विरुद्ध : (आयुर्वेद). जे द्रव्य दोषांना उचंबळविते पण बाहेर काढीत नाही ते द्रव्य म्हणजे विरुद्ध होय. वामक, विरेचक इ. शोधन द्रव्ये दोषांना उचंबळवितात व बाहेर काढतात. देशविरुद्ध, कालविरुद्ध असे विरुद्धाचे अनेक प्रकार आहेत. उदा., झाडी, पाणी पुष्कळ असलेल्या प्रदेशात स्निग्ध, शीतादी आहार आणि जल अल्प असलेल्या प्रदेशात रूक्ष, उष्ण, तीक्ष्ण आहार घेणे हे विरुद्ध आहे. विरुद्ध व विपरीत असे दोन शब्द एकाच अर्थाचे भासतात पण त्यांचे अर्थ अगदी भिन्न आहेत. विपरीत म्हणजे उलट. उष्णाच्या विपरीत म्हणजे उलट थंड होय, पण स्निग्ध प्रदेशात त्याच देशाच्या गुणाचे पदार्थ खाणे म्हणजे समगुणी खाणे विरुद्ध होय. येथे विरुद्ध म्हणजे विपरीत नाही. हिवाळ्यांत थंड पेये पिणे, आइस्क्रिम खाणे विरुद्ध होय. अनिष्ट परिणाम : नपुंसकत्व, संततीमध्ये दोष, अंधत्व, जलोदर, उन्माद, भगंदर, पांडू इ. अनेक रोग होतात.

पहा : पथ्यापथ्य.

जोशी, वेणीमाधवशास्त्री