लज्जा : सामान्य व्यवहारामध्ये ‘लज्जा’ हा शब्द दोन अर्थाने वापरला जातो : पहिला अर्थ ‘लाजणे’ किंवा ‘लज्जारक्त होणे’. ह्याला इंग्रजीत ‘ब्लशिंग’ हा प्रतिशब्द आहे. प्रेमात पडलेली मुग्धा आपले प्रेम वडीलधाऱ्यांपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करते व त्यांच्याशी बोलताना हे तिच्या मनात दडलेले प्रेम त्यांनी ओळखले आहे असे तिला प्रथम दिसून येते, तेव्हा ती लज्जारक्त होते, लाजते. तिचे डोके खाली झुकते, तोंडावर स्मितयुक्त लाली पसरते व ती लटके नकारार्थी उद्‌गार काढते. ही भावना तिला सुखद असते व त्यात तिची आपण प्रेम लपविण्यात अयशस्वी झाल्याची कबुलीसुद्धा असते. दुसरा अर्थ ‘शरम’ किंवा ‘शरमिंदा होणे’. ह्याला इंग्रजीमध्ये ‘शेम’ हा प्रतिशब्द आहे. शरमणे किंवा शरमिंदा होणे, ही एक स्व-मूल्यांकनकारी भाववृत्ती (इमोशनल ॲटिट्यूड) आहे. स्वतःला मान्य असलेल्या अशा मूल्यांपासून किंवा वर्तनाच्या मानदंडापासून स्खलन झाल्याची, इतरांच्या दृष्टीने त्यात काही कमी पडल्याची कबुली त्या भाववृत्तीत असते. ही भावना असुखदायी असते व केव्हा केव्हा ती इतकी तीव्र होते, की त्यामुळे आंतरवेदना किंवा मनःस्ताप होतो. ह्याला इंग्रजीत ‘रिमोर्स’ म्हणतात. नीतिमत्ता व सामाजिक मानदंडाच्या पालनाविषयी विशेष संवेदनक्षम असणाऱ्या व्यक्तीमध्ये हा मनःस्ताप इतका टोकाला जातो, की ती व्यक्ती या स्खलनाबद्दल स्वतःला प्रतीकात्मक किंवा केव्हा केव्हा शारीरिक इजा करून घेते किंवा स्वतःला जगण्यास अयोग्य ठरवून आत्महत्यादेखील करू शकते. जपानी राष्ट्रस्वभाव अशा संवेदनक्षमतेसाठी प्रसिद्ध आहे.

लज्जेचा हा अनुभव व्यक्तीमध्ये सारासार विचार, बुद्धीचा किंवा सदसद्‌बुद्धीचा (कॉन्शन्सचा) विकास झाल्याचा द्योतक आहे. बालक पौगंडावस्थेत येत असताना कौटुंबिक व सामाजिक नीतिमूल्यांना व वर्तनाच्या मानदंडांना संवेदनक्षम बनते कारण त्याचे आईवडील व इतर वडीलधारे त्याच्या वर्तनाचे मूल्यांकन करून ‘अमुक करणे बरोबर नाही’, ‘हे तुला शोभत नाही’, ‘हे लोकांना आवडणार नाही’ वगैरे म्हणून त्याच्या मनावर ही मूल्ये व मानदंड बिबविण्याचा नेहमी प्रयत्न करतात.  यामुळे बालकही या दृष्टीने स्वतःचे मूल्यांकन करावयास शिकते व मूल्ये, मानदंड आत्मसात करते. त्याचबरोबर ह्या आत्ममूल्यांकनाचा परिणाम म्हणून आत्मगौरव किंवा लज्जा, शरम अनुभवण्यास सक्षम होते. ही लज्जाभावना, शरम व्यक्तीवरच्या सामाजिक अंकुशाचे एक महत्त्वाचे साधन आहे. [⟶ सामाजिक नियंत्रण].

मनोविश्लेषण सिद्धांताप्रमाणे भावना ह्या आंतरिक संघर्षाच्या द्योतक असतात. सामाजिक-नैतिक मूल्ये व मानदंड आत्मसात करून विकास पावलेला ⇨पराहम् (सुपर एगो) किंवा साध्या शब्दात ⇨सदसद्‌बुद्धी वा सारासारबुद्धी ही व्यक्तीत वेळोवेळी उत्पन्न व उत्तेजित होणाऱ्या आंतरिक प्रेरणा, इच्छा वगैरे प्रस्थापित मूल्यांच्या व मानदंडांच्या विरुद्ध किंवा विसंवादी असल्यास त्यांना ⇨अबोध मनामध्ये दाबून टाकते, त्यांचे ⇨निरोधन, दमन करते. ह्या दमन केलेल्या प्रेरणा केव्हा केव्हा उफाळून वर येतात व वर्तनात प्रकट होतात. अशा वेळेला पराहम् पश्चात् अवलोकनाने त्या वर्तनाचे मूल्यांकन करतो व व्यक्ती लज्जेचा किंवा शरमेचा अनुभव करते. काही विकृतिजनक कारणांमुळे काही व्यक्तींमध्ये ही सारासार बुद्धी विकास पावत नाही. त्यांच्यात पराहम् उचित आकार घेत नाही. अशा व्यक्तीला ‘सायकोपॅथ’ किंवा ‘विकृत मनाची’ म्हणतात. अशा व्यक्तीला कधीच, कशाचीच लाज वा शरम वाटत नाही. [⟶ अपसामान्य मानसशास्त्र मनोविश्लेषण].


व्यक्ती कोणती मूल्ये व मानदंड आत्मसात करते, ते मुख्यत्वे ती व्यक्ती ज्या समाजात राहते त्यावर अवलंबून असते. मानवशास्त्रज्ञ व समाजलक्षी मानसशास्त्रज्ञ ह्या मूल्यांच्या व मानदंडांच्या समाजसापेक्षतेवर बोट ठेवतात. निरनिराळ्या समाजांची, सांस्कृतिक समूहांची, ज्ञातींची मूल्ये व मानदंड निरनिराळी असतात. उदा., ब्राझीलच्या जंगलात राहणाऱ्या वाकैरी या जमातीच्या लोकांना नग्नावस्थेत वावरण्यात काहीच वावगे वाटत नाही त्याची त्यांना शरम वाटत नाही पण अन्न खाताना मात्र त्यांच्यातील प्रत्येक जण स्वतःचे अन्न घेऊन दुसरे कोणी पाहणार नाही अशा आडोशाला, एकांत जागी जाऊन खातो व त्याला खाताना कोणी पाहिले, तर तो हातातील अन्न शरमेने खाली टाकून देऊन उपाशी राहतो. मानदंडांच्या बाबतीत समाजासमाजांमध्ये भिन्नता आहेच पण एकाच समाजातही परिस्थितीसापेक्षतेप्रमाणे भिन्नता आहे. उच्चभ्रू स्त्रीस समुद्रास्नान करताना किंवा पोहोण्याच्या तलावावर पोहोण्याच्या कपड्यात वावरताना संकोच वाटत नाही पण त्याच स्त्रीला दिवाणखान्यात किंवा हमरस्त्यावर त्या पोषाखात दिसणे लज्जास्पद वाटते. पुरुष घरात अंतर्वस्त्रे घालून निःसंकोचपणे वावरतो, परंतु रस्त्यावर काही कारणाने त्याची बाह्यवस्त्रे सुटून जाऊन अंतर्वस्त्रे उघडी पडल्यास शरमेने मान खाली घालतो.

भारतीय रससिद्धांतात लज्जेला शृंगाररसाचा ‘अनुभाव’ तसेच संचारी वा ‘व्यभिचारी भाव’ म्हटले आहे. अनुभाव म्हणजे आलंबन व उद्दीपन विभावांच्या योगे उत्पन्न झालेले मानसिक भाव शरीरावर व्यक्त वा प्रकट होणे. म्हणूनच ‘व्रीडा’ वा ‘लज्जा’ हा भाव रतिभावनेचे शारीरिक सूचन वा प्रकटीकरण होय. प्रेमविकाराच्या प्रक्रियेत लज्जा ही भावना आशा, चिंता, आशंका, औत्सुक्य ह्यांसारख्या भावनांप्रमाणे येते आणि जाते म्हणून ती संचारी वा व्यभिचारी भावही ठरते. प्रेयसीच्या मनात उदित झालेल्या प्रेमभावनेची सूचना लज्जेद्वारा मिळते. अनुभावास पश्चातवर्ती भाव म्हणजे कार्यरूप मानले आहे. लज्जेवरून प्रेयसीच्या मनातील प्रेमभावनेची खुण प्रियकरास पटते आणि त्याद्वारे प्रियकराच्या मनातही प्रेमभावना उदित होते. म्हणजे लज्जा हा अनुभाव प्रेयसीच्या बाबतीत कार्यरूप, तर प्रियकराच्या बाबतीत कारणरूप ठरतो. [⟶ रससिद्धांत].

संदर्भ : 1. Holt, E. B. The Freudian Wish and Its Place in Ethics, New York, 1915.

           2. James, William, Principles of Psychology, Vol. II, New York, 1890.

           3. McDougall, William, An Introduction to Psychology, London, 1913.

भोपटकर, चिं. त्र्यं.