लानजो: चीनच्या पश्चिम भागातील कान्सू प्रांताची राजधानी. लोकसंख्या १४,३०,००० (१९८३ अंदाज). ह्‌वांग हो  (पीत)  नदीच्या वरच्या टप्प्यात ह्‌वांग हो आणि वी या नद्यांच्या संगमाजवळ हे शहर वसलेले असून येथूनच  ह्‌वांग हो नदी पर्वतीय प्रदेशातून बाहेर पडते. साधारणपणे चीनच्या भूमितीय मध्यावर लानजोचे स्थान आहे. काउलान, गोल्डन सिटी, ही ला न जोची जुनी नावे आहेत. ‘लानजो लष्करी विभागा’ चेही मुख्य ठाणे असून या विभागामध्ये चिंगहाई, कान्सू   व शेन्सी प्रांत आणि निंगशि आ हू ई या स्वायत्त विभागाचा समावेश होतो. पूर्वीपासूनच वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरलेले हे ठाणे आहेत. मध्ययुगीन काळात चीनचे प्रवेशद्वार म्हणून लानजो ओळखले जाई. त्यावेळी पश्चिमेकडे जाणारा रेशीममार्ग येथूनच सुरू होत होता. मार्को पोलो व इतर प्रवाशांनी रेशीम मार्गावरून प्रवास करून चिनी उत्पादने यूरोप व पश्चिम आशियाकडे नेली. त्यावेळी प्रशासकीय व व्यापारी दृष्ट्या याला विशेष महत्त्व होते. लानजोचे हवामान बरेच विषम आहे. येथील उन्हाळ्यातील कमाल तापमान ३०° से., हिवाळ्यातील किमान तापमान -१२° से. पर्यंत व वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४४ सेंमी. असते. 

 इ. स. पू. सहाव्या शतकात लानजो हे प्राचीन चीन प्रदेशाचा एक भाग होते. वू टि (इ. स. पू. १४०-८७) या सम्राटाच्या कारकीर्दीत शहराची विशेष भरभराट झाली. यावेळी जांग च्यन या त्याच्या मुत्सद्याने लानजो हे आपले मुख्य ठाणे केले. इ. स. पू.  ८१ मध्ये प्रथम चीन-चेंग परगण्याचे, नंतर चीन-चेंग कमांडरीचे (लष्करी अधिकाऱ्याच्या ताब्यातील प्रदेश) हे मुख्य ठाणे बनले. हे शहर इ.स. चौ थ्या शतकात पूर्वीच्या लिआंग या स्वतंत्र राज्याची अल्पकाळ राजधानी बनले. स्वै राजघराण्याच्या कारकीर्दीत (इ. स.५८१- ६१८) लानजो प्रांताचे हे शहर पहिल्यांदा मुख्य ठाणे बनले. इ. स. ११२७ नंतर ते झूजेन राजघराण्याच्या ताब्यात, तर १२३५ नंतर मंगोलांच्या ताब्यात आले.  १६६६ मध्ये कान्सू हा वेगळा प्रांत होऊन लानजो ही त्याची राजधानी बनली. जपानशी झालेल्या युद्धात व दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वार्धात रशियाकडून चीनकडे पाठविल्या जाणाऱ्या युद्धसामग्री वाहतूक मार्गावरील हे अत्यंत मोक्याचे ठिकाण होते. १६ डिसेंबर १९२० रोजी भूकंपाचा तीव्र धक्का बसून संपूर्ण शहर उद्ध्वस्त झाले होते. चीन-जपान युद्धाकाळात (१९३७- ४५) लानजो हे महामार्गाने सीआनशी जोडले गेले, तेव्हा ३,२०० किमी. च्या चिनी-सोव्हिएट महामार्गावरील हे महत्त्वपूर्ण प्रस्थानक होते. लानजो-ऊरूमची लोहमार्ग होईपर्यंत वायव्य चीनमधील वाहतुकीच्या दृष्टीने हाच मार्ग विशेष महत्त्वाचा होता. युद्धकाळात जपानने लानजोवर तुफान बॉम्बहल्ला केला. 

इ. स. १९४९ मध्ये देशात साम्यवादी सत्ता आली व १९५२ मध्ये पंचवार्षिक योजना सुरू झाली. तेव्हापासूनच येथे विशेष औद्योगिक विकास घडून आला. वायव्य भागातील रस्ते, लोहमार्ग व हवाई वाहतुकीचे हे प्रमुख केंद्र आहे. येथे एक औष्णिक विद्युत् केंद्र उभारण्यात आलेले आहे. शहराच्या वरच्या बाजूस ह्‌वांग हो नदीवर लिऊक्यूसिआ आणि लुंग्यांगसिआ येथे जलविद्युत्‌ निर्मिती प्रकल्प उभारले जात असून लानजोच्या औद्योगिक विकासास त्यांचा चांगलाच लाभ मिळणार आहे. चीनमधील अणुकेंद्रीय उद्योगाचेही हे मुख्य केंद्र आहे. खनिज तेल रसायन उद्योगाचे हे प्रमुख केंद्र असून देशातील सर्वांत मोठ्या खनिज तेल शुद्धीकरण कारखान्यांपैकी येथे एक आहे. हा कारखाना  युमेन खनिज तेल क्षेत्राशी नळमार्गाने जोडला आहे. तेल उद्योगाला आवश्यक साधनसामग्री व उपकरणे, रेल्वेची एंजिने, रूळ व यंत्रसामुग्री, ॲल्युमिनियम उत्पादने, यंत्रे, औद्योगिक रसायने, खते, सिमेंट, कृषि अवजारे, कातडी व चामडी यांवरील प्रक्रिया, रबर, सुती आणि लोकरी वस्त्रोद्योग इ.  उद्योगधंदे शहरात चालतात.  कृषी उत्पादन व पशुधन उत्पादनांच्या व्यापाराचे हे प्रमुख केंद्र आहे.  कान्सू प्रांतातील हे एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असून लानजो विद्यापीठ, विशेष विद्यालये व उच्च शिक्षण संस्थासमूह, तेल संशोधन संस्था, तंत्रशिक्षण महाविद्यालये इ. शहरात आहेत. सुंग  (इ.स.९६०-१२७९) व मिंग (१३६८-१६४४)  कारकीर्दीतील अवशेष येथे आढळतात.

 चौधरी,  वसंत