लाकूड : वनस्पतींच्या साल व भेंड (नरम मध्यभाग) यांच्या दरम्यानच्या कठीण तंतुयुक्त भागाला लाकूड म्हणतात. लाकडाची अधिक नेमकी व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल. वनस्पतींच्या फांद्यांची, खोडांची व मुळांची लिग्‍निनयुक्त, जलवाहक, बळकटी देणारी व साठवण करणारी ऊतके (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांचे– पेशींचे–समूह). वनस्पतिवैज्ञानिक दृष्ट्या लाकडाला प्रकाष्ठ असे नाव असून त्याचे विवरण त्याच शीर्षकाच्या नोंदीत दिलेले आहे. लाकडाचे पृथक्करण केल्यास त्यामध्ये ५० ते ६०% सेल्युलोज, २० ते २५% लिग्‍निन आणि १०–२०% कार्बोहायड्रेटे व खनिज पदार्थ आढळतात. लाकूड ही एक अतिशय महत्त्वाची नैसर्गिक साधनसंपत्ती असून काही थोड्याच पुनर्निर्मितिक्षम साधनसंपत्तीपैकी ती एक आहे. 

प्राचीन काळी मानव प्रारंभी लाकडाचा उपयोग आपले घर बांधण्यासाठी व इंधन म्हणून करीत असे. त्यानंतर तो जलप्रवासासाठी लागणाऱ्या नौका, शेतीची अवजारे, वाहने, क्रीडासाहित्य, विविध कारखान्यांसाठी कच्चा माल, प्लायवुड, कागद वगैरे गोष्टीसाठी त्याचा उपयोग करू लागला. औद्योगिक क्रांती व दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात लाकडाचा उपयोग अनेक क्षेत्रांत होऊ लागला व त्याची मागणी पण फार मोठ्या प्रमाणावर वाढली. 

पृथ्वीचा सु. १/३ भूभाग जंगलव्याप्त आहे. भारतात. ६·९ लक्ष चौ. किमी. म्हणजे सु. २२% भूभाग जंगलव्याप्त आहे व त्यापैकी ७८% जंगले उत्पादक स्वरूपाची आहेत. भारतात साधारण ३,६०० प्रकारची झाडे अस्तित्वात असून त्यांपैकी फक्त २०० प्रकारच उपयोगी आहेत आणि फक्त काही झाडांचेच लाकूड (उदा., साग, देवदार, शिसवी इ.) चांगले टिकाऊ आहे. कापून चौरस आकार न दिलेल्या सालरहित लाकडाचे भारतात १९७० साली १७·०५ कोटी घ. मी. उत्पादन झाले. १९८५ मध्ये हे उत्पादन २४·५ कोटी घ. मी. झाले आणि त्यापैकी ९०·८% लाकूड इंधनाकरिता व कोळसा तयार करण्याकरिता, तर ९·२% औद्योगिक उपयोगाकरिता वापरण्यात आले. 

यूरोपात स्वीडन, नॉर्वे व फिनलंड हे देश लाकडाकरिता प्रसिद्ध आहेत.तेथे मोठी जंगले असून त्यामध्ये पाइन, स्प्रूसस व बर्च या झाडांचे लाकूड मोठ्या प्रमाणावर होते व त्याची निर्यातपण होते. रशियाचा एक तृतीयांश भाग जंगलमय आहे. त्यामध्ये लार्च, पाइन, स्प्रूसस, बर्च आणि ॲस्पेन या झाडांची पैदास होते. कॅनडामध्ये पण पुष्कळ भाग जंगलमय असून त्यामध्ये स्प्रूस, बाल्सम फर, जॅकपाइन, व्हाइट पाइन व टॅमॅरॅक या जाती प्रसिद्ध आहेत. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत पॉप्लर, स्वीटगम, ट्युपेलो, बर्च, अँश, पाइन, सायप्रस ओक, हिकरी, वॉलनट (अक्रोड), बीच या मुख्य जाती आहेत. या देशात दरवर्षी जितकी झाडे तोडतात तितकी नवी झाडे लावण्याची वहिवाट आहे. आफ्रिकेतील मध्य भागात मोठी जंगले आहेत आणि त्यांमधील मॅहॉगनी व ओकोम या जाती प्रसिद्ध आहेत. भारतात केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, ओरिसा इ. राज्यांत लाकडाच्या अनेक जाती उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात सागवान, अंजन,आंबा, बाभूळ, मोह, साल इ. जाती उपलब्ध आहेत.  

प्रस्तुत नोंदीत लाकडाची सर्वसाधारण संरचना, वर्गीकरण, गुणधर्म, उत्तम लाकडाचे विनिर्देश (मूलभूत आवश्यक वैशिष्ट्ये), त्यावर करावयाच्या प्रक्रिया, परिरक्षण, कापकाम व लाकडापासून मिळणारे रासायनिक पदार्थ या गोष्टींचे विवरण केलेले आहे. लाकडाशी संबंधित असलेल्या ‘लाकडाचे बांधकाम’ व ‘सुतारकाम’ या विषयांवर तसेच त्यापासून बनविण्यात येणाऱ्या आगकाड्या, कागद, नौका, प्लायवुड, फर्निचर, लोणारी कोळसा इ. वस्तूंवर स्वतंत्र नोंदी आहेत.

संरचना : आ. १ मध्ये सर्वसाधारण झाडाच्या लाकडाची संरचना दर्शविणारा खोडाचा आडवा छेद दाखविला आहे. यामध्ये (१) ही बाह्य साल आहे हिच्यामुळे झाडाचे रक्षण होते. (२) ही अंतर्साल आहे. ही बाह्य सालीच्या आत असते. ही साल झाडाच्या पानांमध्ये तयार होणारे अन्नरस फांद्यांना, खोडाला व मुळांना पुरविते. (३) हा ऊतककर स्तर आहे. हा स्तर सारखा वाढत असतो. प्रत्येक हंगामात या स्तराच्या आतील बाजूस नवीन लाकूड तयार होते व बाहेरच्या बाजूस नवीन साल तयार होते. (४) ही वार्षिक वा वृद्धी वलये आहेत. यांतील प्रत्येक वलय म्हणजे एक वर्षातील  (हंगामातील) वाढ असते. (५) हे रसकाष्ठ आहे. या भागातून झाडाच्या मुळांनी जमिनीतून शोषून घेतलेली पोषक द्रव्ये पानांपर्यंत पोहोचविली जातात.  

कोष्टक क्र. १. काही देशांतील लाकडाचे उत्पादन आणि त्यापैकी इंधन व कोळसा यांकरिता तसेच औद्यौगिक उपयोगाकरिता होणारा त्याचा वापर ( १९८५ )

देश

उत्पादन

( हजार घ. मी. ) 

इंधन व कोळसा 

(%) 

औद्योगिक उपयोग 

(%) 

अमेरिकेचीसंयुक्त संस्थाने 

४,४८,४८८ 

२२·७ 

७७·३ 

अर्जेटिना 

१३,४२९ 

६३·० 

३७·० 

ऑस्ट्रिया 

१४,२०४ 

९·९ 

९०·१ 

ऑस्टेलिया 

१९,२१७ 

१५·० 

८५·० 

इंडोनेशिया 

१,४९,००८ 

८२·० 

१८·० 

इथिओपिया 

३७,८९६ 

९५·२ 

४·८ 

कॅनडा 

१,७१,३०६ 

३·६ 

९६·४ 

कॅमेरून 

१०,७५२ 

७४·३ 

२५·७ 

केन्या 

३२,४०९ 

९६·२ 

३·८ 

कोलंबिया 

१७,२२४ 

८४·५ 

१५·५ 

चिली 

१५,४९३ 

३९·२ 

६०·८ 

चीन 

२,६३,३७३ 

६४·८ 

३५·२ 

चेकोस्लोव्हाकिया 

१९,००२ 

७·३ 

९२·७ 

जपान 

३३,४६५ 

१·६ 

९८·४ 

जर्मनी,पश्चिम 

३०,६५० 

१२·४ 

८७·६ 

जर्मनी,पूर्व 

१०,५६६ 

६·२ 

९३·८ 

झाईरे 

३०,४९१ 

९१·७ 

८·३ 

टांझानिया 

४२,५४० 

९६·८ 

३·२ 

थायलंड 

४१,२७६ 

८९·८ 

१०·२ 

तुर्कस्तान 

१८,४४६ 

६७·७ 

३२·३ 

दक्षिण आफ्रिका 

१८,९४४ 

३७·० 

६३·० 

नायजेरिया 

९५,५६६ 

९१·७ 

८·३ 

नॉर्वे 

१०,६२० 

७·५ 

९२·५ 

नेपाळ 

१५,७७६ 

९६·५ 

३·५ 

पाकिस्तान 

२०,२३३ 

९६·९ 

३·१ 

पोलंड 

२३,३४० 

१५·० 

८५·० 

फिनलंड 

४१,७८२ 

७·४ 

९२·६ 

फिलिपीन्स 

३६,६१४ 

७९·७ 

२०·३ 

फ्रान्स 

३८,९९९ 

२६·७ 

७३·३ 

बांगला देश 

२७,१४४ 

९६·९ 

३·१ 

ब्रह्मदेश 

१८,८७६ 

८४·० 

१६·० 

ब्राझील 

२,२५,९०५ 

७४·४ 

२५·६ 

भारत 

२,४५,०२९ 

९०·८ 

९·२ 

मलेशिया 

३९,६८८ 

१९·१ 

८०·९ 

मेक्सिको 

२१,३१७ 

६४·९ 

३५·५ 

मोझँबीक 

१५ ,२३१ 

९३·७ 

६·३ 

युगांडा 

१२,४८८ 

८६·९ 

१३·१ 

यूगोस्लाव्हिया 

१५,८६३ 

२५·९ 

७४·१ 

रशिया 

३,५५,७०० 

२२·६ 

७७·४ 

रूमानिया 

२४,१२६ 

१८·९ 

८१·१ 

व्हिएटनाम 

२४,८७२ 

८६·९ 

१३·१ 

सुदान 

१९,५२४ 

९०·६ 

९·४ 

स्पेन 

१३,६९६ 

१३·६ 

८६·४ 

स्वीडन 

५३,३३९ 

८·३ 

९१·७ 


(६) हा मध्यकाष्ठाचा भाग आहे. तेथील रसकाष्ठ चांगले वाळून घट्ट झालेले असते. या भागातील लाकूड इमारतीच्या उत्तम कामासाठी वापरतात. (७) हे भेंड असून ते नरम असते. (८) हे काष्ठ-किरण असून ते भेंडापासून ते सालीपर्यत विविध स्तर जोडतात. यांत पोषक द्रव्ये साठविलेली असतात. आकृतीत दर्शविलेल्या साल, ऊतककर, मध्यकाष्ठ व भेंड या भागांवर स्वतंत्र नोंदी आहेत. वार्षिक वलये आणि त्यांवरून झाडाचे वय ठरविण्याची पद्धत यांचे विवरण ‘ वृक्षकालनिर्णयशास्त्र ’ या नोंदीत दिलेले आहे.

आ. १. सर्वसाधारण झाडाच्या लाकडाची संरचना दाखविणारा खोडाचा आडवा छेद : (१) बाह्य साल, (२) अंतर्साल, (३) ऊतककर स्तर, (४) वार्षिक किंवा वृद्धी वलये, (५) रसकाष्ठ, (६) मध्यकाष्ठ, (७) भेंड, (८) काष्ठ-किरण.वर्गीकरण : सर्वसाधारणपणे लाकडाचे वर्गीकरण करताना ते ज्या झाडापासून मिळते त्यांचे प्रकार करण्याची प्रथा आहे. यानुसार त्यांचे बहिर्भव म्हणजे बाह्य बाजूने वाढणारी आणि अंतर्भव म्हणजे आतल्या आत वाढणारी असे दोन भाग असतात. बहिर्भव प्रकारात व्यापारी तत्त्वावर वापर होणाऱ्या सर्व लाकडांचा समावेश असतो, उदा., सागवान, देवदार इ. आणि अंतर्भव प्रकारात पाम, बांबू इ. झाडांच्या समावेश असतो. बहिर्भव लाकडाचे कठीण लाकूड आणि मृदू लाकूड असे उपप्रकार करतात. कठीण लाकूड देणाऱ्या झाडांची पाने रूंद, गडद रंगाची असून त्यांचे तंतू घट्ट व त्यांमध्ये निश्चित स्वरूपाची गोलाकार वलये असतात. ही लाकडे वजनाने जड, कणखर व बळकट असतात. मृदू लाकडाच्या झाडाची पाने लांब व निमुळती असतात. फिकट रंग, एकसारखा पोत. वजनाने हलके, कमी कणखर व बळकट असे त्याचे स्वरूप असते. 

गुणधर्म : भौतिक दृष्ट्या लाकूड हे एक अतिशय घट्ट जेली किंवा जेल [⟶कलिल] स्वरूपाचे असून ते जलशोषकही आहे. पाणी शोषत असताना ते फुगते व वाळत असताना आकुंचन पावते. लाकूड काही मर्यादेपर्यंतच ( त्याच्या शुष्क स्थितीतील वजनाच्या सु. ३०% ) पाण्याचे शोषण करू शकते. ज्याच्या भित्तीत या मर्यादेइतके पाणी आहे पण पोकळ्यांत काहीही पाणी नाही असा लाकडाचा तुकडा तंतुसंपृक्तता अवस्थेत गेलेला आहे असे म्हणतात व त्या वेळी त्याचे घनफळ महत्तम असते. अधिक पाणी पुरविले, तर लाकडाच्या पोकळ्यांत पाणी शिरते पण ते अधिक फुगत नाही. 

वनस्पतींची कोशिकीय ( पेशीय ) संरचना ज्याची बनलेली असते त्या मूलभूत पदार्थाचे विशिष्ट गुरूत्व १.५५ असते व सर्व जातींकरिता हे मूल्य समान असते. विविध जातींतील कोशिकीय मांडणीमधील फरकामुळे त्यांच्या लाकडाची घनता भिन्न असते. 

सल, पोत व घाट : सल (किंवा सळ) ही संज्ञा लाकडातील तंतूच्या वा इतर अनुदैर्घ्य (लांबीला समांतर) घटकांच्या झाडाच्या उभ्या अक्षाच्या किंवा लाकडाच्या तुकड्याच्या अनुदैर्घ्य कडांच्या सापेक्ष असणाऱ्या दिशेशी संबंधित आहे. सल हा सरळ, सर्पिल, परस्पर बंधित, तरंगाकार वा अनियमित असू शकतो. 

पोत हा कोशिकांचे सापेक्ष आकारमान व आकारमानातील भिन्नता यांच्याशी संबंधित असून तो तलम ते भरड आणि एकसारखा ते विषम असू शकतो. लहान व्यासाच्या कोशिका असलेल्या जातींच्या (उदा., मॅपल) बाबतीत पोत तलम असतो, तर मोठ्या व्यासाच्या कोशिका असलेल्या जातींच्या (उदा., ओक) बाबतीत पोत भरड असल्याचे आढळते. एकसारख्या पोताच्या लाकडांत जवळजवळ एकसारख्या व्यासाच्या कोशिका असतात, तर विषम पोताच्या लाकडांतील कोशिकांच्या व्यासात स्पष्टपणे भिन्नता दिसून येते. 

निरनिराळ्या ऊतकांची मांडणी, सलाची दिशा, रंगामधील भेद अथवा यांच्या संयोगाने लाकडाच्या  (अथवा त्याच्या एकसारख्या जाडीच्या स्तराच्या) अनुदैर्घ्य पृष्ठभागावर निर्माण होणाऱ्या आकृतिबंधांना लाकडाचा घाट म्हणतात. 

रंग : कोशिका भित्ती व कोशिका पोकळ्या यांत झिरपलेल्या रासायनिक संयुगांमुळे लाकडाला रंग प्राप्त होतो. काही अपवाद वगळता रंग मध्यकाष्ठापुरताच मर्यादित असतो. रसकाष्ठाचा रंग अतिशय फिकट असतो. मध्यकाष्ठ व रसकाष्ठ यांच्या रंगांतील फरक रेडवुड, ब्‍लॅक वॉलनट, ब्‍लॅक चेरी यांसारख्या जातींत ठळकपणे आढळतो. हजारो निरनिराळ्या झाडांच्या जातींत कल्पना करता येण्याजोगे जवळजवळ सर्व रंग आढळू शकतात.हॉलीचे लाकूड जवळजवळ पांढरे असते, तर शिसवीचे काळे कुळकुळीत असते. दीर्घ काळ लाकूड उघडे राहिल्यास त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे फिकट रंगाची लाकडे गडद होतात व गडद रंगाची फिकट होत जातात. नुकतेच कापलेले लाकूड हवेत व सूर्यप्रकाशात काही काळ उघड्या राहिलेल्या लाकडांपेक्षा पुष्कळच फिकट रंगाचे असते. ऑक्सिडीभवनामुळे (ऑक्सिजनाशी संयोग झाल्याने) सर्व लाकडांच्या रंगच्छटा गडद होतात. मॅहॉगनी, पर्पलवुड, सागवान व इतर अनेक उष्ण कटिबंधीय झाडांच्या लाकडांचा चकचकीत गडद रंग आणि त्यांचा आकर्षक घाट व सल यांमुळे त्यांना मागणी पुष्कळ असून त्यांच्या किंमतीही खूप असतात. 

चकाकी : लाकडाच्या विविध घटकांनी प्रकाशाचे परावर्तन केल्यामुळे लाकडाला आकर्षक चकाकी प्राप्त होते. प्रकाशाच्या विभिन्न परिस्थितीत सर्व लाकडे चकचकीत किंवा निस्तेज दिसतात. लाकूड कापण्याच्या पद्धतीचा या गुणधर्मावर परिणाम होऊ शकतो. पॉलिश केल्यावर सर्व प्रकारची लाकडे काही एका मर्यादेपर्यंत चकचकीत होतात. मॅहॉगनी, चेरी, ब्‍लॅक वॉलनट, सॅटिन वुड, सागवान यांसारख्या काही जातींच्या मध्यकाष्ठात डिंक, रेझिने, टॅनीन व तेले असल्याने आणि त्यांचा सल आकर्षक असल्याने त्यांचे स्वरूप विशेष चकमकीत असते. 

गंध : बहुसंख्य लाकडांना स्पष्टपणे वेगळा असा गंध नसतो पण काही जातींना मात्र निश्चित व अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गंध असतो आणि त्यामुळे हा एकच गुणधर्म त्या जाती ओळखण्यास पुरेसा असतो. स्पष्टपणे वेगळा व आल्हाददायक गंध असलेल्या जातींत सीडार, रोझवुड, सॅसॉफ्रस, कापूर वृक्ष, चंदन इत्यादींचा समावेश होतो तर अप्रिय गंध असलेल्या जातींत अल्पाइन फरचा अंतर्भाव होतो. लाकूड सुकल्यावर हे गंध सामान्यतः नाहीसे होतात. नुकत्याच कापलेल्या लाकडाला (विशेषतः रेझीनयुक्त पाइन व स्प्रूस किंवा टॅनीनयुक्त ओक) वैशिष्ट्यपूर्ण वास येतो. 


जलांश : लाकडातील जलांशाचे प्रमाण महत्त्वाचे असते. कारण त्याचा लाकडाचे वजन (व त्यामुळे वाहतुकीचा खर्च), आकार, आकारमान, उष्णतानिर्मितीची क्षमता,  कठीणपणा, त्याच्या तुकड्याचे बल व कडकपणा तसेच कवके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) व कीटक यांच्या आक्रमणास भेद्यता अशा विविध गुणधर्मांवर परिणाम होतो. लाकूड निराळ्या परिस्थितींत नेल्यास या गुणधर्मांत होणारे बदलही जलांशामुळे निर्धारित होतात.

जलांश दोन पद्धतींनी निदर्शित करता येतो : (१) जलाशांचे वजन व ओल्या लाकडाचे वजन यांचे गुणोत्तर (नेहमी १००% पेक्षा कमी), (२) जलांशाचे वजन व शुष्क लाकडाचे वजन यांचे गुणोत्तर. दुसरी पद्धत अधिक प्रचारात असून या पद्धतीत एखाद्या ओंडक्यात २००% जलांश आहे. याचा अर्थ १०० किग्रॅ. वजनाच्या शुष्क लाकडात २०० किग्रॅ. पाणी आहे, असा होतो. इतका उच्च जलांश कधीकधी नैसर्गिक रीत्याही (उदा., दलदलीतील ताज्या तोडलेल्या बाल्ड सायप्रस वृक्षात) आढळतो. अधिकांशाने ताज्या तोडलेल्या इमारती लाकडात सु. १००% जलांश रसकाष्ठात असतो मध्यकाष्ठात तो पुष्कळच कमी असतो.  

नुकत्याच तोडलेल्या लाकडाचा तुकडा खुल्या हवेत (जास्तकरून सावलीत) वाळतो आणि त्याच्या पृष्ठभागाचा बाष्पदाब वातावरणीय बाष्पदाबाबरोबर होईपर्यंत आकुंचन पावतो. अशा प्रकारे खुल्या हवेवर वाळविलेल्या (रापविलेल्या) इमारती लाकडाचा फार अवजड नसलेल्या तुकड्यांतील जलांशात ऋतू व स्थळ यांनुसार फरक पडतो. ब्रिटनमध्ये असा जलांशाची नमुनेदार मूल्ये १५% ते २०% यांच्या दरम्यान, तर ईजिप्तमध्ये जलांश ६% इतका कमी असू शकतो. लाकूड इमारतीच्या आत आणल्यावर आणखी वाळते व आकुंचन पावते. यामुळे ब्रिटनमधील फर्निचरमध्ये ७ ते ९% जलांश आढळतो, तर अमेरिकेच्या व दक्षिण आफ्रिकेच्या शुष्क भागात तो फक्त ६% असतो.

लाकडातील रासायनिक रीत्या संयोग पावलेले पाणी वगळून बाकीचे सर्व पाणी काढून टाकल्यावरच लाकूड पूर्णपणे शुष्क झाल्याचे समजतात. पाणी काढून टाकण्यासाठी लाकूड भट्टीत १०० से. तापमानाला वाळवितात. कोरडे लाकूड आर्द्र हवेत उघडे ठेवल्यावर ते पुन्हा पाणी शोषते व फुगते. दिलेल्या वातावरणीय आर्द्रतामानाला लाकडाच्या सर्व जाती साधारण समान शेकडा प्रमाणात आर्द्रता शोषतात व हे प्रमाण त्यांच्या भट्टीत शुष्क केल्यावर होणाऱ्या वजनावर अवलंबून असते.

शोषलेल्या वा काढून टाकलेल्या पाण्याच्या समान शेकडा प्रमाणाकरिता निरनिराळ्या लाकडांच्या बाबतीत त्यांच्या घनफळात होणाऱ्या बदलात फरक आढळतात. सामान्यतः जड लाकडे हलक्या लाकडांपेक्षा अधिक फुगतात वा आकुंचन पावतात. तथापि आकुंचन व फुगणे हे घनतेच्या अगदी बरोबर प्रमाणात असतात असे नाही. कारण एकाच घनतेच्या लाकडांत या बाबतीत फरक आढळतात. 

लाकडाच्या तुकड्याचे निरनिराळ्या दिशांतील आकुंचन आणि फुगणे असमान असते. सलाच्या दिशेने आकुंचन व फुगणे अगदी थोडे असते आणि त्यामुळे चांगल्या रापविलेल्या लाकडाचे मोजदंड अतिशय विश्वासार्ह असतात. सलाला आडव्या असलेल्या दिशेतील आकुंचन व फुगणे अनेक पटींनी जास्त असते. ते त्रिज्यीय दिशेत २ ते ९% आणि स्पर्शीय दिशेने (किंवा वार्षिक वलयांना समांतर दिशेने) ४ ते १४% असते. 

अतिशय गाठी असलेल्या लाकडाप्रमाणे ज्याचे तंतू निरनिराळ्या दिशांना असतात अशा लाकडाचा तुकडा सुकविल्यावर विशेषत्वाने तडकण्याची शक्यता असते. अंशतः याच कारणासाठी शोभिवंत आकृत्या असलेल्या फर्निचरच्या निर्मितीत वापरण्यात येणारे गाठाळ लाकूड अतिशय पातळ चादरींच्या रूपात कापण्यात येते आणि मग या चादरी सरळ सल असलेल्या लाकडावर चिकटविण्यात येतात. प्लायवुडामध्ये लाकडाचा पातळ चादरी अशा प्रकारे एकत्रित चिकटवितात की, लागोपाठच्या चादरींचे सल एकमेकांना आडवे (सामान्यतः काटकोनात) असतात. यामुळे साध्या लाकडापेक्षा प्लायवुडाला कमी बाक येतो व त्याचे आकुंचन अधिक एकसारखे असते.[⟶ प्लायवुड].

उष्णता मूल्य : लाकडाच्या तुकड्याची उष्णता उत्पन्न करण्याची क्षमता वाढत्या जलांशाबरोबर कमी होत जाते. लाकडाच्या ज्वलनक्रियेत मुक्त होणारी उष्णता मुख्यत्वे काष्ठमय घटकांपासून उत्पन्न होते. यामुळे अधिक जड लाकूड जास्त उष्णता पुरवू शकते. रेझिनाच्या उपस्थितीमुळे लाकडाचे उष्णता मूल्य वाढते, तथापि उष्णता कशा प्रकारे मुक्त होते ही एक महत्त्वाची बाब आहे. अतिशय जड लाकडांच्या ज्वाला अल्प किंवा मुळीच नसतात व ती मंदपणे जळतात, तर हलक्या लाकडांच्या ज्वाला उंच असतात व ती उग्रपणे धडावून जळतात. यामुळे अग्‍नीच्या प्रारंभासाठी वा वाफेच्या निर्मितीसाठी हलकी लाकडे वापरतात, तर खोल्या गरम राखण्यासाठी मध्यम घनतेची (उदा., ओक, बीच व अँश) लाकडे अधिक कार्यक्षम असतात. 

वजन : लाकडांमध्ये वजनाच्या बाबतीत पुष्कळच फरक आढळतो. लिग्‍नम व्हिटी व क्केब्रॅको यांसारख्या उष्ण कटिबंधीय झाडांचे लाकूड अतिशय जड, तर बाल्सा व कॉर्कवुड (भेंडवृक्ष) यांचे लाकूड अतिशय हलके असते. सर्व जातींच्या लाकडांचे विशिष्ट गुरूत्व एकापेक्षा कमी असल्याने ती पाण्यावर तरंगतात. 

बहुतेक कठीण लाकडे (विशेषत: ओक, ब्‍लॅक वॉलनट, बीच, बर्च, मॅपल, अँश, हिकरी) जड असतात. सीडारच्या विविध जातींचा समावेश अतिशय हलक्या लाकडांच्या जातीत होतो. फर (ॲबीस ), हेमलॉक, स्प्रूस, रेडवुड व पाइनच्या काही जाती यांच्या लाकडांचे वि. गु. कमी असते. डग्‍लस फर व सदर्न पाइन या जातींच्या इमारती लाकडांचे वजन मध्यम असते. अंजन, खैर व मोह यांचे लाकूड पुष्कळ जड असते तर आंबा, देवदार, सागवान व बाभूळ यांचे लाकूड मध्यम वजनाचे असते. कठीणपणा, बल तसेच उष्णता मूल्य या दृष्टींनीही लाकडाचे वजन महत्त्वाचे असते. हिकरीचे लाकूड या दृष्टीने एक लक्षणीय उदाहरण आहे. हे लाकूड कठीण व जड असून त्याची बल गुणवत्ता उत्तम असते. तसेच इंधन म्हणून ते महत्त्वाचे आहे.

बल : लाकडाच्या बाबतीत बल ही संज्ञा विशिष्ट भारांना व त्यांमुळे निर्माण होणाऱ्या विकृतींना प्रतिकार करण्याच्या लाकडाच्या क्षमतेच्या संदर्भात वापरली जाते. या बाबतीत निरनिराळ्या लाकडांत मूलत: फरक आढळतात. 

बलाचा अंतर्भाव होणारी प्रमुख प्रतिकार वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत : (१) तंतूंच्या दिशेतील संपीडनाला प्रतिकार (जसे खांब व इमारतीच्या बाह्य सांगाड्यातील इतर उभ्या लाकडी घटकांतील) (२) ताठपणा किंवा वाकण्यास प्रतिकार करण्याची क्षमता (जसे जमिनीला आधार देणारे बडोद व सर्व बांधकामांतील जड भारांना आधार देणाऱ्या तुळ्या यांतील) (३) ताणातील बल किंवा लांबीच्या दिशेतील भाराला प्रतिकार करण्याची क्षमता (४) कर्तन बल किंवा सलाच्या दिशेने वा त्याच्या आडव्या दिशेने तुटण्यास प्रतिकार करण्याची तंतूंची क्षमता (उदा., खोबणीत बसविलेल्या खुंटीचे कर्तन). 

लाकडाच्या अंगी झालेला बल आणि हलकेपणा यांचा संयोग हा त्याचा एक उल्लेखनीय यांत्रिक गुणधर्म आहे. उदा., लाकडाचे दलन (चुरडण्याचे) बल व घनता यांचे गुणोत्तर लोखंड, पोलाद व इतर बहुतेक धातूंपेक्षा जास्त असते. गाठी नसलेले व सरळ सल असलेले लाकूड सलाला समांतर असलेल्या ताणाच्या बाबतीत अतिशय मजबूत असते व त्यामुळे असे लाकूड कैच्यांमध्ये खालच्या घटकांकरिता बऱ्याच वेळा वापरतात. 


जलांश हा लाकडाच्या बलातील महत्त्वाचा घटक आहे. यामुळे काही मर्यादेपर्यंत लाकडाचे बल ते रापविण्याच्या मानानुसार वाढते. लाकूड हवेतील पाणी जसजसे शोषते तसतसे त्याचे बल व कडकपणा कमी होत जातात. तथापि या गुणधर्माचा फायदाही घेता येतो. उदा., फर्निचर तयार करताना लाकडावर ओली वाफ सोडतात आणि त्यामुळे ते अधिक सुलभपणे वाकविता येते व त्याला चांगली रेखीव वक्रता देता येते. लाकडातील गाठी व इतर दोष यांचाही बलावर परिणाम होतो. गाठीचे आकारमान, स्वरूप आणि स्थान महत्त्वाची असतात. लाकडाचे वजन बलाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. जड लाकडांची संरचना बहुधा मजबूत असते. लार्च, हिकरी, हार्ड मॅपल, यलो बर्च, व्हाइट ओक इ. लाकडांचे बल उत्तम असते. भारतातील सागवान, जांभा, धामणी, धावडा, बाभूळ, साल इ. लाकडांचे बल चांगले असते. सायप्रस, डग्‍लस फर, ॲश, बीच, रेड ओक, चेस्टनट व सिकॅमूर तसेच भारतातली आंबा, अंजन, अर्जुन यांचे लाकूड मध्यम बलाचे असते. सर्वांत दुर्बळ असलेल्या लाकडांची उदाहरणे म्हणजे हेमलॉक, स्प्रूस, यलो पॉप्लर, कॉटनवुड, व्हाइट व इतर मृदू पाइन वगैरे. 

कठीणपणा : खाच पाडण्यास किंवा सलामधून करवत वा कुऱ्हाड चालविण्यास होणाऱ्या लाकडाच्या विरोधाला त्याचा कठीणपणा म्हणता येईल. विविध लाकडांचा कठीणपणात खूप भिन्नता आढळते. लाकडाचे वजन, घटकांची संरचना व रापविण्याचे प्रमाण यांवर लाकडाचा कठीणपणा अवलंबून असतो. जमीन, फर्निचर, शिळेपाट (लोहमार्गाखाली आधारासाठी बसविण्यात येणारे आडवे लाकडी ओंडके), मुठी व इतर अनेक लहान लाकडी वस्तू वगैरे उपयोगांच्या दृष्टीने लाकडाचा कठीणपणा हा गुणधर्म महत्त्वाचा आहे. हिकरी, ओक, बीच, बर्च, ब्‍लॅक लोकस्ट, ॲश, अंजन, जांभा, धामणी, धावडा, बाभूळ, मोह, हळदू इ. झाडांचे लाकूड चांगले कठीण असते. डग्‍लस फर, व्हाइट एल्म, कॉटनवुड, सागवान, अर्जुन, आंबा, साल वगैरेंचे मध्यम कठीण असते, तर हेमलॉक, चेस्टनट, सायप्रस, सीडार, स्प्रूस, रेडवुड, विलो वगैरेंचे लाकूड मऊ असते.

विभाजनक्षमता : लाकूड फोडण्याच्या किंवा तोडण्याच्या दृष्टीने सलाच्या दिशेने लाकडाचे विभाजन होण्यास त्याच्याकडून होणारा विरोध महत्त्वाचा ठरतो. त्रिज्येच्या दिशेने लाकडाचे विभाजन होण्यास किमान विरोध होतो कारण काष्ठ-किरण त्या दिशेने असतात. ओल्या लाकडातील तंतू पाण्यामुळे मऊ झालेले असतात व सलाच्या आडव्या दिशेतील त्यांचे आसंजन (चिकटून राहणे) कमी होते आणि त्यामुळे ओले लाकूड अधिक सुलभपणे फोडता येते. तथापि सलाच्या सरळपणावरच लाकडाच्या विभाजनाची सुलभता मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. एल्फ, बीच, सिकॅमूर, डॉगवुड इत्यादींचे लाकूड फोडणे अवघड असते. बर्च, मॅपल, हिकरी, ओक, ॲश, वगैरेंचे लाकूड या बाबतीत मध्यम असते, तर चेस्टनट, पाइन, रेडवुड, सीडार, फर इत्यादींच्या लाकडांचे सहजपणे विभाजन करता येते. 

लवचिकता व चिवटपणा : लाकडातील जलांशाचा त्याच्या लवचिकतेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. हिकरी व ॲश ही लवचिक लाकडांची तर हेमलॉक व पाइन ही ठिसूळ लाकडांची उदाहरणे आहेत. लाकडाच्या या गुणधर्मांमुळे विविध वाद्यांतील स्वरधुमाऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अनुस्पंदकात (उदा., पियानोचा ध्वनिफलक, व्हायोलिनचा खालचा भाग) ते फार उपयुक्त ठरलेले आहे. कुजणाऱ्या लाकडाचे बल आणि लवचिकता लवकरच कमी होतात व अंशत: कुजलेल्या लाकडावरही ठोकल्यास खणखणीत ध्वनीऐवजी जड व मंद ध्वनी येतो.

लाकडाचे एकत्रित बल, आघात रोध व नम्यता (वाकविण्यास सुलभ) यांना उद्देशून चिवटपणा ही संज्ञा वापरली जाते. चिवट लाकडाची हिकरी व एल्म ही उत्तम उदाहरणे असून ही लाकडे ताण व कर्तन यांना तीव्र विरोध करतात.

टिकाऊपणा : लाकडाच्या बाबतीत या संज्ञेचा अर्थ ‘कुजण्याच्या प्रक्रियेला प्रतिकार करण्याची क्षमता’असा होतो किंवा ‘दिलेल्या परिस्थितीत विशिष्ट लाकडाचे असणारे आयुर्मान’ असाही करता येईल. ज्या उपयोगांत (उदा., लोहमार्गावरील शिळेपाट, खांब, खाणकामात वापरावयाचे लाकूड, बांधकामाच्या पायाकरिता वापरावयाच्या स्तंभिका) लाकूड विशेषत्वाने कुजण्याची शक्यता असते तेथे टिकाऊपणा हा गुणधर्म महत्त्वाचा असतो. लाकडाच्या टिकाऊपणामध्ये यांत्रिक झिजेचाही विचार अंतर्भूत असला, तरी शिळेपाटाकरिता होणाऱ्या त्याच्या उपयोगाखेरीज अन्यत्र हा मुद्दा सापेक्षत: गौण ठरतो. विविध उपयोगांकरिता वापरण्यात येणाऱ्या निरनिराळ्या जातींच्या लाकडांच्या किंमतींवर त्यांच्या टिकाऊपणाच्या गुणधर्माचा महत्त्वाचा परिणाम होतो. विशेषतः माती, हवा व पाणी यांच्या सान्निध्यात व परिरक्षक पदार्थांशिवाय उपयोगात आणावयाच्या लाकडांच्या बाबतीत हा गुणधर्म महत्त्वाचा ठरतो.

लाकूड नैसर्गिक रीत्या कुजत नाही. लाकडाच्या सर्व प्रकारच्या कुजण्यास कवके व सूक्ष्मजंतू  कारणीभूत असतात. ही कवके व सूक्ष्मजंतू लाकडाच्या कोशिकांतील स्टार्च व इतर पदार्थांवर जगतात. त्यामुळे लाकडाची संरचना मोडकळीस येते आणि लाकडात विविध प्रकारची कूज उद्‍भवते. कवके व सूक्ष्मजंतू यांना जीवनास व प्रसारणास पुरेशी उष्णता (लाकूड कुजविणारी बहुतेक कवके १५ते ३२ से. तापमानात जलद वाढतात), तसेच आर्द्रता व ऑक्सिजन आवश्यक असतात. यांपैकी काही वा सर्व गोष्टी दूर केल्यास कुजण्याची प्रक्रिया शक्य होत नाही व लाकूड अमर्याद काळापर्यंत टिकू शकेल. उदा., आयरिश बॉग ओकचे ओंडके कित्येक शतके पाण्याखाली असूनही त्यांतील अम्‍ल व मातीतील हवेचा अभाव यांमुळे कुजलेले नाहीत. रसकाष्ठात ओलावा आणि कवके व सूक्ष्मजंतू यांना लागणारे अन्न अधिक प्रमाणात असल्याने मध्यकाष्ठापेक्षा ते जास्त कुजण्याजोगे असते. 

लाकडाचे भौतिक व यांत्रिक गुणधर्म आणि त्याचा टिकाऊपणा यांत स्पष्ट संबंध असल्याचे आढळत नाही. उदा., वजन, बल, कठीणपणा वा चिवटपणा यांचा लाकडाच्या टिकाऊपणावर काही परिणाम होतो असे दिसत नाही. तथापि यांपैकी काही गुणधर्म घर्षणाने व यांत्रिक झिजेमुळे होणाऱ्या नुकसानकारक परिणामांना प्रतिबंध करण्यास मदत करतात. मध्यकाष्ठाचा रंग व टिकाऊपणा यांचा मात्र बऱ्याचदा निश्चित संबंध असल्याचे दिसून येते. मध्यकाष्ठ जितके गडद असेल तितका लाकडाचा टिकाऊपणा अधिक असतो व एबनी, लिग्‍नम व्हिटी, रेड सीडार वगैरेंबाबत हा गुण विशेषत्वाने आढळतो. बासवुड, मॅपल, हिकरी, स्प्रूस वगैरे फिकट रंगाचे मध्यकाष्ठ असलेल्या जातींचे लाकूड फार नाशवंत असते. कोणत्याही लाकडाचा टिकाऊपणा त्यातील विशिष्ट रासायनिक घटकांवर (उदा., रेझिने, डिंक, टॅनिन आणि इतर कुजण्यास विरोध करणाऱ्या द्रव्यांवर) अवलंबून असतो. या द्रव्यांमुळे अनेक जातींत मध्यकाष्ठाला गडद रंग येतो आणि यामुळेच त्याचा रंग व टिकाऊपणा यांतील संबंध स्पष्ट होतो. 

व्हाइट सीडार, ईस्टर्न व वेस्टर्न सीडार, ब्‍लॅक वॉलनट, सायप्रस, रेड वुड, व्हाइट ओक, ब्‍लॅक ॲश, चेरी, रेड एल्म, वेस्टर्न व ईस्टर्न लार्च, आयर्नवुड (लोखंडी) इ. जाती चांगल्या टिकाऊ आहेत. व्हाइट पाइन, नॉर्वे पाइन, रेड ओक, रेड ॲश, यलो पॉप्लर, शुगर पाइन इ. जातींचा टिकाऊपणा मध्यम आहे. व्हाइट एल्म, बीच, हिकरी, हार्ड मॅपल, व्हाइट ॲश, हेमलॉक, स्प्रूस इ. जाती नाशवंत तर बासवुड, ॲस्पेन, विलो, सिकॅमूर, बाल्‍सम फर इ. जाती फार नाशवंत आहेत. भारतातील अंजन, काळा शिरीष, खैर, जांभा, देवदार, शिसू, सागवान इ. जाती चांगल्या टिकाऊ किंजळ, तामण, धामणी, पांढरा शिरीष, शिसवी इ. जाती मध्यम टिकाऊ आणि अक्रोड, आंबा, ऐन, धावडा, पेटारी, बाभूळ, लाल देवदार वगैरे जाती कमी टिकाऊ आहेत.


कोष्टक क्र. २. भारतातील काही महत्त्वाच्या जातींच्या लाकडांचे गुणधर्म व उपयोग

नाव 

गुणधर्म 

उपयोग 

अंजन 

कठीण व जड 

खांब 

अर्जुनसादडा 

अतिशय मजबूत 

तुळ्या, वासे 

आंबा 

भरड आणि विलग कोशिकारचना, कुजणारे, कीटकांना आवडणारे व माफक मजबूत 

जळाऊ लाकूड व हलक्या प्रतीच्या कामासाठी 

ऐन 

तांबूस करड्या रंगाचे, जाड टिकाऊ व बळकट 

सर्व प्रकारच्या इमारती कामांसाठी, शिळेपाट व जहाजांसाठी 

कल्होणी 

मध्यम कठीण, जड, बळकट व टिकाऊ 

जमिनी, छते व काँक्रीट कामासाठी 

किंजळ 

कीटकरोधक, बळकट 

घरबांधणी व काँक्रीट कामासाठी 

खैर 

टिकाऊ,चांगले रापणारे, पॉलिश चांगले होणारे, कीटकरोधक 

शिळेपाट, घराचे खांब 

जांभा 

कठीण,जड, टिकाऊ व बळकट 

पूल, खांब, स्तंभिका 

देवदार 

मऊ, हलके, मर्यादित प्रमाणात मजबूत,टिकाऊ 

सामान्य फर्निचर, सामानाची खोकी, रेल्वेचे डबे वगैरे 

धामणी 

चांगले लवचिक, तंतुमय, कामाला सोपे, टिकाऊ 

गाडीचे आस, खेळाचे सामान, गोल्फच्या काठ्या, कातीव कामासाठी योग्य 

नागचाफा 

कठीण,जड,टिकाऊ व बळकट 

पूल,मोठ्या बांधकामासाठी, शिळेपाट 

नाणा (बेन टीक ) 

चिवट, जड, मध्यम कठीण, मजबूत 

दारे, खिडक्या, शिळेपाट, फर्निचर वगैरे विविध कामांसाठी 

बकुळ 

जड, पिंगट,पॉलिश चांगले होणारे 

साध्या घरबांधणीसाठी 

बाभूळ 

दृढ कोशिकारचना, चिवट व टिकाऊ,चांगले रापणारे, चांगले पॉलिश होणारे, कीटकरोधक 

शिळेपाट, हत्यारे, दांडे व जहाज बांधणीसाठी 

बिली 

कीटकरोधक,बळकट 

घरबांधणी,काँक्रीटकामासाठी 

रोझवुड 

अतिशय मजबूत ,कठीण, दिसण्यात सुंदर,पॉलिशसाठी सुयोग्य 

उत्तम दर्जाचे फर्निचर, कपाटे, शोभिवंत कामासाठी 

शिवण 

रापविल्यानंतर आकुंचन पावत नाही 

अधूनमधून पाण्यात जाणाऱ्या जागेत उदा., जसप्रवाहातील उभे सरकदार,जलपाश दार 

शिसवी 

दृढ कोशिकारचना, लवचिक,अतिशय मजबूत,किंमती पॉलिशसाठी अप्रतिम 

भारी दर्जाच्या फर्निचरसाठी 

सागवान 

मजबूत, जड, टिकाऊ, पॉलिशसाठी सुयोग्य 

सर्व इमारती व फर्निचर कामासाठी 

साल 

अतिशय मजबूत, कठीण, चिवट, जड, टिकाऊ, कामासाठी त्रासाचे 

इमारती कामासाटी 

सिल्व्हर ओक 

मजबूत, टिकाऊ 

चाकाचे आरे, टणक व चिवट कामासाठी 

उत्तम लाकडाचा विनिर्देश : लाकडाच्या वापरानुसार त्याच्या उत्तम प्रतीचा विचार करताना सरासरी वजन, जलांश, नम्यता, ताण व कर्तन बल, टिकाऊपणा, आग व हवा प्रतिबंधकता, लवचिकता, कार्यव्यवहार्यता इ. गोष्टींचा विचार करावा लागतो. नैसर्गिक लाकडामध्ये तडे, भेगा, चिरा, गाठी, बाक, तिरपट यांसारखे अनेक दोष असतात. दोष मर्यादित प्रमाणात असलेले लाकूड उपयोगात येते. तसेच लाकडाच्या आडव्या छेदातील तंतूची दिशा, उतार, सलगता इ. गोष्टीही विचारात घ्याव्या लागतात. संरक्षक व अग्‍निरोधन प्रक्रिया करून त्याची उपयुक्तता वाढविता येते. भारतामध्ये इमारतीच्या व इतर कामासाठी अनेक जातींच्या लाकडांचा उपयोग केला जातो. यामध्ये अंजन, अर्जूनसादडा, अक्रोड, आंबा, ओक, ऐन, कल्होणी, किंजळ, खैर, चिंच, जांभा, धामणी, देवदार, बाभूळ, शिसवी, सागवान, साल वगैरे जातींचा समावेश होतो. या जातींच्या लाकडांचे गुणधर्म व उपयोग त्या त्या वनस्पतीच्या शीर्षकाच्या स्वतंत्र नोंदीत दिलेले आहेत. तसेच कोष्टक क्र. २ मध्ये काही महत्त्वाच्या जातींच्या लाकडांचे गुणधर्म व उपयोग दिलेले आहेत. 

भारतीय मानक संस्थेने देशात उपलब्ध असलेल्या इमारती लाकडांचे सांरचनिक गुणधर्म चाचण्यांच्या आधारे निश्चित केलेले आहेत. या संस्थेने विविध लाकडांचे गुणधर्म व उपयोग यांच्यानुसार निरनिराळी मानके प्रसिद्ध केलेली आहेत. उदा., आय एस २८३–१९७३ मध्ये विविध उपयोगांसाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडांतील महत्तम अनुज्ञान जलांश यासंबंधी, तर आय एस ३३६४–१९७६ यामध्ये लाकडातील दोषांची मोजणी आणि त्यांचे मूल्यमापन करण्याच्या पद्धती यासंबंधी माहिती दिलेली आहे. [⟶ बांधकाम, लाकडाचे].


लाकडाचे कापकाम : जंगलातील पूर्ण वाढ झालेल्या झाडांची निवड करून त्यांवर खुणा करतात व ती झाडे क्रमाक्रमाने तोडण्यासाठी बहुधा साखळीची करवत वापरतात. झाड कापल्यावर त्याच्या फांद्या तोडून व खोड साफ करून पट्टा करवतीच्या साहाय्याने त्याचे योग्य आकाराचे तुकडे (ओंडके) करतात. तुकडे ओढून नेण्यासाठी हत्ती, बैल, घोडे अथवा ट्रॅक्टर वापरून सडकेपर्यंत आणतात आणि खोड कापण्याच्या कारख्यापर्यंत त्यांची वाहतूक परिस्थितीनुसार पाण्याचा प्रवाह, वाहने इत्यादींद्वारे करतात. 

आ. २. खोड कापण्याकरिता वापरण्यात येणारी दोन प्रकारची करवत यंत्रे : (अ) पट्‍ट्याच्या करवतीचे यंत्र (आ) चक्रीय करवत यंत्र (खालील बाजूस चक्रीय करवतीच्या पात्यांचे काही प्रकार दाखविले आहेत)

खोड कापण्याच्या कारखान्यात चक्रीय करवत यंत्र वा पट्ट्याच्या करवतीचे यंत्र वापरतात. या कारखान्याच्या आवारात जंगलातून येणारी खोडे पाण्याच्या कुंडात साठवितात. यामुळे खोडातील रस बाहेर पडतो व पाण्यात शिरतो तसेच खोड पण लवकर मुरते. वाळलेल्या खोडापेक्षा ओले खोड कापणे सोपे जाते. ओले मुरलेले खोड करवत यंत्राच्या सरकणाऱ्या टेबलावर घट्ट आवळून धरावे लागते. यंत्राचे टेबल करवतीकडे जाताना मंद गतीने नेतात. या वेळी टेबलावर बसविलेल्या खोडांची एक बाजू कापली जाते. एका बाजूची साल कापल्यावर टेबल मागे घेतात व खोड ९० अंशांनी फिरवून बसवितात आणि खोडाची दुसरी बाजू कापतात. अशा तऱ्हेने खोडाच्या चारी बाजूंची साल व बाहेरचे कच्चे काष्ठ कापल्यावर खोडाच्या मध्यभागाचा चौकोनी ओंडका तयार होतो. हा ओंडका नंतर सामुदायिक करवती यंत्रात बसवितात. या यंत्रात करवतीची अनेक पाती एकदम काम करतात. करवतींच्या पात्यामधील अंतर पाहिजे तसे बदलता येते. या यंत्रात चौरस केलेल्या ओंडक्यातून एकदम अनेक फळ्या कापून मिळतात. या फळ्यांचा संच ९० अंशांनी फिरवून पुन्हा कापला म्हणजे पाहिजे त्या मापाचे चौकोनी काटच्छेदाचे लांब तुकडे तयार होतात. हे तुकडे ओलसर असल्याने ते चांगले वाळवून मगच त्यांचा वापर करण्यात येतो. आ. ३. मध्ये खोड कापण्याच्या विविध पद्धती आणि आ. ४ मध्ये कापलेल्या लाकडातील (फळीतील) तंतुरेषा दाखविलेल्या आहेत. 

कापीव लाकडाचे गट : इमारती लाकडाच्या वखारीत कापीव लाकडाचे पट्ट्या, फळ्या, स्कॅंटलिंग व बॉक असे चार गट करतात. नेहमी लागणाऱ्या लाकडाच्या विविध घटकांची मापे खालीलप्रमाणे असतात.

गट 

रूंदी ( मिमी. ) 

जाडी ( मिमी.) 

लांबी ( मिमी. ) 

पट्ट्या 

२५– ५० 

१५– ३० 

१,८००– ३,००० 

फळ्या 

७५– २०० 

२५– ५० 

१,८००– ३,००० 

स्कॅंटलिंग 

७५– २०० 

७५– १५० 

१,८००– ३,००० 

बॉक 

२००– ३०० 

१२५– २०० 

१,८००– ३,००० 


आ. ३. खोड कापण्याच्या विविध पद्धती : ( अ ) मध्यकाष्ठातील चौकोनी भाग ( आ ) अरीय काप ( इ ) आडवे काप ( ई ) आडवे व उभे काप.

लाकडाची लांबी मोजताना शेवटचा १० सेंमी. पर्यंतचा लहान भाग सोडून देण्याची वहिवाट आहे. लाकडाच्या घटकांचे मोजमाप हे पट्ट्यांसाठी लांबीच्या मापात म्हणजे मीटरमध्ये, फळ्यांसाठी क्षेत्रफळामध्ये म्हणजे चौरस मीटरमध्ये व इतर घटकांसाठी घनफळामध्ये म्हणजे घनमीटरमध्ये अशा राशींमध्ये मोजतात. 

आ. ४. कापलेल्या लाकडातील ( फळीतील ) तंतुरेषा : (१) स्पर्शीय काप, (२) अक्षीय काप, (३) आडव्या काटच्छेदातील वार्षिक वलयांचे भाग, (४) फळीच्या लांबीवरील तंतुरेषा.

लाकडावरील प्रक्रिया : जरूरीनुसार लाकडावर सर्वसाधारणपणे दोन प्रकारच्या प्रक्रिया करतात. यामध्ये लाकूड वाळविणे व त्यावर विविध प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया करणे यांचा अंतर्भाव असतो. प्रक्रिया केल्याने लाकडाचा वाळवी व इतर कीटक, कवके व सूक्ष्मजंतू यांपासून बचाव होऊन ते टिकाऊ व अधिक उपयुक्त होते. (वाळवीच्या नियंत्रणासंबंधी ‘वाळवी’ या नोंदीत तपशीलवार माहिती दिलेली आहे.)

लाकूड वाळविणे किंवा रापविणे : नैसर्गिक लाकडामध्ये साधारण ४०% ते ८०% एवढा जलांश असतो पण २१से. तापमान व ६०% सापेक्ष आर्द्रतेत हा जलांश साधारण १२% एवढा स्थिर राहतो. लाकूड वापरण्यापूर्वी ते पूर्णपणे वाळविणे आवश्यक असते. त्यामुळे त्यामधील आकुंचन–प्रसरण दोष कमी होतात. लाकूड वाळविण्याच्या मुख्यत: दोन पद्धती आहेत. 

(१) हवेवर वाळविणे : यामध्ये सर्व वा काही बाजू उघड्या असलेल्या आच्छादनाखाली कापलेल्या लाकडाचे घटक आडवे व उभे असे एकमेकांवर एक रचतात [ आ. ५ (अ)]. या रचनेत हवा खेळती राहते व त्यामुळे लाकूड सुकण्याची क्रिया सावकाशपणे साधारण ८ ते १० महिने चालू ठेवावी लागते. ही पद्धत कमी खर्चाची असल्याने जरी जास्त वेळ लागत असला, तरी ती वापरात आहे. 

(२) भट्‍टीत वाळविणे : ही भट्टी म्हणजे एक लांब बोगदा असतो. त्यामध्ये हवा तापवणे. तीमधील आर्द्रता कमी जास्त करणे व हवा खेळवणे यांची व्यवस्था केलेली असते. एका ढकलगाडीवर कापलेली लाकडे उभी व आडवी रचून ती गाडी क्रमशः भट्टीच्या वेगवेगळ्या भागांतून फिरवून वाळविण्याची क्रिया पूर्ण करतात. काही भट्ट्यांत बंदिस्त खोलीत लाकडे उभी व आडवी एकावर एक रचून त्यांतून हवा खेळवितात आणि तिची आर्द्रता व तापमान वाळविण्याच्या काळात सतत बदलतात [ आ. ५. (आ)].

काही ठिकाणी हवेवर व भट्टीत वाळविण्याच्या पद्धती संयुक्तपणे वापरतात. काही मोठ्या लाकूड गिरण्यांत लाकूड प्रथम १४ ते ३०% जलांश होईपर्यत हवेवर वाळवितात आणि मग इष्ट इतक्या जलांश प्रमाणाकरिता भट्टीत वाळवितात. 

डेहराडून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटने लाकूड वाळविण्याकरिता सौर ऊर्जेवर चालणारी भट्टी विकसित केलेली आहे. या भट्टीत उन्हाळ्यात १२ ते १६ दिवसांत व हिवाळ्यांत सु. २० दिवसांत लाकूड वाळविता येते. वर्षातून किमान आठ महिने या भट्टीचा उपयोग करता येतो.

रासायनिक प्रक्रियेद्वारे परिरक्षण : लाकूड हे कोरड्या हवेत अथवा जागेत असले किंवा नेहमी पाण्यात बुडालेले असले, तर त्यावर फारसा परिणाम होत नाही. परंतु आलटून पालटून पाण्यात व कोरड्या जागेत ठेवले अथवा ओलसर जागेत असले, तर ते कुजते किंवा किडते. लाकूड कुजून किंवा किडून नष्ट होऊ नये म्हणून लाकडाचे परिरक्षण करणारी लाकडाच्या पृष्ठभागावर लावण्याची अनेक प्रकारची रसायने उपलब्ध आहेत. यांमध्ये (अ) तेलात विरघळणारी, (आ) कार्बनी विद्रावकात (विरघळविणाऱ्या द्रव्यात) विरघळणारी व (इ) पाण्यात विरघळणारी अशी मुख्य रसायने असतात. तेलात विरघळणाऱ्या रसायनांमध्ये डांबरापासून मिळणारे क्रिओसोट हे महत्त्वाचे रसायन आहे. ते विषारी असून उत्तम परिरक्षक आहे. तथापि घाण वास, काळा रंग व त्यावर इतर रंगलेप न बसणे या गुणधर्मांमुळे त्याचा उपयोग इमारती लाकडासाठी करण्याचे बहुधा टाळतात. कार्बनी विद्रावकात विरघळणाऱ्या रसायनांत कॉपर नॅप्थेनेट, झिंक नॅप्थेनेट, पेंटाक्लोरोफिनॉल, डीडीटी ही मुख्य होत. ही रसायने नॅप्था केरोसीन किंवा पांढऱ्या स्पिरिटमध्ये विरघळवून ब्रशाने लावावयाची असतात. पाण्यात विरघळणाऱ्या रसायनांमध्ये कॉपर सल्फेट (मोरचूद), झिंक क्लोराइड, बोरॅक्स, आर्सेनिक पेंटॉक्साइड ही मुख्य आहेत. ती पाण्यात विरघळवून ब्रशाने लावता येतात. ही रसायने लावल्यावर त्यांवर रंगलेप लावता येतो परंतु काही दिवसांनी बाहेरच्या ओलसर हवेने ही रासायने लाकडातून बाहेर पडतात व पृष्ठभागावर साठतात. रसायने अशा प्रकारे लाकडातून बाहेर येऊ नयेत म्हणून त्यांमध्ये आता सोडियम डायक्रोमेट मिसळून वापरतात. यामुळे रसायने पक्की बसतात व पाण्याने बाहेर येत नाहीत आणि लाकडावर रंगलेप लावणे व व्हार्निश करणे शक्य होते. अशा प्रकारच्या मिश्रणांच्या नमुनेदार संघटनांत आर्सेनिक पेरॉक्साइड, कॉपर सल्फेट व सोडियम डायक्रोमेट (१ : ३ : ४ या प्रमाणात) कॉपर सल्फेट, सोडियम डायक्रोमेट व क्रोमिक अम्‍ल (५० : ४७.५ : २·५) बोरिक अम्‍ल, कॉपर सल्फेट व सोडियम डायक्रोमेट (१.५ : ३ : ४) झिंक क्लोराइड, बोरिक अम्‍ल, सोडियम डायक्रोमेट व पाणी (१ : ३ : ४ : १००) यांचा समावेश होतो. 


परिरक्षक रसायने लावण्याच्या पद्धती : लाकडाच्या परिरक्षणासाठी त्यावर रसायने लावताना जरूरीप्रमाणे निरनिराळ्या पद्धती वापरतात. यांमध्ये (१) पृष्ठभागावर लावण्याची पद्धत, (२) भिजत ठेवण्याची पद्धत, (३) उष्ण विद्राव पद्धत व (४) दाब पद्धत या मुख्य आहेत. 

(१) लाकडाच्या पृष्ठभागावर तेलाच्या जातीचे रसायन लावावयाचे असेल, तर लाकडातील ओलावा १४ टक्क्यांपेक्षा कमी करून घ्यावा लागतो परंतु पाण्यात मिसळलेले रसायन लावावयाचे असेल, तर लाकडातील ओलावा २० ते ३० टक्क्यांपर्यंत असला तरी चालतो. या पद्धतीत लाकडावर रसायनाचा लेप ब्रशाने लावता येतो. रसायनाचा एक थर लावल्यावर लाकूड पूर्णपणे वाळू देतात व नंतर व त्यावरून दुसरा थर लावतात. 

आ. ५. लाकूड वाळविण्याच्या पद्धती : ( अ ) हवेवर वाळविण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या काही प्रकारच्या छपऱ्या ( शेड्‌स ) : ( अ १ ) चारी बाजूंनी भिंती व दोन द्वारे असलेली छपरी, ( अ २ ) तीन बाजूंनी भिंती व उत्तर बाजू मोकळी असलेली छपरी, (अ ३ ) सर्व बाजूंनी मोकळी असलेली छपरी ( आ ) लाकूड वाळविण्याच्या दोन भट्टया : ( आ १ ) प्रगामी भट्टी : ( १ ) लाकडे रचलेली गाडी आत सोडण्याचे टोक, ( २ ) हवा बाहेर जाण्याचे मार्ग, ( ३ ) हवा तापविण्यासाठी विद्युत्‌ वेटोळी, ( ४ ) आद्रीकरणासाठी वाफेचे फवारे, ( ५ ) ताजी हवा आत येण्याचे मार्ग, ( ६ ) लाकडांची गाडीबाहेर काढण्याचे टोक, ( ७ ) टोकाकडील बाजूचा छेद ( आ२ ) नैसर्गिक हवा–प्रवाहाचा उपयोग करणारी बंदिस्त खोलीयुक्त भट्टी : ( १ ) ताजी हवा आत येण्याचा मार्ग, ( २ ) तापविण्यासाठी विद्युत्‌ वेटोळी, ( ३ ) वाफेचे फवारे, ( ४ ) समायोजन करता येणाऱ्या झडपा असलेले हवा बाहेर जाण्याचे मार्ग.

(२) जेथे रसायन लाकडाच्या आत चांगले भरावयाचे असते तेथे रसायनाचा विद्राव एखाद्या टाकीत ठेवतात व त्यामध्ये लाकडाचे तुकडे पुष्कळ वेळ बुडवून ठेवतात. बुडवून ठेवण्याचा अवधी जितका जास्त तितके रसायन लाकडाच्या आत खोलवर जाते. 

(३) या पद्धतीत रसायनाचा विद्राव टाकीत भरून ते ९० ते ९५ से. तापमानापर्यत तापवितात व त्यामध्ये लाकडाचे तुकडे बुडवून ठेवतात. या पद्धतीने कच्चे लाकूडही चांगले सुधारता येते. 

(४) दाब पद्धतीत एक मोठे दाबपात्र वापरतात. या पात्रात लाकडाचे तुकडे भरतात व पात्राचे तोंड बंद करून त्यातील हवा काढून टाकतात आणि साधारण ५०-६० सेंमी. पर्यंतचा निर्वात दाब उत्पन्न करून ही स्थिती अर्धा तास कायम ठेवतात. यामुळे लाकडात अडकलेली सर्व हवा बाहेर पडते. नंतर रसायन विद्राव आत भरतात व त्यावर संपीडित हवेचा दाब देतात. हा दाब जरूरीप्रमाणे ४ ते १२ किग्रॅ. /सेंमी. इतका असतो. या दाबाने रसायन खोलवर शिरते, मग दाब कमी करत परत ४० ते ५० सेंमी.चा निर्वात साधारण १५ मिनिटे ठेवतात. यामुळे लाकडाच्या आतील जास्तीचे रसायन बाहेर काढले जाते व त्याची पण बचत होते. 

लाकडापासून मिळणारे रासायनिक पदार्थ : लाकडापासून अनेक प्रकारचे रासायनिक पदार्थ प्राप्त होऊ शकतात. त्यांपैकी काही पदार्थ अत्यंत महत्त्वाचे असून त्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन व वापर केला जातो. हे पदार्थ लाकडावर विवक्षित प्रकारच्या रासायनिक व भौतिक क्रिया करून तयार केले जातात. निर्लिग्‍निनीकरण (लाकडातील लिग्‍निन काढून टाकण्याची क्रिया), शुष्क अथवा विघटनात्मक ऊर्ध्वपातन [⟶ ऊर्ध्वपातन], ⇨जलीय विच्छेदन आणि अम्‍लीय अगर विद्रावक निष्कर्षण [⟶निष्कर्षण] या त्यांपैकी प्रमुख क्रिया होत. लाकडापासून मिळणारे विविध रासायनिक पदार्थ व त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक वा भौतिक क्रिया यांची निश्चित कल्पना आ. ६ वरून येईल.


आ. ६. लाकडापासून मिळणारे विविध रासायनिक पदार्थ

लाकूड हा पदार्थ कोशिकामय असून त्यातील कोशिकांची रचना तंतूंच्या स्वरूपात असते. लाकडाच्या तंतु-कोशिका सेल्युलोज (५० ते ६०%), लिग्‍निन (२० ते २५%) व हेमिसेल्युलोज (१० ते २५%) या प्रमुख घटकांच्या विविध प्रमाणांच्या मिश्रणांच्या बनलेल्या असतात. सेल्युलोज व हेमिसेल्युलोज हे पदार्थ कार्बोहायड्रेट वर्गातील असून लिग्‍निन हा शाखायुक्त बहुवारिक पदार्थ आहे [⟶ लिग्‍निन सेल्युलोज]. सर्व प्रकारांच्या लाकडांमध्ये वरील प्रमुख घटकांच्या व्यतिरिक्त अन्य कार्बनी घटकद्रव्येही (उदा., टॅनिने, रेझिने, सुगंधी द्रव्ये, रंगद्रव्ये वगैरे) काही प्रमाणांत आढळतात. ही द्रव्ये लाकडातील तंतूंच्या पोकळीतील जागेत समावलेली असतात. लाकडामध्ये अल्प प्रमाणात काही लवणेही असतात.

लोणारी कोळसा व तज्‍जन्य ऊर्ध्वपातित रासायनिक पदार्थ : लाकडाचा इंधन म्हणून उपयोग अजूनही अनेक ठिकाणी केला जातो. इंधन या दृष्टीने लाकडापेक्षा त्यापासून बनविलेला लोणारी कोळसा अधिक चांगले काम देऊ शकतो. 

लाकडापासून कोळसा तयार करण्याच्या क्रियेत उष्णतेच्या सहाय्याने लाकडाचे विघटन केले जाते. हवेचा पुरवठा मर्यादित ठेवला जातो व त्यामुळे लाकडाचे ज्वलन होऊ दिले जात नाही. या विघटनक्रियेत लाकडाचे कार्बनीकरण होऊन कोळसा तयार होतो व लाकडातील अन्य कार्बनी घटकद्रव्ये धूर, वायू व बाष्प यांच्याबरोबर वर निघून जातात. कोळशाच्या जोडीला त्यातील बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) रासायनिक पदार्थ ऊर्ध्वपातित द्रव (पायरोलिग्‍नियस अम्‍ल) म्हणून वेगळे काढून त्याहून अधिक विभाजन व शुद्धीकरण यांच्याद्वारे शुद्ध रसायने तयार करता येतात. 

लाकडाचे कार्बनीकरण करण्याचा व्यवसाय पुढील दोन प्रमुख उद्दिष्टांमध्ये विभागला जातो : (१) फक्त लोणारी कोळसा तयार करणे आणि (२) कोळसाबरोबरच इतर ऊर्ध्वपातित रसायने तयार करणे. 

(१) लोणारी कोळसा तयार करण्याच्या पद्धतीचे वर्णन ‘कोळसा, लोणारी ’ या नोंदीत दिलेले आहे.

(२) लोणारी कोळसा व इतर ऊर्ध्वपातित रासायनिक पदार्थ : कठीण लाकडाच्या कार्बनीकरण क्रियेमध्ये ॲसिटिक अम्‍ल व मिथिल अल्कोहॉल ही रसायने मिळू शकतात. मृदू लाकडाच्या कार्बनीकरणापासून टर्पेटाइन, पाइन डांबर वगैरे पदार्थ मिळू शकतात. त्यांशिवाय ब्युटिरिक अम्‍ल, प्रोपिऑनिक अम्‍ल, व्हॅलेरिक अम्‍ल, क्रिओसोट, ग्वायकॉल, ॲलिल अल्कोहॉल, मिथिल एथिल कीटोन, मिथिल ॲसिटेट, प्रतिऑक्सिडीकारक (रेणवीय ऑक्सिजनाशी संयोग होण्यास प्रतिबंध करणारी) तेले यांसारखी अनेक रसायने थोड्याफार प्रमाणात मिळू शकतात. एकंदर सु. १०० वेगवेगळी रसायने लाकडाच्या कार्बनीकरणाद्वारे मिळविता येतात.  


लोणारी कोळसा तयार करताना तज्‍जन्य रसायनांचे विलगीकरण करण्याचा मोठ्या प्रमाणावरील प्रयत्‍न प्रथम १८३० मध्ये केला गेला. १८७७ ते १९०० या काळात लाकडाच्या कार्बनीकरणाच्या व संबंधित रसायने मिळविण्याच्या औद्योगिक तंत्रांत खूपच सुधारणा झाली. उत्तम बांधणीच्या कार्यक्षम भट्ट्या तयार करण्यात येऊन त्यांमध्ये कार्बनीकरणाद्वारे तयार झालेले वायूरूप रसायनमिश्रण थंड करून पायरोलिग्‍निअस अम्‍ल मिळविण्याची सोय करण्यात आली ह्या विद्रावाचे आवश्यकतेप्रमाणे विभाजन करण्याची यंत्रसामग्री निर्माण झाली व वायुरूपी मिश्रणाचा थंड करून द्रवीभूत न होणारा भाग धुराच्या रूपाने बाहेर सोडून देण्याची व्यवस्था भट्‍टीमध्ये केली गेली. हा धूर कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डाय–ऑक्साइड, मिथेन व हायड्रोजन या घटकांचा बनलेला असतो. अनेक भट्ट्यांमध्ये वरील धुराचा पूरक इंधन म्हणून त्याच भट्ट्यांसाठी उपयोग करण्यात येऊ लागला. पायरोलिग्‍नअस अम्‍लाच्या ऊर्ध्वपातित विभाजनाने मिथिल अल्कोहॉल व ॲसिटिक अम्‍ल ह्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करता येणे शक्य झाले. ऊर्ध्वपातन पूर्ण झाल्यावर तळाला राहिलेला दाट काळा द्रव म्हणजे लाकडाचे डांबर होय. हा पदार्थही अनेक दृष्ट्या उपयुक्त असतो. मूळ लाकडाच्या वजनाच्या प्रमाणात कठीण जातीच्या लाकडापासून पुढीलप्रमाणे सर्वसादारण उत्पादन मिळते : कोळसा २०% पायरोलिग्‍निअस अम्‍ल ३०–४०%, डांबर ६–१३%, पायरोलिग्‍निअस अम्‍लापासून मूल लाकडाच्या वजनाच्या प्रमाणात ४–६% ॲसिटिक अम्‍ल व १.२% मिथिल अल्कोहॉल मिळतात. डांबराचा उपयोग जळण म्हणून कार्बनीकरणासाठी अगर ऊर्ध्वपातित विभाजनासाठी करता येतो. हे डांबर अनेक रसायनांचे मिश्रण असल्याने त्याचे अधिक विस्ताराने विभाजन करणे किफायतशीर होत नाही. सर्वसाधारणपणे बीच, बर्च, मॅपल, हिकरी व ओक ह्या वृक्षांचे लाकूड कार्बनीकरण करून कोळसा व रसायने तयार करण्यासाठी वापरले जाते. भारतीय कठीण लाकडाचे सु. ३५ वृक्ष कोळसा व रसायने तयार करण्यास योग्य आहेत. त्यांतील महत्त्वाचे वृक्ष पुढीलप्रमाणे आहेत : बाभूळ, सागवान, मॅहॉगनी, अक्रोड, रोझवुड, सॅटिनवुड (कुंती), पॉप्लर व अँश. 

रेझीनयुक्त लाकडाच्या कार्बनीकरणापासून मिळणारी रसायने : पाइन, स्प्रूस वगैरेंसारख्या रेझीनयुक्त झाडांच्या लाकडाचे ऊर्ध्वपातन करून अनेक महत्त्वाची रसायने तयार करता येतात. मूळ लाकडात कमीत कमी २०% रेझिने असावीत म्हणजे पुढील रसायनांचा उतारा चांगला मिळतो. ऊर्ध्वपातित केलेला विद्राव थंड केल्यावर त्याचे दोन थर विलग होतात. एक थर अम्‍लीय पाण्याचा असतो व दुसरा रेझीन पदार्थांचा असतो. अम्‍लीय पाण्याच्या थरामध्ये ॲसिटिक अम्‍ल व मिथिल अल्कोहॉल असते पण रेझीनयुक्त लाकडांच्या बाबतीत बहुधा हे प्रमाण कमी असल्याने वेगळे काढण्याच्या दृष्टीने फायदेशीर होत नाही. हा अम्‍लीय पाण्याचा थर वेगळा काढून टाकून देण्यात येतो व उरलेल्या रेझिनांच्या मिश्रणाच्या काळ्या थराचे ऊर्ध्वपातन करून विभाजन केले जाते. त्यायोगे पाइन डांबर, पाइन तेल, टर्पेटाइन तेल, टर्पेटाइन डायपेंटिन हे महत्त्वाचे पदार्थ मिळतात. साधारण एक टन पाइन लाकडापासून २०० ते २२० किग्रॅ. कोळसा, २०० ते २५० लि. एकूण तेल, २० ते ३० लि. टर्पेटाइन, १०० ते १५० लि. पाइन डांबर मिळू शकते. पाइन डांबराचा उपयोग रबर तयार करण्यासाठी, दोऱ्या वळताना व विशेष प्रकारचा कागद तयार करताना, रोगण म्हणून लावण्यासाठी, साबण व व्हार्निशे तयार करण्यासाठी होतो. 

कठीण जातीच्या लाकडाचे ऊर्ध्वपातन करून अँसिटिक अम्‍ल व मिथिल अल्कोहॉल तयार करण्याला एके काळी फार महत्त्व होते परंतु विसाव्या शतकात प्रथम दगडी कोळशाच्या ऊर्ध्वपातनाद्वारे व त्यानंतर खनिज तेलाच्या परिष्करणाद्वारे ही रसायने मोठ्या प्रमाणावर किफायतशीरपणे व कमी प्रयासाने तयार करता येऊ लागल्यामुळे लाकडांपासून ही रसायने तयार करणे बंद झाले. पाइन व इतर रेझीनयुक्त लाकडांपासून ऊर्ध्वपातनाद्वारे तयार केलेल्या अन्य रसायनांना मोठी मागणी असून ह्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते. कच्चे टर्पेटाइन ऊर्ध्वपातन करून शुद्ध करण्यात येते व त्याला टर्पेटाइन तेल म्हणतात. भारतात टर्पेटाइन तयार करण्याचे अनेक कारखाने आहेत. त्यांत पाइन व इतर काही रेझीनयुक्त वृक्षांचे लाकूड वापरले जाते. [⟶ टर्पेटाइन].

रेझीनयुक्त लाकडाचे वाफयुक्त (बाष्पीय) ऊर्ध्वपातन : शुष्क ऊर्ध्वपातन किंवा कार्बनीकरण या क्रियांप्रमाणेच रेझीनयुक्त लाकडापासून रसायने मिळविण्यासाठी वाफयुक्त ऊर्ध्वपातन क्रियेचाही उपयोग बऱ्याच प्रमाणात केला जातो. वाफयुक्त ऊर्ध्वपातनामुळे लोणारी कोळसा मिळत नाही परंतु सेल्युलोज व लिग्‍निन यांच्या मिश्रणाचा लगदा तयार होतो. सर्व ऊर्ध्वगामी रसायने वाफेबरोबर जातात व ती थंड केल्यावर विद्रावाच्या स्वरूपात मिळतात. पाइन तेलापासून मिळालेल्या अशा विद्रावाचे अधिक विभाजन व शुद्धीकरण करून टर्पेटाइन, पाइन तेल, रोझीन व पाइन डांबर हे महत्त्वाचे पदार्थ तयार केले जातात. लाकडाचा गाळ म्हणून शिल्लक राहिलेला लगदा तंतुफलक (धागी फलक) तयार करण्यासाठी वापरला जातो. वाफयुक्त ऊर्ध्वपातनाने रसायने मिळविण्याच्या क्रियेत कार्बनीकरणाप्रमाणे जास्त तापमानाचा उपयोग करावा लागत नसल्याने या रसायनांचे अधिक शुद्धीकरण करणे सुलभ जाते. योग्य त्या प्रकारचे मृदू लाकूड वापरून रसायनांच्या उत्पादनाचे प्रमाण वाढविणे शक्य असते. रेझीनयुक्त लाकडापासून सल्फेट पद्धतीने लगदा करण्याच्या क्रियेतही टर्पेटाइन व तत्सम रसायने मिळविता येतात. वाफयुक्त ऊर्ध्वपातन क्रियेचा वापर सुगंधी द्रव्ये असलेल्या मृदू लाकडापासून सुगंधी द्रव्ये मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. सीडार, कापूर, चंदन वगैरेंच्या लाकडापासून मिळणारी द्रव्ये व तेले योग्य त्या लाकडाच्या वाफयुक्त ऊर्ध्वपातनाने तयार केली जातात. [⟶ बाष्पनशील तेले].

लाकडापासून कागद व लगदा : लाकडावर अवलंबून असलेला सर्वांत महत्त्वाचा उद्योग म्हणजे कागद, लगदा आणि लगद्यापासून करता येणारे सेल्युलोज व तत्सदृश पदार्थ हा होय.

अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, नॉर्वे व अन्य प्रगत देशांत कागदनिर्मितीसाठी लाकडाचा लगदा प्रामुख्याने वापरला जातो. भारतात सामान्यतः वृत्तपत्रीय कागदासाठी लाकडाचा लगदा वापरला जातो. वृत्तपत्रीय कागद व पुट्टे तयार करण्यासाठी लागणाऱ्या लाकडाच्या लगद्याला ‘ यांत्रिक लगदा ’ असे म्हणतात. हा लगदा तयार करताना लिग्‍निन काढून टाकण्याची आवश्यकता नसते. रेयॉन तयार करण्यासाठी उत्तम दर्जाचा निर्लिग्‍निनीकरण केलेला लाकडाचा लगदा लागतो. निर्लिग्‍निनीकरण करून तयार केलेल्या लाकडाच्या लगद्याला ‘ सेल्युलोज लगदा ’ असे म्हणतात. सेल्युलोजपासून ॲसिटेट रेयॉन, व्हिस्कोज रेयॉन, प्लॅस्टिके. संरक्षक लेप, नायट्रोसेल्युलोज व इतर स्फोटक द्रव्ये, आसंजके (चिकटविणारे पदार्थ) इ. अनेक पदार्थ तयार करण्यात येतात. [⟶ आसंजके कागद तंतु, कृत्रिम प्लॅस्टिक व उच्च बहुवारिके सेल्युलोज स्फोटक द्रव्ये ].


लाकडापासून जलीय वा विद्रावक निष्कर्षणाने मिळणारी रसायने : लाकडाच्या निष्कर्षणाद्वारे पुढील विविध महत्त्वाचे रासायनिक पदार्थ मिळविता येतात : ⇨टॅनिने, कार्बनी अम्‍ले, कार्बोहायड्रेटे, रंगद्रव्ये, सुगंधी द्रव्ये व तेले [⟶ बाष्पनशील तेले], ⇨ अल्कलॉइडे, ⇨ रेझिने, ⇨टर्पिने वगैरे. यांपैकी काही पदार्थ अत्यंत उपयुक्त असून त्यांना मोठी मागणी असते. ही रसायने वेगवेगळ्या झांडाच्या जातीप्रमाणे वेगवेगळ्या भागांच्या लाकडापासून कमीजास्त प्रमाणात मिळू शकतात. सर्वसाधारणपणे वरील पदार्थांचे प्रमाण अल्प असून ते किफायतशीरपणे मिळविण्यासाठी योग्य त्या झाडाच्या विशिष्ट भागाचे लाकूड वापरावे लागते. अन्यथा हा व्यवसाय आर्थिक दृष्टीने किंवा उत्पादनक्षमतेच्या मर्यादेच्या दृष्टीने फायदेशीर होऊ शकत नाही.

विद्रावक निष्कर्षणाच्या साहाय्याने टॅनिने, रंगद्रव्ये व रेझिने लाकडापासून सुलभतेने वेगळी करता येतात. परंतु त्यातील सेल्युलोज व तत्सम पदार्थ यांपासून उपयुक्त पदार्थ मिळविण्यासाठी लाकडाचे अम्‍लीय निष्कर्षण वापरणे इष्ट ठरते. अम्‍लीय निष्कर्षण पद्धतीत सल्फ्यूरिक अगर हायड्रोक्लोरिक अम्‍ल यांच्या पाण्यातील विद्रावात लाकडाचे निष्कर्षण करतात. सेल्युलोजाच्या विघटनामुळे निर्माण झालेली शर्करा, कार्बनी अम्‍ले व फुरफुराल ही रसायने निष्कर्षित पाण्याच्या विद्रावात उतरतात आणि लिग्‍निन व लिग्‍नोसेल्युलोज यांचा खाली राहिलेला लगदा वेगळा करता येतो. या विद्रावावर यीस्टची किण्वनक्रिया (आंबवण्याची क्रिया) केल्याने एथिल अल्कोहॉल (मद्य) अगर खाद्य यीस्ट तयार करता येतात किंवा त्या अम्‍लीय विद्रावातील रसायने रासायनिक क्रियेने विलग करता येतात. अशा तऱ्हेने ॲसिटिक अम्‍ल, फुरफुराल, शर्करा वर्गातील पदार्थ, हायड्रॉक्सिमिथिल फुरफुराल, लेव्ह्युलिनिक अम्‍ल, फॉर्मिक अम्‍ल, मिथिल अल्कोहॉल, ग्‍लिसरीन, ऑक्झॅलिक अम्‍ल, २–३ ब्युटिलीन ग्‍लायकॉल, लॅक्टिक अम्‍ल, ब्युटिरिक अम्‍ल ही रसायने मिळू शकतात. गाळ म्हणून राहिलेला भाग बहुतांशी लिग्‍निन असतो. लिग्‍निनावर हायड्रोजन वायूच्या दाबाखाली जास्त तापमानाच्या साहाय्याने क्रिया केल्यास सायक्लिक अल्‍कोहॉले, फिनॉले व वनस्पतिज तेलसदृश काही पदार्थ मिळतात. लिग्‍निनाचा उपयोग प्लॅस्टिक उद्योगात व त्याचप्रमाणे विशेष गुणधर्म असलेली कोळशाची पूड तयार करण्यासाठी करता येतो.

लाकडापासून उपलब्ध होणाऱ्या रासायनिक पदार्थांपैकी कागद, लगदा, लोणारी कोळसा, टर्पेटाइन व तज्‍जन्य पदार्थ, रेझिने व टॅनिने ही रसायने आजही अत्यंत महत्त्वाची असून त्यांचे उत्पादन बव्हंशी लाकडावरच अवलंबून आहे. लाकडापासून प्राप्त होऊ शकणाऱ्या इतर रसायनांचे औद्योगिक उत्पादन करण्याचे अन्य सुलभ मार्ग उपलब्ध झाल्याने ती आता लाकडापासून करणे मागे पडले आहे. तरी देखील लाकडाच्या जंगलतोडीपासून ते औद्योगिक व इतर वापरापर्यंत निर्माण होणाऱ्या लाकडाच्या फुकट जाणाऱ्या भागांपासून ( तुकडे, भुसा व अन्य टाकाऊ भागांपासून ) थोड्या सामग्रीच्या व भांडवलाच्या साहाय्याने काही उपयुक्त रासायनिक पदार्थ किफायतशीरपणे तयार करणे शक्य आहे. 

पहा : आगकाड्या ऊतककर कागद कोळसा, लोणारी प्लायवुड फर्निचर बांधकाम, लाकडाचे भेंड मध्यकाष्ठ लाकडी कलाकाम लिग्‍निन वाळवी वृक्ष कालनिर्णयशास्त्र सुतारकाम. 

संदर्भ :1. Browing. B. L., Ed., Chemistry of Wood, New York, 1963.

          2. Chudnoff, M. Tropical Timbers of the World,1979.

          3. C. S. I. R. The Wealth of India:Industrial Products, Part IX, New  Delhi, 1976.  

          4. Desch. H. E. Timber : It’s Structures and Properties, London, 1968.  

          5. Dunmore. F. L.The Technique of Wood Working Machinery, London. 1965.  

          6. Government of Maharashtra, P. W. D. Handbook, Vol. I, Bombay, 1960.  

          7. Hickin, N. E. Insect Factor in Wood Decay,London, 1963.

         10. Latham, B. Wood :  From Farest to Man, London,1964.

         11. National Building Organization, Handbook forBuilding Engineers, New Delhi, 1966.  

         12. Olson, D. W. Woods and Woodworking, New Delhi,1966.

         13. Panshin, A. J. Dezeeuw. C. Textbook of Wood Tehnology, New York, 1980.  

         14. Richardson, B. A. Wood Preservation, Hornby, Lancaster, 1978.

         15. Stamm, A. J. Wood and Cellulose Science, New York, 1964.

         16. Titmuss, F. H. Commercial Timbers of the World,London, 1965.

         17. U. S.Department of Agriculture,Wood Handbook, Madison, Wisc, 1974.  

         18. U. S. Department of Forestry, Encyclopedia of Wood, Washington, 1980. 

वेलणकर, अ. ना. लवाटे, वा. वि. ओक, वा. रा. पाटणकर, मा. वि.