लॅटिन साहित्य : लॅटिन ही प्राचीन रोमची भाषा. तथापि रोमन साम्राज्याच्या ऱ्हासानंतरही ती लिहिली-बोलली जात होती. यूरोपातील ख्रिस्ती जगतात लॅटिनचा वापर होत राहिला. आजही रोमन कॅथलिक चर्चची अधिकृत भाषा लॅटिन ही आहे. लॅटिन भाषेतील अभिजात साहित्यनिर्मिती सर्वस्वी रोमनांनी केली, असेही नव्हे. रोमन नसतानाही ज्यांनी लॅटिन भाषेत लेखन केले, त्यांच्यावर रोमन संस्कृतीचे खोल संस्कार झाले होते, असे मात्र म्हणता येईल. ⇨प्लॉटस (सु. २५४-१८४ इ.स.पू.) आणि टेरेन्स (सु. १८५-१५९ इ.स.पू.नोंद ‘पब्लिशस टेरेनशिअस एफर’ अशी) हे विख्यात सुखात्मिकाकार जन्माने रोमन नव्हते. तथापि रोममध्ये त्यांचे वास्तव्य झाले आणि त्यांचे कर्तृत्व रोमशी निगडित राहिले. रोमन साहित्यपरंपरेचा आरंभ ज्याच्यापासून मानला जातो, तो लिव्हिअस अँड्रोनायकस (सु. २८४-सु.२०४ इ.स.पू,) हा ग्रीक होता. दक्षिण इटलीतील टरेंटम ही ग्रीक वसाहत इ.स.पू. २७२ मध्ये रोमनांनी जिंकून घेतली, तेव्हा त्याला गुलाम म्हणून रोमला आणण्यात आले आणि रोमन सरदारांच्या मुलांना शिकवण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात आली. यथावकाश त्याला गुलामगिरीतून मुक्तही करण्यात आले. ह्याच लिव्हिअस अँड्रोनायकसने ग्रीक महाकवी होमर ह्याच्या⇨ओडिसीचे Odyssia हे लॅटिन भाषांतर केले. हे भाषांतर आज अत्यंत त्रुटित अवस्थेत उपलब्ध आहे आणि त्याची वाङ्मयीन गुणवत्ताही फार मोठी म्हणता येईल अशी नाही. तथापि ह्या भाषांतरापासून लॅटिन साहित्याची परंपरा सुरू झाली, असे मानले जाते. ⇨इलिअड आणि ओडिसी ही दोन महाकाव्ये ग्रीकांना, ग्रीकांची म्हणून, ग्रीक साहित्यपरंपरेच्या अगदी आरंभापासून लाभलेली दिसतात. रोमनांच्या साहित्यपरंपरेच्या आरंभी दिसते, ते ओडिसीचे लॅटिन भाषांतर. नंतरचे लॅटिन साहित्य हे प्राचीन ग्रीक साहित्याच्या प्रभावाखाली आणि त्या साहित्याचा आदर्श समोर ठेवून वाढले, असे मत व्यक्त केले जाते.

ग्रीक संस्कृतीचा प्रभाव रोमनांवर होता, ह्यात शंका नाही. ग्रीकांच्या संस्कृतीप्रमाणेच ⇨इट्रुस्कन संस्कृतीचा प्रभावही रोमनांवर होता. धर्माच्या आणि राजकीय प्रथांच्या संदर्भात इट्रुस्कन संस्कृतीचा रोमनांवरील प्रभाव लक्षणीय असा आहे. ग्रीकांचा प्रभाव अधिक व्यापक होता. हेलेनिस्टिक जगामध्ये एक समर्थ राजकीय सत्ता म्हणून रोमचा उदय होण्यापूर्वीच्या काळापासून ग्रीक संस्कृतीचे संस्कार रोमवर होत होते. ग्रीक संस्कृतीचा प्रभाव रोमन संस्कृतीवर पडला होताच. उदा., काही ग्रीक देवतांना, त्यांच्या इट्रुस्कन नावांवरून रोमन लोक ओळखत असत. ग्रीकांचा प्रत्यक्ष प्रभावही अर्थातच मोठा होता. साहित्यापुरते बोलावयाचे झाल्यास ग्रीकांचे विविध साहित्यप्रकार रोमनांनी स्वीकारले. हे साहित्यप्रकार ग्रीकांनी परिपूर्णतेचा ध्यास घेऊन विकसित केले होते. त्यांच्यापेक्षा अधिक चांगले आणि वेगळे पर्याय शोधणे रोमनांना दुर्घट होते. तथापि रोमनांनी ह्या साहित्यप्रकारांकडे ग्रीकांहून वेगळ्या अभिवृत्तीने पाहिले. ग्रीकांच्या प्रत्येक साहित्यप्रकाराला त्याची अशी एक ठाशीव चौकट होती घाट होता. त्या त्या साहित्यप्रकाराच्या हाताळणीचे निश्चित नियम होते परंतु त्यांच्या चौकटीतही -उदा. ग्रीक शोकात्मिका-⇨सॉफोक्लीझ आणि⇨युरिपिडीझ ह्यांच्यासारखे साहित्यिक आपापली भिन्न प्रकृती आणि व्यक्तित्व जपत असत. रोमन साहित्यिकांनी मात्र कोणताही साहित्यप्रकार हाताळताना आपापल्या स्वतंत्र व्यक्तित्त्वापेक्षा आपल्या रोमनपणाचा ठसा आपल्या साहित्यकृतींवर विशेषत्वाने उमटविला. तसेच विविध साहित्यप्रकार त्यांनी काहीसे लवचिकपणेही वापरले.

उपर्युक्त लिव्हिअस अँड्रोनायकसने काही नाट्यलेखनही केले. लूदी रोमानी ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या उत्सवासाठी इ.स.पू. २४० मध्ये त्याने एक सुखात्मिका आणि एक शोकात्मिका लिहिली. ग्रीक नाटके समोर ठेवूनच त्याने ह्या नाट्यकृतींचे लेखन केले होते. त्यानंतर त्याने आणखी काही नाटके लिहिली. त्याच्या काही नाटकांची शीर्षके आणि त्याच्या नाट्यलेखनातील काही ओळी आज उपलब्ध आहेत. लिव्हिअस अँड्रोनायकसच्या शोकात्मिका आधुनिक ऑपेराच्या जवळपास येणाऱ्या होत्या, असे म्हटले जाते. इ.स.पू. २०७ मध्ये हॅनिबलबरोबर झालेल्या युद्धाच्या वेळी, कसलेही अपशकून होऊ नयेत म्हणून, कुमारिकांनी गावयाचे एक स्त्रोत रचण्याची कामगिरीही लिव्हिअसकडे रोमन सत्ताधाऱ्यांकडून अधिकृतपणे सोपविण्यात आली होती आणि त्याने ती पार पाडली होती.

लिव्हिअर अँड्रोनायकसच्या पूर्वी अस्तित्वात असलेल्या लॅटिन साहित्याचे स्वरूप काय होते, ह्याचा विचार करीत असताना असे दिसते, की त्या भाषेत काही स्तोत्ररचना केली जात होती. अशा स्तोत्रांपैकी एक आपणास उपलब्ध असून ते दगडावर कोरलेले आहे. ‘आर्व्हल ब्रदर्स ’ (इं.अर्थ) ह्या नावाने ओळखला जाणारा एक धर्मगुरुसमूह (ब्रदरहुड) होता. त्याचे ते स्तोत्र होय. ‘साली ’ अथवा सॅलिअन धर्मगुरू ह्या नावाचाही एक धर्मगुरुसमूह होता. त्याचीही स्तोत्रे असत. ह्या स्तोत्रांचेही काही अवशेष आपणास उपलब्ध आहेत. ‘सॅटर्निअन’ ह्या लॅटिन छंदात ती रचिलेली आहेत. ओडिसीच्या लॅटिन अनुवादासाठी लिव्हिअस अँड्रोनायकसने ग्रीक हॅक्झॅमीटरऐवजी ह्या सॅटर्निअन छंदाचा उपयोग केला, ही बाब लक्षणीय आहे.

अँड्रोनायकसपूर्वी काही बॅलडरचनाही केली जात होती. थोरांचा गौरव करणे, हा ह्या बॅलडरचनेचा हेतू असे. रोमचा कॉन्सल थोरला केटो (केटो द सेन्सर- २३४-१४९ इ.स.पू.) ह्याला ह्या बॅलडरचनेची माहिती होती, असे त्याच्या लेखनावरून दिसते. ‘ट्वेल्व्ह टेबल्स ’ (इं.अर्थ) ह्या नावाने प्रसिद्ध असलेली रोमन विधिसंहिताही उल्लेखनीय आहे. इ.स.पू. पाचव्या शतकात ही जाहीर केली गेली. ही विधिसंहिता योग्य प्रकारे तयार व्हावी, म्हणून काही ग्रीक नगरराज्यांतील कायद्यांच्या अभ्यासार्थ रोमन दूत तेथे पाठविण्यात आले होते, अशी एक आख्यायिका आहे. तिच्यात कितपत तथ्य आहे, हे निश्चित सांगता येत नसले, तरी कायद्यासंबंधीच्या काही ग्रीक संकल्पनांचे प्रतिबिंब ह्या विधिसंहितेत पडलेले आढळते. आज ही विधिसंहिता त्रुटित स्वरूपात आहे. ह्या विधिसंहितेतून आढळणारी लॅटिन भाषेची आर्ष रूपे भाषाविष्काराच्या आरंभीच्या प्रयत्नांची द्योतक वाटतात.

लिव्हिअर अँड्रोनायकसने ग्रीक आदर्शानुरूप लिहिलेली एक शोकात्मिका आणि सुखात्मिका रोमन रंगभूमीवर इ.स.पू. तिसऱ्या शतकात सादर झालेली असली, तरी त्याच्याही पूर्वी रोमन रंगभूमीचा आपल्या परीने एक प्रवास सुरू झालेला होता. प्लेगचे संकट आले. म्हणजे देवतांची आराधना करण्यासाठी बासरीच्या स्वरांवर नृत्य करणारे नर्तक इट्रुरिया येथून आणविले जात, असे ⇨लिव्ही ऊर्फ टायटस लिव्हिअस (इ. स. पू. ५९- इ.स.१७) ह्या रोमच्या इतिहासकाराच्या इतिहासलेखनातून दिसते. रोमन तरुण ह्या नृत्यांचे अनुकरण करू लागले आणि उत्स्फूर्तपणे काही पद्य संवादांची जोडही त्या नृत्यांना देऊ लागले. ह्यांतूनच काही नाट्य विकास पावले. संगीताची साथ असलेल्या ह्या नाट्याविष्काराला संविधानकाची चौकट नव्हती. Satura ह्या नावाने तो ओळक्षला जात असे. 

लिव्हिअस अँड्रोनायकसनंतरचे उल्लेखनीय नाव⇨नीअस नीव्हिअसचे (सु. २७०- सु. २०१ इ. स. पू). लिव्हिअस अँड्रोनायकसने एका ग्रीक महाकाव्याच्या लॅटिन अनुवाद केला परंतु नीव्हिअसने Bellum Punicum हे स्वतंत्र महाकाव्य रचिले. ह्या महाकाव्यासाठीही लॅटिनमधील ‘सॅटर्निअन’ ह्याच छंदाचा वापर नीव्हिअसने केला होता. पहिल्या प्यूनिक युद्धात त्याने भाग घेतला होता. ह्या युद्धातील अनुभवांच्या आणि रोमसंबंधी मौखिक परंपरेने उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे त्याने आपले महाकाव्य रचिले होते. हे महाकाव्य लिहून लॅटिन साहित्याला त्याने एक राष्ट्रीय दिशा दिली. आपल्या महाकाव्यात रोमचा त्याने गौरव केला. रोम आणि कार्थेज ह्यांच्यामधील शत्रुत्वाची कारणमीमांसा करताना नीव्हिअसने ट्रोजनांचा प्रमुख नेता इनीअस आणि कार्थेजची राणी डायडो (डिडो) ह्यांची कथा आणली. पुढे रोमन महाकवी ⇨ व्हर्जिलने (७०-१९ इ.स.पू.) ⇨ईनिड ह्या आपल्या महाकाव्याची केलेली हाताळणी पाहता, नीव्हिअसचा त्याच्यावर असलेला प्रभाव स्पष्ट होतो.⇨मार्कस टलीअस सिसरोने  (१०६-४३ इ.स.पू.)  मायरन ह्या ग्रीक शिल्पकाराच्या आर्ष शिल्पाशी ह्या महाकाव्याची तुलना केली आहे. नीव्हिअसचे महाकाव्यही आज त्रुटित स्वरूपातच उपलब्ध आहे. 

हे महाकाव्य लिहिण्यापूर्वी नीव्हिअसने नाट्यलेखन केले होते. रोमन इतिहास आणि रोमन मिथ्यकथा ह्यांवर लॅटिनमध्ये नाटके लिहिण्याचा-ह्या नाटकांना (Fabula Praetcxta) ही संज्ञा आहे-आरंभ केल्याचे श्रेय नीव्हिअसला दिले जाते. नीव्हिअसचे नाट्यलेखन त्रुटित स्वरूपातच मिळते. त्याच्या काही नाटकांची शीर्षकेच मिळतात. त्याच्या नाट्यकृतींचा जो त्रुटित भाग उपलब्ध आहे, त्यावरून त्याला मानवी भावभावना, कारुण्य ह्यांचे दर्शन चांगल्या प्रकारे घडविता येत होते, असे वाटते. 


महाकाव्य आणि नाटक हे दोन्ही साहित्यप्रकार हाताळणारा आणखी एक उल्लेखनीय साहित्यिक म्हणजे⇨क्किन्टस एनिअस (२३९- १६९ इ.स.पू.) हा होय. एनिअसने आन्नालेस (अठरा भाग) ह्या आपल्या महाकाव्यात रोमचा अगदी प्राचीन काळापासून त्याच्या स्वतःच्या काळापर्यंतचा इतिहास पद्यबद्ध केला आहे. एनिअसने आपल्या आन्नालेससाठी लिव्हिअर अँड्रोनायकस आणि नीअस नीव्हिअस ह्यांनी त्यांच्या महाकाव्यांसाठी वापरलेला ‘सॅटर्निअन’ हा छंद न वापरता ग्रीक हेक्झॅमीटरचा उपयोग केला. ग्रीक हेक्झॅमीटरचा लॅटिनमध्ये प्रथम उपयोग करणारा कवी म्हणून एनिअसचे नाव घेतले जाते. एनिअसची पद्यरचना काहीशी अनघड आहे. तथापि एनिअसच्या ह्या महाकाव्याला मोठी लोकप्रियता प्राप्त झाली आणि एनिअसच्या आन्नालेसनंतर ग्रीक हेक्झॅमीटर हे लॅटिन कथाकाव्यांचे वाहन बनले. ह्या महाकाव्याच्या सु. ६०० ओळी आज उपलब्ध आहेत. ह्यांखेरीज काही संकीर्ण स्वरूपाचे लेखनही त्याने केले आहे.

लिव्हिअस अँड्रोनायकस, नीअस नीव्हिअस आणि क्विंटस एनिअस ह्यांनी महाकाव्य आणि नाटक हे साहित्यप्रकार हाताळले. तथापि प्लॉटसने केवळ  नाटके-त्यातही फक्त सुखात्मिका-लिहिण्यापुरतेच स्वतःला सीमित करून घेतले. प्लॉटसने १३० नाटके लिहिली, असे जरी म्हटले जात असले, तरी त्याच्या एकूण २१ नाट्यकृती आज उपलब्ध आहेत (त्यांपैकी ‘वॅलेट’-इं.शी. ही त्रुटित स्वरूपात). ⇨ मिनँडर, फिलीमर, डिफिलस ह्यांसारख्या ग्रीक नव-सुखात्मिकाकारांचा आदर्श प्लॉटसपुढे होता तथापि रोमन प्रेक्षकांच्या अभिरुचीचे त्याला भान होते आणि हवा तो नाट्यपरिणाम साधण्यासाठी आवश्यक ते स्वातंत्र्य घेण्यास त्याने मागेपुढे पाहिले नाही.

प्लॉटसबरोबरच नाव घेण्याजोगा आणखी एक नामवंत नाटककार म्हणजे टेरेन्स. त्यानेही सुखात्मिकाच लिहिल्या. ग्रीक नव-सुखात्मिकांचा आदर्श त्यानेही समोर ठेवला होता. मिनँडर, आपॉलोडोरस ऑफ कारिस्टस, डिफिलस ह्यासांरख्या ग्रीक नव-सुखात्मिकाकारांच्या आधारे त्याने आपल्या सुखात्मिका रचिल्या आणि त्यानेही आपल्या कलादृष्टीला अनुसरून आवश्यक ते स्वातंत्र्य घेतले. कधीकधी एकाच ग्रीक नाटककाराच्या दोन नाट्यकृतींमधली सामग्री वापरून त्याने आपली एक नाट्यकृती उभी केली. उदा., द वूमन ऑफ अँड्रॉस (इं.भा.) ही त्याची सुखात्मिका. टेरेन्सने सहा सुखात्मिका लिहिल्या. त्यांतील ‘द ब्रदर्स’ ही सुखात्मिका सर्वश्रेष्ठ समजली जाते. मुलांना शिक्षण कसे द्यावे, ह्यासंबंधीचा एक उदारमतवादी दृष्टिकोन ह्या सुखात्मिकेत त्याने प्रभावीपणे मांडलेला आहे.

प्लॉटस आणि टेरेन्स हे दोघेही ख्यातनाम नाटककार तथापि प्लॉटस हा नाट्यकृतीच्या घाटाबद्दल काहीसा निष्काळजी, तर टेरेन्स त्याबाबत अतिशय जागरूक. प्रहसनात्मकतेवर प्लॉटसचा विशेष भर, तर प्रहसनात्मकता टाळण्याकडे टेरेन्सचा कल. प्रेक्षकांच्या अभिरुचीचे नेमके भान ठेवल्यामुळे प्लॉटसच्या नाटकांना फार मोठी लोकप्रियता प्राप्त झाली तथापि टेरेन्सच्या नाटकांचे आवाहन सामान्य प्रेक्षकांपेक्षा अधिक नागर आणि सुसंस्कृत अभिरुचीच्या प्रेक्षकांना होते.

प्लॉटसचे सामर्थ्य त्याच्या संविधानकात किंवा व्यक्तिरेखनात नाही, तर ते त्याच्या भाषेत आहे. तिचा ताजेपणा आणि तिची आविष्कारशीलता ह्यांची प्रशंसा⇨ मार्कस टेरेन्शस व्हॅरो (११६- २७ इ.स.पू.) आणि सिसरो ह्यांनी केली आहे. 

 

ग्रीकांच्या संपर्कातून सुसंस्कारित झालेली आणि सुसंस्कृत रोमन समाजात बोलली जाणारी लॅटिन भाषा टेरेन्सने वापरली. सिपिओ ॲफ्रिकॅनस मायनर ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्याप्रेमी रोमन सेनापतीच्या खास वाङ्मयीन वर्तुळात टेरेन्सचा अंतर्भाव होता, ही बाब ह्या संदर्भात लक्षात घेण्यासारखी आहे.

टेरेन्सने द वूमन ऑफ अँड्रॉस (इं.भा.) ही आपली पहिली नाट्यकृती सिसिलिअस स्टेशिअस (सु. २१९- सु. १६६ इ.स.पू.) ह्या ज्येष्ठ रोमन नाटककाराला वाचून दाखविली आणि त्याला ती इतकी आवडली, की त्याने टेरेन्सला स्वतःबरोबर सन्मानाने भोजनास बसवले, अशी आख्यायिका आहे. स्टेशिअस हा उत्तर इटलीचा रहिवासी. गुलाम म्हणून त्याला रोमला आणण्यात आले होते. पुढे त्याची मुक्तता झाल्यानंतर नाट्यलेखनावर त्याने आपला उदरनिर्वाह केला, असे दिसते. त्याच्या काळात एक प्रमुख सुखात्मिकाकार म्हणून त्याला मान्यता मिळाली होती. व्होल्कॅशस सिडिगिटस (इ.स.पू.सु. १००) ह्याने रोमन सुखात्मिकाकारांची जी सूची दिलेली आहे, तीत स्टेशिअसला अग्रस्थानी ठेवले आहे. त्याच्या सु. ४० नाटकांची शीर्षके उपलब्ध होतात. त्यांपैकी जवळपास निम्म्या नाट्यकृतींची शीर्षके मिनँडरच्या नाट्यकृतींशी जुळतात. मूळ ग्रीक नाट्यकृतींपासून स्टेशिअसची संविधानके क्वचितच दूर जातात. असे व्हॅरोने म्हटले आहे. तथापि त्यांच्या तपशिलांत त्याने प्लॉटसइतकेच स्वातंत्र्य घेतले, असे दिसते. ग्रीक नव-सुखात्मिकारांमध्येही स्टेशिअसचा आदर्श मिनँडर हा होता परंतु मिनँडरचे तेज त्याच्या नाटकांत नव्हते.

लॅटिन शोकात्मिकेच्या संदर्भात पहिला उल्लेख करावा लागतो, तो मार्कस पक्यूव्हिअसचा  (सु. २२०-सु. १३० इ. स. पू.). सर्वश्रेष्ठ रोमन शोकात्मिकाकार म्हणून व्हॅरोने  त्याचा गौरव केला आहे. क्विन्टस एनिअसचा हा पुतण्या. एनिअसनेच त्याला रोमला आणले. त्याने एकूण तेरा नाटके लिहिली आणि त्यांतील बारा शोकात्मिका होत्या, असे दिसते. ह्या सर्व नाटकांतील मिळून सु. ५०० ओळी आज उपलब्ध आहेत. पक्यूव्हिअसने आपल्या नाटकांसाठी युरिपिडीझनंतरच्या ग्रीक नाटकांतून उपलब्ध झालेली काहीशी अपरिचित अशी संविधानके उपयोगात आणली. त्याच्या नाटकांतून तत्तवचिंतन प्रकर्षाने जाणवते. त्याची नाटके लोकप्रिय होती. त्याच्या मृत्यूनंतरही त्यांचे प्रयोग होत असत आणि ती वाचली जात असत, असे दिसते.

ल्यूशस ऑक्सिअस (१७०-सु.८६ इ.स.पू.) हा पक्यूव्हिअसचा तरुण प्रतिस्पर्धी. त्याच्या सु. ४५ शोकात्मिकांची माहिती आपल्याला मिळते. युरिपिडीझचा त्याच्यावर विशेष प्रभाव होता.

आरंभीच्या लॅटिन साहित्यावर ‘सिपिऑनिक वर्तुळ’ (इ.स.पू. दुसरे शतक) ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या, अभिजनांच्या एका गटाचाही लक्षणीय प्रभाव पडलेला आहे. सिपिओ ॲफ्रिकॅनस मायनर (१८५-१२९ इ. स. पू.) हा ह्या वर्तुळाचा नेता असल्यामुळे ह्यास सिपिऑनिक वर्तुळ असे म्हटले जाते. सिपिओ ॲफ्रिकॅनस मायनर हा दोनदा रोमचा कॉन्सल झाला होता (१४८ आणि १३३ इ. स. पू.).

त्याला साहित्यासंबंधी आस्था होती. त्याच्या ह्या वर्तुळात इतिहासकार ⇨पॉलिबिअस, स्टोइक तत्त्वज्ञ पनीशिअस, सुखात्मिकाकार टेरेन्स, उपरोधकार गेयस ल्युसिलिअस (१८०-१०२ इ.स.पू.) आणि योद्धा गेयस लिलिअस ह्यांचा समावेश होता. पॉलिबिअस आणि पनीशिअस हे ग्रीक होते. रोमच्या सामर्थ्याने पॉलिबिअस भारलेला होता. भूमध्य सामुद्रिक जगात रोमने झपाट्याने मिळविलेले सामर्थ्य वर्णन करण्यासाठी त्याने रोमचा इतिहास लिहिला. ह्या ४० खंडीय इतिहासाचे पहिले ५ खंडच आज पूर्णतः उपलब्ध आहेत. अन्य खंडांतील उतारे वा उद्धृते मिळतात. पनीशिअसने धैर्य, साधेपणा व शिस्त ह्यांची शिकवण रोमनांना दिली. टेरेन्सच्या कर्तृत्वाचा उल्लेख वर येऊन गेलेलाच आहे. उपरोधिका (सटायर) ह्या खास रोमन साहित्यप्रकाराच्या प्रवर्तनाचे श्रेय ल्यूसिलिअसला दिले जाते. लिलिअस हा जसा योद्धा, तसाच एक व्यासंगी पुरुष होता. तो उत्तम वक्ताही होता. रोमन संस्कृतीचा विकास घडवून आणणे हे सिपिओच्या वर्तुळाचे ध्येय होते.

सिपिओच्या वर्तुळाने लॅटिन गद्याच्या विकासावर भर दिला. लॅटिन गद्यलेखनाचा इतिहास पाहिला, तर ते वक्तृत्वाच्या आणि इतिहास लेखनाच्या अंगाने वाढत गेल्याचे दिसून येईल. ह्या दोन्ही संदर्भात प्रवर्तन केले, ते मार्कस पोर्शिअस केटो (२३४-१४९ इ. स. पू.) ह्याने. ‘ केटो द सेन्सर’, तसेच ‘केटो द एल्डर’ ह्या नावानेही तो ओळखला जातो. ‘सेन्सर’ म्हणजे प्राचीन रोममधील मॅजिस्ट्रेट. केटो हा लेबीअन शेतकरी कुटुंबातून आलेला. दुसऱ्या प्यूनिक युद्धात तो लढलेला होता. अनेक अधिकारपदांवर काम केल्यानंतर इ. स. पू. १९५ मध्ये त्याला कॉन्सलचे पद मिळाले. सेन्सर ह्या नात्याने त्याने रोमन सरदारांच्या सैल नीतिमत्तेला लगाम घालण्याचा प्रयत्न केला. पण ग्रीक संस्कृतीचा प्रभाव रोमवर असावा हे त्याला मान्य नव्हते. तथापि त्याच्या संस्कृतीचा प्रभाव रोमवर असावा हे त्याला मान्य नव्हते. तथापि त्याच्या वृद्धापकाळी त्याने स्वतः ग्रीक भाषेचा अभ्यास केला. केटोने रोमचा इ.स.पू. १४९ पर्यंतचा इतिहास-Origines-लिहिला. हा लॅटिन भाषेत लिहिलेला आरंभीचा इतिहासग्रंथ म्हणून त्याचे महत्त्व आहे. त्यानंतरच्या ५० वर्षांत इतिहासलेखनाचा विकास होत गेला. लॅटिन गद्यशैलीतही कलात्मकता आली. आधीचे रोमन इतिहासकार आपले ग्रंथ ग्रीक भाषेत लिहित होते. De Agri Cultura (De Re Rustica ह्या नावानेही त्याचा काही वेळा उल्लेख होतो) हा केटोचा आणखी एक उल्लेखनीय ग्रंथ. लॅटिन भाषेतील उपलब्ध ग्रंथांत हा सर्वप्राचीन होय. शेतीविषयी केटोला मोठी आस्था होती. व्यापारापेक्षा शेती किती फायदेशीर आहे, हे सांगतच केटोने ह्या ग्रंथाचा आरंभ केलेला आहे. शेतीचे व्यवस्थापन कसे करावे, हे त्याने ह्या ग्रंथात सांगितले आहे. ह्या ग्रंथाचा बराचसा भाग आज उपलब्ध आहे. केटो हा उत्तम वक्ताही होता व त्याची सु. १५० भाषणे सिसरोला माहीत होती, असे दिसते.


उपरोधिका हा खास रोमन साहित्यप्रकार. ल्युसिलिअसने उत्तम उपरोधिका लिहिल्या. मात्र त्या गद्याला अधिक जवळच्या आहेत. आपल्या ह्या उपरोधिकांना त्याने sermunes म्हणजे ‘बोलणे’, ‘गप्पा’ असे नाव दिले होते आणि हेक्झॅमीटरमध्ये रचिलेल्या ह्या उपरोधिकांचे स्वरूप अनौपचारिक गप्पांचेच आहे. स्वतःच्या, तसेच त्याच्या मित्रांच्या जीवनातले प्रसंग, प्रवास, मेजवान्या, काही वाङ्मयीन विषय ह्यांवर त्याच्या उपरोधिका आहेत. चैनी राहणी, खादाडपणा ह्यांवर त्यांत टीका आढळते. काही लेखकांवर तसेच समाजातील अन्य मान्यवर व्यक्तींवरही ल्युसिलिअसने आपल्या ह्या उपरोधिकांतून टीका केली. ह्या उपरोधिकांचे ३० संग्रह होते, परंतु आज त्या त्रुटित स्वरूपातच मिळतात.

हॉरिसच्या मते ‘उपरोधिका’ ह्या साहित्यप्रकाराची निर्मिती ल्युसिलिअसने केली. उपरोधिका एनिअसने लिहिल्या आहेत. पक्यूव्हिअसनेही लिहिल्या आहेत. ल्युसिलिअसने मात्र उपरोधिकेला एक घाट दिला एक निश्चित स्वरूप दिले. अभिव्यक्तीसाठी त्याने आरंभी अनेक वृत्ते वापरली आणि नंतर हेक्झॅमीटर हे वृत्त पक्के केले. त्याची भाषा अत्यंत प्रभावी आणि जिवंत आहे. उपरोधिकेसारख्या साहित्यप्रकारातून कवींना आत्मपरता जोपासता येत होती आणि त्या दृष्टीने हा साहित्यप्रकार विशेष महत्त्वाचा ठरतो.

सिसरोचे युग (८०-४३ इ. स. पू.) : ह्या कालखंडावर मार्कस टलीअस सिसरो ह्याचा ठळक प्रभाव जाणवतो. ह्या काळातील लॅटिन साहित्याची संस्कारसंपन्नताही नजरेत भरण्यासारखी आहे. ग्रीक संस्कृतीचा घाट आणि तिचे सत्त्व आत्मसात करून रोमनांनी आपल्या कल्पना त्यांत एकजीव केल्या. परिणामतः लॅटिन गद्य समद्ध झाले आणि कवितेनेही उत्कट भावाभिव्यक्तीची एक नवी उंची गाठली. 

‘निओटेरिकस’-नवे कवी- हा एक कविसमूह ह्या कालखंडात अस्तित्वात आला. ह्या समूहाला एखाद्या सुबद्ध संप्रदायाचे स्वरूप होते असे नाही पण हे कवी एका विशिष्ट पिढीचे प्रतिनिधी आहेत. ह्या पिढीतील कवींचे बालपण आणि युवावस्थेची आरंभीची वर्षे ल्यूशिअस कॉर्नीलिअस सला (१३८ -७८ इ.स.पू.) ह्याच्या हुकूमशाहीखालच्या वातावरणात गेली. एनिअसच्या काळातील लॅटिन कवितेकडे त्यांनी पाठ फिरवली. त्यांना ग्रीकांसारखी-अधिक काटेकोरपणे म्हणायचे, तर ॲलेक्झांड्रियनांसारखी-कविता लिहावयाची होती. नाईल नदीच्या मुखावरील ॲलेक्झांड्रिया हे ग्रीकांश संस्कृतीचे एक महत्त्वाचे केंद्र होते. तेथील कवींनी हाताळलेल्या  ‘एपिल्यॉन’ (लहान लहान प्रेमकविता), विलापिका आणि गोपकविता ह्यासांरख्या काव्यप्रकारांकडे ते वळले. आपल्या कवितांतून त्यांनी आत्मपरता जोपासली. कवितेच्या परिपूर्ण घाटाबद्दल ते जागरूक असत. पब्लिअस व्हालेरिअर केटो, काल्व्हस लिसिनिअस हेल्विअस सिना (?-४४ इ.स.पू.), मार्कस फ्यूरिअस बिबॅक्यूलस, पब्लिअस टेरेन्शस व्हॅरो (८२-३७? इ.स.पू.) आणि⇨गेयस व्हालीअरिअस काटलस (सु. ८४-सु. ५४ इ.स.पू.) ह्यांचा समावेश होतो. काटलसचा अपवाद वगळता ह्या सर्वांची कविता त्रुटित स्वरूपात उपलब्ध आहे. 

लॅटिनप्रमाणेच ग्रीक भाषेवरही काटलसचे प्रभुत्व होते. त्याच्या ११६ कविता उपलबध आहेत. ह्या कवितांचे तीन गट आहेत. एक गट निरनिराळ्या छंदांतील छोट्या कवितांचा, दुसरा गट हा तुलनेने दीर्घ आणि प्रगल्भ कवितांचा आणि शेवटचा गट हा चतुरोक्तींसारख्या (एपिग्राम्स) कवितांचा. नव्या कवींचे सर्व वैशिष्ट्यपूर्ण विषय काटलसच्या काव्यरचनेत एकत्रितपणे आल्यासारखे वाटतात. प्रेम, स्नेहानुभव, निसर्गचित्रे, राजकीय उपरोधिका इत्यादी. काटलस एका स्त्रीच्या प्रेमात पडला होता. तथापि त्या स्त्रीने त्याची वंचना केली. त्याने रचिलेल्या काही उत्कट भावकवितांमधील ‘लेस्बिआ’ हीच असावी. आनंद, दुःख, तिरस्कार, विरक्ती अशा विविध भावभावना ह्या भावकवितांतून व्यक्त झालेल्या आहेत. सीझरसारख्या राजकीय व्यक्तींवरील त्याची विडंबन काव्येही उल्लेखनीय आहेत. रोममधील उमराव वर्गाची सीझर आणि त्याचे सहकारी ह्यांच्याकडे बघण्याची दृष्टी काही प्रमाणात ह्या विडंबनांतून प्रतिबिंबित होते. त्याने दोन विवाहगीते तसेच Attis हे काव्य रचिले. सिब्ली ह्या देवतेविषयीची त्याची भक्ती ह्या काव्यातून प्रकट झालेली आहे. त्याने आरिआद्नी आणि थीस्यूस ह्यांच्यावरील एक एपिल्यॉनही लिहिले आहे. काटलसच्या कवितेतील विविधता लक्षणीय आहे. कवितेच्या संदर्भात⇨लुक्रीशिअस (सु.९९-सु.५५ इ.स.पू.) हे नावही लक्षवेधक आहे. लुक्रीशिअस हा⇨एपिक्यूरस मताचा होता आणि ह्या मताच्या आविष्कारासाठी त्याने आपली कविता लिहिली. De return natura (६ खंड, इं.शी. ऑन द नेचर ऑफ थिंग्ज) हे त्याचे दीर्घकाव्य ह्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. तात्त्विक संकल्पना मांडण्यासाठी काव्यरचना करणे, ही बाब लॅटिन कवितेला नवी होती. अशा प्रकारच्या काव्याभिव्यक्तीसाठी भाषेच्या दृष्टीनेही तेव्हा काही मर्यादा होत्याच. हेक्झॅमीटर हे वृत्तही अशा प्रकारच्या काव्यहेतूसाठी ह्यापूर्वी कधी वापरले गेले नव्हते. ह्या वस्तुस्थितीचा परिणाम ह्या काव्यावर जाणवतो. त्याची शब्दकळा काहीशी ओबडधोबड आहे.

सिसरोच्या ग्रंथकर्तृत्वातून लॅटिन गद्याचा समृद्ध आविष्कार प्रत्ययास येतो. सुमारे ५७ भाषणे, ४ पत्रसंग्रह, तसेच तत्त्वज्ञान, वक्तृत्वशास्त्र ह्यांसारख्या विषयांवरचे सुमारे २० ग्रंथ, अशी त्याच्या एकूण लेखनाची विभागणी करण्यात येते. एक उत्कृष्ट वक्ता म्हणून सिसरोची ख्याती होती. ‘ॲटिक’ आणि ‘ एशियन’ असे वक्तृत्वशैलीचे दोन प्रकार त्या काळी प्रचलित होते. ॲटिक शैलीत एक प्रकारचा थेटपणा आणि साधेपणा होता, तर एशियन शैली ही भव्य, संपन्न आणि भाषेचा फुलोरा असलेली अशी होती. पण सिसरोने ह्यांपैकी कोणत्याच एका शैलीचा स्वीकार न करता, ज्या शैलीकडून जे चांगले वाटले, ते घेतले. आदर्श वक्तृत्वाचे अनेक प्रकार सिसरोच्या भाषणांतून आपल्याला गवसतात. सिसरोची पत्रे अत्यंत मोकळी आणि बोलकी आहेत. त्याचे जीवन आणि त्याचा स्वभाव ह्यांवर ती प्रकाश टाकतात. ह्या पत्रांतून येणारे विषयही वैविध्यपूर्ण आहेत. उदा., तत्त्वज्ञान, साहित्य, राजकारण, त्याच्या घरातल्या कौटुंबिक घटना. पत्रांतून व्यक्त होणाऱ्या त्याच्या भाववृत्तीही वेगवेगळ्या. आपल्या वक्तृत्वशास्त्रविषयक ग्रंथांतून त्याने वक्तृत्वशास्त्राचा रोममधला इतिहास सांगितला तसेच आदर्श वक्त्याचे शब्दचित्र उभे केले De Oratore, Brutus, Oratore हे वक्तृत्वविषयक त्याचे काही उल्लेखनीय ग्रंथ. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात त्याने काही मौलिक भर घातली, असे म्हणता येणार नाही परंतु त्याच्या तत्त्वज्ञानविषयक ग्रंथांमुळे लॅटिन भाषा तत्त्वज्ञानाशी संबंधित अशा अनेक शब्दांनी संपन्न झाली रोमनांना ग्रीक वैचारिकतेचा परिचय घडून आला.

गेयस सॅलसचिअस क्रिस्पस ऊर्फ⇨सॅलस्ट (८६- ३५ इ. स. पू.) ह्याचे कर्तृत्व इतिहासलेखनाचय क्षेत्राकडे. Bellum Catilinae, Bellum Jugurthimum आणि Historiae हे त्याचे इतिहासग्रंथ. निवेदनशैली आणि इतिहासलेखनाचा शास्त्रीय दृष्टिकोण ह्या दोन्ही संदर्भात सॅलस्ट हा त्याच्या आधीच्या इतिहासकारांपेक्षा श्रेष्ठ वाटतो. ऐतिहासिक व्यक्तिरेखा तो वेधकपणे उभ्या करतो. ‘गॅलिक वॉर’ (इं. शी.) आणि ‘सिव्हिक वॉर’ (इं. शी.) ह्या नावाने प्रसिद्ध प्रसिद्ध असलेली गेयस जूलिअस सीझर ह्याची भाष्ये-कॉमेंटरीज-शैलीचा साधेपणा आणि, वस्तुनिष्ठ निवेदन ह्यांमुळे लक्षणीय ठरतात. मार्कस टेरेन्शस व्हॅरो ह्या विद्वानाने सु. ६०० ग्रंथ लिहिले असे म्हटले जाते. त्यांत शिक्षण आणि तत्त्वज्ञानविषयक ग्रंथांचा समावेश होतो. त्याच्या लेखनांपैकी ‘ऑन ॲग्रिकल्चर’ (इं.शी,) आणि ‘ऑन द लॅटिन लँग्वेज’ (इं. शी.) हे दोन ग्रंथच त्रुटित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यांतून त्याच्या व्यासंगाचा प्रत्यय येतो. व्हॅरोने काही उपरोधिकाही लिहिल्या आहेत.

 

सुवर्णयुग अथवा ऑगस्टन साहित्याचा कालखंड(इ. स. पू. ४३–इ. स. १४) : इ. स. पू. ४४ मध्ये जूलिअस सीझरचा खून झाला आणि राजकीय वातावरण तणावग्रस्त बनले. यादवी युद्धांची एक लाटच पसरली. इ. स. पू. ३१ मध्ये ऑक्टियम येथे ऑक्टेव्हिअनने अँटोनी आणि क्लीओपात्रा ह्यांचा पराभव केला. ह्या लढाईबरोबरच रोमन प्रजासत्ताकाची अखेर झाली आणि रोमन साम्राज्याचा कालखंड सुरू झाला. ऑक्टेव्हिअन हा पहिला रोमन सम्राट झाला. इ.स.पू. २७ मध्ये ऑक्टेव्हिअनला ‘ऑगस्टस’ ही सन्माननीय पदवी बहाल करण्यात आली. ऑक्टेव्हिअनने शांतता प्रस्थापित केली सुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले आणि समृद्धी आणली. क्लीओपात्राचा पराभव झाल्यामुळे ईजिप्तची भूमी रोमन साम्राज्याला जोडली गेली. ऑगस्टस म्हणजेच ऑक्टेव्हिअन हा रोमचा नायक आणि रक्षणकर्ता म्हणून ओळखला जाऊ लागला. ऑगस्टचे धोरण भक्कम अशा आर्थिक, सैनिकी आणि प्रशासकीय पायावर रोमन साम्राज्याची उभारणी करण्याच्या हेतुपुरतेच मर्यादित नव्हते. रोममध्ये अवतरलेल्या नव्या युगाची चैतन्यदायी जाणीव ठेवून आपल्या परंपरांकडे पाहण्याची दृष्टी ऑगस्टसच्या राजवटीत रोमनांना लाभणे आवश्यक होते. ही जबाबदारी साहित्याच्या क्षेत्रावर येऊन पडली आणि ऑगस्टसच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ह्या कालखंडातील विविध साहित्यिकांनी ती समर्थपणे पार पाडली. रोम हे कला-साहित्याचे महान केंद्र बनले. ऑगस्टसने साहित्याला स्फूर्ती दिली, आश्रय दिला. ह्या काळातील साहित्याला ‘ऑगस्टन साहित्य’ व साहित्यिकांना ‘ऑगस्टन साहित्यिक’ असे म्हणण्याचा प्रघात आहे. ऑगस्टसचा विश्वासू सल्लागार मिसीनस (मृ. ८ इ. स. पू.) हा वाङ्मयप्रेमी होता. व्हर्जिल, ⇨हॉरिस (६५-८ इ. स. पू.), ⇨ सेक्स्टस प्रॉपर्शस (सु. ५०- सु. १६ इ. स. पू.)  आणि र्युफस व्हेरिअस हे साहित्यिक मिसीनसच्या वाङ्मयीन वर्तुळात अंतर्भूत होते.  


 

ह्या कालखंडात लॅटिन कविता अत्यंत संपन्न झाली. नव्या राजकीय कालखंडाचे सत्त्व आणि त्याचा अन्वयार्थ व्हर्जिलने उत्तम प्रकारे जाणला होता. रोमचा सम्राट ह्या नात्याने ऑगस्टसने अंगीकारिलेल्या कार्यावर व्हर्जिल, हॉरिससारख्या कवींची पूर्ण श्रद्धा होती. त्यांच्या दृष्टीने ऑगस्टस हा रोमचा केवळ रक्षणकर्ता नव्हता, तर जे ज्या काळात जगत होते, त्या काळालाच आकार देणाऱ्या  कल्पना ऑगस्टसच्या व्यक्तीमत्त्वात समूर्त झाल्या होत्या.

ह्या कालखंडातील कवितेच्या संदर्भात एक बाब लक्षणीय आहे. सिसरो युगातील निओटेरिकस‘ हा नव्या कवींचा समूह एनिअसच्या काळातील लॅटिन कवितेकडे पाठ फिरवून अलेक्झांड्रियनांसारखी कविता लिहू पाहत होता. ऑगस्टन साहित्याच्या कालखंडातील कवींसमोर होमर, हीसिअड, आर्किलोकस, पिंडर ह्यासांरख्या ग्रीक कवींचा आदर्श मुख्यतः होता. अलेक्झांड्रियनांना असलेल्या परिपूर्ण काव्यघाटाच्या जाणीवेचा वारसा मात्र टिकून राहिला.

नव्या राजकीय कालखंडाचा अर्थ आणि त्याचे सत्त्व व्हर्जिलच्या कवितेने सर्वाधिक प्रमाणात आत्मसात केल्याचे दिसून येते. व्हर्जिलची कीर्ती आज मुख्यतः त्याने रचिलेल्या ईनिड ह्या विदग्ध महाकाव्यावर अधिष्ठित आहे. ह्या महाकाव्याचे बारा सर्ग उपलब्ध असून त्यावर ओडिसी आणि इलिअड ह्या ग्रीक महाकाव्यांचा प्रभाव जाणवतो. आपल्या आयुष्याच्या अखेरची शेवटची अकरा वर्षे व्हर्जिलने ह्या महाकाव्याच्या रचनेत व्यतीत केली. तथापि ते तो पूर्ण करू शकला नाही. रोमन साम्राज्याचा आरंभ आणि त्याचा विस्तार ह्यांची गौरवगाथा म्हणून हे रोमनांचे राष्ट्रीय महाकाव्य व्हर्जिलने रचिले आणि त्यासाठी त्याने इनीअसच्या आख्यायिकेचा उपयोग करून घेतलेला आहे. इनीअस हा ट्रॉय पडल्यानंतर ट्रोजनांचा नेता झाला. नवी राजधानी वसविण्यासाठी योग्य अशा राजधानीच्या शोधार्थ तो आणि त्याची सेना एकवीस गलबतांतून समुद्रपर्यटनास निघते, असे दाखवून त्याच्या भ्रमंतीच्या, तसेच त्याने इटालियन फौजेबरोबर केलेल्या युद्धाच्या वर्णनांतून व्हर्जिलने ह्या महाकाव्याच्या रचनेमागचा उपर्युक्त हेतू साधला आहे. ह्या भ्रमंतीत पुण्यात्म्यांच्या निवासस्थानी (एलिझिअम) इनीअसचे वडील त्याला भविष्यकाळातील कर्तृत्ववान रोमन वीर दाखवतात. त्यांत रोम्युलसपासून स्वतः ऑगस्टस तसेच त्याचा पुतण्या मार्सेलस ह्याच्यापर्यंत अनेकजपण असतात.इटली हे एकात्म राष्ट्र असल्याची जाणीव ह्या महाकाव्यातून व्यक्त होते, हे विशेष लक्षणीय आहे. इलिअडओडिसी ह्या दोन महाकाव्यांबरोबरच ॲपोलोनियस रोडियस (सु. २९५-सु. २१५ इ. स. पू.) ह्याच्या आर्गोनाउटिका ह्या ग्रीक महाकाव्याचा, ग्रीक शोकात्मिकांचा, अलेक्झांड्रियन कवितेचा आणि एनिअस क्विन्टस, लुक्रीशिअस ह्यासांरख्या आपल्या पूर्वसूरींच्या साहित्यकृतींचा प्रभाव ईनिडवर असल्याचे दिसून येते.

व्हर्जिलच्या अन्य रचनेत एक्लॉग्ज (रचनाकाळ ४२-३७ इ.स. पू.) ह्या नावाखाली एकत्रित केलेल्या दहा गोपकविता, जॉर्जिक्स हे बोधकाव्य (४ खंड, ३७-३० इ. स. पू.) ह्यांचा अंतर्भाव होतो. जॉर्जिक्स हे कृषिविषयक काव्य असून त्यावर हीसिअड ह्या ग्रीक कवीचा परिणाम जाणवतो. व्हर्जिलच्या सर्वच साहित्यकृतींतून त्याची आदर्शवादी दृष्टी दिसून येते.

ह्या सुवर्णयुगातील आणखी एक महत्त्वपूर्ण कवी हॉरिस ह्याने व्हर्जिलप्रमाणे दीर्घ स्वरूपाची काव्यरचना केली नाही. ग्रीक भावकवितेच्या धर्तीवर त्याने आपल्या उद्देशिका (ओड्स) आणि एपोड्स ह्यांची रचना केली. एपोड्स ही त्याची आरंभीची काव्यरचना होय. ह्या काव्यरचनेत राजकीय विषयांवरील काही रचनाही अंतर्भूत आहेत. तथापि ओड्सवर (४ भाग) त्याची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे. काही राजकीय उद्देशिकाही त्याने लिहिल्या आहेतच. रोमन साम्राज्याच्या आकांक्षा आणि सम्राट ऑगस्टसची स्तुती काही उद्देशिकांत आढळते. ह्या उद्देशिकांमुळे एक थोर राष्ट्रीय कवी म्हणून हॉरिसची प्रतिमा प्रस्थापित झाली. राष्ट्रभक्तीने भारावलेल्या उद्देशिका लिहिताना हॉरिसच्या समोर आदर्श होता, थोर ग्रीक भावकवी पिंडर ह्याचा. काही उद्देशिका त्याने स्वतःच्या तसेच आपल्या काही मित्रांच्या जीवनांतील प्रसंगांवर लिहिलेल्या आहेत. काहींतून जीवनाची क्षणभंगुरता त्याने उत्कटपणे व्यक्तविली आहे. भावकवितेसाठी आवश्यक असलेला भावनेचा उत्स्फूर्तपणा त्याच्या उद्देशिकांतून प्रत्ययास येतो. काही उद्देशिका त्याने सम्राट ऑगस्टसच्या आग्रहावरून लिहिल्या. त्यांत मात्र असा उत्स्फूर्तपणा फारसा आढळत नाही. उपरोधिका हा खास रोमन साहित्यप्रकार. हॉरिसच्या Sermones (सटायर्स, २ भाग) मध्ये रोमन उपरोधिकांच्या परंपरेने कलात्मकतेचे एक टोक गाठल्याचे दिसून येते. संभाषणात्मक शैलीत ह्या उपरोधिका लिहिलेल्या आहेत. हेक्झॅमीटरमध्ये रचिलेल्या त्याच्या Epistulae (एपिसल्स, २ भाग) त्याच्या उपरोधिकांशी साम्य असून ह्या रचनांची शैलीही संभाषणात्मक आहे. तथापि उपरोधिकांच्या तुलनेत ह्या रचनांतून त्याच्या प्रतिभेची परिपक्वता आणि तत्त्वचिंतनाची प्रवृत्ती वाढली असल्याचे आढळते. Epistulae च्या दुसऱ्या भागात दोन रचना आहेत. लॅटिन अभ्यासकांच्या साहित्याच्या दृष्टीने त्या महत्त्वाचा आहेत. Ars Poetica (इं.शी. आर्ट ऑफ पोएट्री) ही ४७६ ओळींची त्याची दीर्घ कविता ह्याच भागात अंतर्भूत आहे. एक प्राचीन साहित्यसमीक्षात्मक दस्तऐवज म्हणून ह्या कवितेचे मोल मोठे आहे.

Carmen Saeculare ही कविता हॉरिसने सम्राट ऑगस्टसच्या आदेशावरून रचिली. रोमन देवतासृष्टीतील विविध देवतांना रोमन साम्राज्याला आशीर्वाद देण्याचे आवाहन ह्या कवितेत हॉरिसने केलेले आहे.

परिपूर्ण घाट, आत्मचरित्र रेखाटतानाही त्याने दाखविलेला प्रांजळपणा, त्याचे राष्ट्रप्रेम, त्याची नागरता आणि त्याचा विनोद ह्यांमुळे रोमन कवींमध्ये त्याला मानाचे स्थान प्राप्त झाले.

सेक्स्टस प्रॉपर्शस ह्याने आपल्या विलापिकांच्या चार खंडांतून लॅटिनमधील विलापिकारचनेची परंपरा समृद्ध केली. ‘ सिंथिआ’ ह्या नावाने त्याच्या कवितांतून एक स्त्री अनेकदा येते. वेगवेगळ्या प्रसंगांतून आणि भाववृत्तींतून ह्या ‘सिंथिआ’ बद्दलचा त्याचा भावबंध साकार होत राहतो.

अल्बिअस टिबलस (सु.६०-१९ इ.स.पू.) हा आणखी एक उल्लेखनीय विलापिकाकार. त्याच्या काळातील दरबारी कवींपासून तो काहीसा अलिप्त होता. डीलिआ आणि नेमेसिस हे त्याचे दोन काव्यग्रंथ त्याच्या हयातीत प्रसिद्ध झाले. डिलिआ आणि नेमेसिस ही ज्या स्त्रियांना उद्देशून त्याने कविता लिहिल्या, त्यांची नावे. विलोभनीय मृदुता आणि साधेपणा ही त्याच्या काव्यशैलीची  वैशिष्ट्ये . काही कवितांतून त्याने रोमच्या समृद्धीचे गुणगान गायिले आहे.

ह्या सुवर्णयुगातला अन्य एक महत्त्वपूर्ण कवी म्हणजे ⇨ऑव्हिड (इ. स. पू. ४३–इ. स. १८). मेटॅमॉर्फसिस हा त्याचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ. त्यात अनेक आख्यायिका आणि मिथ्यकथा त्याने कौशल्याने गुंफलेल्या आहेत. Ars amatoria (इं.शी आर्ट ऑफ लव्ह) आणि Remidium amoris (इं.शी लव्ह्ज रेमिडी) ह्या त्याच्या काव्यग्रंथांमुळे सम्राट ऑगस्टसचा त्याच्यावर रोष झाला होता. गणिकेच्या प्रणयाराधनाबाबतचे मार्गदर्शन त्याने ‘आर्ट ऑफ लव्ह’ मध्ये केले, तर ‘लव्ह्ज रेमिडी’ मध्ये प्रेमातून अंग काढून घेऊन प्रेमप्रकरणे कशी संपवावीत हे त्याने सांगितले आहे. Amores (इं.शी.लव्ह्ज) मध्ये त्याच्या प्रेमविषयक कविता आहेत. ऑव्हिडच्या लेखनाकडे पाहिल्यानंतर त्याचा चतुरस्त्रपणा प्रत्ययास येतो. शिवाय ग्रीक आणि रोमन मिथ्यकथांचा वारसा त्याच्या लेखनातून पुढील पिढ्यांना मिळाला.

ह्या सुवर्णयुगात गद्यलेखन मोठ्या प्रमाणावर झाले नाही. काही तांत्रिक विषयांवर जे गद्यग्रंथ लिहिले गेले, त्यांत⇨मार्कस व्हिट्रूव्हिअस पॉलिओ (सु.५०-२६ इ.स.पू.) ह्याच्या De architectura (दहा भाग, इं. शी. ऑन आर्किटेक्चर) ह्या ग्रंथाचा उल्लेख करावा लागेल. ह्या ग्रंथात वास्तुकला आणि बांधकाम ह्या विषयांबरोबरच सजावट, पाणीपुरवठा, जलयंत्रे व अन्य यंत्रे, छाया घड्याळ इत्यादींवरही त्याने लिहिले आहे. त्यात सुनिदर्शनार्थ (इलस्ट्रेशन्स) काढलेल्या आकृत्यांचाही समावेश आहे. आपल्यापाशी वाङ्मयीन गुणवत्ता नाही, ह्याची जाणीव व्हिट्रूव्हिअसने ह्या ग्रंथात व्यक्त केली आहेच परंतु ह्या ग्रंथात प्रभाव प्रबोधनकालीन वास्तुकलातत्त्वांवर पडला, ही बाब महत्त्वपूर्ण आहे. 


इतिहासाच्या क्षेत्रात लिव्ही याने १४२ खंडांत लिहिलेला रोमचा प्रचंड इतिहास निर्देशनीय आहे. ह्या इतिहासग्रंथाच्या आरंभीच लिव्हीने आपल्या ग्रंथरचनेचा उद्देश स्पष्ट केला आहे. जगातील अग्रगणय राष्ट्राच्या-रोमच्या -कर्तृत्वाचा गौरव करणे, रोमला ज्यांच्यामुळे थोरवी प्राप्त झाली त्या व्यक्तींचे व जीवनमार्गाचे वर्णन करणे, हा तर ह्या ग्रंथाच्या लेखनामागील एक उद्देश आहेच परंतु त्याच्या इतिहासलेखनामागे नैतिकतेची एक प्रगल्भ बैठकही आहे. गेयस असिनिअस पॉलिओ (इ.स.पू.७६- इ.स.५) आणि पाँपीअस त्रोगस ह्यांनी लिहिलेले इतिहासग्रंथ आज उपलब्ध नाहीत. पॉलिओने इ.स.पू. ६० ते इ. स. पू. ४२ पर्यंतच्या (फिलिप्पीच्या युद्धापर्यंतच्या) यादवी युद्धांचा इतिहास लिहिला होता, तर त्रोगसने ४४ खंडांत जगाचा इतिहास लिहिला होता. ह्या कालखंडात, सम्राटसत्तेच्या वातावरणामुळे वक्तृत्त्वकलेला उत्तेजक असे वातावरण फारसे राहिलेले नव्हते. त्या कलेचे व्यावहारिक महत्त्वही कमी झालेले होते आणि तिला एक प्रकारचे प्रदर्शनी रूपही येऊ लागले होते.

रौप्ययुग(इ. स. १४-११७) : इ. स. १४ मध्ये सम्राट ऑगस्टस मृत्यू पावला. त्या घटनेपासून सम्राट एड्रिअनच्या कारकीर्दीच्या आरंभापर्यंतचा काळ लॅटिन साहित्याच्या इतिहासातील रौप्ययुग म्हणून ओळखला जातो. ऑगस्टन कालखंडाच्या, म्हणजेच लॅटिन साहित्यातील सुवर्णयुगाच्या अस्ताबरोबरच एकूण लॅटिन साहित्यातील एक पर्व संपले, असे म्हणावयास हरकत नाही. ग्रीक साहित्यप्रकार आत्मसात करण्याची, तसेच आविष्काराच्या वैशिष्ट्यपूर्ण रोमन रीती निर्माण करण्याची प्रक्रिया ह्या कालखंडात हळूहळू पुढे जात राहिली. रौप्ययुगाच्या आरंभी मात्र व्हर्जिल, हॉरिस, ऑव्हिड, सॅलस्ट, लिव्ही हे आता अनुकरणीय असे अभिजात आदर्श बनले. लॅटिन साहित्याचा लॅटिन साहित्य म्हणून एक स्वाभाविक प्रवास सुरू झाला. परंतु ऑगस्टन कालखंडातली परिस्थिती आता लक्षणीयपणे पालटली होती. त्या कालखंडातल्या साहित्यिकांपाशी असलेला आशावाद ह्या रौप्ययुगातील वाङ्मयीन वातावरणात दिसून येत नव्हता. मिसीनससारखे वाङ्मयप्रेमी आश्रयदाते आता उरले नव्हतेच परंतु राजकीय सत्तेच्या केंद्रीकरणाबरोबर वाङ्मयाला अभ्यवेक्षणाला (सेन्सॉरशिप) तोंड द्यावे लागले. मुक्त वत्कृत्वाला वावच राहिला नाही. संशयाचे आणि दडपणुकीचे वातावरण तयार झाले. श्रीमंतांचा एक नवा वर्ग तयार झाला आणि त्याचे वर्चस्व वाङ्मयाला मोकळा बहर येण्याच्या दृष्टीने प्रतिकूल ठरले. साहित्यकृतींत भव्य विषयांचा अभाव दिसू लागला. तंत्रकौशल्य मात्र होते.

मुक्त वक्तृत्वाला प्रतिकूल असलेल्या ह्या कालखंडातही ⇨मार्कस फेबिअस क्विंटिल्यन (३५-१००) ह्याने दोन वर्षे परिश्रम करून Institutio Oratoria (९५, इं.शी. द ट्रेनिंग ऑफ ॲन ऑरटर) हा वक्तृत्वशास्त्रावरील जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. स्फूर्तीसाठी आणि शैलीसाठी त्याने सिसरोचा आदर्श मानला. क्विंटिल्यनला सम्राट डोमिशनची (५१-९६) स्तुती करावी लागली होती, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. वक्तृत्वकलेच्या ऱ्हासाची जाणीव त्याला होती, हे त्याच्या De Causis Corruptae Eloquentiae ह्या त्याच विषयावर लिहिलेल्या ग्रंथावरून (आज अनुपलब्ध) लक्षात येते.

ऑगस्टन कालखंड आणि रौप्ययुग ह्यांच्या संक्रमणकाळातील साहित्यिकांत मार्कस मनिलिअस आणि⇨फीड्रस (इ. स. पू. सु. १५- इ. स. सु. ५४) ह्यांचा उल्लेख करता येईल. मनिलिअसविषयी फारशी माहिती मिळत नाही. परंतु Astronomica ह्या त्याच्या काव्यग्रंथातील उल्लेखांवरून ऑगस्टस आणि टायबीअरियस ह्या दोन्ही सम्राटांच्या कारकीर्दीत तो हयात असावा, असे दिसते. Astronomica हे फलज्योतिषविषयक महाकाव्य त्याने लिहिले. त्याचे पाच भाग असून पाचवा अपूर्ण राहिल्याचे दिसते. मनिलिअसच्या ह्या काव्यग्रंथात काव्यरचनातंत्राचे कौशल्य दिसत असले, तरी काव्यगुण फारसे नाहीत. फीड्रसने मात्र आपल्या बोधकथालेखनाने लॅटिन साहित्यात बोधकथा ह्या साहित्यप्रकाराला एक स्वतंत्र स्थान प्राप्त करून दिले, असे दिसते. इसापच्या कथांना त्याने लॅटिन रूप दिले. त्याचप्रमाणे स्वतःही काही स्वतंत्र बोधकथा रचिल्या. तत्कालीन सामाजिक-राजकीय जीवनातील काही अपप्रवृत्तींवर आपल्या बोधकथांतून त्याने उपरोधप्रचुर टीका केलेली आहे.

 

व्हेलीयस पटरक्युलस हाही ऑगस्टस आणि टायबीअरियस ह्या दोन्ही सम्राटांच्या कारकीर्दीत आपले जीवन जगला होता. त्याने रोमचा इतिहास लिहिला. हा दोन भागांत रचिलेला गद्यग्रंथ आहे पण तो लिहीत असताना पक्षपाती वृत्तीचा त्याग त्याला करता आलेला नाही आणि सम्राट टायबीअरिसवरील एक प्रशंसापर ग्रंथ, असे त्याचे एकूण स्वरूप दिसते. परंतु ह्या इतिहासग्रंथात त्याने लॅटिन साहित्याविषयीही लिहिले आहे, त्याच्या ऱ्हासाची चर्चा केली आहे. ऑगस्टन कालखंडातील साहित्यिकांनी वाङ्मयीन गुणवत्तेचे पूर्णत्व गाठल्यामुळे उत्तरकालीन लेखकांना नैराश्य आले, असा सूर त्याच्या विवेचनात आढळतो. Facta et Dicta Memorabilia (इं.शी. मेमरेबल डीड्स अँड सेइंग्ज) हा नऊ खंडीय दंतकथासंग्रह लिहिणाऱ्या व्हालीरिअस मॅक्सिमसची फारशी माहिती मिळत नाही. परंतु तो सम्राट टाबीअरियसच्या काळात होऊन गेला, असे दिसते. ह्या दंतकथाविषयवार मांडलेल्या आहेत. उदा., धर्म, शकुन, सामाजिक, रीती, सद्गुणी वर्तन इत्यादी. टायबीअरियसची स्तुती त्यानेही केली आहे. साहित्य म्हणून ह्या संग्रहाला फारसे महत्त्व नाहीच पण रोमच्या सामाजिक इतिहासावर हा ग्रंथ काही प्रकाश टाकतो. कॉर्नीलिअस सेल्सस हाही सम्राट टायबीअरियसच्या कारकीर्दीतला लेखक. त्याने कृषी, युद्धकला, वक्तृत्व, कायदा, तत्त्वज्ञान, वैद्यक अशा विविध विषयांवर लेखन केले. त्याच्या एकूण ग्रंथांपैकी वैद्यकावरील आठ भाग-Demedicina-उपलब्ध आहेत. हिपॉक्राटीझ आणि अन्य काही ग्रीक लेखकांच्या लेखनाधारे हे आठ भाग लिहिलेले दिसतात. तथापि कॉर्नीलिअसच्या काळातील वैद्यकीय उपचारपद्धतीचे विवेचनही ह्यात केलेले आहे. ल्यूशस अनीअस सेनिकाने (इ. स. पू. सु. ५५- इ. स. ३७, थोरला सेनिका म्हणून ओळखला जाणारा) वक्तृत्वशास्त्राचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने काही परिकल्पित न्यायालयीन प्रकरणे आपल्या Controversiae ह्या ग्रंथात एकत्र केली तसेच Suasoriae ह्या ग्रंथात काही परिकल्पित प्रसंग मांडले. त्यांपैकी पहिला ग्रंथ चर्चांच्या स्वरूपात आहे, तर दुसरा एकभाषितांच्या (मॉनलॉग्ज).

थोरल्या सेनिकाचा पुत्र⇨ल्यूशस अनीअस सेनिका ऊर्फ धाकटा सेनिका (इ. स. पू. ४-इ. स. ६५) हा तत्त्वज्ञ आणि नाटककार. त्याने विपुल लेखन केले आहे. त्याच्या उपलब्ध ग्रंथांखेरीज त्याने भूगोल, निसर्गेतिहास, नीतिशास्त्र आणि अन्य विषयांवर लिहिलेल्या ग्रंथांचे अंश आणि काही नुसतीच शीर्षकेही आपणास पहायला मिळतात. त्याच्या उपलब्ध गद्यग्रंथांत त्याच्या बारा ग्रंथांच्या समूहाचा Dialogi (इं.शी. डायलॉग्ज) अंतर्भाव होतो. ‘डायलॉग्ज’ असे नाव असले, तरी ह्या ग्रंथांचे स्वरूप संवादांचे म्हणता येण्यासारखे नाही. सेनिकाच्या तात्त्विक समजल्या जाणाऱ्या लेखनात फारशी मौलिकता वा सखोलता नाही जीवनाच्या व्यावहारिक मर्यादा आणि मानवी स्वभावातील दोष ह्यांचे आकलन मात्र त्यांतून दिसून येते.

Naturales Quaestiones (इं.शीं. नॅचरल क्वेश्चन्स) हा त्याचा एक सात ग्रंथांचा समूह. निसर्गातील घटनांची चिकित्सा स्टोइक मताच्या दृष्टिकोनातून करण्याचा प्रयत्न त्यांतून दिसून येतो. De Clementia आणि De Beneficiis ह्या ग्रंथांचे स्वरूप नैतिक उद्बोधनाचे आहे. त्याची १२४ पत्रेही उपलब्ध असून जीवनाच्या विविध पैलूंवरील नैतिक भाष्य त्यांत आढळून येते.

परंपरेने धाकट्या सेनिकाच्या नावावर मोडणाऱ्या दहा शोकात्मिकांपैकी Octavia ही अन्य कोणा लेखकाने लिहिलेली असावी, असे अभ्यासकांचे मत आहे. ग्रीक शोकात्मिकांच्या आधारे धाकट्या सेनिकाने आपल्या शोकात्मिका लिहिल्या आहेत. ह्या शोकात्मिका मुख्यतः वाचनासाठी लिहिल्या गेल्या असल्या, तरी त्यांचा प्रभाव एलिझाबेदन नाट्यकृतींवर-विशेषतः शेक्सपिअरवर-पडलेला दिसतो. Apocolocyntosis हे एक विनोदी नाटकही त्याने लिहिले.

ह्या कालखंडातील विशेष कर्तृत्ववान साहित्यिकांत ⇨कॉर्नीलिअस टॅसिटस (सु.५५-१२०) ह्या इतिहासकाराचा समावेश होतो. Historiae ह्या त्याच्या ग्रंथात त्याने समकालीन इतिहास नोंदला (६९ ते रोमन सम्राट डोमिशन ह्याच्या मृत्यूपर्यंतचा-९६). ह्या ग्रंथापाठोपाठ त्याने Annales हा इतिहासग्रंथ लिहून त्यात रोमन सम्राट टायबीअरियसपासून सम्राट नीरोपर्यंतचा इतिहास सांगितला आहे. आपल्या काळातील महत्त्वाचे प्रश्न व व्यक्ती ह्यांचा विचार त्याने सूक्ष्म अंतर्दृष्टी ठेवून केलेला दिसतो. विषय वेधकपणे मांडण्याची त्याची ताकदही ह्या इतिहासग्रंथातून प्रत्ययास येते. आपल्या ग्रंथांतून रोमन सम्राटांच्या दोषांवर त्याने आघात केले. टायबीअरियसवर त्याचा विशेष रोख दिसून येतो. जर्मानिया ह्या आपल्या जर्मनीविषयक ग्रंथात जर्मनीची भौगोलिक व प्राकृतिक वैशिष्ट्ये, राजकीय- सामाजिक प्रथा व रीती, तेथील लष्करव्यवस्था, धर्म इत्यादींची माहिती त्याने दिली आहे. कर्शिअस रूफस ह्याने अलेक्झांडर द ग्रेटवर दहा खंडांचा ग्रंथ लिहिला. त्यातील पहिले दोन खंड उपलब्ध नाहीत. ह्यात चिकित्सेचा अभाव दिसून येतो. ⇨ थोरल्या प्लिनीने (२३ किंवा २४-७९) युद्धशास्त्र, वक्तृत्व, व्याकरण, इतिहास अशा विषयांवरील ग्रंथलेखन केले होते. आज ते उपलब्ध नाही परंतु Naturalis Historia (३७ खंड, इं.शी. नॅचरल हिस्टरी) हा त्याचा महाग्रंथ मात्र आजही उपलब्ध आहे. इ.स.७७ मध्ये ह्या ग्रंथाचे लेखन पूर्ण झाले. तथापि त्याचा  बराचसा भाग त्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला. शंभर वेचक ग्रंथकारांच्या एकूण दोन हजार ग्रंथांच्या आधारे थोरल्या प्लिनीने ह्या गंथाची रचना केली, असे दिसते. ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्याने ह्या ग्रंथकारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘नॅचरल हिस्टरी’ मध्ये गणिताच्या आणि भौतिकीच्या दृष्टीने केलेले विश्ववर्णन, भूगोल, मानवजातिवर्णन, मानवी शरीर, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, कृषी, वैद्यकविषयक माहिती, खनिजविज्ञान अशा विषयांची माहिती त्याने दिली आहे. खनिजविज्ञानाबद्दल लिहिताना जीवन आणि कला ह्यांच्या संदर्भातील त्याच्या प्रयुक्त (अल्पाइड) स्वरूपाबद्दल त्याने विशेषत्वाने लिहिले आहे. प्राचीन कलेच्या इतिहासाच्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा आहे. उदा., ब्राँझपासून केली जाणारी मूर्तिनिर्मिती, चांदीवरील उत्कीर्णन आणि उठावरेखन, संगमरवरी शिल्पे, चित्रकला, हिरे ह्यांच्याबद्दलही त्याने लिहिले. कलावंत आणि कलाकृती ह्यांची सूचीही त्याने दिली आहे.

प्लिनीच्या ह्या ग्रंथात चुका आहेतच. अनेक ठिकाणी सखोलतेचा आणि वैज्ञानिक दृष्टीचा अभाव जाणवतो. त्याने दिलेल्या विविध सूची ह्या शुष्क, कंटाळवाण्या वाटतात, तरीही अपार कष्ट घेऊन त्याने लिहिलेल्या ह्या प्रचंड ग्रंथात स्वारस्य निर्माण करणारीही बरीच माहिती आढळते. त्याच्या काळातल्या संस्कृतीविषयीही बरीच माहिती प्लिनी आपल्याला देतो. पाँपोनिअस मीला (पहिले शतक) ह्याने Chorographia अथवा De Situ orbis हा आपला भूगोलविषयक ग्रंथ तीन खंडांत लिहिला. पृथ्वी तसेच यूरोप, आशिया आणि आफ्रिका ही खंडे ह्यांचे संक्षिप्त वर्णन केल्यानंतर भूमध्य समुद्राभोवतालच्या देशांबद्दल त्याने अधिक तपशीलवार लिहिले आहे. भारत आणि पर्शियन गल्फ ह्यांच्याविषयीही त्याने लिहिले आहे. त्या त्या देशातील चालीरीती, निसर्ग इत्यादींची माहिती तो आपल्या जिवंत शैलीत देतो. कॉल्युमेला (पूर्ण नाव ल्यूशस जून्यस मॉडरेटस-पहिले शतक) ह्याने आपल्या Dere Rustica (बारा खंड, सु. ६५) ह्या कृषिविषयक ग्रंथात कृषिजीवनाची विविध अंगे शब्दरूप केली आहेत. बागांविषयीही त्यात माहिती आहे. त्याच्या ग्रंथातून एक प्रकारच्या प्रसन्न नम्रतेचा आणि साधेपणाचा प्रत्यय येतो. कृषी आणि कष्टाळूपणा ह्यांविषयीचा खोल आदर त्याने व्यक्तविला आहे. व्हर्जिलची वचने त्याने अनेकदा उद्धृत केली आहेत. त्याची शैली साधी असूनही तिच्यात एक प्रकारचा वजनदारपणा आहे. सेक्स्टस जूल्यस फ्राँटायनसचे (सु. ४०-१०३) दोन ग्रंथ मिळतात : Strategemata (इं. शी. स्ट्रॅटगिम, ३ भाग) आणि De aquae ductu किंवा De aquis urbis Romae हा. फ्राँटायनसने युद्धशास्त्रावर एक ग्रंथ लिहिला होता (तो आज अनुपलब्ध). त्याच्या पुढचा भाग म्हणून त्याने ‘स्ट्रॅटगिम’ हा ग्रंथ लिहिला.

युद्धापूर्वी तसेच प्रत्यक्ष युद्धात कोणते डावपेच लढवायचे ह्याचे विवेचन त्याने रोमच्या आणि अन्य काही देशांच्या सैनिकी इतिहासाच्या आधारे केले आहे. सैन्याच्या व्यवस्थापनाविषयीचा एक ग्रंथ ‘स्ट्रॅटगिम’चा चौथा भाग म्हणून दाखवला जातो. पण तो फ्राँटायनसचे अनुकरण करून कोणी अन्य लेखकाने लिहिला असावा. De aquae… मध्ये त्याने रोममधील जलनलिकांची माहिती (ह्या जलनलिकांचा इतिहास, त्यांची लांबी, उंची, क्षमता इत्यादी) दिली आहे. प्राचीन रोममध्ये सार्वजनिक हिताची जी कामे करण्यात आली होती, त्यांत रोमच्या पाणीपुरवठ्यासाठी असलेली जलनलिकांची व्यवस्था फार महत्त्वाची आहे. फ्राँटायनसने दिलेल्या आकडेवारीवरून असे दिसून येते, की चोवीस तासांच्या कालावधीत किमान २२२ दशलक्ष गॅलन पाणीपुरवठ्याची क्षमता ह्या जलनलिकांमध्ये होती. गेयस प्लिनिअस सिसिलिअस सिकंदस ऊर्फ ⇨धाकटा प्लिनी (६१ किंवा ६२-सु.११३) हा आधी उल्लेखिलेल्या क्विंटिल्यन याचा शिष्य. आपल्या पत्रांच्या रूपाने (दहा खंड) त्याने आपला वाङ्मयीन वारसा पुढील पिढ्यांसाठी ठेवला. सामाजिक, राजकीय, वाङ्मयीन असे विविध विषय त्याच्या पत्रांतून आलेले आहेत. अनेकदा एखाद्या समस्येच्या अनुषंगाने केलेली नैतिक स्वरूपाची चर्चाही तो करतो. काळजीपूर्वक लिहिलेल्या ह्या पत्रांत त्या त्या विषयाला अनुरूप अशा शैलीचे भान त्याने ठेवलेले आहे. ही पत्रे आपल्याला प्रसिद्ध करावयाची आहेत. ही जाणीवही त्याने पत्रे लिहिताना ठेवल्याचे दिसते. 


ह्या कालखंडातील कवींत ⇨जूव्हेनल (सु. ६०-१२७ नंतर) आणि ⇨मार्शल (सु.४०-सु.१०३) हे विशेष उल्लेखनीय होत. जूव्हेनलने लिहिलेल्या सोळा उपरोधिकांतून तत्कालीन रोमन जीवनातील विविध अपप्रवृत्तींचा आणि विसंगतींचा त्याने तीव्र उपहास केलेला आहे. आपण पूर्वकालीन रोमन जीवनाविषयी लिहीत आहोत, अशी भूमिका त्याने घेतली आहे. तथापि पूर्वकालीन रोमन जीवनातले दोष त्याला त्याच्या समकालीन रोमनांमध्येही दिसत होतेच. मोजक्या शब्दांतून रोमन जीवनाची प्रत्ययकारी लघुचित्रे उभी करण्याचे त्याचे सामर्थ्य त्याच्या उपरोधिकांतून अनुभवास येते. मार्शलची कीर्ती ‘एपिग्राम’ ह्या काव्यप्रकारात मोडणाऱ्या त्याच्या कवितांवर अधिष्ठित आहे. रोमममधील विविध वृत्तिप्रवृत्तींच्या माणसांची अतिशय वास्तववादी चित्रे तो आपल्या कवितांतून रेखाटतो. सरळ, साधी पण सफाईदार आणि प्रत्ययकारी अशी त्याची काव्यशैली आहे.

ल्यूकन (३९-६५) ह्याचे फार्सालिया (दहा सर्ग) हे महाकाव्य श्रेष्ठ गणले जाते. सीझर आणि पाँपी ह्यांच्याधील युद्ध, हा ह्या महाकाव्याचा विषय. ह्या महाकाव्यात काही दोष असले, तरी ल्यूकनच्या प्रतिभेचा तल्लखपणा आणि जोम अनेकदा प्रत्ययास येतो.

अन्य कवींत व्हालीअरिअस फ्लॅकस (पहिले शतक), ⇨पब्लिअस पापिनिअस स्टेशिअस (सु.४०-सु.९६) आणि सिलिअस इटॅलिकस (२५ किंवा २६-१०१) ह्यांचा समावेश होतो. फ्लॅकसने आर्गोनाउटिका हे महाकाव्य लिहिले. ग्रीक कवी ॲपोलोनियस रोडियस ह्याने ह्याच नावाचे महाकाव्य रचले होते आणि आपले महाकाव्य रचताना फ्लॅकसने ते ग्रीक महाकाव्य समोर ठेवल्याचे दिसते. होमरकृत ओडिसी आणि व्हर्जिलचे ईनिड ह्या महाकाव्यांचा प्रभावही फ्लॅकसवर असल्याचे जाणवते. पूर्णतः स्वकल्पनानिर्मिती असाही काही भाग त्याच्या ह्या महाकाव्यात आहे. ह्या महाकाव्याचे आठ सर्ग त्याने लिहिले आणि त्याच्या मृत्यूमुळे हे महाकाव्य अपूर्ण राहिले. Thebaid (१२ सर्ग) आणि Achilleid ही स्टेशिअसची दोन महाकाव्ये. ईडिपसचा पुत्र पॉलिनायसीझ ह्याने आपला भाऊ एटिओक्लीझ ह्याच्याकडून सिंहासन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला पाठिंबा म्हणून पॉलिनायसीझसह सात जणांनी हाती घेतलेली थीब्झविरुद्धची मोहीम हा पहिल्या महाकाव्याचा विषय, तर ट्रोजन युद्धातला प्रमुख वीर आकिलीझ ह्याच्या कथेवर दुसरे महाकाव्य आधारलेले आहे. ह्या महाकाव्याचा पहिला सर्ग आणि दुसऱ्याचा काही भागच स्टेशिअस लिहू शकला. Silvae हा त्याच्या कवितांचा संग्रह. हॉरिस व त्याच्या संप्रदायातील उत्तरकालीन कवी ह्यांचा प्रभाव ह्या कवितांवर दिसून येतो. सिलीअस इटॅलिकस हा त्याच्या प्यूनिका (१७ सर्ग) ह्या महाकाव्यासाठी प्रसिद्ध आहे. दुसरे प्यूनिक युद्ध हा ह्या महाकाव्याचा विषय. मार्शलने ह्या महाकाव्याची मोठी प्रशंसा केली होती पण ह्या महाकाव्यात प्रतिमेपेक्षा परिश्रमांचाच प्रत्यय अधिक येतो, असे मत धाकट्या प्लिनीने व्यक्त केले आहे. आजही हा ग्रंथ वाङ्‌मयीन दृष्ट्या नीरस आणि निःसत्त्वच वाटतो.

कॅल्परनिअस सिक्यूलस (पहिले शतक) हा रोमन गोपकवी. त्याच्या नावावर अकरा गोपकविता (एक्लॉग्ज) मोडतात. त्यांपैकी अखेरच्या चार कोणा उत्तरकालीन कवीने रचल्या असाव्यात. कॅल्परनिअसच्या गोपकवितांवर व्हर्जिलचा प्रभाव जाणवतो. 

पिकरेस्क स्वरूपाची म्हणता येईल अशी एक कादंबरी Satyricon ह्या कालखंडात लिहिली गेल्याचे दिसते. ⇨ पित्रोनिअस आर्बिटर (मृ.६६) हा ह्या कादंबरीचा लेखक मानला जातो. ही मुख्यतः गद्य असून तीत अधूनमधून पद्याचाही उपयोग केलेला आहे. होमरच्या ओडिसीचे विडंबन करण्याचा प्रयत्नही तीत दिसून येतो. ही कांदबरी त्रुटित स्वरूपातच उपलब्ध आहे. 

ऑलस फ्लॅकस पर्सिअस (३४-६२) ह्याने लिहिलेल्या सहा पद्य उपरोधिका आज उपलब्ध आहेत. त्यांना उपरोधिका म्हटले जात असले, तरी त्यांतील पहिल्या पद्यरचनेचा अपवाद वगळता, अन्य पद्यरचना स्टोइक पंथाचे नैतिक तत्त्वज्ञान सांगण्यासाठी केलेल्या आहेत. ⇨ स्विटोनिअस (सु.७०-सु. १६०) ह्याने De Vita Caesarum ह्या नावाने लिहिलेली चरित्रे उल्लेखनीय आहेत. ह्या चरित्रांत जूलिअस सीझरच्या तसेच ऑगस्टसपासून डोमिशनपर्यंतच्या रोमन सम्राटांच्या चरित्रांचा अंतर्भाव होतो.

उत्तरकालीन साहित्य(इ. स. ११७ नंतरचे) : रोमन सम्राट एड्रिअन (कार.११७-३८) ह्याच्या कारकीर्दीबरोबर समृद्धीवर आधारलेल्या एका नव्या सांस्कृतिक पर्वाचा आरंभ झाला. एड्रिअननंतर सम्राटपदी आलेल्या कॅराकॅला (खरे नाव मार्कस ऑरीलिअस अँटोनायनस-कार. २११-१७) ह्या एका रोमन सम्राटाने रोमन साम्राज्यातील गुलाम सोडून सर्वांना नागरिकत्व दिले (२१२). ११७ नंतरच्या काळात रोममधील वाङ्मयीन संस्कृतीचे क्षेत्र अधिक विस्तृत झाले. तथापि उत्तुंग वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा एकही साहित्यिक निर्माण झाला नाही, हेही नमूद करावे लागेल. उत्तरकालीन रोमन साहित्यिकांनी ऑगस्टन कालखंडाच्या आरंभीच्या, तसेच रोमन प्रजासत्ताकाच्या काळातील साहित्यिकांकडून स्फूर्ती घेतली त्यांना आदर्श मानले. आपल्या नजीकच्या भूतकाळातील-इसवी सनाच्या पहिल्या शतकातील-साहित्याने ते फारसे प्रभावित झाले नाहीत, असे दिसते. प्राचीन ग्रीक साहित्य हे रोमन साहित्यावर पुन्हा आपला प्रभाव गाजवू लागले होते, हे ह्या वस्तुस्थितीमागचे एक कारण होय. दायो कॅशिअस किंवा दायॉन कॅशिअस (कॉक्सियेनस ह्या नावानेही प्रसिद्ध-सु. १५० -२३५) ह्याने आपला रोमन इतिहासावरील ८० खंडांचा ग्रंथ ग्रीक भाषेत लिहिला (आज उपलब्ध असलेले खंड फक्त २६). रोमन चरित्रकार व इतिहासकार स्विटोनिअस, रोमन विधिज्ञ आणि व्यासंगी फ्राँटो (दुसरे शतक), रोमन सम्राट मार्कस ऑरिलिअस (मूळ नाव मार्कस ॲनिअस व्हीरस-कार.१६१-८०), रोमन तत्त्वज्ञ व वक्तृत्वशास्त्रवेत्ता ॲप्युलीयस (दुसरे शतक) ह्यांनी लॅटिन आणि ग्रीक अशा दोन्ही भाषांत लेखन केले.

स्विटोनिअसने लिहिलेल्या चरित्रांचा उल्लेख ह्यापूर्वी येऊन गेलेला आहेच. सु.७० ते सु. १६० असा जीवनावधी लाभलेला स्विटोनिअस, लॅटिन साहित्याचे रौप्ययुग आणि हा उत्तरकालीन साहित्याचा काळ अशा दोन्ही कालखंडांत समाविष्ट होणारा आहे. फ्राँटो ह्याने मार्कस ऑरीलिअसला लिहिलेली काही पत्रे (काही ग्रीक भाषेत) उपलब्ध आहेत. साहित्य, वक्तृत्व, शब्दांचा अभ्यास असे विषय त्याच्या पत्रांतून येतात. केटो, व्हॅरो, एनिअस ह्यासांरख्या रोमन साहित्यिकांच्या  शैलीचा आदर्श जोपासला पाहिजे, असे त्याचे मत होते. फ्राँटोच्या शैलीविषयक विचारांचा लॅटिन लेखनावर मोठा प्रभाव पडला. ॲप्युलीअसची कीर्ती त्याच्या मेटॅमॉर्फसिस (‘द गोल्डन ॲस’ ह्या इंग्रजी नावानेही प्रसिद्ध) ह्या रोमान्सवर अधिष्ठित आहे. अकरा भागांतील ह्या रोमान्समध्ये ल्यूशस नावाच्या एका तरुणाची कहाणी सांगितलेली आहे. एका अभिमंत्रित मलमामुळे त्याचे एका गाढवात रूपांतर होते. पुढे तो अनेक प्रसंगांतून जातो आणि अखेरीस त्याला त्याचे मनुष्यरूप एकदाचे प्राप्त होते, अशी ही कथा. इसिस ह्या ईजिप्शियन देवतेच्या अनुग्रहाने हे मनुष्यरूप त्याला लाभते आणि त्यामुळे तो ह्या देवतेचा भक्त बनतो. काहींना ह्या कथेत गूढार्थ जाणवलेला आहे (आत्म्याचा अधःपात आणि त्यातून पुढे त्याची सुटका). पौर्वात्य धर्मांमध्ये ॲप्युलीअसला असलेले स्वारस्यही ह्या रोमान्समधून दिसते. ह्या रोमान्समध्ये क्यूपिड आणि सायकी ह्यांची एक सुंदर कथा आलेली आहे. ॲप्युलीअसची शैली जिवंत, चित्रमय अशी आहे. निवेदनाच्या ओघात तो अनेक वास्तववादी तपशील मांडत जातो आणि ते त्याच्या काळातील लोकजीवनावर प्रकाश टाकतात. ⇨फ्लोरस ह्या इतिहासकाराने रोमन इतिहासकार लिव्हीकृत रोमच्या इतिहासग्रंथावर मुख्यतः आधारित असलेला आपला Epliomae de Tito Livio Bellorum Omnium Annorum DCC Libri II(दोन खंड) हा ग्रंथ लिहिला. रोम्यूलसपासून रोमन सम्राट ऑगस्टसपर्यंतचा इतिहास ह्या ग्रंथात दिलेला आहे. Vergilius orator an poeta हा संवाद लिहिणारा फ्लोरस हाच असावा, असे मत व्यक्त केले गेले आहे. ऑलस जेलिअस (बहुधा दुसरे शतक) ह्याच्यावर फ्राँटोचा प्रभाव दिसून येतो. अथेन्समध्ये तत्त्वज्ञानाच्या अध्ययनासाठी तो राहिला होता. Noctes Atticae (इं.शी. ॲटिक नाइट्स) ह्या नावाने प्रसिद्ध असलेले त्याचे निबंध त्याने अथेन्समध्ये असतानाच लिहावसाय सुरुवात केली. ह्या निबंधांच्या वीस खंडांपैकी आठवा सोडून अन्य खंड उपलब्ध आहेत. भाषा, व्याकरण, पाठचिकित्सा, तत्त्वज्ञान असे विविध विषय ह्या निबंधांतून आलेले आहेत. जेलिअसची भाषा, काहीशी आर्ष वाटते.

कवितेच्या क्षेत्रात समकालीन ग्रीक तंत्राचा अवलंबे करण्यात आला. लघुरूपावर भर असलेले काव्यप्रकार (मिनिअचर फॉर्म्स) कवींना विशेष आकर्षून घेऊ लागले. ॲल्फिअस ॲव्हिटस ह्या एका महत्त्वाकांक्षी कवीने मात्र संपूर्ण रोमन इतिहास आयँबिक छंदात रचिलेला दिसतो. 

रोमन सम्राट एड्रिअन ह्याच्या कारकीर्दीबरोबरच रोमन न्यायशास्त्राचा महान कालखंड सुरू झालेला दिसतो. न्याशास्त्रावरील लक्षणीय ग्रंथलेखन ह्या कालखंडात झाले.

मार्कस ऑरीलिअस (कार.१६१-८०) ह्याच्या Eis heauton (इं.शी. मेडिटेशन्स) ह्या ग्रीक भाषेत लिहिलेल्या ग्रंथातून उत्तम आत्मपरीक्षणात्मक लेखनाची प्रचीती येते.

इसवी सनाचे दुसरे शतक संपल्यानंतर लॅटिन साहित्यात ख्रिस्ती धर्माचा प्रवेश झाला. रोमन साम्राज्याच्या ग्रीक भाषिक पूर्व भागात ख्रिस्ती धर्म आधी पसरला आणि सांस्कृतिक जीवनात समरसला. इटली, गॉल व आफ्रिका येथेही तिसऱ्या शतकापर्यंत चर्चची भाषा ग्रीक होती. साम्राज्याचा पश्चिम भाग लॅटिन भाषिक होता. पश्चिमेकडील शहरांत ख्रिस्ती धर्म आधी पसरला तो ग्रीक भाषिक लोकांतच. सामाजिक-आर्थिक दृष्ट्या कनिष्ठ स्तरावर असलेले हे लोक होते. तथापि दुसऱ्या शतकात लॅटिन भाषेने पश्चिमेकडील चर्चची भाषा म्हणून मान्यता मिळविली. हे प्रथम आफ्रिकेत घडून आल्याचे दिसते. बायबलची अत्यंत जुनी अशी लॅटिन भाषांतरे आपल्याला आफ्रिकेत सापडतात. लॅटिन भाषेतील आरंभीचे मौलिक ख्रिस्ती साहित्यही आफ्रिकेतलेच. टर्टल्यन (सु.१६०-२३०) आणि सायप्रिअन (२००-५८) हे दोघेही कार्थेजचे. ख्रिस्ती-लॅटिन साहित्य निर्माण करणाऱ्या  आरंभीच्या लेखकांपैकी हे होत. टर्टल्यनचे Apologeticum हे एक काल्पनिक न्यायालयीन भाषण आहे. ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केलेल्यांना रोमन प्रशासकांकडून संरक्षण मिळावे, ह्यासाठी त्याने वक्तृत्वपूर्ण भाषेत, अधूनमधून उपरोधाचा प्रभावी वापर करीत, त्या प्रशासकांना आवाहन केले आहे. ह्या भाषणाच्या अखेरीस ख्रिस्ती धर्मतत्त्वांचेही संक्षिप्त विवेचन आहे. सायप्रिअन हा कार्थेजचा बिशप होता. सायप्रिअन हा खूप व्यासंगी होता असे नव्हे. टर्टल्यनची बौद्धिक ताकदही त्याच्या ठायी नव्हती परंतु त्याच्या लेखनातून प्रतिबिंबित होणारे त्याचे व्यक्तिमत्त्व एका सुसंस्कृत आणि शांतताप्रिय माणसाचे आहे.

सायप्रिअनशी संबंधित अशी- म्हणजे काही इतरांनी त्याला लिहिलेली आणि काही त्याने इतरांना लिहिलेली- ८१ पत्रे आज उपलब्ध आहेत आणि ती इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. उपदेशात्मक स्वरूपाचे लेखन त्याने विपुल केले. 

मिन्यूशिअस फीलिक्स (बहुधा दुसरे-तिसरे शतक) हाही आरंभीच्या ख्रिस्ती-लॅटिन लेखकांपैकी एक. त्याने Octavius ह्या नावाने एक संवाद लिहिला आहे. तीन व्यक्तींच्या ह्या संवादातून पेगनांचे ख्रिस्ती धर्माविरुद्धचे आक्षेप आणि ख्रिस्ती धर्मीयांचे त्यांना उत्तर ह्यांचे दर्शन घडविले आहे. मिन्यूशिअसवर सिसरोचा प्रभाव दिसून येतो. सिसरोचा प्रभाव असलेले अनेक ख्रिस्ती-लॅटिन साहित्यिक होते. लॅकटॅन्शिअस (तिसरे-चौथे शतक) हा तर ख्रिस्ती सिसरो म्हणून मान्यता पावलेला आहे. Divinaruam institutionum (सात खंड) हा त्याचा प्रमुख ग्रंथ. ख्रिस्ती धर्म ही एक सुसंवादी आणि तर्कशुद्ध अशी व्यवस्था आहे, हा विचार त्यात प्रभावीपणे मांडलेला आहे. सेंट अँब्रोझच्या (सु. ३४०-९७) De officiis ministrorum ह्या ग्रंथात धर्मोपदेशकांची कर्तव्ये सांगण्यात आलेली असून सिसरोच्या De officiis ह्या ग्रंथाचा आदर्श त्याने समोर ठेवलेला दिसतो.

एक वाङ्‌मयीन भाषा म्हणून लॅटिन ही सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापरात असलेल्या भाषेपासून नेहमीच काही प्रमाणात वेगळी राहिली होती. ख्रिस्ती धर्माच्या प्रवेशानंतर ‘ख्रिस्ती-लॅटिन’ हा लॅटिन भाषेचा एक नवा आविष्कार अस्तित्वात आला. पश्चिमेकडील वाढत्या ख्रिस्ती जनांची ही भाषा होती ख्रिस्ती धर्मीयांच्या भाषिक गरजांनुसार काही नवे, वैविध्यपूर्ण शब्द ह्या भाषेत समाविष्ट झाले होते. वर उल्लेखिलेल्या टर्टल्यन, मिन्यूशिअस फीलिक्स, सायप्रिअन आणि लॅकटॅन्शिअस ह्यांच्या लेखनावर ख्रिस्ती-लॅटिनचा तसेच दैनंदिन व्यवहारात बोलल्या जाणाऱ्या लॅटिनचा प्रभाव कमीअधिक प्रमाणात दिसून येतो.

निरंकुश राजसत्ता प्राप्त झालेला रोमन सम्राट डायोक्लीशन (कार.२८४-३०५) आणि त्याच्या नंतर आलेले रोमन सम्राट ह्यांनी सांस्कृतिक जीवनाला एक नवी चेतना दिली. परंतु वाङ्मयीन परिस्थिती बदललेली होती. रोमन साम्राज्याच्या संदर्भात बोलावयाचे, तर पूर्व आणि पश्चिम ह्यांच्यातील दूरस्थपणा तिसऱ्या शतकात वाढत गेला होता. सम्राट डायोक्लीशन आणि सम्राट कॉन्स्टंटीन ह्यांनी पूर्वेकडील प्रदेशांवर लॅटिन संस्कृतीचे प्रतिरोपण करण्याचा प्रयत्न केला. उदा., डायोक्लीशनने लॅकटॅन्शिअस ह्याला, तो पेगन असताना, आफ्रिकेहून निकोमीडिया येथील आपल्या दरबारी बोलावून घेतले होते. तथापि दूरस्थ होण्याची ही प्रक्रिया थांबली नाही आणि ३९५ मध्ये रोमन साम्राज्याच्या झालेल्या फाळणीने ह्या दूरस्थपणावर शिक्कामोर्तब केले. रोमन साम्राज्य हे आता द्वैभाषिक राहिले नाही, तर ग्रीक आणि लॅटिन अशी त्याची भाषिक विभागणी झाली. पश्चिमेकडे ग्रीकचे ज्ञान काही छोट्या वर्तुळांमध्येच मर्यादित राहिले.

ह्याचा एक परिणाम असा झाला, की पश्चिमेकडे ग्रीक ग्रंथांचे अनेवाद मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. चौथ्या शतकात प्लेटो, ॲरिस्टॉटल, पॉर्फिरी ह्यांचे ग्रंथ अनुवादिले गेले. ख्रिस्ती साहित्यही अनुवादिले गेले. त्यात संतचरित्रे, बायबलविषयक लेखन, नीत्युपदेश ह्यांचा समावेश आहे. 


कवितेकडे पाहिले, तर ख्रिस्ती आणि पेगन ह्यांच्यातील अंतराय कमी होत गेलेला दिसतो. काव्यविषय ख्रिस्ती परंतु काव्यघाट अभिजात, असे दिसून येते. जूव्हेनकस ह्याच्या ‘बुक्स ऑफ द इव्हँजेलिस्ट्स’ (इं. शी.) ह्या महाकाव्याचे उदाहरण ह्या संदर्भात देता येईल. ख्रिस्ताच्या उदात्त कर्तृत्वाचे गौरवगीत गाणे हा ह्या महाकाव्यलेखनाचा हेतू असल्याचे जूव्हेनकस सांगतो. ⇨प्रूडेन्शिअस (३४८-४१०?)ह्यानेही अभिजात कवितेच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्मसिद्धांतांचा उद्घोष केला. सिड्यूलिअस (पाचवे शतक) ह्याचे Carmen Paschale (पाच भाग) हे काव्यही ह्या संदर्भात निर्देशनीय आहे. काही ख्रिस्ती कवींनी आपल्या लौकिक स्वरूपाच्या कवितांतून काव्यसंकेतांचा एक भाग म्हणून प्राचीन मिथ्यकथांचा उपयोग केलेला दिसतो. उदा., ऑसोनिअस (सु. ३१०-सु. ३९५). आयँबिक छंदात अँब्रोझने रचिलेली सुंदर स्तोत्रे ख्रिस्ती धर्मकवितेचे एक प्रातिनिधिक रूप म्हणून पाहता येतात. उत्तरकालातील मौखिक व्यवहारातल्या लॅटिनच्या रूपाशी सुसंगत असा एक नवा छंदही अस्तित्वात आला. ⇨सेंट ऑगस्टीनची (३५४-४३०) ‘ Psalmus contra Partem Donati’ ही कविता त्या संदर्भात उल्लेखनीय आहे. कोमोडिआनस ह्याच्या काव्यरचनेत नव्या-जुन्याचे एक चमत्कारिक मिश्रण आढळते. गद्यपद्यांच्या अभिजात रचनाप्रकारांशी जिवंत लॅटिन भाषेची फारकत झाली होती परंतु परंपरेने हे प्रकार जपून ठेवले ते अगदी आधुनिक काळापर्यंत.

ख्रिस्ती धर्म हा रोमन साम्राज्यात शिरून वाढत होता, तरी रोमन सम्राट जूलिअन (कार.३६१-३६३) ह्याने पेगनिझमचा जोरदार पुरस्कार केला होता. रोमन सिनेटला महत्त्व प्राप्त झाले होते आणि सिनेटला रोम शहराच्या भूतकालीन परंपरांचा अभिमान होता. ‘ ख्रिस्ती रोम’ ची फारशी दखल सिनेटच्या वर्तुळातील मंडळींनी घेतलेली नव्हती.

मॅक्रोबिअस थिओडोशिअस (सु. ४००) ह्याने लिहिलेला Saturnalia (सात खंड) हा ग्रंथ उपर्युक्त संदर्भात पाहण्यासारखा आहे. ह्या ग्रंथाच्या नावाचा एक उत्सव रोमन धर्मानुसार केला जाई. ह्या उत्सवाच्या प्रसंगी एकत्र आलेल्या प्रतिष्ठित रोमनांमधला संवाद, असे ह्या ग्रंथाचे स्वरूप आहे. ह्या मंडळीत त्या काळच्या सिनेटचे प्रमुख सदस्य-उदा., निकोमाकस फ्लेव्हिआनस, क्विंटस ऑरीलिअस सिमॅकस-ह्यांचा अंतर्भाव आहे. व्याकरणकार सर्व्हिअस हाही तेथे आहे. महाकवी व्हर्जिल हा ह्या संभाषणाचा विशेष विषय असला, तरी इतर अनेक विषय त्यात आलेले आहेत. उदा., प्राचीन धर्म, शब्दांच्या व्युत्पत्त्या, वैद्यक, शरीरशास्त्र, खगोलशास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी. परंतु इतक्या ह्या सर्व विषयांची चर्चा चालू असताना ख्रिस्ती धर्माबद्दल पूर्णपणे मौन पाळलेले दिसते आणि हा काही अपघात किंवा योगायोग नव्हे. ख्रिस्ती धर्माबद्दल अनुल्लेखाची भूमिका घेणे, हे पेगन मंडळींचे धोरण दिसते. मॅक्रोबिअस हा स्वतः पेगन असल्याचे त्याच्या ग्रंथांवरून दिसून येते. मॅक्रोबिअसने सिसरोच्या Somnium Scipionis (इं.शी. द ड्रीम ऑफ सिपिओ) वर भाष्यही लिहिले आहे.

इतिहासकार ॲमिएनस मार्सेलायनस (चौथे शतक) ह्याने इतिहासकार टॅसिटस ह्याने लिहिलेल्या रोमच्या इतिहासाचा पुढील भाग लिहिण्याच्या उद्देशाने आपला ३१ खंडांचा इतिहासग्रंथ लिहिला. ह्या महाग्रंथाचे १४ ते ३१ एवढेच खंड आज उपलब्ध असून त्यात ३५३ ते ३७८ पर्यंतचा कालखंड चित्रित केलेला आहे. अचूकपणा आणि सत्यप्रियता ह्यांचे इतिहासलेखनातील महत्त्व तो जाणून होता, हे त्याच्या इतिहासग्रंथातून दिसून येते. मार्सेलायनस हा पेगन असला, तरी ख्रिश्चनांचा छळ व्हावा, हे त्याला मान्य नव्हते. लॅटिन ही त्याची मातृभाषा नव्हती आणि ह्या बाबीचा परिणाम त्याच्या लेखनशैलीवर दिसून येतो.

सलपिशिअस सिव्हीरस (३६०?-४१०) हा ख्रिस्ती इतिहासकार. त्याने Charonica हा आपला इतिहासग्रंथ ४०३ मध्ये लिहिला. ओरोझिअस ह्या अन्य ख्रिस्ती इतिहासकाराने ४१७ मध्ये जगाचा इतिहास लिहिला. ख्रिस्ती धर्मश्रद्धा वाढीला लागावी, हा ह्या इतिहासलेखनामागचा त्याचा हेतू होता. युजिपिअसने Vita Sancti Severini (५११) हा संत सेव्हेरीनसंबंधीचा ग्रंथ लिहिला आणि ऐतिहासिक माहितीच्या दृष्टीने तो महत्त्वाचा मानला जातो.

ऑरीलिअस व्हिक्टर (चौथे शतक), युट्रोपिअस (चौथे शतक) व फ्लेव्हिअस व्हिजिशिअस रेनाटस (पाचवे शतक) हे अन्य काही उल्लेखनीय इतिहासकार.

इसवी सनाच्या तिसऱ्या-चौथ्या शतकांतले वक्तृत्वाचे जे नमुने आपल्याला लिखितस्वरूपात मिळतात, त्यांतले काही सांस्कृतिक इतिहासकारांच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटतात. शाळांच्या पुनर्रचनेच्या संदर्भात युमेनिअस (तिसरे शतक) ह्याने दिलेले एक भाषण त्या दृष्टीने निर्देशनीय आहे.

पत्रसंग्रहही भरपूर उपलब्ध आहेत. पूर्वी ज्याचा उल्लेख झाला आहे, तो सिमॅकस, त्याचप्रमाणे जेरोमी, ऑगस्टीन आणि पोप लीओ पहिला आदींची पत्रे त्यांत अंतर्भूत आहेत. Recognitiones ही एक ख्रिस्ती कादंबरी रूफिनसने लॅटिनमध्ये अनुवादिली. मध्ययुगात ट्रॉयची कथा प्रसृत झाली, ती क्रीटचा डिक्टिस (डिक्टिस क्रीटेन्सिस) आणि डेरीझ फ्रिजिअस ह्यांच्यामुळे. असे म्हणतात, की डिक्टिस क्रीटेन्सिस हा आयडोमीनिअसबरोबर (ही खरे ती ग्रीक मिथ्यकथांतील एक व्यक्तिरेखा) ट्रोजन युद्धावर गेला होता. तेथील घटनांची रोजनिशी त्याने फीनिशिअन भाषेत ठेविली होती  रोमन सम्राट नीरो ह्याच्या काळात ती ग्रीक भाषेत अनुवादिली गेली. पुढे क्विंटस सेप्टिमिअस (चौथे शतक) नावाच्या एका लेखकाने ह्या रोजनिशीचे पहिले पाच भाग लॅटिनमध्ये अनुवादिले आणि उरलेल्या चार भागांतील मजकूर एका भागात-पण लॅटिनमध्येच-आणला.

डेरीझ फ्रिजिअस हा एक कवी. ह्याने ट्रॉयचा वेढा ह्या विषयावर एक कविता लिहिली. ही कविता येथे उपलब्ध झाली, असे दिसते.  Daretis Phrygii de Excidio Historia ही पाचव्या शतकातील साहित्यकृती म्हणजे ह्या कवितेचे लॅटिन भाषांतर असल्याचे दिसते.

ईलिअस डोनेटस ह्याने दोन व्याकरणग्रंथ तसेच नाटककार टेरेन्स व महाकवी व्हर्जिल ह्यांच्यावर भाष्ये लिहिली. मध्ययुगात लॅटिन भाषा ज्यांच्या द्वारे मुख्यतः शिकविली जात असे, त्यांत डोनेटसच्या व्याकरणग्रंथाचा अंतर्भाव होतो. डोनेटस म्हणजेच व्याकरण असे समीकरण रूढ झाले, ह्यावरून ह्या क्षेत्रातील डोनेटसच्या ग्रंथरचनेचे महत्त्व लक्षात येते.

मार्शिएनस कापेला (पाचवे शतक) ह्याने De nuptiis Mercurii et Philologiae हा ग्रंथ लिहिला. ग्रंथाला दिलेली चौकट मनोरंजक आहे. मरक्यूरी हा भाषाशास्त्राशी (फिलॉलॉजी) विवाह करतो. तिला तो सात मुली भेट म्हणून देतो. ह्या सात मुली म्हणजेच सात कला (व्याकरण, तर्कशास्त्र, वक्तृत्वशास्त्र, भूमिती, अंकगणित, खगोलशास्त्र आणि संगीत). त्या एकामागोमाग एक आपले धडे म्हणतात, अशी योजना. हा ग्रंथ म्हणजे एक प्रकारचा ज्ञानकोशच म्हणता येईल. Pervigilium Veneris हे व्हीनस ह्या देवतेच्या उत्सवाचे वर्णन करणारे काव्य उल्लेखनीय आहे. आकर्षक निसर्गप्रतिमांचा ह्या काव्यात उपयोग केलेला दिसतो. ही कविता ३०७ च्या सुमारास रचिली गेली असावी.

ऑप्टेशिआनस पॉर्फिरिअस ह्याने Panegyricus ह्या नावाने वीस कविता लिहिल्या. सम्राट कॉन्स्टंटीनची स्तुती करण्यासाठी लिहिलेल्या ह्या कविता काव्यगुणांसाठी प्रसिद्ध नाहीत तर त्यांच्या आकृतिबंधांसाठी. कवितेच्या ओळी आणि अक्षरसंख्या काव्यपंक्तींमधील पहिले व शेवटचे अक्षर ह्यांच्या संदर्भात काही रचनेच्या करामती त्याने केलेल्या आहेत. काही अक्षरांतून एखादी आकृती उभी करणे असाही प्रकार आहे. सम्राट कॉन्स्टंटीनचा ह्या कवीवर रोष झालेला होता. तो घालविण्यासाठी ही धडपड होती. एका सुशिक्षित ख्रिस्ती माणसाने समकालीन जगाचे रंगविलेले चित्र म्हणून ऑसोनिअसच्या (चौथे शतक) कविता निर्देशनीय आहेत. Cento nuptialis ह्या त्याच्या एका कवितेत एका विवाहरात्रीचे वर्णन आहे. टायबेरिआनस (चौथे शतक) ह्याच्या नावावर अनेक कविता मोडतात. त्यांत एक सुंदर निसर्गकविता आणि एक नव-प्लेटॉनिक विचारांचा संस्कार दर्शविणारी प्रार्थना ह्यांचा समावेश होतो. रूफिअस फेस्टस एव्हिएनस (सु.चौथे शतक) ह्याने काही भौगोलिक आशयाच्या कविता लिहिल्या. त्यांत Phaenomena आणि Ora Maritima (भूमध्य समुद्रकिनाऱ्याचे वर्णन) ह्यांचा समावेश होतो. Ora….  साठी बऱ्याच प्राचीन अशा ग्रीक संदर्भांचा उपयोग त्याने केलेला असल्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्याही ही कविता महत्त्वाची आहे.

क्लॉडिअन, म्हणजेच क्लॉडिअस क्लॉडिएनस (चौथे व पाचवे शतक) हा अलेक्झांड्रियाचा. De bello Gotico (४०२) सारखी समकालीन इतिहासाचे चित्रण करणारी काही महाकाव्ये त्याने लिहिली. गॉथ लोकांशी झालेल्या युद्धांची वर्णने त्याच्या महाकाव्यातून आलेली आहेत. रोमन साम्राज्याबद्दल प्रामाणिकपणे वाटणरा उत्साह, प्रभावी वक्तृत्वाची उंची गाठणारा भाषाशैलीतला जोम, तांत्रिक कौशल्य ही क्लॉडिअनच्या काव्यरचनेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत. एक अभिजात शुद्धता त्याच्या रचनांतून प्रत्ययास येते. मिथ्यकथांचा उपयोग तो आपल्या काव्यकृतींसाठी करून घेतो, तसेच रूपकांचाही वापर करतो. पश्चिम रोमन साम्राज्याचा सम्राट होनोरिअस (कार. ३९५-४२३) ह्याच्या स्तुतिपर काव्यरचनाही क्लॉडिअनने केलेली आहे. काही छोट्या छोट्या कविताही त्याने विविध विषयांवर-उदा., नाईल नदी. एखादे निसर्गचित्र, फीनिक्स इत्यादी-केल्या आहेत. ख्रिस्त्येतर अथवा ‘हीदन’ जगातील हा अखेरचा थोर लॅटिन कवी. त्याने ख्रिस्ती धर्म केवळ एक उपचार म्हणून, नावाला स्वीकारला होता तथापि अंतर्यामी तो पेगनच होता. व्हर्जिल, ऑव्हिड, ल्यूकन आणि स्टेशिअस ह्यांचा वारसा सांगणारा हा कवी होता.

लॅटिन साहित्यातील ख्रिस्ती धर्मकवितेचे परिपक्व रूप प्रूडेन्शिअसच्या कवितेतून प्रत्ययास येते. आपल्या अभिजात कवितेचा उपयोग त्याने ख्रिस्ती धर्मसिद्धांतांच्या उद्घोषासाठी तसेच पेगन आणि पाखंडी ह्यांच्यावर हल्ले करण्यासाठी केला. ख्रिस्ती हुतात्म्यांना त्याने गौरविले.

क्लॉडिअस नमेशिएनस रूटिलिअस (पाचवे शतक) ह्याने De reditusuo (दोन भाग, इं. शी, इं. शी. द व्हॉयेज होम) हे काव्य लिहिले. ४१६ किंवा ४१७ मध्ये त्याने रोमहून गॉलपर्यंतचा प्रवास केला. गॉल ही त्याची मूळ भूमी. तेथील त्याची मालमत्ता गॉथ लोकांनी उद्ध्वस्त केली म्हणून तो तेथे जात होता. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याने समुद्रमार्गे जाणे पसंत केले. त्याची उपर्युक्त De reditu…. ही कविता म्हणजे ह्या प्रवासाचे वर्णन.  हे काव्य अपूर्ण आहे. कवितेच्या घाटावर रूटिलिअसचे प़भुत्व आहेच. त्याचबरोबर वर्णनशैलीत वेधकता आणि जिवंतपणा आहे. प्राचीन रोमबद्दल रूटिलिअसला विलक्षण जिव्हाळा वाटत होता. Regina mundi हे रोमचा निरोप घेतानाची भावना व्यक्त करणारे काव्य आहे आणि त्यातून रोमबद्दलची त्याची उत्कट निष्ठा दिसून येते.

रोम ४१० मध्ये पडले. ह्या घटनेमुळे सेंट ऑगस्टीन म्हणजेच ऑरीलिअस ऑगस्टिनस ह्याला आपला De Civitate Dei (इं. शी. द सिटी ऑफ गॉड, २२ खंड) हा ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा मिळाली. रोमन संस्थांचा हळूहळू अधःपात होत जाऊन अखेरीस ॲलेरिक (३७०?- ४१०) ह्या गॉथ राजाने, वर उल्लेखिल्याप्रमाणे रोमवर ताबा मिळवला. ख्रिस्ती धर्माच्या प्रभावामुळे रोमचा हा असा अधःपात घडून आला असे मानणारे अनेक होते. सदर आरोपाचे खंडन करण्याच्या हेतूने ऑगस्टीनने हा ग्रंथ लिहावयास आरंभ केला होता परंतु हा ग्रंथ खूप विस्तारला आणि त्याचा आवाकाही व्यापक झाला. मानवतेच्या आध्यात्मिक उत्क्रांतीची एक प्रणालीच ह्या ग्रंथाच्या रूपाने त्याने उभी केली. जगाच्या प्राचीन इतिहासाचा आढावा घेऊन त्याने मानवी महत्त्वाकांक्षा आणि यश-कीर्ती ह्यांचे वैयर्थ्य दाखवून दिले. त्याचप्रमाणे अवशेषरूप झालेल्या प्राचीन रोमन धर्माचा उपहास केला. स्टोइक, प्लेटॉनिक आणि नव-प्लेटॉनिक ह्यांसारखी पेगन तत्त्वज्ञाने चिरंतन  जीवनाचे आश्वासन देऊ शकत नाहीत, अशी त्या तत्त्वज्ञानांवर त्याने टीका केली. त्यानंतर त्याने दोन शहरे ह्या ग्रंथात चित्रित केली. ह्या दोन शहरांच्या रूपाने दोन जनसमूहांचे शब्दचित्र ऑगस्टीनने रेखाटले आहे. एक शहर हे देवाचे स्वर्गीय. त्यात पृथ्वीवरील सात्त्विक माणसे आणि स्वर्गातले  संत राहतात. ईश्वराच्या इच्छेनुसार हे लोक आपले जीवन व्यतीत करतात. दुसरे शहर ऐहलौकिक वा पार्थिव आहे. ऐहिक आणि स्वार्थी विचारांनुसार ह्या शहराची रहाटी चालते. दोन शहरांच्या रूपकांतून त्याने ख्रिस्ती धर्माची महती सांगितली आहे. ऑगस्टीनच्या दृष्टीने रोम ही केवळ एक ऐतिहासिक सत्ता होती व त्या दृष्टीनेच तिचे चिकित्सक विश्लेषण तो करतो. उपर्युक्त दोन शहरांमागील ज्या भूमिका आणि वृत्तिप्रवृत्ती आहेत, त्याच इतिहासाचा ओघ निश्चित करतात, असे ऑगस्टीनचे म्हणणे होते. Confessiones(३९७-४०१, इं.शी.कन्फेशन्स) ह्या आपल्या ग्रंथात त्याने आपला आध्यात्मिक अनुभव व्यक्त केला आहे. एक सखोल मानसशास्त्रीय अंतर्दृष्टी त्यातून प्रत्ययास येते. 


पश्चिम रोमन साम्राज्याचा राजकीय विनाश पाचव्या शतकात घडून आला. दक्षिण गॉलमध्ये ४१५ पासून व्हिसिगॉथांची सत्ता आली व ५०७ मध्ये ते स्पेनकडे जाईपर्यंत ती टिकली. सेंट ऑगस्टीनच्या मृत्युसमयी हिपोलाला व्हँडलांचा वेढा पडलेला होता आणि पुढे त्यांनी आफ्रिकेत पाय रोवले. ऑस्ट्रोगॉथांचा राजा थिओडोरिक (४५४ ?- ५२६) ह्याने इटलीत ऑस्ट्रोगॉथांच्या सत्तेची प्रस्थापना केली आणि ती सत्ता पुढे ६३ वर्षे टिकली. रोमच्या बौद्धिक वारशाचा ज्यांना अभिमान होता, अशांनी अशा दुःस्थितीतही लॅटिन साहित्याची वाङ्मयीन परंपरा खंडित होऊ नये, ह्याची काळजी घेतली. अशा व्यक्तींमध्ये अपॉलिनेअरिस सायडोनिअस (४३०-सु. ४८३) ह्याचा समावेश होतो. वाङ्मयाविषयीचे प्रेम आणि आस्था कमी होत चालल्याबद्दलचे दुःख त्याने आपल्या काही कवितांतून व्यक्त केले आहे. त्याची काव्यरचना वाङ्‌मयीन दृष्ट्या सामान्य असली, तर त्याच्या पत्रातू (९ खंड) समकालीन समाजाचे वेधक चित्र उभे राहते.

ब्लोसिअस इमिलिअस ड्राकॉन्शिअस (पाचवे शतक) हा लेखक कार्थेजचा. त्याने काही प्रासंगिक कविता, काही पौराणिक महाकाव्ये अशी काही रचना केली आहे. De laudibus Dei (इं.शी. ऑन द प्रेजिस ऑफ गॉड) ही त्याची कविता काव्यगुणांच्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. व्हँडल राजा गुंथॅमुंड ह्याच्या कारकीर्दीत रोमन सम्राटाचा गुणगौरव केल्यामुळे ड्राकॉन्शिअस ह्याला तुरुंगवास भोगावा लागला होता. तुरुंगात त्याने हे काव्य रचले. कवितेचा आरंभ सृष्टत्पत्तीपासून (क्रीएशन) करून मग ईश्वर आणि माणूस ह्यांच्या नात्याच्या संदर्भात ईश्वराच्या अद्भुत, विस्मयकारक करणीची त्याने स्तुती केली आहे. कवितेतील तपशिलांची मांडणी कवितेच्या सौंदर्यात भर घालणारी आहे. आदमला दिसलेले पार्थिव नंदनवन आणि स्वतःच्या सुखात सहभागी होण्यासाठी जोडीदार हवा, अशी त्याच्या मनात निर्माण झालेली तीव्र इच्छा ह्यांचे चित्रण मिल्टनच्या पॅरडाइस लॉस्टच्या आठव्या सर्गाशी काही लक्षणीय साम्य दर्शविते.

 

फ्लेबिअस क्रेसकोनिअस कोरिपस (सहावे शतक) ह्याने यॉहान्यिस (आठ भाग) ह्या आपल्या महाकाव्यातून यॉहान्यिस ह्या बायझंटिन सेनापतीच्या एका मोहिमेचे गौरवगान गायिले आहे. 

ऑस्ट्रोगॉथ राजा थिओडोरिक हा इटलीच्या ऑस्ट्रोगॉथिक राज्याचा संस्थापक. आपल्या कारकीर्दीत (४९३-५२६) त्याने इटलीला भौतिक समृद्धी दिली तसेच तेथे एका बौद्धिक संस्कृतीचे वातावरण तयार होण्यास उत्तेजन दिले. वरिष्ठ रोमन वर्गाच्या हाती त्याने मुलकी प्रशासनाची सूत्रे सोपविली. मॅग्नस ऑरीलिअस कॅसिओडोरस (सु. ४८०-५७५) ह्याला थिओडोरिकने ‘सेक्रेटरी ऑफ स्टेट’ (इं. अर्थ) ह्या हुद्यावर नेमले होते. Variae हा त्याच्या प्रशासकीय पत्रांचा संग्रह (बारा भाग) त्या काळच्या राजकीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. थिओडोरिकनंतर गादीवर आलेल्या त्याच्या तीन वारसांच्या सत्तेखाली त्याने काम केले होते. गॉथ लोकांचा इतिहास त्याने लिहिला. Institutiones…. (दोन भाग) ह्या त्याच्या ग्रंथात त्याने धार्मिक आणि लौकिक शिक्षणाबाबतचे आपले विचार मांडले आहेत. त्या काळच्या सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहेत. De orthographia हा त्याचा शुद्धलेखनावरील ग्रंथ होय.

आरेटर (सहावे शतक) ह्याने De acribus apostolorum हे ख्रिस्ती अपॉसलांच्या संदर्भातील एक रूपकात्मक महाकाव्य लिहिले.

उत्तरकालीन लॅटिन साहित्याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण नाव अनिशिअस मॅनलिअस सेव्हरायनस ⇨बोईथिअस (सु.४८०-५२४) ह्याचे होय. De Consolatione Philosophiae (पाच भाग, इं.शी. ऑन द कन्सोलेशन ऑफ फिलॉसफी) हा त्याचा विख्यात ग्रंथ. एके काळी ‘कॉन्सल’ह्या सन्माननीय पदावर असलेल्या बोईथिअसला थिओडोरिकने देहान्ताची सजा दिलेली होती. तुरुंगवासाच्या काळात हा ग्रंथ बोईथिअसने लिहिला. एका सुंदर स्त्रीच्या रूपाने तत्त्वज्ञान त्याच्या समोर येऊन उभे राहते आणि त्याचे सांत्वन करते, अशी ह्या ग्रंथाची मांडणी आहे. आपल्यावर अन्याय झाला, ही बोईथिअसची भावना. तथापि भाग्य आणि दुर्भाग्य ही दोन्ही ईश्वरी अनुसंधानाच्या तुलनेत कनिष्ठच असून, न्यायान्यायाचा देखावा वरवर काहीही दिसत असला, तरी सदगुणांची कदर ही होतेच, असे तत्त्वज्ञान त्याला सांगते. बोईथिअस हा ख्रिस्ती परंतु त्याच्या ग्रंथावर प्लेटोच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव दिसून येतो. प्लेटोचा तत्त्वविचार मध्ययुगात ह्या ग्रंथाद्वारे प्रसृत झाला.

ॲरिस्टॉटलच्या ‘ऑन इंटरप्रिटेशन्स’ आणि ‘कॅटेगरीज’ (दोन्ही इं.शी.) ह्यासांरख्या तर्कशास्त्रविषयक ग्रंथांचा लॅटिन अनुवाद त्याने केला. पॉर्फिरी (सु. २३४-सु. ३०५) ह्या ग्रीक तत्त्वज्ञाने ॲरिस्टॉटलच्या ‘कॅटेगरीज’ ह्या ग्रंथावर केलेल्या भाष्याचा अनुवादही बोईथिअसने केला आहे, तसेच त्यावर स्वतःचे भाष्य लिहिले आहे.

बोईथिअसच्या मृत्यूनंतर लवकरच इटलीवर बिझँटिअमची सत्ता प्रस्थापित झाली. गॉथांनी  (व्हिसिगॉथांनी) त्या वेळी प्रखर प्रतिकार केला. ह्या साऱ्याचा समृद्धीवर आणि सांस्कृतिक वातावरणावर प्रतिकूल परिणाम झाला. तथापि अभिजाततेचा वारसा नष्ट झाला नाही. दक्षिणेकडे कॅसिओडोरस आणि उत्तरेकडे आयरिश मिशनरी कॉलंबेनस (५४३-६१५) ह्यांच्यासारख्यांनी ती जपली. व्हिसिगॉथांच्या स्पॅनिश राज्यात हा वारसा सातव्या शतकापर्यंत जपला गेला. लॅटिन कवी व्हिनॅन्शिअस फॉर्च्यूनेटस (सु. ५३०-सु.६००) हाही मध्ययुगाला जोडणारा एक सेतू म्हणता येईल. काही लघुकाव्ये, स्तोत्रे, पद्यपत्रे त्याने लिहिली, तसेच गद्याच्या माध्यमातून काही संतांची चरित्रेही लिहिली. तथापि बोईथिअस हा लॅटिन साहित्याचा अखेरचा थोर प्रतिनिधी म्हणता येईल.

इंग्लंडमधील लॅटिन साहित्याचा आरंभ सातव्या शतकात झाला. शर्बर्नचा बिशप ॲल्डहॅल्म (६४०?-७०९) ह्याने काही लॅटिन कविता लिहिली, तसेच लॅटिन छंदशास्त्रावर लेखन केले. बीडने लिहिलेला हिस्टोरिया इक्लिझिॲस्तिका… (इं.शी. इक्लीझिॲस्टिक हिस्टरी ऑफ द इंग्लिश पीपल) हा ग्रंथ ख्यातनाम आहे.

फ्रँकांचा राजा शार्लमेन (७४२-८१४) ह्याच्या दरबारी आयरिश आणि इटालियन विद्वान आले. स्पेनहून कवी आणि विद्वान थीओडल्फ (मृ.८२१) हा आला. दरबारी वर्तृळातील विद्वान मंडळींनी अभिजात आदर्श समोर ठेवून लॅटिन कविता लिहिली. आइनहार्ट (७७०?-८४०) ह्याने शार्लमेनचे चरित्र लिहिले. स्विटोनिअस हा त्याचा चरित्रलेखनातील आदर्श होता, असे दिसते. पॉलस डायॅकोनस म्हणजे पॉल द डीकन हा इटालियन (लाँबार्ड) होता. त्याने लाँबार्डाचा ५६८ ते ७४७ पर्यंतचा इतिहास ६ भागांत लिहिला. ॲल्क्विन (७३५-८०४) हा इंग्रज पंडित शार्लमेनला विद्यापुनरुज्जीवनाच्या कामी मदत करणारा. त्याने शालेय पुस्तके लिहिली काही धर्मशास्त्रविषयक लेखन केले काही कविता लिहिली. अनेक लॅटिन ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती  तयार करण्याचे कामही झाले आणि त्यामुळे ह्या ग्रंथांची जपणूक होऊ शकली. फेर्येचा लूपस, जोहॅनीज स्कोटस एरिजेना (८१५ ? – ८७७ ?) हा आयर्लंडमध्ये जन्मलेला तत्त्वज्ञ आणि धर्मशास्त्रवेत्ता राबानुस माउरुस (७७६-८५६) हा फ़ँकिश धर्मशास्त्रज्ञ आणि विद्वान, तसेच गोटशाल्क हा कवी, ह्यांनी लॅटिन साहित्याची सेवा केली.

दहाव्या व अकराव्या शतकांत महत्त्वाचे साहित्यिक फारसे आढळत नाहीत. फ्रान्समध्ये क्लूनीचा ॲबट ओदो (कवी आणि ईश्वरशास्त्रवेत्ता), तूरचा बेरांझे (धर्मविषयक लेखन), इटलीत क्रीमोनाचा बिशप लीउतप्रांत (इतिहासलेखन, तसेच कवितालेखन), सेंट पीटर डेमिअन (शैलीकार गद्यलेखक आणि कवी) हे काही उल्लेखनीय साहित्यसेवक होत. माँटी कासीनो हे एक विद्याकेंद्र होते आणि तेथे विविध ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती तयार केल्या गेल्या.

जर्मनीत व्हीडूकिंट (व्हिटकिंट ह्या नावानेही प्रसिद्ध) ह्याने सॅक्सनांचा इतिहास लिहिला. मारिआनस स्कोटस ह्या आयरिश लेखकाने ‘युनिव्हर्सल क्रॉनिकल’ (इं. अर्थ) हे इतिवृत्त लिहिले व त्याचा उत्तरकालीन इतिहासकारांना उपयोग झाला.

जॉन ऑफ सॉल्झबरी (बारावे शतक) हा मध्ययुगातील थोर मानवतावादी. त्याने Historia Pontificalis हा ग्रंथ लिहिला. Metologicus ह्या त्याच्या अन्य एका ग्रंथात त्याने ॲरिस्टॉटलच्या तर्कशास्त्राविषयक लेखनाचे विश्लेषण केले आहे.

जेफ्री ऑफ मॉनमथ (बारावे शतक) ह्या सेंट आसाफच्या इंग्रज बिशपने Historia regum Britamniae (इं.शी. हिस्टरी ऑफ द किंग्ज ऑफ ब्रिटन) ह्या आपल्या ग्रंथात अनेक रोमान्सचा विषय झालेल्या राजा आर्थरविषयी लिहिले.

बाराव्या शतकात इतिहासलेखन बरचे झाले. व्यापक होत जाणारा बौद्धिक दृष्टिकोण त्याचप्रमाणे ख्रिस्ती धर्मयुद्धांसारख्या महत्त्वाच्या घटनांची नोंद ठेवण्याची आवश्यकता ह्यांसारख्या कारणांमुळे इतिहासलेखनाची प्रवृत्ती वाढीला लागलेली दिसते. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात तसेच तेराव्या शतकात चांगली भावकविताही लिहिली गेली. ह्या कविता धार्मिक, नैतिक, उपरोधप्रचुर, शृंगारिक अशा वैविध्यपूर्ण आशयाच्या आहेत. ह्या कविता रचणाऱ्या कवींपैकी बरेचसे अज्ञात आहेत. तथापि वॉल्टर ऑफ शाटीयाँ, प्रिमास ऑफ ऑर्लिअन्झ, पीटर ऑफ ब्लवा हे काही ज्ञात आणि उल्लेखनीय कवी. कविता ही वक्तृत्वशास्त्राची एक शाखा मानली जात होती आणि काव्यकलेची तत्त्वे विशद करणारे पद्यबद्ध ग्रंथही लिहिले जात होते. अकराव्या शतकापासून धार्मिक आणि भक्तिप्रधान लेखनही वाढत्या प्रमाणावर केले जात होते.

प्रबोधनकालीन लॅटिन साहित्याचा विचार करीत असता⇨दान्ते, ⇨पीत्रार्क आणि ⇨बोकाचीओ ह्या इटालियन साहित्यिकांची नावे पुढे येतात. लॅटिनमधील अभिजात ग्रंथांचे दान्तेने उत्तम अध्ययन केले होते. दे व्हल्गारी इलोक्वेंतीया आणि दे मोनार्कीआ हे दान्तेचे लॅटिन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. पीत्रार्क आणि बोकाचीओ हे दोघेही अभिजात ग्रीक-लॅटिन वारशाचा मनःपूर्वक शोध घेत होते. व्हर्जिल, सिसरो ह्यांसारख्या थोर लॅटिन साहित्यिकांच्या साहित्यकृतींचे साक्षेपी वाचन पीत्रार्कने केले होते. इतकेच नव्हे, तर फ्रान्स, ब्राबांट, फ्लँडर्स, ऱ्हाईनलँड इ. ठिकाणी प्रवास करून दुर्मिळ वा अनुपलब्ध अशा अभिजात साहित्यकृतींच्या (मुख्यतः लॅटिन) हस्तलिखितांचा शोध त्याने घेतला. पीत्रार्कच्या लॅटिन  गद्यग्रंथात Secretum meum हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ, तसेच De viris illustribus (विविध विख्यात व्यक्तींची चरित्रे) आणि De vita solitaria ह्यांचा समावेश होतो. देकामेरॉन हा आपला जगद्विख्यात ग्रंथ इटालियन भाषेत लिहिल्यानंतर बोकाचीओने मुख्यतः लॅटिनमध्येच लेखन केले. ह्या लेखनात ‘जीनिऑलॉजी ऑफ द गॉड्स ऑफ द जेंटिल्स’, ‘ऑन द फेट्स ऑफ फेमस मेन’ आणि ‘ऑन द माउंटन्स फॉरेस्ट्स, स्प्रिंग्ज, लेकस, रिव्हर्स, स्वँप्स ऑर मार्शिस अँड ऑन द नेम्स ऑफ द सी’ (सर्व इं.शी.) अंतर्भूत आहेत. फ्लॉरेन्स, रोम आणि नेपल्स ही इटलीतील तीन मुख्य ज्ञानकेंद्रे होती. ह्या ज्ञानकेंद्रांत लॅटिनचे अभ्यासक होते. अभिजात साहित्यकृती आदर्श मानल्या जात होत्या. ऐतिहासिक, मानवतावादी, वैज्ञानिक, तात्त्विक आणि धार्मिक असे विविध प्रकारचे साहित्य लॅटिनमध्ये विविध देशांत व प्रदेशांत लिहिले जात होते आणि ते  विपुल आहे. लॅटिन भाषेची सेवा करणाऱ्या साहित्यिकांपैकी काही असे : इटली-⇨प्येअत्रो बेंबो (१४७०-१५४७), जोव्हान्नी कोत्ता, मार्को व्हीदा, जोव्हान्नी पोंतानो, याकोपो सान्नाद्झारो, लोरेंत्सो व्हाल्ला जर्मनी-निकोलस ऑफ क्यूसा नेदर्लंड्स-⇨इरॅस्मस, स्पेन-ह्वान व्हीव्हेस इंग्लंड-⇨टॉमस मोर आणि स्कॉटलंड- जॉर्ज ब्युकॅनन व जॉन बारक्ले. 

इंग्लंडप्रमाणेच फ्रान्समध्येही प्रबोधनकाळाचा आरंभ काहीसा उशिरा झाला. ⇨ला प्लेयाद हे सोळाव्या शतकात फ्रान्समध्ये घडून आलेल्या प्रबोधनाशी निगडित असलेले एक कविमंडळ. फ्रेंच साहित्याला ग्रीक-लॅटिन साहित्याची श्रेष्ठता प्राप्त करून देणे हा ला प्लेयादचा प्रयत्न होता. झां आंत्वान बाईफ आणि रेमी बॅलो ह्यांसारखे ला प्लेयादमधले काही कवी लॅटिन काव्यरचनाही करीत. १५३० मध्ये पहिल्या फ्रान्सिसने स्थापन केलेले ‘College Royal’ विद्याव्यासंगाला आणि लॅटिन कवितेला उपकारक ठरले.

 

अठराव्या शतकापर्यंत लॅटिन ही इतिहासविषयक तसेच वैज्ञानिक इ. लेखनास अखिल यूरोपीय वाचकवर्ग मिळावयाच्या दृष्टीने महत्त्वाची भाषा होती. म्हणूनच फ्रान्सिस बेकन, देकार्त, स्पिनोझा, न्यूटन अशा अनेकांनी तिचा लेखनासाठी वापर केलेला आढळतो.

संदर्भ : 1. Bieler, Ludwig, History of Roman Literature, London, 1966.

           2. Duff, John Wight, A Literary History of Rome in the Silver Age, 2nd ed., New York, 1960.

           3. Duff, John Wight, A Literary History of Rome from the Origins to the Close of the Gloden Age, 3rd ed., New York, 1964.

           4. Hadas, Moses, A History of Latin Literature, New York,1964.

           5. Mackail, John W. Latin Literature, New York, 1902.

           6. Rose, H. J. A. Handbook of Latine Literature, London1949.

कुलकर्णी, अ. र.