लंघन : अतिस्थूल व्यक्तीत, आम व कप, पित्त दोष वाढल्यामुळे होणाऱ्या रोगांत, तसेच आमादिकांचा संबंध असलेल्या वात दोषाने झालेल्या रोगांत लंघन आवश्यक असते. लंघन म्हणजे शरीराला लाघव-हलकेपणा आणणारे, शरीरात गरजेपेक्षा अधिक प्रमाणात वाढलेले मलदोष-धातूपधातू कमी करून हलकेपणा आणणारे. कमी करण्याचे दोन प्रकार आहेत.

शोधन : दोषादी शरीरातून एकदम काढून टाकणे याला शोधन म्हणतात. रेच, वांती इ. करणारी औषधे देऊन रेच, वांती वगैरेंमधून दोषादी घालविणारे शोधन.

शमन : दोषादींना शोधनाने एकदम बाहेर न काढता आतल्या आत त्यांना पचवून कमी करणारे शमन होय. 

शोधनाचे प्रकार : हे पाच आहेत. निरुह, वमन, शरीररेचक, शिरोरेचक व रक्तस्त्राव. निरूह मलाशयातील वातभूयिष्ट मलदोषांना, वमन आमाशयातील कफप्रधाने दोषांना, शरीररेचक पित्ताशयातील आणि पक्वाशयातील पित्तभूयिष्ट मलदोषांना, शिरोरेचक डोक्यातील दोषमलांना व रक्तस्त्राव धातूमधील दोषांना बाहुल्याने घालवितात. शोधन मलदोषाबरोबर अनावश्यक धातुघटकांनाही बाहेर घालविते.

शमनाचे प्रकार : हे सात आहेत. पाचन, दीपन, क्षुधा, तहान, व्यायाम, आतप व मारुत. पाचन : आहार व दोष पचविण्याला शरीराला, अग्नीला मदत करणारी औषधे व उपचार. दीपन : अग्नी उत्तेजित व बलवान करणारी-अग्निकर औषधे व उपचार. क्षुधा : भूक वाढविणे. याकरिता उपवास करणे. याला लंघन असेच म्हणतात. अग्नीला बाहेरून अन्नरूपी इंधन देण्याचे बंद करून शरीरातील दोष पचविण्याला अवसर देणे. तहान : शरीरात आर्द्र, जलीय द्रव्ये, दोष, कफ अधिक झाल्यास पाणी न पिणे, तहान निर्माण करणे, बाहेरून पाणी न देता आतले पाणी पचविण्याला व बाहेर घालविण्याला संधी देणे. व्यायाम : शरीराची हालचाल करून दोषांचा क्षय घडवून आणणे. आतप : सूर्यकिरणांच्या प्रकाशाने, उष्णतेने स्त्रोतसे विस्तृत करून बाह्य शरीरातील पचन वाढवून दोष कोठ्यात नेणे व घाम हा मल बाहेर काढणे. मारुत : बाह्य शरीरातील पित्तभूयिष्ठ दोष अंगावर वारा घेऊन कमी करणे. अशी भिन्न भिन्न स्थानी ही शमने कार्ये करतात.

पाचक द्रव्य आम, दोष यांवर कार्य करते. दीपन आमाशय, ग्रहणी यांवर-अग्नीवर क्षुधा, तृषा यांचे अग्नीवरच कार्य होते व्यायामाचे कार्य संधी, मांस, मेद, रक्त व हृदय, फुप्फुस यांवर आणि आतप व मारुत यांचे दोषशमन कार्य बाह्यत्वचा व स्त्रोतसे यांवर होते.

आणखी एक शमन : वरील शमने शरीरात लाघव निर्माण करतात पण शरीरात वात व वातपित्त वाढले, तर पौष्टिक आहार व औषधोपचार द्यावे लागतात, त्याला बृंहण शमन म्हणतात.

जोशी, वैणीमाधवशास्त्री