सृष्टि व मानव : (आयुर्वेद). जीव हा सृष्टीतील एक द्रव्य आहे. तो त्या सृष्टीचाच एक घटक आहे. जीवाचे सर्व भाव व सर्व घटक सृष्टीतीलच असतात. जड म्हणजे अचेतन व सजीव म्हणजे सचेतन असे सृष्टीचे दोन भाग असतात. एक जड व दुसरा आध्यात्मिक असे सजीवाचेही दोन भाग असतात. दोषधातुमलादी पंचमहाभूतांचे विकार म्हणजे जड तर बुद्घी, मन, अहंकार इ. आत्म्याचे विकार आहेत.

शरीरातील व सृष्टीतील पंचमहाभूतविकार गुण व कर्मे : आकाशाचे विकार– शब्द, कर्णेंद्रिय, हलकेपणा, सूक्ष्मपणा व वेगळे करणे. वायूचे विकार–स्पर्श, स्पर्शेंद्रिय, रुक्षता, प्रेरणा करणे, धातूंची रचना करणे व शरीर हालचाली. अग्नीचे विकार–रूप, नेत्रेंद्रिय, प्रकाश, पचन व उष्णता. जलाचे विकार–रस, रसनेंद्रिय, शीतता, मृदुता, स्नेह व जलीय द्रव्ये. पृथ्वीचे विकार–गंध, घ्राणेंद्रिय, जडपणा, स्थिरत्व व कठीणपणा.

आध्यात्मिक विकार : जसे सृष्टीमध्ये सर्वव्यापी ब्रह्मतत्त्व तसेच जीवशरीरात आत्मा. सृष्टीमध्ये प्रजापती, इंद्र, आदित्य, रुद्र, सोम, वसू, आश्विनी, मरुत् हे अनुक्रमे, तर जीवामध्ये मन, अहंकार, खाणे, रोष, प्रसाद, सुख, कान्ती व उत्साह ह्या रूपाने असतात. विश्वदेव हे स्पर्श व स्पर्शादी इंद्रियांचे अर्थ होत. त्याचप्रमाणे अंधःकार हा मोह, तेज हे ज्ञान, सृष्टीची उत्पत्ती ही गर्भधारणा, वायू हा प्राण, आकाश ही शरीरातील पोकळी, कलियुग ही रुग्णावस्था आणि युगाचा अंत म्हणजे मरण होय. असा सृष्टी व जीव यांचा परस्पर घटकांच्या दृष्टीने आत्मीय संबंध आहे.

गुणसाम्य : गुरु-लघू, शीत-उष्ण, स्निग्ध-रुक्ष, मंद-तीक्ष्ण, स्थिर-चल, मृदू-कठीण, विशद-पिच्छिल, श्लक्ष्ण-खर, स्थूल-सूक्ष्म, घट्ट-पातळ हे परस्परविपरीत २० गुण शरीरात व बाह्य सृष्टीत असतात. हे पंचमहाभूतांचे व त्यापुढे निर्माण झालेले, शारीरिक स्थूल गुण होत. यांनाच सामान्य गुण असेही म्हणतात.

इंद्रिय गुण : शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे पाच इंद्रियांचे गुण होत. इच्छा-द्वेष, सुख-दुःख, चेतना, घृती, बुद्घी, स्मृती व अहंकार हे अध्यात्म गुण होत.

कर्मसाम्य : विविध शारीरिक क्रियांचे सृष्टीतील महाभूतांच्या क्रियेशी असलेले साम्य. शरीरातील सर्वक्रिय धातुपरिपोषण, मलविभाजन इ. क्रिया वायूच्या होत. आकर्षण, जोडणे इ. क्रिया कफाच्या म्हणजेच पृथ्वी व जल महाभूतांच्या आणि पचनादी कर्मे पित्ताची म्हणजेच अग्नी महाभूताची होत.

गुणकर्मांचा विशेष : ही गुणकर्मवान द्रव्ये शरीरात त्यांच्या गरजेपेक्षा अधिक झाली की त्यांचा द्वेष आणि कमी झाली की त्यांची इच्छा निर्माण होते. शरीर क्षणोक्षणी झिजत असल्याने ज्या द्रव्यांच्या ज्या गुणकर्मांचा क्षय होतो त्या गुणकर्मांच्या द्रव्यांची इच्छा आणि आहारादी रूपाने जी द्रव्ये शरीरात गरजेपेक्षा जास्त झाली त्यांच्या गुणकर्मांच्या संचयाने त्यांचा द्वेष निर्माण होतो. ही दोन्ही प्रकारची द्रव्ये शल्यस्वरूपच होतात.

द्रव्यांचे ज्ञान व व्यक्तीकरण : शरीराला ह्या द्रव्यांचे ज्ञान व व्यक्तीकरण त्या द्रव्यांच्या गुणकर्मांच्या रूपानेच होते. शरीर ते इच्छा-द्वेषरूपाने व पुढे द्रव्यतः देखील व्यक्त करते. रुक्ष द्रव्यांचे न्यूनत्व असताना त्या द्रव्यांची इच्छा होते व शरीर रुक्ष गुणाच्या विपरीत म्हणजे स्निग्ध दिसते तसेच ती द्रव्ये अधिक झाली असताना त्यांचा द्वेष निर्माण होतो आणि पुढे शरीर बाह्यतः रुक्ष दिसू लागते.

शरीराची भाषा : शरीरात होणारे द्रव्यगुणांचे न्यूनाधिक्य शरीर इच्छा-द्वेष व प्रत्यक्ष गुणकर्म यांनी व्यक्त करते. ती शरीराची भाषा होय. कडड व कट्ट ह्या दोन नादांनी जशी तारेची सर्व भाषा तयार होते, तशी ह्या गुणकर्मांनी शरीराची सर्व सांकेतिक भाषा तयार होते. ही चिन्हेच रोग लक्षणे होत. आरोग्यात ही होत नाहीत. आत्मा प्रसन्न असतो. सुखसंवेदनांचा प्रवाह सतत चालू असतो. त्या सुखसंवेदना हीच आरोग्याची दर्शक भाषा होय.

 

मानवाची नित्याची गरज : मानवशरीर कर्माने नित्य झिजत असते. झीज भरून काढण्याची आवश्यकता असते. जे घटक झिजून क्षीण झाले त्यांचीच भरपाई होणे आवश्यक असते. म्हणून त्यांच्या समान गुणकर्मांच्या द्रव्यांची आकांक्षा धातुघटकात असते व जशी मागणी धातुघटकांकडून होते त्यानुसार तशी इच्छा मनाकडून व्यक्त होते. ती द्रव्ये भोवतालच्या सृष्टीतून घेतली जातात, म्हणून खानपानादी व्यवहार निर्माण झाले. द्रव्यांच्या ठिकाणी जी गुणकर्मे असतात, तीच शरीरामध्ये असतात. म्हणून त्यांची वृद्घी बाह्य सृष्ट द्रव्यांनी होते व झीज भरून निघते परंतु ही द्रव्ये गरजेपेक्षा अधिक घेतली तर त्या द्रव्यगुणकर्मांची शरीरात वृद्घी होते व कमी घेतली तर त्यांचा क्षय होतो. शरीराचे साम्य, वृद्घी व क्षय ही सृष्ट द्रव्यांवर अवलंबून आहेत.


सृष्टीतील जड द्रव्ये व मानवाचे शारीर-मानस भाव : सूर्यावर काळे डाग आले की, पृथ्वीच्या वातावरणावर परिणाम होतात. अगस्त्य ताऱ्याच्या रात्रीच्या प्रकाशकिरणांनी पाणी निर्विष होते. याप्रमाणेच मानवाच्या शारीर-मानस भावांवरही ग्रह-नक्षत्रांचे परिणाम होतात. शरीर आरोग्य व रोग आणि मनाचे बुद्घी, भावना, विचार इ. विकार यांवर अनुकूल-प्रतिकूल परिणाम होत असतात. अमावस्या व पौर्णिमा यांदिवशी अपस्मार-उन्माद यांचे वेग येतात किंवा वाढतात तसेच श्वास, त्वचेवरचे इसबही वाढते. रोगाच्या साध्यत्वाच्या अनुकूल कारणात अनुकूल ग्रह सांगितले आहेत.

सृष्टी व मानव यांचे परस्पर आक्रमकत्व : लोक व पुरुष यांचे परस्परसाम्य आहे परंतु ते परस्परांवर आक्रमक वृत्तीचे आहे. महाभूते हीच आपापसात आक्रमक स्वभावाची आहेत. त्यांच्या मानाने अगदी क्षुद्र असलेल्या जीवांवर आक्रमण करून त्यांना आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात परंतु मानव हा नगण्य असा क्षुद्र जीव असला, तरी मोठा ताठर आहे. आक्रमक असलेल्या प्रचंड व विशाल महाभूतांपेक्षाही महान महत्त्वाकांक्षेने मानव भारलेला आहे त्यांच्याशी सातत्याने संघर्ष करणारा आहे. तो आपणास अनुकूल असलेल्या महाभूतविकारांनाच अन्नपानरूपाने घेऊन खाऊन पचवून टाकतो व त्यांना आपल्या शरीराशी आत्मसात करतो. त्यांना आपल्या शरीराचे घटक बनवितो आणि त्यांच्याशी संघर्ष करताना झिजलेले शरीर नवीन घटक निर्माण करून बलवान होऊन त्यांच्या प्रतिकाराला सज्ज राहतो. हा क्षुद्र मानव जे महाभूत त्याच्यावर आक्रमण करते त्याच्याविरुद्घ स्वभावाच्या महाभूताचा उपयोग करून घेतो. जसे ग्रीष्म ऋतूत उन्हाळा तीव्र होत जातो, तसा मानव भोवताली पाणी, झाडी असलेल्या थंड हवेच्या स्थळी जातो. तेज महाभूताला टाळतो. सावलीत प्रकाश नसलेल्या थंड जागेत जातो. थंड पाणी अंगावर शिंपडणे, त्याने स्नान करणे, त्यात पोहणे इ. प्रकारांनी शरीरावरील त्याचा परिणाम नाहीसा करतो. पुन्हा उष्णतेने शरीर जसे तापत जाते तसे शरीरातील घामरूपी जलद्रव्य त्वचेवर आणून तेज महाभूत व शरीर यांच्यामध्ये आप महाभूत उभे करून तेजाचा प्रतिकार करतो. या कालात बलनाश फार होतो म्हणून थंड, बलवर्धक, गोड, हलकी व पातळ द्रव्ये पोटात घेऊन शरीरातील उष्णता कमी करून अग्नी महाभूताचा प्रतिकार करण्यात यशस्वी होतो. पंचमहाभूते बुद्घिमान नाहीत, परंतु मानव बुद्घिमान आहे, म्हणूनच मानव व त्याचे शरीरघटक आपल्या बुद्घिप्रभावाने आयुष्यभर त्या महाभूतांच्या आक्रमणाशी झगडत राहतात.

 

अखेर पंचमहाभूतांचाच विजय : या संघर्षात पंचमहाभूते आपले दोषरूपी सैनिक जीवाच्या शरीर प्रांतात सर्वत्र पेरतात व एकेक अवयव रोगरूपाने ताब्यात घेऊन उपद्रवाने त्यास हैराण करतात आणि रोगाच्या असाध्य अवस्थेने जीवाला निस्त्राण करून अखेर रिष्ट (विनाशक) चिन्हे निर्माण करून चिन्हांच्या द्वारे शरणोन्मुख बनवितात. ही पंचमहाभूते मन, बुद्घी इत्यादिक आध्यात्मिक घटकांना उडवून लावून त्या पंचभौतिक घटकांना आपल्या ताब्यात घेतात. ह्याच घटनेस आपण मृत्यू किंवा ‘पंचत्वं गतः’ (पंचत्वात विलीन होणे) असे म्हणतो.

संघर्षाचा दुसरा प्रकार : सृष्टीमध्येच सजीव तिच्यापासून वेगळा होऊन राहिला. सृष्टीच्या आक्रमणाचा प्रतिकार करीत रोगरूपाने जरी आपल्यावर सृष्टीचा साक्षात ताबा होऊ दिला नाही, तरी तो कालपक्व म्हणजे वृद्घ होतो. त्याचे घटक या संघर्षात थकत जातात. याचाच अर्थ तोच थकत जातो व क्रमाने थोडा थोडा मरतो. या क्रमाने श्वास घेण्याचे सामर्थ्य संपुष्टात येते, तेव्हा घेतलेला श्वास शेवटचाच ठरतो. ह्याच वेळी आध्यात्मिक घटक सोडून गेलेले असतात.

मानव आणि पृथ्वी : पृथ्वी हा मानवाचा आधार आहे. आप, तेज व वायू यांच्यापासून रक्षण व्हावे, म्हणून तो पृथ्वीचा उपयोग करून घेतो. पाण्यापासून उद्‌भवणाऱ्या संकटांच्या मर्यादेपलीकडे वसती करतो. वायू व तेजाच्या प्रतिकारार्थ घरे बांधण्यास विटा, चुना, सिमेंट, लाकूड, लोखंड इत्यादींच्या रूपाने पृथ्वीचाच उपयोग करून घेतो.

शरीरघटक : पृथ्वी मानवाच्या शरीराचा घटक बनून हाडे अवयवरूपाने त्याला आकार देते. केश, नख, लव, श्मश्रू, दात, शिरा, स्नायू व धमनी हे पदार्थ पार्थिव होत. गर्भाचे पोषण होत असताना जर पृथ्वीचे पोषक अंश रसात अधिक असले, तर स्वभावतःच ते शरीर पार्थिव म्हणजे पृथ्वीमहाभूताच्या प्रकृतीचे होते. ते मोठे, उफाड्याचे, धिप्पाड, भरदार व स्थिर असते. ती व्यक्ती क्षमाशील असते. तसेच निसर्गतःच पुरुषशरीर हे स्त्रीशरीराच्या तुलनेने अस्थिधातुप्रधान म्हणजे पृथ्वी घटकप्रधान असते. त्याला अनुसरून त्याचा स्वभाव स्त्रीस्वभावाच्या मानाने कडक व कठोर असतो.

 

अस्थिसार लक्षणे (सार म्हणजे गाभा) : पार्थिव पृथ्वी : पृथ्वी ही पार्थिव आहे, तरी तिचा काही भाग जलगुणभूयिष्ठ (जलगुण विपुल असलेला) तर काही भाग अग्निगुणभूयिष्ठ असा असतो. काही भागांत पृथ्वीचे स्वतःचे गुण अधिक प्रमाणात असतात. जी भूमी खडकाळ, काळसर किंवा काळी स्थिर म्हणजे खूप जड मातीची असून, मोठे वृक्ष व विपुल धान्ये निर्माण करणारी असते, अशी जमीन पार्थिव होय. या भूभागातील मानवावर, वातावरणावर तसेच धान्य व पाणी यांवर त्या परिस्थितीचा परिणाम त्यांच्या गुणकर्माप्रमाणे होत असतो.

 

इतर भूमिविभाग : ज्या भूमिभागात पाणी व वनस्पती पुष्कळ असतात त्याला आनूप, कमी असतात त्याला जांगल आणि मध्यम असतात त्याला साधारण देश म्हणतात. आनूप देशात जांगल गुणांच्या आहारविहाराचा व जांगल देशात आनूप गुणांच्या आहारविहाराचा सतत उपयोग करावा लागतो. साधारण देशात सर्वसाधारण आहारविहार उपयुक्त होतो. [→ स्वस्थवृत्त].

 

पार्थिव द्रव्यांचा मानवी शरीरात उपयोग : मानव प्राधान्याने वनस्पती व प्राणी यांचा आहारात उपयोग करतो. त्याच्या शरीरातील पार्थिव घटक या आहारातून येत असतात. जे जाळले असता त्यांत पार्थिव द्रव्ये, क्षार, लोह इ. आढळतात. यावरून पार्थिव द्रव्ये त्यांच्या गुणकर्माप्रमाणे उपयोगात आणता यावीत म्हणून प्रयत्न झाले. या द्रव्यात मुख्य दोष कठिणपणा आहे व त्यामुळेच ते शल्यसूत होते. म्हणून त्यांचे शल्यत्व (बोचण्याचा गुण) नष्ट करणे गरजेचे असते. याकरिता भस्मप्रक्रिया अस्तित्वात आल्या व शल्यत्व पूर्ण नाहीसे झाले की नाही हे पाहण्याकरिता जलतरत्व, रेखापूर्णता इ. परीक्षाही प्रचारात आल्या. काव, मीठ, चुना इ. निःशल्य पार्थिव पदार्थांचा मानव आहारात किंवा तसाच उपयोग करतोच.

सात्मीकरण : या पार्थिव घटकांचे आमाशयात जाताच शरीराकडून स्वागत व्हावे म्हणून इष्ट अशा तूप, त्रिफळा इ. द्रव्यांचे मिश्रण (अमृतीकरण) करून शिवाय ते पोटात घेताना मध, तूप, गूळ इ. आहार्य द्रव्यात कालवून (अनुपान) घेण्याची पद्घत आहे. त्यामुळे शरीरात पचनही चांगले होऊन त्याचे सात्मीकरण व्यवस्थित होते.


मानवकर्म आणि पृथ्वी : मानवी शरीरातील पार्थिव घटकांनी गुरुत्व हा गुणधर्म निर्माण केला. या गुणधर्मामुळे मानव पृथ्वीपासून थोडाफार दूर अवकाशात गेला, तरी तो पृथ्वीवरच येतो. त्याला पृथ्वीचे सान्निध्य वा निकटत्व सोडता येत नाही. ते सोडण्याचा त्याने प्रयत्न केल्यास त्याला पृथ्वीशी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे त्याला श्रम होतात. जो अवयव तिच्यापासून दूर असतो, त्याला स्वतःजवळ आणण्याचा ती प्रयत्न करते व त्याला ओढते. त्या ओढीविरुद्घ प्रयत्न करून त्या अवयवाला राहावे लागते. अशा प्रकारचे श्रम अधिक काळ झाले तर तो थकतो. उदा., चालणे हाही एक तिच्याशी संघर्षच आहे. पाऊल वर उचलण्यास व ते उचललेले पुन्हा जमिनीवर ठेवण्यास श्रम होतात, त्यात शरीराची शक्ती क्षीण होते. कारण तसे करताना त्याचे शारीरघटक (पार्थिव व आप्य) खर्च होतात. हे करताना त्या सांध्यांची हालचाल होऊन व तेथे अधिक झीज होते. धावणे वा पळणे यांत झगडा, घर्षण, झीज व श्रमही जास्त होतात, म्हणून त्यामुळे येणारा थकवाही जास्त असतो. शरीर आडवे व तेही पाठीवर असताना होणारा ताण कमीत कमी असतो. त्यापेक्षा क्रमाने अधिक ताण कुशीवर असणे, बसणे, उभे राहणे, चालणे व धावणे यांत होतो. ओझे हे पार्थिव द्रव्य घटित असते. ते अंगावर घेणे, ढकलणे व ओढणे यांत संघर्ष, श्रम आणि थकवा ही क्रमाने आहेतच. अंगावरचे ओझे शरीराला पृथ्वीकडे ढकलते व मानवी प्रयत्न त्याला पृथ्वीपासून दूर ठेवण्याचा असतो.

उपचार : पार्थिव प्रकृतीच्या भूतत्त्व व्यक्तींना मृदू, थोडा स्निग्ध, हलका व उष्ण असा म्हणजे पार्थिव गुणकर्मांच्या विपरीत आहारविहार उपयुक्त असतो तसेच व्यायाम म्हणजे पृथ्वीशी संघर्षही उपयुक्त असतोच.

 

मानव व जल : पृथ्वीमहाभूतापेक्षा जलमहाभूताशी मानवाचा संपर्क कमी आहे, तरी सुद्घा तो मानवाच्या दृष्टीने अपरिमित आहे. मानवी जीवनाला सर्वच पंचमहाभूतांची गरज आहे परंतु दैनंदिन जीवनात त्याच्या अंतःशरीराला अधिक वेळा जलाचीच गरज असते. अन्नातील पोषक घटक शरीरात योग्य ठिकाणी पोहोचविण्यास जलाचीच आवश्यकता असते. जलाचा दिसणारा गुण ‘द्रव’ हा आहे. शरीराचे परिणत रसधातू व रक्तधातू तसेच सर्व परिणाममापकमान धातू द्रवच आहेत. हेच रसधातू व रक्तधातू आहारातील पोषकांश व प्राणवायू (ऑक्सिजन) इतर शरीरधातू व अवयव यांच्या घटकांना पोहोचवितात.

शारीर व जलज मानवी घटक : रस, रक्त, स्नेह, द्रव व रसनेंद्रिय हे शारीरघटक-आणि शीतत्व व मृदुत्व हे गुण जलज होत.

जलीय रसधातू कार्य : शरीराची उत्पत्ती, अभिवृद्घी, प्राणाचा शरीर घटकाशी असलेला संबंध ठेवणे आणि तृप्ती, पुष्टी व उत्साह निर्माण करणे हे जलीय रसधातूचे कार्य आहे.

जलीय द्रव्याचे आणि जलगुणभूयिष्ठ मानवाचे गुण : द्रव, स्निग्ध, जड, मंद, मऊ व बुळबुळीत षड्‌रसांचे उत्कटत्व असणे हे आप्य द्रव्याचे गुण शरीरात ओलावा, स्राव, स्नेह व मऊपणा ठेवतात. रसधातू समरवान असला तर रससार लक्षणे व आणखी जलीय गुण अधिक चांगले असतात.

रससार लक्षणे : कफप्रकृती : ही जलतत्त्वीय आहे. जन्मतः जलमहाभूताचे गुण ह्या प्रकृतीच्या माणसात जास्त असतात.

जलप्रकृती वा वारुण : ही व्यक्ती पिंगट डोळ्यांची, करड्या केसांची, पाण्यात विहार करणारी, क्लेश नसलेली, कामे करणारी, सहनशील, शूर व धैर्यवान, गोड बोलणारी, स्वकीयांस रागावणारी व कृपा करणारी, शुची राहणारी व अशुचीचा द्वेष करणारी अशी असते.

मानव व जलीय देश : पाणथळ, आनूप देश यांत झाडे पुष्कळ तसेच पाणीही भरपूर असते. याचा मानव प्राण्याच्या शरीरावर अनिष्ट परिणाम होतो. कफदोष शरीरात गरजेपेक्षा अधिक राहतो व त्याच दृष्टीने लक्षणे असतात. [→ दोषधातुलविज्ञान].

मानव व जलीय काळ (पावसाळा) : याच्याही अनिष्ट परिणामांमुळे वातादी तीनही दोष वाढतात. [→ स्वस्थवृत्त].

मानव व जल : पाणी हे मानवाचे जीवन आहे. ते थंड व तृप्तिदायक शरीराला पोषक, आनंददायक इ. गुणांचे आहे. इतर द्रव्यांचा वापर पूर्णपणे टाळता येऊ शकतो व तो पाळताही येतो परंतु जलाचा निषेध असूनही जर तहान असेल, तर जल नाकारता येत नाही. ते घ्यावेच लागते.

 

मानवकर्म व जल : पाण्याद्वारा झालेल्या आक्रमणाच्या प्रसंगी पाण्याशी संघर्ष करूनच पार पडावे लागते. पोहणे हा पाण्याशी संघर्षच होय. व्यायाम म्हणून हा पाण्याशी असलेला संघर्ष मानवच उत्पन्न करतो. पोहण्याची कला व तिच्यापासून मिळणारा आनंद प्राप्त करण्यासाठी मानव पाण्याच्या आक्रमणाचा कमीत कमी धोका पत्करून हा संघर्ष उत्पन्न करतो. आद्यवात (मांड्यांतील वातरोग) या रोगात हा व्यायाम उपचार म्हणूनच सांगितला आहे.

 

जलाशी इतर महाभूतसंपर्क : जलाशी इतर महाभूतांचा संपर्क बऱ्याचदा येतो. संपर्कात आलेल्यांचे सूक्ष्म गुणधर्मही जलतत्त्व चटकन घेते. पावसाचे पाणी शुद्घ असते परंतु सुरुवातीच्या पावसाचे पाणी हे उन्हाळ्यातील वातावरणात पसरलेल्या धुळीत मिसळते व त्यामुळे ते अशुद्घ होते. हाही पृथ्वीमहाभूताशी जलाचा संयोग होय पार्थिव (भूतत्त्व) गुणाच्या जमिनीवरील पाणी खारट व आंबट जलभूयिष्ठ जमिनीवरील पाणी गोड तेजोभूयिष्ठ जमिनीवरील तिखट व कडू वातभूयिष्ठ जमिनीवरील तुरट आणि आकाशभूयिष्ठ जमिनीवरील अव्यक्त रसाचे व श्रेष्ठ असते. आकाश हे अव्यक्त म्हणून तत्संबंधी जलदेखील अव्यक्त रसाचे असते. इतर महाभूते व्यक्त रसाची म्हणून तत्संबंधी जलदेखील त्या त्या महाभूतरसाचे होते. मानवाचा पृथ्वीशी तसेच महाभूतांचा पृथ्वीशी व पार्थिव द्रव्यांचा जसा संबंध मानवी शरीराशी येतो व मानवावर जसे त्याचे इष्टानिष्ट परिणाम होतात, तसेच जल, इतर महाभूतसंबद्घ जल व जलीय द्रव्ये यांच्याशी संबंध येतो व त्यांचे इष्टानिष्ट परिणाम मानवावर होतात.


भिन्नभिन्न पार्थिव द्रव्यांचा संबंध असलेले जल : सोने, चांदी इ. धातूंच्या भांड्यातील जल गुणधर्माने परस्पर भिन्न असते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यासाठी इतरांच्या मानाने श्रेष्ठ असते. मडक्यातील पाणी देखील तसेच श्रेयस्कर असते. पाणी पिताना आवश्यकतेनुसार पाण्यावर खालील संस्कार करून ते वापरावे. सोने, रुपे, दगड व मातीचे ढेकूळ ही अग्नीने तापवून पाण्यात विझवून ते पाणी उष्ण किंवा थंड करून प्यावे. वरील दोन्ही संस्कारांनी पाण्यात त्यासंबंधी द्रव्याचे किती सूक्ष्म घटक पाण्यात येतात व शरीरावर आपले कार्य करतात, याचा अनुभव आयुर्वेदीयांनी घेऊन पाहिला आहे.

जलीय द्रव्यसंबद्घ जल : सूर्यकिरणांनी तापलेले, चंद्र किंवा नक्षत्रे यांच्या किरणांनी संबद्घ झालेले पाणी गंगाजलासारखे श्रेष्ठ होते. चंद्रकांत मण्यामध्ये चंद्रकिरण शिरल्यामुळे उत्पन्न झालेले पाणीही तसेच होते. अगस्त्य तारा रात्री ज्या भूभागात असतो त्या प्रदेशातील पाणी निर्विष होते.

अग्निसंबद्घ जल : अग्नीवर तापविलेले पाणी व उन्हात तापविलेले पाणी भिन्न गुणकर्मांचे होते. तापवून अर्धे, पाव व एक-अष्टमांश उरलेले पाणीही भिन्न गुणकर्माचे होते. उष्णतेच्या कमी-अधिक कालप्रमाणाचेही परिणाम लक्षात घेतले जातात.

मानव व तेज : या महाभूतामुळे मानवाला तेज प्राप्त होते. ते शरीरात अग्निरूपाने वसते. पचन हे आपणास उपयुक्त अंश घेण्याकरिता आहे. अग्नीचे बल उत्तम असले की, बाह्य द्रव्ये स्निग्ध इ. गुणांची असली तरी ती पचवून आत्मसात करता येतात. तेज पित्तरूपाने शरीरात आहे.

 

अग्नी : पित्ताने युक्त अग्नी असला, तर तो तीक्ष्णाग्नी होतो. तीक्ष्णाग्नी हा विकार होय. सम म्हणजे शरीराला आवश्यक असे व योग्य प्रमाणातील अन्न चांगले पचवून आत्मसात करणाऱ्या अग्नीला समाग्नी म्हणतात. सर्व दोषधातुमल, उपधातू, अवयव, इंद्रिये, ज्ञान इत्यादींचे पचन करणारे अनेक अग्नी शरीरात आहेत. मानवी शरीरात तेज व तेजयुक्त द्रव्ये उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, रुक्ष, लघू, विशद (विरविरीत) इ. गुण वाढवितात. दाह, वर्ण, पचन, प्रभा व प्रकाश निर्माण करतात आणि अशी माणसे रूपसंपन्न व तेजस्वी असतात.

रक्तसार लक्षणे :रक्तधातू : मानवाचा रक्तधातू हा तेजोभूयिष्ठ आहे. त्याची लाली तेजाची आहे. रक्तधातू शरीरात प्राणवायूचा पुरवठा करतो.

पित्तप्रकृती : जन्मतः तेजमहाभूताचे अंश शरीरात आधिक्याने असतात, ती पित्तप्रकृती होय. तीमध्ये आग्नेय गुण अधिक असतात. सर्पसत्त्व, आसुरसत्त्व व मत्स्यसत्त्व ह्यादेखील आग्नेय होत.

मानव व तैजस भूमी : सहाराचा दक्षिण भाग, राजस्थान रण इ. प्रदेश उन्हाळ्यात अतिउष्ण असतात. हे आप्य (कफ) प्रकृतीला स्वास्थ्यकर असतात. असा प्रदेश आपपोषक असतो.

मानव व तैजस काळ : उन्हाळा. हा काळदेखील सौम्य घटकशोषक असतो. शरीर उष्ण करतो, तसेच आप्य प्रकृतीस अनुकूल असतो.

मानवबल व तेज : उष्णता ही मानवाला उपयुक्त खरी परंतु उष्ण देश व उष्ण काळ सामान्यतः मानवाचे बळ हरण करणारे असतात. वसंत ऋतूत व त्यापेक्षाही ग्रीष्म ऋतूत बल कमी होते. अशा वेळी शीतोपचार उपयुक्त असतात. ऊन हे अग्नी प्रदीप्त करते. हे पित्तकर असते. उन्हाच्या विपरीत छायेचे गुणधर्म असतात. प्रकाश हा हृदय व शरीर यांतील स्रोतसे (शरीराची रंध्रे) विकसित करतो. अंधःकार त्यांचे संकोचन करतो. सूर्याच्या किरणांनी तापलेले पाणी शुद्घ होते. यात उष्णता व प्रकाश यांचे, विशेषतः प्रकाशाचे, कार्य आहे. अंधःकारामध्ये निशाचरांचा संचार व उपसर्ग अधिक असतो. दिवसा प्रकाशात तो कमी असतो. वसतिस्थानात प्रकाश असावा परंतु ऊन नसावे.

तेजाचे प्रकार : उष्ण व थंड असे तेजाचे दोन प्रकार आहेत. सूर्य व मंगळ यांचे तेज उष्ण आणि चंद्र, शुक्र, गुरु, बुध तसेच नक्षत्रे यांचे तेज थंड असते. उष्ण तेज कफशामक, पित्तकारक व स्रोतसे विकसित करणारे आणि शीत तेज पित्तशामक व स्रोतसे संकुचित करणारे असते.

मानव व वायू : मानवी शरीरात वायू व वायवीय द्रव्ये लघू, शीत, खर (तीक्ष्ण), सूक्ष्म, विशद, रुक्ष व स्पर्श इ. गुण निर्माण करतात. त्याचप्रमाणे ते ग्लानी, विचार व शुद्घी उत्पन्न करतात. वायू हा अस्थी व धमन्यांमध्ये आधिक्याने असतो. शरीरातील सर्व क्रिया वायुधातूच करतो. अन्न, दोष व धातू यांचे ग्रहण, पचनाला मदत त्याचप्रमाणे त्यांचे शरीरात वहन, मलविसर्जन, हालचाल इ. सर्व क्रिया वायू करतो. इंद्रियांच्या सामर्थ्याचे व्यक्तीकरण वायूच करतो व त्यांचा नियंत्रक हाच आहे. कफ, पित्त, धातू व मल हे पंगू आहेत. मेघांची हालचाल ज्याप्रमाणे वायूने होते, त्याचप्रमाणे शरीरातील कफ, पित्त, मल इ. शारीरघटकांची हालचालदेखील शरीरस्थ वायूनेच होते. वायूच शरीरात ‘कर्तुमाकर्तुं अन्यथा कर्तुम्’ आहे. त्याला भगवानही म्हटले आहे.

 

वायूचे पचन : आहारातील वायवीय घटक फुप्फुसांत पृथक् होऊन शोषले जातात व त्यांनी प्राणापानादी वायूंचे पोषण होते.


स्वतंत्र पचनस्थान : बाह्य वायू श्वासरूपाने शरीरात घेतल्यानंतर त्याचे पचन फुप्फुसात होते. प्राणवायूचे पचन होऊन त्याचा सारभाग रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात जातो. या प्रक्रियेत वायुरूप धातुमल प्राण्याच्या निःश्वासाबरोबर बाहेर फेकले जातात आणि शुद्घ रक्त विशुद्घ होते. वायू हा सर्वकाळ सभोवताली विपुल भरलेला असल्याने त्याच्या पचनाकरिता स्वतंत्र फुप्फुस विभाग निर्माण झालेला आहे. द्रव व घन द्रव्यांकरिता पोट हे पचनस्थान आहे. घन, द्रव व वायू या सर्वांच्या पचनानंतर उर्वरित सारघटक सर्व शरीरात पोहोचविण्याकरिता रस व रक्त हृदयात नेऊन व्यानवायूने (व्यानवायू म्हणजे सर्व शरीरात फिरणारा) संपूर्ण शरीरामध्ये वाहून नेले जातात. गर्भावस्थेतच वातमहाभूतगुणांचे शरीरात आधिक्य झाल्यास वातप्रकृती होते. [→ दोषधातुमलविज्ञान]. तो मनुष्य कृश, चंचल इ. गुणांचा असतो व त्याला आनूप देश मानवतो.

सर्वशक्तिमान कर्तृत्वकारक असा वायू क्षणाक्षणाला आवश्यक आहे. तरीदेखील स्पर्शेंद्रियाला वाहत्या वायूचा जोरदार स्पर्श अनिष्ट आहे, म्हणून वसतिस्थान निर्वात असावे.

मानव व वातलभूमी : ज्या प्रांतात पाणी, वृक्ष इ. कमी असतात अशी मरुभूमी वातल (वातूळ) असते. तसेच डोंगरावरचे उंच असे स्थानही वातभूयिष्ठच असते. भोवताली जर झाडी, पाण्याचे झरे,जलाशय असतील, तर ती भूमी वातकफभूयिष्ठ असते. ही पित्तपकृतीला आणि मरुभूमी कफप्रकृतीला आरोग्यकर असते. पित्तप्रकृतीला मरुभूमी अल्प प्रमाणात आरोग्यकर असते.

 

मानव व वातलकाल : ग्रीष्म व वर्षा ऋतूंत वातद्रव्य शरीरात अधिक होते. अग्नी अबल होतो. म्हणून ग्रीष्मात लघू, स्निग्ध व द्रव तर वर्षा ऋतूत थोडा स्निग्ध, लघू व शुष्क आहार घ्यावा.

मानव व आकाश : पंचमहाभूते परस्परांपासून अगदी निराळी अशी नाहीत. पंचमहाभूतांपैकी पृथ्वी व जल ही महाभूते इतर त्रयींपासून सामान्यतः  पुष्कळ निराळी आहेत. ती एकमेकांशी निगडित, परंतु पृथक् आहेत. आपणाला पृथ्वीचा आधार आहे, तसेच वायू आणि आकाश ही आपल्याभोवती अतिनिकट एकमेकांत दूध साखरेसारखी मिसळलेली आहेत. तेजही त्या दोहोत तसेच मिसळते. ही मानवावर अगदी एकेकटी परिणाम करीत नाहीत. वायू व आकाश ह्या जोडीत वायू दिसत नाही परंतु त्याचे कार्य व अस्तित्व श्वासोच्छ्‌वास, वाहत्या वायूचा स्पर्श इत्यादींनी प्रतीत होते. आकाशाचे अस्तित्व डोळ्याला दिसते परंतु त्याचे कार्य काही समजत नाही. इतरांचे अस्तित्व आकाशातच आहे परंतु कार्य जाणिवेत येत नाही. ‘अप्रतिघात’ म्हणजे अडथळा न येणे हे आकाशाचे प्रत्ययास येणारे लक्षण आहे.

आकाशीय द्रव्यांचे गुण : ते मऊ, हलके, चिकण, सूक्ष्म, बुळबुळीत व शब्दगुणाधिक असून त्याद्वारा ते हलकेपणा, मऊपणा, पोकळी इ. निर्माण करते. शरीरातील सर्व पोकळ्या आकाशातच आहेत. जन्मतः आकाशीय घटकांचे आधिक्य असलेले शरीर आकाशीय प्रकृतीचे असते. त्या व्यक्तीचे तोंड, जिवणी, नाक व कान यांची भोके मोठी असतात. ती व्यक्ती नेहमी स्वच्छ व पवित्र असते, तसेच दीर्घजीवी असते.

मानवाचे मानसभाव व पंचमहाभूते : शरीर हे पंचभौतिक व आध्यात्मिक विकारांचे संयुक्त स्वरूप आहे. मन, बुद्घी, अहंकार व त्यांचे आविष्कार, ज्ञान, विचार, भावना, बरा-वाईट स्वभाव इ. मानसभाव हे शरीरातील पंचमहाभूते व त्यांचे दोषधातुमल या विकारांच्या प्राधान्याने शुद्घ, विशुद्घ, विशुद्घेतर इ. प्रकारच्या योग्यतेनेही उत्पन्न होतात. पार्थिव प्रकृतीची व्यक्ती क्षमावान, तर आकाशीय प्रकृतीची व्यक्ती शुची तसेच अस्थिसारवान (पार्थिव), क्लेश सहन करणारी राकट, तर रक्तसारवान क्लेश सहन न करणारी सुकुमार असते. रक्तसार मेधावान, मांससार क्षमावान व धैर्यवान असतो. वातप्रकृतीचा कपटी तर पित्तप्रकृतीचा क्रोधी असतो. तसेच कफप्रकृतीचा कृतज्ञ असतो. असे या जड पंचमहाभूतांच्या व त्यांच्या विकारांच्या आधिक्याने अनेक विशेष मानसभाव उत्पन्न होतात.

केवळ आकाश महाभूत व मानव : शरीर पंचमहाभूतांच्या निरनिराळ्या संयोगांनी निर्माण झालेल्या विकारांचे बनलेले आहे. त्याचे जीवन त्या विकारांवर चालू आहे. त्याचे जीवन केवळ एकाच महाभूतावर अवलंबून असत नाही, अन्यथा ते संपुष्टात येईल.

केवळ आकाश या महाभूतात मानव आज राहू शकतो, त्याव्यतिरिक्त केवळ इतर महाभूतात तो राहू शकत नाही. त्यांचे अस्तित्व आकाशावाचून नाही. ती महाभूते व्याप्य व आकाशव्यापक आहे. जल, अग्नी व वायूच्या अभावी केवळ पृथ्वीने मानवी जीवन चालणार नाही. ते पृथ्वीसारखे म्हणजे पार्थिव होईल. फक्त जलाने किंवा त्याच्या आधिक्याने ते फुगेल व जलात त्याच्या शरीराचे कणन् कण मिसळतील. आकाशाखेरीज सर्व महाभूते प्रतिकारी असल्यामुळे त्यांच्या आक्रमणात शरीर आले तर ते भूत शरीराला त्याच्यासारखे बनवील. अग्नीच्या आक्रमणाने ते जळून शरीराला अग्निमय करील. वायू शरीराला वायुरूप विरल करील. अवकाशयानातून शरीर अवकाशात फेकले, तर तेथे केवळ आकाश महाभूताच्या आक्रमणात शरीर सापडते. आकाश आक्रमक नाही उलट अप्रतिकारी आहे. भोवताली नित्य असणाऱ्या बाह्य वायूचा शरीराशी प्रतिकार दाबही तेथे नसतो, त्यामुळे शरीरस्थ केंद्रोत्सारण गती स्वभावाचे जल, अग्नी व वायू बाह्य आकाशात जाऊ लागतात. त्यामुळे शरीर फुटून त्याचे अणुरेणू बनून आकाशमय होतात.

जोशी, वेणीमाधवशास्त्री