लामार्तीन, आल्फाँस द : (२१ ऑक्टोबर १७९० – २८ फेब्रुवारी १८६९). फ्रेंच कवी आणि मुत्सद्दी. फ्रान्समधील मेकॉन येथे एका उमराव घराण्यात जन्मला. लिआँ व बेले येथे त्याचे शिक्षण झाले. धार्मिक आणि राजनिष्ठ विचारांचे संस्कार त्याच्या मनावर झालेले होते. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात त्याच्या वडीलांनी, ते राजनिष्ठ असल्यामुळे तुरुंगवासही भोगलेला होता. शिक्षण संपल्यानंतर (सु. १८०८) काही काळ त्यांने वाचन, आराम ह्यांत घालविला. १८११ साली त्याने इटलीला भेट दिली. फ्रान्सच्या राजपदावर अठराव्या लूईची पुनःस्थापना झाल्यानंतर त्याने राजाच्या शरीरसंरक्षक दलात काही काळ काम केले तथापि त्यानंतर लष्करी जीवनाबद्दलचा त्याचा उत्साह ओसरला.

प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे १८१६ साली एक्स-ले-बँ येथे राहिला असताना ज्युली शार्ल नावाच्या एका स्त्रीबरोबर त्याचे प्रेम जमले परंतु १८१७ साली तिचे निधन झाले (‘एल्वीर’ ह्या नावाने लामार्तीनच्या कवितांतून ही स्त्री आपणास भेटते). तिच्या निधनाच्या दुःखाचे प्रतिबिंब मेदितासियाँ पोएतिक (१८२०, इं. शी. पोएटिक मेडिटेशन्स, चिकित्सक आवृ. १९१५) ह्या त्याच्या पहिल्याच काव्यसंग्रहात प्रभावीपणे प्रत्ययास येते. ह्या काव्यसंग्रहाला फार मोठा प्रतिसाद मिळाला. नवे, स्वच्छंदतावादी सूर त्यातून ऐकू येत होते. त्याचप्रमाणे ह्या कवितांनी फ्रेंच कवितेला एक नव्या नादमाधुर्याचा प्रत्यय दिला. ह्या कवितांची शब्दकळा अठराव्या शतकातील फ्रेंच कवितेशी नाते सांगणारी असली, तरी त्या कवितांच्या पंक्तींतून उमटणारे अनुनाद, त्यांतील समर्थ लय आणि जीवनसक्ती ही मात्र वेगळी वैशिष्ट्ये होती. ‘ल लाक’ ही त्याची ख्यातनाम झालेली उत्कट, हृदयस्पर्शी कविता ह्याच काव्यसंग्रहातली. ह्या काव्यसंग्रहामुळे लामार्तीनला फ्रेंच कवितेतील स्वच्छंदतावादाचा अध्वर्यू म्हणून मान्यता मिळाली आणि १८२० हे ह्या काव्यसंप्रदायाचे आरंभवर्ष ठरले. ह्याच वर्षी त्याने राजनैतिक सेवेत प्रवेश केला. ॲना एलिझा बर्च ह्या इंग्रज तरुणीशी त्याचा विवाह झाला. नेपल्स आणि फ्लॉरेन्स येथे त्याने राजनैतिक पदांवर काम केले. १८२० ते १८३० हा त्याच्या राजनैतिक सेवेचा कालखंड. ह्या काळात त्याचे काव्यलेखन चालू होतेच. ले नुव्हॅल मेदितासियाँ (१८२३) व आर्मोनी पोएतिक ए रलिजझ्य (१८३०) ह्यांसारखे त्याचे काव्यसंग्रह ह्याच काळात बाहेर पडले.

 त्याची दोन कथाकाव्ये – जॉसलँ (१८३६) आणि ला शूत दॉनाँज (१८३८, इं. शी. द फॉल ऑफ ॲन एंजल)-प्रसिद्ध झाली. ही दोन कथाकाव्ये संकल्पिलेल्या ले व्हिझियाँ   ह्या एकाच महाकाव्याचे दोन भाग असून ‘द फॉल ॲन एंजल’ हा ह्या महाकाव्याच्या आरंभीचा भाग होय. ‘आत्म्याचे महाकाव्य’ रचण्याचा लामार्तीनचा हा प्रयत्न होता. ईश्वरी प्रेम हेच सर्वश्रेष्ठ प्रेम होय ईश्वरावरच प्रेम करावे, हा ह्या महाकाव्याचा मथितार्थ म्हणता येईल.

 ईश्वर, प्रेम व निसर्ग ही त्याची स्फूर्तिस्थाने होती. आपल्या उदास प्रेमभग्नतेचे प्रतिबिंब त्याला निसर्गात उमटलेले दिसे व तोच त्याच्या एकाकीपणाला दिलासाही देई. त्याचे काव्य ही काळाची गरज ठरली. झंझावती फ्रेंच राज्यक्रांती, नेपोलियनची गौरवशाली कारकीर्द ह्यांच्या पार्श्वभूमीवर बूर्‌बाँ राजवटीच्या सामान्यपणाला लोग उबगले होते. लोमार्तीनच्या स्वप्नरम्य, निसर्गपूजक, चिंतनशील काव्याने त्यांना ताजेपणाची प्रचीती दिली.

लामार्तीनच्या जीवनाला सामाजिक-राजकीय कार्याची दुसरी एक बाजू होती. राजकारणात प्रवेश करण्यासाठी लामार्तीनने १८३० नंतर राजनैतिक सेवेचा त्याग केला. ह्याच वर्षी फ्रान्समध्ये पुन्हा क्रांती होऊन बूर्‌बाँ घराण्याची सत्ता संपुष्टात आली होती आणि ड्यूक ऑफ आर्लेआं ह्याने लूई फिलिप ह्या नावाने  राजसूत्रे स्वीकारली होती. तथापि लामार्तीनची राजनिष्ठा मंदावली होती आणि लोकांचे लक्ष सामाजिक प्रश्नांकडे वेधण्याचे कार्य त्याने हाती घेतले होते. दोन वेळा केलेल्या अयशस्वी प्रयत्नांनंतर १८३३ साली फ्रान्सच्या ‘चेंबर ऑफ डेप्यूटीज’ मध्ये त्याने डेप्यूटी म्हणून स्थान प्राप्त करून घेतले. हीन स्वार्थापासून दूर राहून न्याय आणि स्वातंत्र्य ही ध्येये साकार करणारा समाज त्याच्या डोळ्यांसमोर आदर्श म्हणून होता. असा समाजाबद्दलचे त्याचे विचार वक्तृत्वपूर्ण शैलीने तो मांडीत असे. अशा भाषाणांनी देशभरचे लोकमन त्याने काबीज केले होते. १८४८ च्या फेब्रुवारीत फ्रान्समध्ये झालेल्या बंडानंतर तेथे दुसऱ्या प्रजासत्ताकाची द्वाही फिरविण्यात आली. ह्यानंतर स्थापन झालेल्या हंगामी सरकारचा तो नेताही होता. त्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात लामार्तीन फ्रान्सच्या लोकसभेवर (आसांब्ले नासियॉनाल) निवडून आला तथापि दोनच महिन्यांनी हे बंड चिरडून टाकण्यात आले. त्यानंतरच्या काळातील लामार्तीनचे जीवन विपन्नावस्थेत गेले. तुर्कस्तान आणि रशिया ह्या देशांचे इतिहास त्याने लिहिले (१८५४ १८५५) काही कादंबरिका-राफाॲल (१८४९) व ग्राझिॲल्ला (१८५२)- आणि अन्य प्रकारचे लेखन-आत्मचरित्र-ले काँफिदांस (१८४९), नुव्हॅल काँफिदांस (१८५१) भाषणे- अव्ह्र ऑरात्वार ए एकी पॉलितीक (१८६४-६५)- केले. पॅरिस येथे तो निधन पावला. 

संदर्भ : Whitehouse, Henry R.The Life of Lamartin, 2 Vols., 1918 reprint 1969.

 टोणगावकर, विजया