लसूणघास : (विलायती गवत हिं. लसून घास, विलायती गवत गु. विलायती घास पं. लुसन इं. ल्यूसर्न, अल्फाल्फा लॅ. मेडिकॅगो सटायव्हा कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-पॅपिलिऑनेटी). फुलझाडांपैकी लसूणघास ही एक महत्त्वाची द्विदलवर्गातील बहुवर्षायू (अनेक हंगाम जगणारी), सरळ वाढणारी, अनेक शाखायुक्त सु. ०.३ ते १ मी. उंच ⇨ ओषधी आहे. पाने संयुक्त व त्रिदली असून दले टोकाशी दातेरी व आयत-अंडाकृती असतात. पानांच्या बगलेत दाट मंजऱ्या असून त्यांवर जांभळट फुले येतात. फळे (शिंबा-शेंगा) फिरकीसारखी असून त्यात ६-८ पिवळ्या ते तपकिरी व मूत्रपिंडाकृती बिया असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨लेग्युमिनोजी कुलात (शिंबावंत कुलात) आणि पॅपिलिऑनेटी उपकुलात (पलाश उपकुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

या वनस्पतीचे मूलस्थान नैऋत्य आशियात असावे, असे मानले जाते. तिचे लागवडीतील प्रकार प्रथम पश्चिम इराणात उगम पावून तेथून जगाच्या इतर भागात पसरले. विषुववृत्तापासून उत्तरेस सु. ६० अक्षांशांपर्यंत या वनस्पतीची लागवड होते.

शिंबावंत कुलातील वैरणीच्या पिकांपैकी लसूणघास हे फार महत्त्वाचे पीक असून ते उष्ण व उपोष्ण कटिबंधांतील अनेक देशांत लागवडीत आहे. जगातील लसूणघासाखालील एकूण क्षेत्र सु. ३.२ कोटी हेक्टर असून त्यांपैकी सु. १.१ कोटी हेक्टर क्षेत्र अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत आहे. तेथे ते सर्वांत महत्त्वाचे वैरणीचे पीक आहे. कॅनडा, अर्जोटिना, फ्रान्स, इटली, मध्य यूरोप, ईजिप्तखेरीज मध्य आशियातील सर्व देश, रशिया, द. आफ्रिका, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया येथेही या पिकाची लागवड होते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा व द. अमेरिका येथे हे पीक अल्फाल्फा या नावाने ओळखले जाते.

भारतात या पिकाची लागवड इ. स. १९०० च्या सुमारास सुरू झाली आणि सध्या ते देशाच्या सर्व कोरड्या हवेच्या व पाणी देण्याची सोय असलेल्या भागात कमीजास्त प्रमाणात लागवडीत आहे. महाराष्ट्र, पंजाब, गुजरात व उत्तर प्रदेशातील पश्चिमेकडील जिल्हे या भागात हे पीक लागवडीत आहे परंतु कोणत्याही राज्यात ते ७ ते ८ हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त नाही. महाराष्ट्रात नासिक व अहमदनगर या दोन जिल्ह्यांत या पिकाची लागवड इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त असून त्या खालोखाल ती पुणे व धुळे या जिल्ह्यांत आहे.

लसूणघास : (अ)फांदी: (१) पाने, (२) फुलोरे, (३)फळे (आ) बियांसह एक फळ हे पीक वाढीस लागल्यावर त्यापासून सर्वसाधारणपणे तीन ते चार वर्षे वैरण मिळते. (योग्य मशागत केल्यास हे पीक ५० वर्षेपर्यंत उत्पादनक्षम असते, असा उल्लेख आहे). दुष्काळी परिस्थिती, तसेच उष्णता आणि थंडी या सर्वांना ते प्रतिकारक असून वैरणीचे उत्पादन व वैरणीची प्रत यांसाठीही ते प्रसिद्ध आहे.

हवामान : समुद्रसपाटीच्या प्रदेशापासून २,४०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात हे पीक वाढते. कोरड्या हवामानात बागाईताखाली हे आदर्श पीक आहे. त्याची मुळे ७.६ मी. पर्यंत खोल जात असली, तरी सर्वसाधारणपणे ती १.८ ते ३.६ मी. खोल जातात. (२० वर्षांच्या वयाच्या झाडाची मुळे सु. १५ मी. पर्यंत खोल गेल्याची नोंद आहे). हे पीक उत्तर भारतातील ४०° ते ४३° से. पर्यंतचे तापमान सहन करू शकते परंतु जास्त तापमानाबरोबरच हवेतील आर्द्रता मोठ्या प्रमाणावर असल्यास या पिकाला अपाय होतो. ५० ते ५५ सेंमी. वार्षिक पर्जन्यमान या पिकाला पोषक असते परंतु ३५ सेंमी. पर्यंत कमी पावसातही हे पीक वाढू शकते. १०० सेंमी. अथवा जास्त पावसाच्या प्रदेशात हे पीक बहुवर्षायू म्हणून घेता येत नाही.

जमीन : हे पीक निरनिराळ्या प्रकारच्या जमिनींत वाढू शकते परंतु सुपीक, भुसभुशीत, चांगल्या निचऱ्याची दुमट जमीन या पिकाच्या वाढीला उत्तम असते. पाणथळ व अम्लीय जमिनीत हे पीक वाढत नाही.

प्रकार : जगात लसूणघासाचे सु. ५० प्रकार आहेत परंतु त्यांपैकी फार थोडे प्रकार विस्तृत प्रमाणावर लागवडीत आहेत. भारतात पर्शियन किंवा अरेबिक, कंदाहार किंवा क्वेट्टा व मिरत असे तीन मुख्य प्रकार लागवडीत आहेत. पर्शियन हा प्रकार फार लोकप्रिय आहे. पंजाबासाठी सिरसा-९ हा उत्तम बहुहंगामी प्रकार विकसित करण्यात आला आहे. हे सर्व ३ ते ५ वर्षे चारा देणारे प्रकार आहेत. काही प्रकार फक्त १ वर्ष टिकणारे असतात व ज्या वेळी जमीन एक वर्षापेक्षा जास्त काळ लसूण घासाखाली ठेवता येत नसेल त्या वेळी असे प्रकार लावतात.

पूर्वमशागत : हे पीक एकाच जागी तीन ते चार वर्षे ठेवतात त्यामुळे जमिनीची पूर्वमशागत फार महत्त्वाची असते. या पिकाची मुळे खोलवर जात असल्याने जमीन चांगली नांगरून कुळवून भुसभुशीत करतात. काही ठिकाणी तागाचे हिरवळीचे पीक गाडतात अथवा हेक्टरी ५० ते ५५ गाड्या शेणखत आणि सु. १७० किग्रॅ. सुपरफॉस्फेट पेरणीपूर्वी ६ आठवडे जमिनीत मिसळतात. पेरणीपूर्वी थोड्या प्रमाणात जमिनीत चुना मिसळतात.


पेरणी : जर लसूणघासाची लागवड विशिष्ट शंतात प्रथमच होणार असेल, तर पेरणीपूर्वी वियांना ऱ्हायझोबियम सूक्ष्मजंतू संवर्धन लावणे आवश्यक असते. १० किग्रॅ. बियांना २५० ग्रॅ. ऱ्हायशोबियम संवर्धन पुरेसे असते. हेक्टरी २० ते २५ किग्रॅ. बियाणे लागते.

पिकाची पेरणी शेतात ४५-६० सेंमी. अंतरावर सऱ्या पाडून अथवा सपाट वाफ्यात करतात. वरंब्याच्या दोन्ही बाजूंना तळापासून १/३ उंचीवर १५ सेंमी. अंतरावर टोकण पद्धतीने एका ठिकाणी ३-४ बिया पेरतात. बी २.५ ते ३.५ सेंमी. पेक्षा जास्त खोल पडणार नाही याची खबरदारी घेतात. पेरणीनंतर माफक प्रमाणात पाणी देतात. सपाट वाफ्यात पेरणी करावयाची असल्यास प्रथम वाफ्यात पाणी भरून त्यात हाताने बी फोकून पेरतात. लसूणघासाच्या बियाचे कवच कठीण असते आणि ते तसेच पेरल्यास लवकर उगवून येत नाही. उगवण लवकर होण्यासाठी बी ७ ते ८ तास पाण्यात भिजत ठेवून नंतर ते काही वेळ पोत्याच्या कपड्यात गुंडाळून ठेवतात अथवा दुसऱ्या पद्धतीत बी खडबडीत पृष्ठभागावर घासून मग पेरतात. नवीन बियांपेक्षा २-३ वर्षांचे जुने बी जास्त चांगले उगवते. पेरणी उत्तर भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आणि महाराष्ट्रात पावसाळ्याच्या सुरुवातीला अथवा ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये करतात. सुरुवातीला पिकाला वारंवार पाणी द्यावे लागते. झाडे मोठी झाल्यावर उन्हाळ्यात १०-१२ दिवसांनी व हिवाळ्यात जमिनीच्या प्रकारानुसार जास्त अंतराने पाणी देतात. वर्षांत १५-१८ पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. कापणीच्या सुमारास पाणी द्यावयाचे असल्यास ते कापणीनंतर देतात. आवश्यकनेनुसार कोळपणी व खुरपणी करतात.

खत : या पिकाला फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम व गंधक यांची मोठ्या प्रमाणात गरज असते. पिकाच्या मुळ्यांवरील गाठींत वाढणाऱ्या व हवेतील नायट्रोजनाचे स्थिरीकरण करणाऱ्या सूक्ष्मजंतूंमुळे पिकाला नायट्रोजनाचा पुरवठा होतो. पिकाला दरवर्षी हेक्टरी २५ ते ३० गाड्या शेणखत आणि १३५ किग्रॅ. सुपर फॉस्फेट देणे आवश्क असते. याशिवाय अमोनियम सल्फेट देण्याचीही पद्धत आहे. तसेच बोरॅक्स हेक्टरी ५५ किग्रॅ. मातीत मिसळून देण्याची आणि मोरचूद हेक्टरी ५.६ किग्रॅ. ४५० लिटर पाण्यात मिसळून आणि सोडियम मॉलिब्डेट हेक्टरी ६० ग्रॅ. १४० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.

रोग : (१)सूक्ष्मजंतुजन्य मर : अप्लॅनोबॅक्टर इन्सीडिओसम या सूक्ष्मजंतूमुळे होणारा हा लसूणघासाचा फार नुकसानकारक रोग आहे. रोगट झाडे खुजी राहातात व शाखायुक्त खोडांची फार मोठ्या संख्येने वाढ होते. पाने रोगट हिरवी होतात व त्यांचा आकार बदलतो आणि कडा पिवळ्या पडतात. मुळांतील काष्ठमय ऊतकांचा (पेशीसमूहांचा) नेहमीचा पांढरा रंग बदलून तो तपकिरी पिवळा होतो. रोगप्रतिकारक प्रकारची लागवड करणे एवढाच एक उपाय आहे.

(२) पानांवरील ठिपके : स्यूडोपेझीझा मेडिकॅजिनिस या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) होणारा हा रोग मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. ठिपके वाटोळे व टाचणीच्या शिरोभागाच्या आकारमानाचे असून त्यांचा रंग गर्द तपकिरी अथवा काळा असतो. रोगट झाडे पिवळी पडतात आणि पाने झडतात. पाने झडण्याअगोदर कापणी केल्याने नुकसान कमी होते.

किडी : या पिकावरील किडींमध्ये ⇨ तुडतुडे, ⇨ मावा (इलिनोइया पिसी) व अल्फाल्फा टोका (फायटोनोमस पोस्टिकस) या महत्त्वाच्या आहेत. तुडतुडे आणि मावा हे वनस्पतीतील रस शोषून घेतात आणि त्यामुळए तिची वाढ खुंटते व पाने पिवळी पडतात. लहान पंखरहित तुडतुडे पानांच्या खाली लपतात व प्रौढ कीटकनाशकांचा प्रतिकार करीत असल्याने त्यांचे नियंत्रण करणे कठीण जाते. टोक्याचे डिंभ (अळ्या) पाने खातात आणि मोठ्या प्रमाणावर त्यांचा प्रसार झाला, तर पिकाची वाढ खुंटते व चाऱ्याचे उत्पादन कमी मिळते. आल्ड्रिन, एंड्रीन वा डिल्ड्रिन दर हेक्टरी २५-९० लिटर पाण्यात ५५-२२० ग्रॅ. मिसळून फवारल्यास डिंभांचे चांगले नियंत्रण होते.

अमरवेल (कस्क्यूटा चायनेन्सीस) या सपुष्प परोपजीवी (इतर सजीवांवर उपजीविका करणाऱ्या) वनस्पतीमुळे या पिकाचे केव्हा केव्हा पुष्कळ नुकसान होते. याकरिता पिकाची कापणी करताना अमरवेल ज्या झाडावर आढळून येईल ती झाडे फुलावर येम्यापूर्वीच काढून टाकतात व वेलीचे तुकडे शेतातून वेचून काढून नष्ट करतात.

कापणी व उत्पादन : पिकाची पहिली कापणी सामान्यतः पेरणीनंतर ६० ते ७५ दिवसांनी करतात. पुढील कापण्या २५ ते ३० दिवसांच्या अंतराने करतात. एका वर्षांत ८-१० कापण्या होतात व त्यापासून हेक्टरी ७५ ते १०० टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. फुलोऱ्याची सुरुवात होताच ती पिकाच्या कापणीची सर्वात योग्य स्थिती असते. बी धरण्यासाठी पिकाच्या कापणीची सर्वांत योग्य स्थिती असते. बी धरण्यासाठी पिकाच्या चवथ्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पीक फुलोऱ्यावर आल्यावर कापणी न करता तसेच ठेवतात व पाणी देणे बंद करतात. एप्रिलमध्ये शेंगा पक्क झाल्यावर कापणी करून वाळवून झोडणी करून बी वेगळे करतात. एक हेक्टरमधून सर्वसाधारणपणे २८० किग्रॅ. बी मिळते.

उपयोग : लसूणघासाच्या हिरव्या चाऱ्यात ७४.६% पाणी, ४.६% प्रथिने, १०.४% कार्बोहायड्रेटे व २.४% राख (खनिज द्रव्ये) असतात. याशिवाय अ जीवनसत्त्व व कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर असतात. दुभती जनावरे, घोडे, शेळ्या, मेंढ्या व डुकरे यांना हा चारा फार उपयुक्त आहे. भारतात लसूणघास मुख्यत्वेकरून हिरव्या चाऱ्याच्या स्वरूपात घोड्यांना खाऊ घालतात. अमेरिकेत कापलेला हिरवा चारा, वाळलेला चारा, मुरघास व चराऊ कुरण या निरनिराळ्या स्वरूपांत लसूणघास जनावरांच्या खाद्यासाठी वापरण्यात येतो. वाळलेल्या चाऱ्याचे दळून पीठ करून ते खाऊ घालतात. त्यात २०% प्रथिने असतात.

दुभत्या जनावरांना व औताच्या बैलांना दररोज ८-१० किग्रॅ. हिरवा चारा पुरेसा असतो. जास्त खाल्ल्याने जनावरांचे पोट फुगते. हा चारा तसाच खाऊ न घालता ज्वारी, मका अथवा भाताच्या वाळलेल्या चाऱ्यात (कडब्यात) सम प्रमाणात मिसळून खाऊ घालतात. लसूणघासाचे पीक फुलोऱ्यावर येण्याच्या सुमारास त्याची कापणी करून वाळविलेला चारा सर्व प्रकारच्या व विशेषतः दुभत्या व वाढत्या वयाच्या जनावरांना फार उपयुक्त असतो. हिरवळीच्या पिकासाठीही लसूणघासाचा वापर करता येतो. मधमाशीपालनात हे पीक फार उपयुक्त आहे. मधमाश्यांद्वारे परागण (परागीकरण) झाल्याने बियांचे अधिक उत्पादन मिळते.

संदर्भ : 1. Bolton, J. L. Alfalfa Botany, Cultivation and Utilitation, New York,1962.

           2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Mterials, Vol.VI, New Delhi,1962.

           3. Hanson, C. H., Ed., Alfalfa Science And Technology, Madison, 1972.

          4. Narayanan, T. R. Dabadghao, P. M. Forage Crops of India, New Delhi, 1972.

चव्हाण, ई. गो. गोखले, वा. पु. जोशी, वा. ना.