्या दऱ्यांमध्ये त्यांचा वेग ताशी सु. ६५ किमी.पर्यंतही असू शकतो. परिणामी याचे पातळ थर झटकन पसरू शकतात. सिलिकेचे जादा प्रमाण असलेले लाव्हे चांगलेच श्यान असून ते मंदपणे वाहतात व सापेक्षतः कमी अंतरापर्यंत वाहत जातात. यामुळे सामान्यतः यांच्या घुमटाकार राशी तयार होतात. सिलिका मध्यम प्रमाणात (५०-६५ टक्के) असलेल्या अँडेसाइटी लाव्ह्याची वैशिष्ट्ये अल्पसिकत आणि सिकत लाव्ह्यांच्या दरम्यानची असतात.लाव्हा जसजसा थंड होत जातो, तसतशी त्याची श्यानता वाढत जाते व वाहण्याचा वेग कमी होत जातो. लाव्हा जलदपणे थंड झाल्यास (उदा., प्रवाहाच्या पृष्ठभागी) काचमय द्रव्य अधिक प्रमाणात निर्माण होते. उलट तो अधिक सावकाश निवल्यास (उदा., प्रवाहाच्या मध्यभागी) स्फटिकांच्या निर्मितीचे प्रमाण वाढते.

पुष्कळ ज्वालामुखी उद्‌गीरणांमध्ये लाव्हा जलदपणे बाहेर फेकला जातो. त्यामुळे दाब कमी होऊन प्रसरण पावणाऱ्या वायूंच्या स्फोटक क्रियेने त्याचे तुकडे होतात. हे छोटे तुकडे वर हवेतच जलदपणे थंड होऊन थिजतात व जमिनीवर येऊन पडतात. यातून ज्वालामुखी टफ व संबंधित अग्निदलिक खडक यांचा जाड थर साचू शकतो. लाव्हा प्रवाह व ज्वालामुखी टफ हे मोठ्या भूप्रदेशावर साचले जाऊन त्यांच्या एकाआड एक व कमीअधिक जाडीच्या थरांमुळे त्यांची एकून जाडी कित्येक हजार मी. झालेली आढळते (उदा., कोलंबिया पठार १,५०० मी.). अर्थात अशा एकेका सुट्या थरांची जाडी १ सेंमी.पासून शेकडो मी.पर्यंत असते. हवाई बेटांमध्ये लाव्ह्याचे थेंब व तंतूही थिजून घट्ट झालेले आढळतात.

मुख्यत्वे लाव्ह्याच्या श्यानतेनुसार (तसेच संघटन व तापमान यांच्यानुसार) थिजताना त्याची विविध रूपे व संरचना निर्माण होतात. वरचे पृष्ठ थिजले, तरी अंतर्गत लाव्हा प्रवाही राहिल्यास त्याचा पृष्ठभाग दंतुर होतो व तो अनियमित ठोकळ्यांच्या रूपात भंग पावू शकतो. अशा प्रकारे खडबडीत पृष्ठ व ठोकळ्या ठोकळ्यांच्या रूपातील लाव्ह्याच्या प्रकाराला ठोकळ्या लाव्हा किंवा हवाईमध्ये आआ लाव्हा म्हणतात. लाव्ह्याची वाहणारी संपूर्ण राशी थिजली, तर जाड दोरखंडासारखे पिळवटलेले स्वरूप तिच्या पृष्ठभागी तयार होते. अशा काचमय, गुळगुळीत व तरंगाकार (सुरकुत्या पडलेले) पृष्ठ असलेल्या लाव्हा प्रकाराला दोरखंडी लाव्हा म्हणतात व हवाईमध्ये यालाच पाहोएहोए लाव्हा म्हणतात. पाण्याखाली लाव्हा थिजताना बहुधा त्याला उशा-लोडांप्रमाणे आकार प्राप्त होतो. अशा संरचनेच्या लाव्हाला गिरदी लाव्हा म्हणतात. पुष्कळगा बेसाल्टी लाव्हा थंड होताना षट्‌कोणी स्तंभाकार संरचना निर्माण होते (उदा., अंधेरी येथील गिल्बर्ट टेकडी, वायोमिंगमधील डेव्हिल्स टॉवर, आयर्लंडमधील जायंट्स कॉजवे). कधीकधी लाव्हा प्रवाहांद्वारे गुहा, बोगदा वा नळ निर्माण होतात म्हणजे वरचे पृष्ठ थिजल्यावर प्रसंगविशेषी आतले सर्व प्रवाही द्रव्य निघून जाते व बोगदा, गुहा किंवा नळ मागे राहतो. अशा नळाच्या पृष्ठभागी सामान्यतः सुरकुत्या पडलेल्या आढळतात. 

भूवैज्ञानिक काळांत ज्वालामुखी क्रिया झालेल्या सर्व प्रदेशांत लाव्हे आढळतात. सिकत लाव्हे सामान्यपणे खंडांवर आढळतात आणि पाण्याखालील बहुतेक लाव्हे बेसाल्टी संघटनाचे असतात. लाव्हे आढळणारे जगातील काही प्रमुख भूप्रदेश पुढीलप्रमाणे आहेत : दक्षिण ट्रॅप ( भारत ), कोलंबिया पठार, हवाई बेटे, मेक्सिको, पूर्व ब्राझील, आइसलंड, पराना द्रोणी (द.अमेरिका) वगैरे. 

तप्त लाव्हा प्रवाहाच्या वाटेत येणारी प्रत्येक गोष्ट नष्ट होऊ शकते. मात्र लाव्ह्यांचे पुढील फायदेही आहेत. लाव्ह्यांपासून बनलेल्या जमिनी सामान्यपणे सुपीक असतात. काचमय लाव्हा (उदा., पर्लाइट) भट्टीत तापविल्यास फेसाळलेले द्रव्य मिळते व ते वजनाने हलक्या असणाऱ्या काँक्रीटमध्ये टाकण्यास उपयुक्त असते. बांधकामाचे दगड, खडी यांसाठी लाव्ह्याचे खडक उपयुक्त असून पमीस हा खडक अपघर्षक (खरवडून व घासून पृष्ठ गुळगुळीत करणारा) पदार्थ म्हणून उपयुक्त आहे. प्राचीन काळी ज्वालाकाचेपासून सुऱ्या, कुऱ्हाडी, बाणाची टोके इ. हत्यारे बनवीत. 

व्हीस्यूव्हिअस व एटना पर्वतांच्या उतारांवरून खाली वाहून येणाऱ्या वितळलेल्या द्रव्यासाठी लाव्हा ही संज्ञा प्रथम वापरण्यात आली. धुवून टाकणारा या अर्थाच्या इटालियन शब्दावरून ही संज्ञा आली असून पावसामुळे अचानकपणे बनलेल्या प्रवाहांसाठी ती आधी वापरीत असत.

 पहा : अग्निज खडक अग्निदलिक खडक ज्वालाकाच ज्वालामुखी -२ टफ दक्षिण ट्रॅप पमीस.

 ठाकूर, अ. ना.