ल शातल्ये, आंरी ल्वी : (८ ऑक्टोबर १८५०-१७ सप्टेंबर १९३६). फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ. रासायनिक समतोला संबंधी [→समतोल, रासायनिक ] असलेल्या ल शातल्ये तत्त्वाबद्दल विशेष प्रसिद्ध.
ल शातल्ये यांचा जन्म पॅरिस येथे आणि शिक्षण तेथील कॉलेज रोलँ, एकोल पॉलिटेक्निक आणि एकोल द माइन्स या संस्थामध्ये झाले. १८७५ साली ते पदवीधर झाले. दोन वर्षे खाणकाम अभियंता म्हणून काम केल्यानंतर १८७७ साली के एकोल द माइन्स या संस्थेत व १९०८ साली पॅरिस विद्यापीठामध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले.
‘जर एकाद्या स्थिर समतोल अवस्थेतील विक्रियेत तापमान, दाब व सांद्रता (द्रव्याचे प्रमाण) यांपैकी एखादी बाब बदलली, तर समतोल अशा तऱ्हेने बदलतो की, या बदलाचा प्रभाव समतोलावर पडत नाही ’, हे त्त्व ल शातल्ये यांनी १८८४ साली प्रथम प्रतिपादिले व Loi de stabilite de l’ equilinre chimique (रासायनिक समतोलाच्या स्थिरतेचा नियम) या ग्रंथात १८८८ साली प्रसिद्ध केले. समतोलावस्थेतील प्रणालीवर बाह्य प्रेरणा लावली असता या प्रेरणेचा परिणाम किमान होईल अशा तऱ्हेने ही प्रणाली जुळवून घेते, असे या तत्त्वानुसार म्हणता येते. हे तत्त्व रासायनिक उद्योगांमध्ये रासायनिक प्रक्रिया अत्यंत कार्यक्षमतेने घडवून आणण्याकरिता अतिमहत्त्वाचे असल्याचे सिद्ध झाले.
धातुविज्ञान, सिमेंट, काच, इंधन आणि स्फोटक द्रव्ये या विषयांसंबंधी ल शातल्ये तज्ञ होते. त्यांनी उच्च तापमानांचे मापन करणाऱ्या प्लॅटिनम-ऱ्होडियम तपयुग्मात [तापमान मोजावयाच्या साधनात →तापमान] सुधारणा केल्या. त्यांनी तपयुग्माचे इयत्तीकरण (अंश बिनचूक) करण्याकरिता गंधक व सोने यांच्या वितळबिंदूंचा वापर केला. त्यांनी प्रकाशीय उत्तापमापकाचा (अतिशय तप्त पृष्ठाचे तापमान त्याच्या प्रदिप्त तेजस्वितेवरून निश्चित करणाऱ्या उपकरणाचा) शोध लावला. या उपकरणाच्या साह्याने वस्तूंच्या रक्तोष्ण ते शुभ्रोष्ण रंगाचे निरीक्षण करून तापमान मोजले जाते. विशेषतः याचा वापर मृत्तिका उद्योग, धातुविज्ञान इ. क्षेत्रांमध्ये भट्ट्यांचे तापमान मोजण्याकरिता केला जातो. त्यांनी उच्च तापमान प्रक्रियांमध्ये भेददर्शी प्रसरणमापकाचा (निरनिराळ्या द्रव वा घन पदार्थाचे ऊष्मीय प्रसरण मोजणाऱ्या उपकरणाचा ) वापर प्रथम केला.
ल शातल्ये यांनी मिश्रधातू , मृत्तिका उद्योग, पोलाद, सिलिकेटे, इंधनाचे ज्वलन इ. विषयांवर अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी Revue de Metallurgie या नियतकालिकाची स्थापना केली व १९०४-१४ ते त्याचे संपादक होते. १९१६ साली त्यांना लंडनच्या रॉयल सोसायटीचे डेव्ही पदक मिळाले.
ते ईझेरे येथे मृत्यू पावले.
कानिटकर, बा. मो.