लामा : या समखुरी प्राण्याचा कॅमलिडी (उंट) कुलात समावेश होतो. लामा ग्लामा हे याचे शास्त्रीय नाव आहे. याचा प्रसार दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण व पश्चिम भागांत समुद्रसपाटीपासून ५,००० मी. उंचीवरील प्रदेशात आहे. याच्या शरीराची व डोक्याची लांबी १.२ मी. व शेपटी १५ सेंमी. लांब असते. याची खांद्याजवळ उंची सु. १•२ मी. असते व वजन ७०-१४० किग्रॅ. असते. शरीरावर बऱ्याच लांब, दाट व सुंदर लोकरीचे आच्छादन असते व शरीराच्या इतर अवयवांपेक्षा डोके, मान व पाय यांवरील केस आखूड असतात. रंग तपकिरी ते काळा किंवा पांढरासुद्धा असतो व त्यावर वरील रंगांचे ठिपके असतात.
लामाचे कमाल आयुर्मान सु. २० वर्षांचे असते. ११ महिन्यांच्या गर्भावधीनंतर एक पिलू जन्माला येते. उंट कुलातील इतर प्राण्यांप्रमाणे लामा शाकाहारी आहे. याला ३६ दात असतात. याला पित्ताशय नसते. दक्षिण अमेरिकेत निरनिराळ्या अस्सल जातींशी संयोग होऊन याचे कुतूहलजनक पुष्कळ संकर तयार झाले आहेत. उदा., लामा नर व अल्पाका मादी यांच्या संकराला मिस्टी वा माचुर्गा असे म्हणतात.
तेथील लोकांना (इंडियन) याचा फार उपयोग होतो. याच्या लहान केसापासून ते लिदीपर्यंत सर्व बाबींचा जवळजवळ १०० टक्के उपयोग होतो. याचे मांस खाण्यासाठी, लोकरीचा उबदार कपड्यासाठी, चामड्याच्या पादत्राणासाठी, टॅलोचा (चरबीचा) मेणबत्त्या तयार करण्यासाठी, लांब केस वळून दोरासाठी व वाळलेली लीद जाळून थंडीच्या कडाक्यापासून संरक्षणासाठी अशा हरप्रकारे उपयोग होतो.
लामा लीद टाकण्यासाठी ठराविकच जागा निवडतो असे दिसून आले आहे. २.४ मी. व्यासाचे आणि सु. ३१ सेंमी. खोल खड्ड्यातील ढिगांत वाळलेल्या लिदीच्या लहान गोवऱ्या (खांडे, शेण्या) आढळल्या आहेत. इतर प्राण्यांच्या उलट याच्या रक्तातील हिमोग्लोबिनामध्ये ऑक्सिजनाची बरीच जास्ती आसक्ती असल्याचे दिसून येते व रक्तात तांबड्या पेशींचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे उत्तुंग ठिकाणी जगणे त्याला काही अंशी शक्य होत असावे.
अर्जेंटिनामधील प्लाइस्टोसीन (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीच्या) काळातील निक्षेपांमधील जीवाश्मांवरून (शिळारूप अवशेषांवरून) असे दिसून येते की, लामाची एक वेगळी जाती आहे. नंतरच्या हिमनद-पश्च-काळात ती नाहीशी होण्याच्या मार्गावर होती पण ती आदिवासींनी माणसाळविल्यामुळे निर्वंश (लुप्त) झाली नाही.
पहा : अल्पाका.
“