लाक्सनेस, हाल्डोर किल्यान : (२३ एप्रिल १९०२ – ). आइसलँडिक कादंबरीकार. जन्म आइसलँडमधील रेक्याव्हीक येथे. रेक्याव्हीक येथेच त्याचे शिक्षण झाले. तो सतरा वर्षांचा असतानाच ‘चाइल्ड ऑफ नेचर’ (१९१९, इं. शी.) ही त्याची पहिली साहित्यकृती प्रसिद्ध झाली. त्यानंतरची त्याची अनेक वर्षे त्याने प्रवासात घालवली आणि रशिया, जर्मनी, अमेरिका, इंग्लंड इ. विविध देशांना भेटी दिल्या. १९२३ साली त्याने रोमन कॅथलिक पंथाचा स्वीकार केला होता. तथापि पुढे ख्रिस्ती धर्माबद्दल त्याचे मत प्रतिकूल झाले आणि तो साम्यवादी झाला. ‘द बुक ऑफ द पीपल’ (१९२९, इं. शी.) ह्या त्याच्या निबंधसंग्रहात साम्यवादाचा त्याच्यावर असलेला प्रभाव दिसून येतो.
‘अँट द होली माउंटन’ (१९२४, इं. शी.) आणि ‘द ग्रेट बीव्हर फ्रॉम काश्मीर’ (१९२७, इं. शी.) ह्या लाक्सनेसच्या दोन कादंबऱ्यांतून रोमन कॅथलिक पंथापर्यंतच्या त्याच्या वैचारिक प्रवासाचे प्रतिबिंब पडलेले दिसून येते. १९३० मध्ये तो आइसलँडमध्ये स्थिरावल्यानंतर आइसलँडमधील ग्रामीण जीवनाचे सहानुभूतीने चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या त्याने लिहिल्या. त्यांपैकी Salka Valka (२ खंड, १९३१–३२, इं. भा. १९६३) ह्या कादंबरीवर त्याची आंतरराष्ट्रीय कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे. मासेमारीवर अवलंबून असलेल्या एका आइसलँडिक खेड्यातील जीवन तीत रंगविले आहे. इंडिपेडंट पीपल (१९३४–३५ , इं. भा. १९४६), वर्ल्ड लाइट (४ खंड, १९३७–४०, इं. भा. १९६९), ‘द बेल ऑफ आइसलँड’ (१९४३, इं. शी.), ‘ब्राइट मेडन’ (१९४४, इं. शी.) आणि ‘फायर इन कोपनहेगन’ (१९४६, इं. शी.) ह्या कादंबऱ्या म्हणजे त्याने लिहिलेले एक ऐतिहासिक त्रय (ट्रिलॉजी) होय.
आइसलँडिक साहित्यातील वास्तववादाचा प्रेषित म्हणून लाक्सनेसचा गौरव केला जातो. १९५५ साली साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन त्याच्या साहित्याचा जागतिक पातळीवर गौरव केला.
कुलकर्णी, अ. र.