लॅडोगा : यूरोपमधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. यूरोपीय रशियाच्या वायव्य भागात, लेनिनग्राडच्या पूर्वेस सुमारे ४० किमी. वरील या सरोवराचे क्षेत्रफळ बेटांसह १८,१०० चौ.किमी. व बेटे वगळून १७,७०३ चौ.किमी. असून सरोवराची लांबी २१९ किमी. रुंदी १२८ किमी. आणि सरासरी खोली ५१ मी. आहे. सर्वात जास्त खोली (२२३ मी.) व्हालाम बेटाच्या पश्चिमेस आढळते.

हिमनदीच्या घर्षण कार्यामुळे सरोवराचा खोलगट भाग तयार झाला असून त्याचा उत्तरेकडील किनारा उंच कड्यासारखा व फ्योर्डप्रमाणे आत आलेल्या खोल खाड्यांमुळे तुटलेला, बर्फाच्छादित आहे, तर दक्षिणेकडील किनारा कमी उंचीचा, वालुकामय पुळणीचा व दलदलयुक्त आहे.

या सरोवरक्षेत्रात सु. ५०,००० लहान सरोवरे व ३,५०० प्रवाह असून सरोवरास सु. ७० लहान-मोठ्या नद्या येऊन मिळतात. यांपैकी दक्षिणेकडून व्हॉल्खफ, आग्नेयीकडून (ओनेगा सरोवरातून) स्व्ही व पश्चिमेकडून फिनलंडच्या साइमा सरोवर प्रणालीतील इन्मेन सरोवरातून येणारी व्हूऑक्सी या प्रमुख नद्या आहेत. सरोवरातून पश्चिमेस वाहणारी नीव्हा ही उपनदी फिनलंडच्या आखाताला लेनिनग्राड येथे मिळते. या सरोवरात १ हे. पेक्षा अधिक क्षेत्रफळाची सु. ६६० बेटे आहेत. त्यांत ऱ्येक्कालनसारी, मँत्सिन्सारी, किल्पोला, तूलोलान्सारी, व्हालाम ही काही मोठी बेटे आहेत.

सरोवरप्रदेशातील हवामान सौम्य थंड आहे. येथील वार्षिक सरासरी पर्जन्य ६१० मिमी. असून सरोवराची पाण्याची पातळी जून, जुलैमध्ये सर्वांत जास्त, तर डिसेंबर, जानेवारीमध्ये सर्वांत कमी असते. लॅडोगा सरोवरातील पाणी स्वच्छ व पिवळसर-तपकिरी रंगाचे आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सरोवराचे पाणी गोठते या गोठलेल्या भागाची सरासरी जाडी ०.५ मी. असते मार्च-एप्रिलमध्ये बर्फ वितळते. व्यापारी दृष्ट्या मासेमारी व जलवाहतुकीच्या दृष्टीने सरोवर उपयुक्त असून त्यातून सॅमन, ट्राउट बुलट्राउट, सिका (व्हाइटफिश), पाइक, पर्च, पिकेरेल, फ्रॉस्टफिश, तसेच प्लवक आणि लॅडोगा सील. इ. जलचर मिळतात. व्होल्गा-बाल्टिक जलमार्ग व श्वेत समुद्र-बाल्टिक जलमार्ग हे या सरोवरातून जातात. त्यांतून रशिया, फिनलंड इ. देशांशी वाहतूक चालते.

लॅडोगा सरोवर १९४० पूर्वी फिनलंड आणि रशिया यांच्यामध्ये विभागलेले होते. तथापि १९३९-४० मधील या दोन्ही देशांतील लढाईनंतरच्या शांतता करारान्वये ते पूर्णतः रशियाला देण्यात आले. दुसऱ्या महायुद्धात (सप्टेंबर १९४१ ते मार्च १९४३ पर्यंत) जर्मनांनी लेनिनग्राडवर हल्ला केला. त्यावेळी गोठलेले लॅडोगा सरोवर हे देशाच्या इतर भागांना जोडणारी जीवनरेषा बनले होते. लेनिनग्राडला लागणारा माल, सैनिकी उपकरणे, तसेच आजारी व जखमी सैनिक इत्यादींची वाहतूक याच्या गोठलेल्या भागावरून  मोठ्या प्रमाणात केली गेली.

लहानलहान नौकांना वाहतुकीच्या दृष्टीने लॅडोगा सरोवर असुरक्षित असल्याने (नौकानयनातील अडचणींवर मात करण्याच्या हेतूने), सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर अनेक कालवे बांधण्यात आले असून पहिला कालवा अठराव्या शतकात बांधण्यात आला. हे ‘लॅडोगा कालवे’ सु. १६० किमी. लांबीचे असून ते व सरोवराचा दक्षिण भाग असे मिळून एक मोठी कालवायंत्रणा बनली असून तीद्वारा लॅडोगा सरोवर हे फिनलंडचे आखात, व्होल्गा नदीखोरे व श्वेत समुद्र यांना जोडण्यात आले आहे.

लॅडोगा सरोवराच्या काठी प्रीअझ्यॉर्स्क, पेत्रोक्येपस्त्य, सॉर्ताव्हाला ही प्रमुख बंदरे आहेत. सरोवरातून प्रामुख्याने इमारती लाकूड व बांधकाम साहित्य यांची वाहतूक होत असून सरोवरात मासेमारी आणि किनाऱ्यावरील शहरांतून लाकूडकापणी हे महत्त्वाचे उद्योग चालतात.

सरोवराच्या उत्तर भागातील व्हालाम या बेटावर सु. १० व्या शतकातील प्रसिद्ध ग्रीक ऑर्थोडॉक्स मठ आहे. त्यामुळे ह्या बेटाला यात्रेकरू भेट देतात. 

सावंत, प्र. रा.