स्त्रीरोग व कौमारभृत्य : ( आयुर्वेद ). स्त्रीरोग या भागा-मध्ये स्त्री वैशिष्ट्ये, रजोविकार, योनिरोग व रक्तप्रदर यांचे वर्णन दिलेले आहे. कौमारभृत्य या भागामध्ये सुप्रजाजनन, धातुपरिपोषण व धातुक्षय यांची आवर्तने, प्रसूती, गर्भव्यापत, बालोपचार, बालामय व उपचार ही प्रकरणे पुढे दिली आहेत. ही सर्व प्रकरणे परंपरागत आयुर्वेदीय विचारांस व समजुतींस अनुलक्षून आहेत.

स्त्रीरोग 

स्त्री वैशिष्ट्ये : स्त्री शरीर व मन हे दोन्ही पुरुष शरीर व मन यांपेक्षा स्वभावत: काही बाबतींत भिन्न आहे. पुरुष शरीर अस्थिघटकप्रधान, तर स्त्री शरीर मज्जाधातुप्रधान असते. यामुळे पुरुषी शरीर उंच, राठ, कठीण व शारीरबलयुक्त, तर स्त्री शरीर वरील गुणांच्या विरुद्ध कमी उंचीचे, मृदू , कोमल व अबल असते. स्त्रीचे आतडे तिच्याच उंचीच्या पुरुषाच्या आतड्यापेक्षा लहान असते. तिच्या शरीराला लागणारे परिपोषक घटक घेण्याकरिता तिने पुरुषाइतके अन्न घेतले तरी त्याचे पचन, पृथ:करण, शोषण इ. प्रक्रिया या लहान आतड्यात परिपूर्ण होतात आणि त्याचकरिता पुरुषाला लांब आतड्याची गरज लागते. पुरुषाच्या मानाने मृदू घटकांची अधिक आवश्यकता स्त्री शरीराला असते आणि ते घटक लवकर पचनात विभक्त होतात व शोषता येतात असे दिसते.

स्त्रीचे मन अधिक मृदू , दयाळू , व्यापक सहानुभूतीचे व लवकर द्रवणारे असते, तर पुरुषी मन कठीण, करारी इ. असते.

स्त्री शरीरात रज व स्तन्य हे उपधातू अधिक आहेत. त्यामुळे त्यांची स्थाने स्तन व गर्भाशय हे भिन्न अवयवही स्त्री शरीरात असतात. त्यांचे व्यापार अधिक असतात व त्यामुळे विकारही अधिक होतात. स्त्रीला गर्भधारणपोषण करावे लागते. पुरुष शुक्र थंड, परंतु स्त्री शुक्र उष्ण असतो. अशा भिन्नतेमुळे स्त्रीचे विकारही भिन्न असतात त्यांचा विचार स्वतंत्रपणे करणे इष्ट आहे.

स्तन्य, योनी व रजोविकार यांचा स्त्रीच्या शुक्रधातूशी संबंध असतो. हे विकार तिच्या आहारविहाराने जसे होतात तसेच तिच्या शुक्र विकृतीनेही होतात. पती वैषयिक दृष्टीने अबल किंवा नपुंसक तर याच्या उलट अति-कामुक असल्यास त्याचे अनिष्ट परिणाम स्त्रीच्या शुक्रावर व योनीवर होतात. म्हणून योनीबरोबर शुक्राचा विचार करणे अत्यावश्यक आहे.

रजोविकार : हे आठ प्रकारचे आहेत पृथक दोषज ३, द्विदोषज ३, त्रिदोषज १ व रक्तज १ . यांपैकी पहिले ३ साध्य असतात. दोषचिन्हे त्या त्या प्रकारात असतात आणि रक्तजात प्रेतासारखी घाण असते व ती प्रमाणाने अधिक ( रक्तप्रदर ) असते. [⟶ ऋतुस्राव व ऋतुविकार ].

उपचार : दोषांना अनुसरून वमनादी ३ व उत्तरबस्ती विधीयुक्त देऊन, दोषहर द्रव्यांच्या चटण्या, काढे, तेल-तूप यांत भिजविलेले बोळे, अभ्यंग योनिधावन यांचा उपयोग करावा. गाठाळ रज असेल तर पहाडमूळ, सुंठ, मिरी, पिंपळी व कुडा यांचे जल द्यावे. दुर्गंधी पूवासारखी तसेच मज्जेसारखा स्राव असेल तर चंदनाचा ( पांढरा, पिवळा ) काढा द्यावा. रजोविकारांशी शुक्र धातूचा संबंध असतो, तो पहावा व शुक्र-दोषहर द्रव्यांचाही उपयोग करावा.

योनिरोग : योनीचे वीस रोग आहेत. वातिकी-दोषकारक अन्न, वेडेवाकडे शरीर ठेवून अतिमैथुन, कृत्रिम लिंगाने मैथुन सेवन करणे इत्यादींनी वेदना, टोचणी, स्पर्शनाश, मुंग्या येणे, योनी मोठी व विस्तृत होणे, उठता-बसता योनीतून आवाज येणे, विकृत रज:स्राव योनिस्थानातून खाली येणे, रक्तगुल्म इ. विकार होतात.

उपचार : वातज : वातावाचून योनी दुष्ट होत नाही म्हणून कोणत्याही योनिरोगात प्रथम वातशामक उपचार करून त्यानंतर किंवा त्याबरोबर इतर दोषांचे उपचार करावेत. औषधी स्नेह व शेकणे आणि गुद व योनिमार्गात बस्ती देणे कोणत्याही योनिरोगात, विशेषत: वातज योनिरोगांत, अत्यावश्यक आहे. शिवाय परिषेक, अभ्यंग व पिचू ( वातघ्र द्रव्याचे ) ठेवावे. कफदुष्टीत वामक आणि पित्तदुष्टीत रेचक सौम्य देऊन अभ्यंतरलेप, औषध सिंचन, योनीत औषधी बोळा ठेवणे इ. उपचार करावेत. कारमर्यादी घृत योनिविकार नष्ट करून गर्भदायक होते. वचादी चूर्ण योनिरोगाबरोबर हृद्रोग, फासळ्यांत शूल, गुल्म, मूळव्याध यांपैकी विकार असेल तरी त्याचा नाश करते. योनिशूल रास्नादी दुधाने कमी होतो. गुडुच्यादी काढा योनीवर शिंपडावा तसेच नतादी तेलाचा बोळा योनीत ठेवावा.

पित्तज : योनिरोगात थंड व पित्तनाशक अशा द्रव्यांचे बोळे, अभ्यंग, सिंचन करावे व जीवनीय द्रव्यांनी सिद्ध क्षीर-सर्पी द्यावे. गर्भद असताना औषधी तुपांचा उपयोग करावा. शतावरी इ. घृतांचे चाटण, बोळे ठेवणे यांनी रजशुक्रदोष व क्षतक्षयादी अनेक रोग नष्ट होतात. स्त्री शुक्र व होणारी संतती बलवान होते. जीवनीय घृत किंवा दूध असेच उपयुक्त होते. बलादींनी तूप व तेल एकसिद्ध करून दिले तर वातपित्तात्मक विकार नष्ट होतात. रक्तयोनीमध्ये रक्तदोषानुरूप रक्तस्तंभके द्यावीत. पुष्यानुगचूर्ण निरनिराळे योनिस्राव, अतिसार, मूळव्याध व रक्तस्रावनाशक आहे.

कफज : योनिरोगात सर्व रूक्ष व उष्ण उपचार करावे. धातक्यादी तेलाचा बस्ती, बोळे, अभ्यंग, पान उपचारांनी सुजून वर आलेली, स्तब्धा, पिच्छिला, स्राविणी, विप्लुता, उपप्लुता, फोड व शूलयुक्त योनी चांगली होते. जवाचे अन्न, हिरडा व तीळतेल नेहमी सेवन करावे. पिंपळी, लोह-भस्म, हिरडा यांचे रसायन विधीने सेवन करावे. कासीसादी व पलाशादी चूर्ण बुळबुळीत स्रावनाशक, आरग्वधादी वर्ग सिंचनास उपयुक्त आहे. स्तब्धा व कर्कशा योनीला मृदू करण्याकरिता योग्य असे वैद्यकीय उपचार करणे आवश्यक आहे. दुर्गंधी योनीत सुगंधी द्रव्यांचे चूर्ण वापरण्यात यावे व बस्ती, बोळ, धावन इ. उपचार करावेत. कफज योनिरोगात तिखट द्रव्यांचा मूत्रयुक्त बस्ती, पित्तज रोगात ज्येष्ठमध-युक्त दूध व वातज रोगात तेल आणि आंबट रस संयुक्त बस्ती उपयुक्त होतात. सन्निवातज विकारात दोषाधिक्याप्रमाणे उपचार करावेत. फलघृत-योनिशुक्रदोषनाशक व पुत्रदायक मानतात. हे पाळीच्या काळात व गरोदरपणीही द्यावे.

रक्तप्रदर : या नावाने ओळखला जाणारा रोग स्त्रियांना फार त्रासदायक असतो. योनिमार्गातून रक्तस्राव होणे हे एक मुख्य लक्षण असते व रक्त स्तंभक उपचार केले जातात परंतु या लक्षणाचे अनेक विकार असतात. याला असृग्दर असेही नाव आहे. रक्तदुष्टार्तव, रक्तवृद्धी, रक्तपित्त, रक्तयोनी, पित्तावृत अपान, अपानावृत व्यान, रक्तार्बुद व रजोवृद्धी या रोगांपैकी कोणता हे निश्चित करावे. अपानावृत व्यानांत वातनाशक, मधुर, स्निग्ध, अनुलोमक, कोमट उपचार तर रजोवृद्धीस रसधातूच्या पचनास इंद्रजव देऊन रसधातू पचनाने रक्तधातू निर्माण करून रसाचा उपधातू रज अधिक बनण्याची शारीरप्रक्रिया कमी केली पाहिजे. रक्तवृद्धीस अशक्तता नसेल, तर रक्तस्राव होऊ द्यावा व विरेचन द्यावे. नंतर पाचक, दीपक, रक्तसंग्रहकर द्रव्ये देऊन त्याचे मांस धातूत रूपांतर होण्याला चालना द्यावी. पित्तावृत अपानात रेचक देऊन वात व पित्तशामक मधुर द्रव्यांचा उपयोग करावा. रक्तार्बुदाची अर्बुदचिकित्सा रक्तदुष्टीला अनुसरून करावी. रक्तयोनी, रक्तदुष्टार्तव व रक्तपित्त यांची रक्तपित्तासारखी सामान्य चिकित्सा करावी. रक्तयोनीत दाहयुक्त स्राव असतो, तर रक्तदुष्टार्तवात प्रेतासारखी दुर्गंधी रज:स्रावाला येते. असृजा गरोदरपणीही नियमित काळाने रक्तस्रावी असते. रक्तपित्तास रज:प्रवृत्ती काळासारखा मध्ये नियमित काळ जात नाही. अगदी अनियमित काळाने स्राव जात असतो. रक्तपित्तात रेचक चालणार नाही, वमनच द्यावे लागेल. इतर दोन्ही रोगांत रेचक बस्ती व उत्तर बस्ती चालेल. रक्त-दुष्टार्तवात चंदनादी सुगंधी शीत द्रव्यांचा उपयोग करावा लागेल, इतरांत जरूरी नाही. बाकी रक्तस्राव कमी करणारी रक्तपित्तनाशक चिकित्सा करावी. सुश्रुताने लोहितक्षरा व चरकाने सांगितलेली असृजा एकच दिसते. यात रक्तस्राव अधिक होण्यापेक्षा अकाली गरोदरपणीही होणे हा दोष आहे, यात स्राव दाहकर असतो. पित्तनाशक चिकित्सा व रजोवृद्धीची चिकित्सा करावी लागेल. रक्तदुष्टार्तवात गर्भ राहत नाही. अशा रीतीने एकाच मुख्य चिन्हाच्या ( लक्षणाच्या ) या निरनिराळ्या रोगांचे पृथक् निदान करून तद्नुरूप चिकित्सा करावी.


 कौमारभृत्य

कौमारभृत्य म्हणजे कुमार भरण व बालसंगोपन होय. हे बालकाच्या जन्मानंतर करावेच लागते परंतु ते गर्भात असताना नव्हे तर तो गर्भात येण्यापूर्वीही त्याची व्यवस्था झाली पाहिजे. या दृष्टीने स्त्रीचे आरोग्य, अना-रोग्य, तिचे विशिष्ट अवयव, ऋतुकाल, रज आर्तव, पुरुषशुक्र, स्त्री-पुरुष संभोग, गरोदरावस्था, प्रसूती, बाळाचे आरोग्य, अनारोग्य इ. विषयांचा विचार झाला पाहिजे.

सुप्रजाजनन : निरोगी, सुदृढ, भव्य शरीराची, यशकीर्तिधनसंपन्न, दीर्घायुषी, सुखी, कर्तृत्ववान व महामना संतती व्हावी अशी इच्छा माता-पित्यांना असणे स्वाभाविक आहे. त्या इच्छेला मोठ्या प्रयत्नांची जोड अत्यावश्यक असते. आपल्या व प्रजेच्या इष्ट उत्तम व्यक्तिमत्त्वाची प्रतिमा मनात उभी ठेवून तसे प्रथम आपणास व नंतर प्रजेला घडविण्याची महत्त्वाकांक्षा व दृढ निश्चयाने अखंड प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. भोवताली समाजात अशा विचारांचेच वातावरण असले, तर फारच चांगले होईल.

प्रथम प्रत्येक स्त्री व पुरुष व्यक्तीने प्रकृतिस्थापन चिकित्सेने स्वत: निर्दोष होऊन, सर्व किंवा अधिकाधिक धातू सारवान बनविण्याकरिता तज्ञाच्या सल्ल्याने वय:स्थापन ( शक्यतर कूटी प्रावेशिक सुद्धा ) घेऊन शरीर व मन बलपौरुषपराक्रमी बनविले पाहिजे. वंशातील वैगुण्ये नष्ट करण्याचा प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे. उंची, कृशता, कुरूपता इ. शारीर दोष अतिक्रोध, अतिमवाळ स्वभाव, निर्बुद्धता इ. मानसिक दोष घालविण्याकरिता वयाच्या आठव्या वर्षापासून सुद्धा सतत तन्नाशक उपचार केले गेले पाहिजेत. विवाह करताना वैषयिक प्रेमात जी व्यक्ती प्रथम डोळ्यासमोर आली व प्रेम बसले ती केवळ भावनेने न निवडता आपल्या स्वास्थ्य, धातुसारत्व विशेषत: शुक्रसारत्व, मानसिक, बौद्धिक, वैचारिक अनुरूपता व आपल्या आयुष्याच्या ध्येयाला वांशिक वैगुण्ये नाशनाला पूरक ठरेल असाच जोडीदार तज्ञांच्या साहाय्याने परस्परांचे परीक्षण करून, सुप्रजाजनन हे ध्येय असलेला निवडावा. विवाहानंतर दोघांच्या वरीलप्रमाणे शरीर परीक्षणानंतर आढळलेल्या वैगुण्यांना अनुसरून देहशुद्धी करून ती नष्ट करणार्‍या आहारविहार व वयःस्थापन यांचे नित्य सेवन करून ती नष्ट करावीत. वयःस्थापन औषधे नियमितपणे दररोज सेवन केली पाहिजेत. खाण्यापिण्यात व वागण्यात उच्छृंखलपणा शक्य तो टाळला पाहिजे.[⟶ सुप्रजाजननशास्त्र ].

ऋतुकाल : ऋतुकाळात  स्त्रीच्या शरीराची निसर्गत: शुद्धी होत असते. तिचे सर्व धातू अवयव, प्रामुख्याने गर्भाशय, शुद्ध होतात. रेचक झाल्याने शरीरात अशक्तता येते. रेचकाने मळच काढला जातो परंतु पाळीने शरीराच्या रक्तासारखाच रज हा घटक बाहेर जातो. त्यामुळे शरीर, जठराग्नी, इंद्रिये, मन, बुद्धी, भावना ही अबल होतात. ही अधिक अबल  न व्हावी म्हणून स्त्रीने या चार दिवसांत कमी कष्ट करावेत, कामे किंवा फार हालचाल करू नये, हलका आहार घ्यावा व नियंत्रित असावे. तारुण्यातील शरीरापेक्षा बाल्यातील, त्यापेक्षा गर्भावस्थेतील, त्यापेक्षाही बीजावस्थेतील शरीर नाजूक व प्रतिकाराला अक्षम असते. पाळीचे स्त्री-शरीरावर होणारे सर्व परिणाम बीज-शरीरावर होतात. तिच्या प्रत्येक हालचालीचे व आहारविहाराचे इष्टानिष्ट परिणाम बीज-शरीरातील बीजीभूत अंगप्रत्यंगांवर होतात. स्त्रीला स्वशरीर-पोषक आहारजन्य घटक बीज — शरीरपोषणाला पुन्हा पचवून योग्य करावे लागतात. स्त्री-शरीरातील प्रत्येक अंगप्रत्यंगाचे पोषक अंश त्यांची शुक्रधरा कळा पुन्हा पचवून बीजाच्या अंगप्रत्यंगांच्या पोषणाला योग्य करते. त्यांनी बीज व बीजांतर्गत अंगप्रत्यंगांचे पोषण होते. पाळीच्या अशक्ततेच्या काळात स्त्रीने केलेल्या पथ्यापथ्याचे इष्टानिष्ट परिणाम कदाचित स्त्रीवर जाणवण्याइतके झाले नाहीत, तरी बीज-शरीरावर झाल्यावाचून राहत नाहीत. ऋतुमतीने दिवसा झोप घेतली, तर तिला आळस येतो व कफ वाढतो. तो मेंदूच्या शुक्रधराकलेकडून नीट न पचल्यामुळे बीजाच्या मेंदूच्या बीजांशाकडे अधिक प्रमाणात येतो. तेथे त्याचे पचन न झाल्याने पुढे गर्भावस्थेत व जन्मल्यावर अनिष्ट परिणाम होतात. बालक झोपाळू होते. अति परिश्रम केल्यास डोळ्यांतून पाणी, दोष व त्यांबरोबर पोषक घटकही बाहेर जातात. ऋतुस्रावाने अशक्त शरीराबरोबर अशक्त झालेले डोळे अधिक अशक्त होतात, त्यांचा अग्नी अबल होतो. बीजस्थ नेत्रांशांच्या पोषणाकरिता निर्दोष व बलवान पोषक अंशांचा पुरवठा डोळ्यातील शुक्रधराकला करू शकत नाही. गर्भधारणा कालावधीत स्त्रीने अतिश्रम केल्यास त्याचे अनिष्ट परिणाम गर्भावर होतात. त्या मुलांच्या जन्मत: होणार्‍या अनेक विकृतींची कारणे गरोदरपणी केलेल्या कुपोषणात असतात, म्हणून आहाराचारांचे शास्त्रोक्त नियम पाळावेत.

संभोगापूर्वी एक महिना अगोदर पतिपत्नींनी वृष्य ( शुक्रवर्धक ) स्नेहाने स्नेहन व नंतर स्वेदन, वमन, विरेचन आदी योग्य शोधनांनी शरीर शोधन करून नेहमीच्या अन्नावर यावे. एक महिना ब्रह्मचारी राहून पुरुषाने मधुर औषधांनी सिद्ध दूध व तूप यांचे आणि स्त्रीने तिळाचे तेल व उडीद यांचे विशेष सेवन आहारात करावे. इतर आहार आपल्या प्रकृतीच्या गुणांच्या विपरीत गुणांचा व असारधातू परिपोषक असावा. दूध पांढरे वासरू असलेल्या पांढर्‍या गायीचे असावे व ते स्त्रीला माहीत असावे. ते चांदीच्या किंवा काश्याच्या भांड्यातून शेवटचे सात दिवस सकाळ-संध्याकाळ प्यावे. आहारात जव, तांदूळ, दूध, दही, तूप, मध असावे. पुरुषाने तूप व स्त्रीने तेल अंगाला लावून स्नान करावे, पांढरी वस्त्रे नेसावीत. पांढरी सुगंधी फुले धारण करावीत. स्त्रीचे निवासस्थान, आसन, शय्या, वस्त्रे, भूषणे, वाहन इ. स्वच्छ व पांढरी, तेजस्वी असावीत. दररोज सकाळ-संध्याकाळ पांढर्‍या चंदनाची स्वच्छ भूषणे घातलेली व्यक्ती वा प्राणी तिच्या दृष्टीस पडावा. ज्यांचे बोलणे, चालणे, वागणे सौम्य आहे, जे सौम्य दिसतात असे स्त्री-पुरुष तिच्याभोवती असावेत, मैत्रिणी व सेविका अशाच असाव्यात. सभोवतालची दृश्ये तेजस्वी व वातावरण सुगंधी असावे. आठव्या दिवशी म्हणजे रजोदर्शनाच्या बाराव्या दिवशी स्वस्तिवाचन इ. वेदोक्त  धार्मिक विधी करावा. यातली प्रार्थना वीरपुत्र मागणारी आहे. या कालात विशेषत: या रात्री मैथुनाचे वेळी धिप्पाड तेजस्वी सिंहासारखा विक्रमी, ओजस्वी, धीधृतिस्मृतिमान पवित्र मनाचा व सात्त्विक स्वभावाचा पुत्र व्हावा अशी इच्छा दोघांनीही करावी. नंतर दोघांनी आठ दिवस एकत्र राहावे.गरोदरावस्थेतही दूध व मधुर पदार्थ स्त्रीने सेवन करावेत. वरील प्रकारच्या वातावरणात असावे. शिवाय चंदन, पुन्नाग, पद्मकाष्ठ, काळा वाळा, ज्येष्ठमध, मंजिष्ठा, अनंतमूळ, भुईकोहळा व दूर्वा यांचे सिद्ध दूध किंवा काढा सतत सेवन करावा म्हणजे गौरवर्णी संतती होईल. असे मानले जात होते. 

संतती सावळी व्हावी अशी इच्छा असणार्‍यांनी वरीलप्रमाणे सर्व वातावरण सावळ्या वर्णाचे करावे. गोरा वर्ण हा स्वास्थ्याचा नाही. सावळा वर्ण स्वास्थ्याचा आहे, असे मानले जाते. 

ज्या शारीरिक व मानसिक गुणांचा उत्कर्ष भावी पिढीत व्हावा असे वाटत असेल, त्या गुणांचे परिपोषक वातावरण पतिपत्नींच्याभोवती विशेषत: पत्नीच्याभोवती गर्भसंभवाच्या एक महिना अगोदर व गरोदरपणी असावे. उताणे राहूनच स्त्रीने संभोग करावा. इतर आसनाने गर्भाशय विकृती निर्माण होऊ शकतात. मुलगा व्हावा म्हणून गर्भधारणा झाल्यावर दोन महिन्यांच्या आत पुष्य नक्षत्र असताना पुंसवन विधी करावा. रानात ज्या वडाखाली गायी बसतात, त्या वडाच्या उत्तरेच्या रसरशीत व किडक्या नसलेल्या पारंब्या आणून दोन उडीद किंवा पांढर्‍या मोहर्‍यांसह वाटून दह्यात कालवून प्याव्यात तसेच जीवक, ऋषभक, आघाडा, निळी कोरांटी इ. एक व अनेकांची चटणी दुधाबरोबर प्यावी. सोने, रुपे व लोखंड यांपैकी एका धातूची पुरुषाकृती मूर्ती अग्नीत तांबडी लाल तापवून दही, दूध किंवा पाणी यांत विझवून ते नि:शेष प्यावे. वडाच्या पारंब्या, पेटारी, पांढरा चिकणा, लक्ष्मणा यांच्या चटणीचे ३-४ थेंब गर्भवतीचे डोके उंबरठ्यावर ठेवून तिच्या उजव्या नाकपुडीत घालावेत, ते गिळावेत, थुंकू नयेत असे आणखी अनेक उपाय आहेत. मुलगी हवी असल्यास चटणीचे थेंब डाव्या नाकपुडीत घालावेत व पुरुष मूर्तीच्याऐवजी स्त्री मूर्तीचे दही इत्यादी पाजावे.

तसेच पुरुषामध्ये ईडा-पिंगला या दोन्ही नाड्या नाकापासून वृषणापर्यंत व स्त्रियांमध्ये फलांपर्यंत गेल्या आहेत. मानवी शरीराचा उजवा भाग पुरुषी व डावा भाग स्त्री संबंधित असतो. उजव्या नाकपुडीत घातलेल्या नस्यौषधाचे नाकाच्या त्या त्वचेकडून पचन होते व पिंगलेच्या द्वारे उजव्या फलाकडे जाऊन तेथून गर्भाशयात जाऊन गर्भाचे पुरुषभाव वाढवितो व त्यामुळे पुरुषी अवयवांची वाढ जोराने होते. स्त्रीगर्भ व्हावयाचा असेल तर त्यातील घटनाविघटना बदलून पुरुषी गर्भ बनतो व तशी त्याची वाढ होते. याच्या उलट डाव्या नाकपुडीत घातलेल्या नस्याने स्त्रीभाववृद्धी होऊन स्त्रीगर्भ होतो. असे मानले जात होते.

मासानुमासिक योग : ज्या स्त्रीला गर्भस्राव वा गर्भपात होण्याची खोड आहे, तिला पहिल्या महिन्यापासून दहाव्या महिन्यापर्यंत मासानुमासिक योग दिल्याने ती खोड नाहीशी होते. गर्भाचे धातुपरिपोषण नीट होत नाही, म्हणून गर्भ गर्भाशयाशी संलग्न न राहता बाहेर पडतो. गर्भिणीचे दोषच याला कारणीभूत असतात. धातुपरिपोषणाक्रमाची जी आवर्तने चालू असतात ती आवर्तने यथाकाळ व निर्दोष व्हावी, मातेचे शरीर निर्दोष होऊन गर्भ व माता यांच्या आवर्तनारूप परिपोष होणार्‍या धातूचा उत्तम परिपोष व्हावा म्हणून त्या त्या महिन्याच्या परिपोष कार्याच्या वैशिष्ट्यानुरूप त्या त्या महिन्याला द्यावयाची द्रव्ये सांगितली आहेत. त्यांचे चूर्ण दुधाबरोबर द्यावयाचे असते किंवा त्या द्रव्यांनी सिद्ध दूध द्यावयाचे असते. हे योग वयःस्थापकच आहेत म्हणून गर्भपात न होणार्‍या प्रत्येक स्त्रीने घेतले तरी चालतील. कुलवैगुण्यनाशक द्रव्ये या प्रत्येक योगाबरोबर द्यावीत, याचा उत्कृष्ट उपयोग होतो.

नैसर्गिक शुद्धिपुष्टिकाल : वंशातील प्रत्येक भावी जीव अधिक  निरोगी, पुष्ट व बलवान निपजावा म्हणून त्या भावी जीवाच्या आगमन कालापूर्वी पाळीच्या काळी, गर्भाशयात आल्यानंतर व गरोदरपणी त्या स्त्री–शरीराकडून निसर्गत: प्रयत्न होतात. रजाचा स्राव हा शरीर व गर्भाशय शुद्ध करतो. गर्भिणीच्या पहिल्या, दुसर्‍या महिन्यापासून ओकारी सुरू होते. ओकारीही गर्भिणीची शरीरशुद्धीच करणारी आहे. घ्राणेंद्रिय तीव्र झालेले असते. त्यामुळे गर्भिणीला नित्याच्या आहाराचा वास येतो. जर तो आहार तिने पातळ करून घेतला तरच त्याचा वास कमी होतो. या नैसर्गिक बदलांमुळे गर्भिणीला सवयीचा आहार थोडा जावा, त्याचे नीट पचन व्हावे व दोन्ही शरीरांचे पोषण निर्दोष व्हावे या गोष्टी साधतात. गर्भिणीला डोहाळे लागतात. तिच्या विशेषत: गर्भशरीराला ज्या द्रव्यांची जरूरी आहे, त्यांची इच्छा होते. अर्थात ही नैसर्गिक मागणी पुरविल्याने गर्भ निर्दोष व पुष्ट होतो. काही पदार्थांबद्दल द्वेष निर्माण होतो. ते पदार्थ तिला देऊ नयेत, त्यामुळे दोषनिर्मिती टळते. खाद्यपेयांबद्दलच्या इच्छाद्वेषाप्रमाणेच वस्त्रप्रावरणे, इतर वस्तू, प्राणी, दृश्ये इ. पाहण्याची, गाणी ऐकण्याची, पंचेंद्रिये व कर्मेंद्रिये यांच्या विविध विषयांच्या इच्छा व द्वेष तिला होतात. इच्छापूर्ती व द्वेषत्याग गर्भाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक व ऐश्वर्यादी अमूर्त भावांचे परि-पोषकच असतात. भावी जीवाच्या या जडणघडणीच्या वेळी तिची चिन्हे पाहून, वंशवैगुण्ये लक्षात घेऊन व मातापित्यांच्या महत्त्वाकांक्षा ध्यानात आणून योग्य द्रव्यांचा उपयोग केला तर इष्ट साध्यपूर्ती होईल.

गरोदरकालात गर्भिणीच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक इ. भावांचा परिपोष होऊन ती निर्दोष, आनंदी व उत्स्फूर्त वृत्तीची राहावी आणि तिच्या भावी आशाआकांक्षांचे प्रतिबिंब असलेले सुंदर वातावरण तिच्याभोवती असावे.

जन्मानंतर सोन्याचा यथोक्त उपयोग करावा. इष्टसिद्धीला परिपोषक द्रव्ये मूल अंगावर दूध पीत आहे तोपर्यंत मातेने सेवन करावीत. दूध पाजण्यापूर्वी त्या द्रव्यांचा स्तनावर लेप करून तो वाळताच त्याला ते दूध पाजावे. नंतर त्याला रुचकर होतील अशा स्वरूपात त्याला सतत ती द्यावीत. जन्मापासून ही द्रव्ये दिली तर त्याच्या जिभेवर त्याची रुची तयार होईल, आवड निर्माण होईल व त्याला त्याच्या सेवनाचा कंटाळा येणार नाही. मुलाची स्मरणशक्ती वाढत असलेल्या काळात त्याच्यावर बोजा न पडता महत्त्वाकांक्षावर्धक राष्ट्र, संस्कृती व धर्मभावना परिपोषक पद्य व वाङ्मय पाठ करून घेतल्याने ज्ञान, स्मरणशक्ती आणि वक्तृत्व यांची वाढ होते. मुलामध्ये उपजत कला असतील, त्यांच्या वृद्धीकरिता व त्यांना उपयुक्त अवयवांच्या बळ व आरोग्याकरिता तज्ञांच्या सल्ल्याने उपचार करावेत. गाणार्‍याच्या गळ्याकरिता, नाचणार्‍याच्या पायांकरिता व हस्तकलेच्या दृष्टीने हाताच्या बोटांकरिता उपचार केले पाहिजेत,म्हणजे पहिल्या दर्जाचे नैपुण्य येईल. वाचनाची व व्यायामाची आवड निर्माण करावी. व्यायाम आरोग्यरक्षणाच्या दृष्टीने आयुष्यात एक सहकारी मित्र म्हणून असावा.

मुलाचा कल व त्या कलाप्रमाणे त्याच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक कुवती पाहून इष्ट त्याच्या परिपोषाचा प्रयत्न वरीलप्रमाणे करीत राहावे. मुलाच्या महत्त्वाकांक्षेला अनुसरून योग्य क्षेत्र, त्या शास्त्रकलांचे भरपूर वाङ्मय व योग्य साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी. वाचनाची आवड व उपलब्ध साधनसामग्रीचा उपयोग करण्याचा छंद निर्माण करावा. असे शास्त्रोक्त प्रयत्न केले तर भिन्नभिन्न क्षेत्रांत कर्तृत्वसंपन्न, आदर्श व राष्ट्राला ललामभूत प्रजा उत्पन्न होण्याला काहीही हरकत नाही.


मानवी जीवनातील धातुपरिपोषण व धातुक्षय यांची आवर्तने : समागमानंतर पुरुष शुक्र गर्भाशयात गेल्यावर आर्तवाशी ( स्त्री शुक्राशी ) संयुक्त होते, जे बलवान असते ते दुसर्‍यास पचविते. त्या पचनात शुक्रापासून मज्जा, अस्थी, स्नायू , मेद, मांस, रक्त व रस धातू प्राणवायूने बीजरूपात भिन्न होतात. सर्व अंगे, अवयव व इंद्रिये भिन्न होतात. नंतर मातेकडून येणार्‍या रसाने पोषण सुरू होते. एका महिन्यात गर्भ कलल ( कफासारखा ) होतो. ही गर्भावस्था रस धातूचा पुरवठा आणि त्याचे गर्भ शरीरांत पचन, विभाजन व घटक परिपोषण ही कार्ये अविरत चालू असल्याने येते. हे परिपोषण सर्व घटकांचे अविरत असतेच, परंतु काही विशिष्ट कालात काही घटकांचे परिपोषण अधिक वेगाने व प्रमाणाने होत असते. एका गटानंतर दुसरा गट नंतर पुन्हा पहिला नंतर दुसरा असे सारखे परिपोषण फिरून चालूच असते, याला आवर्तन म्हणतात. ही आवर्तने सर्व आयुष्यभर चालू असतात.

महिन्याने येणारी कललरूपी गर्भावस्था ही स्थिर कललावस्था असते. या कालात तीन आवर्तनांनी गर्भपोषण होते. पहिले आवर्तन एक दिवसांचे असते. या २४ तासांत आकाशादी पंचमहाभूतांचे पोषण होऊन अस्थी कललावस्था येते आणि वर आरंभी सांगितलेले विभाग तयार होतात. दुसरे आवर्तन सात दिवसांचे असते. शुक्रापासून ते रस धातूपर्यंतचे घटक भिन्न करणारे एकेका धातूचे एकेक दिवसाचे पचन होते व तसेच पोषणही होते. तिसरे आवर्तन २१  दिवसांचे असते. यात रसापासून मेदापर्यंतच्या चार धातूंचे ५-५ दिवसांचे पचन व पोषण होते. नंतरचा एक दिवस झालेले पोषण स्थिर होण्याकरिता आवश्यक असतो. ३० दिवसांनी स्थिर कलल होतो. चवथे आवर्तन ३० दिवसांचे असते. यात अस्थिमज्जा व शुक्रधातूचे परिपोषण प्राधान्याने होते. प्रत्येक धातूचे पाच दिवसांतच पोषण असे दोनदा पोषण होऊन अस्थिघटक गर्भात निर्माण झाल्यामुळे दुसर्‍या महिन्याच्या शेवटी गर्भ घन होतो. या एका मुख्य आवर्तनात दोन उप-आवर्तने होतात. पाचवे आवर्तन ३० दिवसांचे असते. मातेच्या शरीरात दोन महिन्यांच्या अस्तित्वानंतर रसधातूच्या पुन्हा पचनाची आवश्यकता उरत नाही. माता सर्वच घटक गर्भशरीराकरिता पचवून योग्य करून पाठवीत असली, तरी स्वशरीरात आत्मसात करून घेण्याकरिता रसाचेही पचन आवश्यक होते. परंतु आता त्या रसाचे रक्त बनविण्याला गर्भ समर्थ झाल्यामुळे रक्तादी तीन धातूंचे पचनादी व्यापारच या महिन्यात करावयाचे असतात, ५-५ दिवसांच्या दोन पाळींनी ३० दिवसांत मेदापर्यंतच्या धातूचे परिपोषण तिसर्‍या महिन्यात होते व सर्व इंद्रिये, सर्व अंगप्रत्यंगे, हात-पाय डोक्यांचे पिंड तयार होतात. येथपर्यंतच्या काळात मन-बुद्धी इ. मानस घटकांचे पोषण होत राहते परंतु ते व्यक्त होत नाही. या तिसर्‍या महिन्यात मनाचे पोषण आधिक्याने होते. सहावे आवर्तन चवथ्या महिन्यात ३० दिवसांचेच होते. यात अस्थिमज्जा व शुक्रधातूचे परिपोषण ५-५ दिवसांच्या दोन टप्प्यांनी होते. अस्थिधातूच्या अधिक पोषणाचा परिणाम म्हणून गर्भामध्ये स्थिर धर्म आधिक्याने निर्माण होतो. सर्वांगप्रत्यंग विभाग आधिकत्वाने व्यक्त होतो. गर्भाच्या हृदयात चेतना धातू व्यक्त होतो. बुद्धीचे परिपोषण आधिक्याने होते. सातव्या आवर्तनाच्या पाचव्या महिन्यात पुन्हा रक्तादी तीन धातूंचे दोन टप्प्यांनी पोषण होते आणि मन अधिक संवेदनाग्रहणक्षम होते. आठव्या आवर्तनाच्या सहाव्या महिन्यात, सहाव्या आवर्तनाप्रमाणे अस्थ्यादिकांचे परिपोषण उत्कटत्वाने होतेच शिवाय बलवर्ण, ओज व बुद्धी यांची विशेष वृद्धी होते. सातव्या महिन्यात नवव्या आवर्तनात रसादी शुक्रधातू , ओज, सर्व अंगप्रत्यंगे अधिक परिपुष्ट व अधिक व्यक्त होतात आणि वात-पित्त- -कफ हे त्रिधातूही व्यक्त होतात. आठव्या महिन्याच्या दहाव्या आवर्तनात शरीर बाह्य निसर्गात स्वातंत्र्याने परिपोषण करण्यास समर्थ व्हावे याकरिता सर्व धातूचे पोषण होते व ओज स्थिर होते. अकराव्या आवर्तनाच्या काळात जन्म होतो.

त्यानंतरही ही आवर्तने सुरूच असतात, त्यांचा काळ स्पष्टपणे सांगितलेला नाही परंतु तो काळ गरोदरावस्थेच्या काळापेक्षा अनेक पटींनी जास्त असावा. एका महिन्यात तीन, दुसर्‍या महिन्यात दुसरे तीन असे जे आवर्तन गरोदरावस्थेत होते ते बदलून एका धातूच्या परिपोषणाला सव्वा ते पावणेदोन महिने काळ लागतो असे दिसते. स्वस्थ मुलाला आठव्या महिन्याच्या काळात दात येऊ लागतात. अस्थि धातूचे पोषण जोराने सुरू झाल्याचे ते दर्शक आहेत. दात दीड ते दोन महिन्यांत येतात. शुक्रधातूपर्यंतचे हे आवर्तन सरासरी बाराव्या महिन्यात पूर्ण होते. आतापर्यंत बालक क्षीरप असते. बाराव्या आवर्तनानंतर क्षीरान्नाद होते. ते आणखी  एक वर्ष असते. यात पुन्हा सर्व धातू परिपोषणाचे अन्नसात्म्याकरिता होते. तेरावे आवर्तन स्वस्थ मुलाचे दात आठव्या वर्षी पडून दुसरे दात येतात. या २-३ वर्षांत येणार्‍या दातांस अन्नाचे दात म्हणतात. दुसरे दात पहिल्या दातासारखे लवकर येत नाहीत. हे आवर्तन स्थिर पोषणाचे असून तिसर्‍या वर्षापासून पंधराव्या वर्षाअखेर चालते. चौदावे आवर्तन हे सोळा ते वीसपर्यंत म्हणजे चार वर्षांचे असून अतिशीघ्र आवर्तन आहे. या काळात शरीराची पुष्टी व वृद्धी फार वेगाने होते. मूल तारुण्यात येताना बदलून जाते, म्हणून या आवर्तनाच्या काळाला वृद्धी म्हणतात. हे शुक्र-धातूच्या व्यक्तीच्या काळातील आहे. पंधरावे आवर्तन हे वीस ते तीस वयापर्यंतच्या दहा वर्षांचे आहे, यास तारुण्य म्हणतात. या आवर्तनात प्रत्येक धातूच्या शुक्रधराकलांचेही परिपोषण चांगले होते. सोळावे आवर्तन वयाच्या तीस ते चाळीस वर्षांपर्यंत असते, यास संपूर्णता म्हणतात. या आवर्तनकालात सर्व धातू, इंद्रिये व त्यांचे बलवीर्य यांची संपूर्ण वाढ होते. गर्भधारणेपासून ते चाळीसाव्या वर्षांपर्यंत पुन:पुन्हा शरीर धातू घटकांची वाढच होत राहते. चाळीसाव्या वर्षी मानव हा घडत घडत पूर्ण स्वरूपाला येतो. या काळात विघटनापेक्षा ( हानीपेक्षा ) घटनाच जास्त बलवत्तर असते.

चाळीस ते शंभर वर्षांपर्यंतचा विघटन काळ हा घटनापेक्षा विघटना अधिक असण्याचा असतो. विघटनाही आवर्तनांनीच होते. या विघटना काळाचे (१) ईषत् हानिकाल व (२) हानिकाल हे दोन भाग होतात. वयाच्या सत्तराव्या वर्षांपर्यंत ईषत् हानिकाल व नंतरचा हानीकाळ होय. हा काळ शुक्रधातूच्या हानीने सुरू होतो. सत्तर वर्षापर्यंत हानी अल्प प्रमाणात होते व पुढे ती वेगाने होते. सामान्यतः दहा वर्षे अंतराने पन्नाशी-पर्यंत शुक्र नंतर दहा वर्षे मज्जा अशा क्रमाने अस्थी, मेद, मांस, रक्त व रसक्षीण होत जातात. याप्रमाणे शंभराव्या वर्षांनंतर रसक्षीणतेच्या काळात स्वस्थ मनुष्य मरतो.

स्त्री-शरीरात १२ , १३ व १४ ही आवर्तने लवकर होतात. बाराव्या किंवा अगोदरच तिला शुक्र धातूच्या व्यक्तीतील रज:प्रवृत्ती सुरू होते व सोळाव्या वर्षी ती जनन समर्थ होते. पुरुष हा स्त्रीशी समवीर्य जननसमर्थ होण्याला ८-९ वर्षे लागतात. तो पंचविसाव्या वर्षी स्त्रीसमवीर्य होतो. ईषत् क्षीणावस्था सुरू होईपर्यंत म्हणजे ४० वर्षांपर्यंत प्राधान्याने रसायन तर त्यानंतर सतत प्राधान्याने वाजीकरण चिकित्सेची ते योग सेवनाची अत्यंत आवश्यकता असते. रसायन व वाजीकरण सेवनाने मानवी शंभर वर्षांचे निसर्गदत्त जीवन निर्वेध जगता येईल. [⟶ वाजीकरण]. 

प्रसूती : गर्भिणी स्त्रियांकरिता तांबड्या, पिवळ्या, काळ्या जमिनीवर अनुक्रमे बेल, वड, टेंबुर्णी व बिब्बा यांच्या लाकडांचे सूतिकागार बांधून त्याच लाकडांचे पलंग त्यात ठेवावे. वेळेवर उपयुक्त होतील अशी औषधे, उपकरणे, साधनसामग्री व नखे काढलेल्या परिचारिका इ. साहाय्यकांनी ते सज्ज असावे. नवव्या महिन्यात शुभ दिवशी सूतिकागारात गर्भिणीला ठेवावे. ओटीपोट, कंबर व पाठ यांत वेदना, मलमूत्रप्रवृत्ती व योनिस्राव सुरू झाला की, उक्त धार्मिक विधी करून वातहर तेलाचा अभ्यंग करून गरम पाण्याने स्नान घालून पोटभर पेज पाजून मऊ व प्रशस्त अशा पलंगावर तिला मांड्या पोटावर घेऊन उताणे निजवावे. तिच्या योनीत आतून बाहेर असे वातहर तेल लावावे. तिला कोष्टादिचूर्ण याची पुरचुंडी हुंगावयास द्यावी किंवा भूर्जक वा शिसवाचा गाभा यांचा धूर हुंगवावा. मधून मधून कोमट तेलाने कंबर, पाठ व ओटीपोटाला अभ्यंग करावा. याने गर्भ खाली येतो. वेणा येऊ लागल्यावर वेणांबरोबरच कुंथण्यास सांगावे. गर्भ दिसू लागल्यावर जोराने व तो योनिमुखात आल्यावर अधिक जोराने कुंथण्यास सांगावे व तिला धीर द्यावा. तिला लज्जा निर्माण होईल अशा व्यक्तींना तेथे असू देऊ नये. वेणा नसताना कुंथू नये व कुंथल्यास गर्भाला विकार होईल हे तिला अगोदरच सांगितलेले असावे.

बाळंत झाल्यावर तिला गरम पाणी शिंपडून स्नान घालावे. भूक लागल्यावर तेल, तूप, वसा व मज्जा यांपैकी सात्म्य होईल तो स्नेह, पिंपळी इ. चूर्णयुक्त भरपूर प्रमाणात पाजावा. तेलतूपाचा अभ्यंग करून स्वच्छ मोठ्या वस्त्राने पोट थोडे आवळून बांधून ठेवावे, म्हणजे पोटात वातविकृती होणार नाही. स्नेह जिरल्यावर पिंपळी इ. चूर्णांनीच सिद्ध पेज भुकेप्रमाणे पाजावी. याप्रमाणे पाच किंवा सात दिवस करावे. दहाव्या दिवशी गंधौषधी पांढर्‍या मोहर्‍या व लोध्र यांनी युक्त तापविलेल्या पाण्याने स्नान घालावे.  

बाळंतिणीच्या शरीराची शुद्धीच झालेली असते. अशा वेळी तिचे नेहमीचे रोग पाहून, कोणते धातू क्षीण झाले ते लक्षात घेऊन वातनाशक, धातुपरिपोषक व पूर्वरोगघ्न आहार व औषधे द्यावीत. पुन्हा रजोदर्शन होईपर्यंत स्त्री ही बाळंतीण असते, तिने पथ्याहारानेच वागावे.

रक्षणविधीसाठी सूतिकागारात सर्वत्र घोसाळी, पीलू इत्यादींच्या डहाळ्या बांधाव्यात. सर्वत्र मोहर्‍या, पिंपळीचे कण, वावडिंग इ. असावेत. वेखंड, लसूण इत्यादिकांच्या पोटळ्या दोन्ही दरवाज्यांना, बाळंतीण व बालक यांच्या गळ्यात आणि पलंगाला बांधाव्यात. पलंगाचे पाय पाणी घातलेल्या भांड्यांत असावेत. नेहमी टेंबुर्णीच्या लाकडाचा अग्नी असावा. बाळं-तिणीच्या मैत्रिणी सतत तिच्या सोबतीला असाव्यात. तेथे मंगलस्तोत्रे, गाणी गावीत, वाद्ये वाजवावीत. सर्व वातावरण पवित्र व आनंदी ठेवावे.

अडचणी : (१) गर्भ ठरलेल्या काळात खाली बाहेर येत नसेल, तर काळ्या नागाच्या कातीची किंवा गेळफळाची धुरी द्यावी. कळलावी, ब्राह्मी, रुई या वनस्पतींची मुळी हातापायांना बांधावी. (२) वार पडत नसेल, तर डाव्या हाताने पाठीवर दाब देऊन ती धरून उजव्या हाताने बेंबीच्या वर गर्भाशयाचा भाग जोराने पिळवटून वार सुटेल असे करावे. बाजूने कंबर दाबावी, ढुंगण जोराने पिरगळावेत. केसाच्या वेणीने वा केस गुंडाळलेल्या बोटाने टाळू व घसा यांत थोडे घासावे. भूर्जपत्रादिकांची धुरी योनीला द्यावी. बाळंतशेप, कोष्ठ इ. सिद्ध तेलाचा बोळा योनीत ठेवावा. कळलावीची चटणी हातापायांच्या तळव्यांना लिंपावी. कोष्ठ, कळलावी मुळाची चटणी मद्य किंवा मूत्राबरोबर पाजावी. कोष्ठ तालीस पत्राची चटणी मोळाच्या काढ्यात, सुराभण्डात, तीक्ष्ण कुळथाच्या काढ्यात, ब्राह्मी, पिंपळी काढ्यात घालून द्यावी. तिची वार पडत नसेल तर एक उपाय म्हणून मोळाचा काढा करून, काही वेळ ठेवून तो पाजावा. वरील उपायांनी वार पडण्यास मदत होते. यातच गेळफळ इ. घालून किंवा मोहरी, कोष्ठ इ. दारूच्या निवळीत घालून द्यावी.

गर्भव्यापत : गर्भाची विकृती रोगांनी किंवा गभिर्णीने असेवनीय आहारादिकांचे सेवन केले तर होते. गर्भिणीच्या योनीतून रक्तस्राव सुरू झाल्यास किंवा शूल झाल्यास अंतर्बाह्य स्निग्ध व थंड उपचार करावेत. वाळा, कमळ, चंदन, वड, उंबर इत्यादींच्या सालीची चटणी किंवा सिद्ध तूप यांनी भिजविलेले कापसाचे किंवा कपड्याचे ओलेचिंब बोळे योनीत व ओटीपोटावर ठेवावेत. स्राव अधिक असल्यास शतधौतघृत ओटीपोट व कंबर यांना चोळून वाळा इत्यादींच्या थंड काढ्यात बसवावे आणि दूध, साय, दुधाचे तूप यांबरोबर कमळ-केशर चाटवावे. गव्हला इत्यादींचे सिद्ध दूध द्यावे. जंगली प्राण्यांच्या मांस रसाबरोबर किंवा दुधात मध व साखर घालून त्याबरोबर भात खाण्यास द्यावा. शुद्धीखेरीज रक्तपित्तांची चिकित्सा करावी. पहिल्या तीन महिन्यांपर्यंत गर्भस्राव असता प्रत्याख्येय चिकित्सा करावी. तसेच आमाचा संबंध असता प्रत्याख्येयच चिकित्सा करावी. विरुद्धोपक्रमत्वात आमाचा संबंध असल्यास उपवास घालून शीत व रूक्ष उपचार करावेत. नागरमोथा इत्यादींचे उकळलेले पाणी पाजावे. मूग इत्यादींच्या कढणाबरोबर वर्‍याचे तांदूळ इ. तृणधान्ये आहारात द्यावीत. आम नाहीसा झाल्यावर स्निग्ध व थंड उपचार करावेत. हे उपचार तीन महिन्यांच्या आतील गर्भिणीच्या स्रावाकरिता करावेत. वरील उपचारानंतरही गर्भपात झालाच, तर गर्भाशयशुद्धीकरिता व वेदनाशमनाकरिता पुष्कळ प्रमाणात मद्य पाजावे. नंतर लघुपंचमुळांनी सिद्ध पेज, तूप इ. न घालता  द्यावी. अमद्यपी स्त्रीला पंचकोलाच्या चटणीने किंवा महापंचमुळांच्या काढ्यात सिद्ध तीळ-तांदूळ यांची पेज जितक्या महिन्यांचा गर्भपात असेल तितके दिवस पाजावी. अग्निदीपक हलके, स्नेहविरहित व विनामीठ खानपान असावे. त्यामुळे दोषधातूंतील वाढलेला ओलावा कमी होतो. नंतर ओज बलवर्धक अग्निदीपक उपचार करावेत.


उपविष्टक : रक्त किंवा इतर योनिस्रावाने बलवान मोठा गर्भ न पडला तरी त्याची वाढ खुंटते. पोट वाढत नाही, फक्त गर्भाशयास याचे चलनवलन आढळते, अशाला उपविष्टक म्हणतात. अतिस्राव व शोक इत्यादीकांनी वाढलेल्या वाताने गर्भ कृश व शुष्क होतो (नागोदर). वाढलेले पोट कमी होते व स्फुरणही क्वचित होते, या दोन्हींकरिता वातघ्न, पौष्टिक व गोड द्रव्याने सिद्ध तूप, दूध, मांसरस व अंडी द्यावीत. ही पोटभर देऊन वाहनात किंवा घोडा इत्यादींवर बसवून, वेगाने मार्गक्रमण करून उदरात क्षोभ उत्पन्न करावा. जो गर्भ स्फुरणही पावत नाही त्या लीन गर्भाकरिता ससाणा, गाय इत्यादींच्या मांसरसात किंवा उडीद, मुळे यांच्या कढणात भरपूर तूप घालून ते द्यावेत. बाळबेल इ. दुधाबरोबर, मेदस्वी मांस, मध द्यावेत. कंबरेला अभ्यंग करावा, गर्भिणीला सतत आनंदात ठेवावे म्हणजे गर्भ वाढतो. मातेच्या अल्प आहाररसाने पोसला जाणारा गर्भ काही काळ पोटात राहतो किंवा कष्टाने तो बाहेर येतो. उदावर्त अनुरूप स्नेह व बस्तींनी जिंकावा नाहीतर गर्भ व गर्भिणीला मारक होतो. गर्भ मृत झाला तर गर्भिणीचे पोट थंड, ताठरलेले, फुगलेेले व अतिवेदनायुक्त होते. गर्भाचे स्पंदन थांबते. बेचैनी, डोळे म्लान होणे, तहान, भ्रम, ग्लानी होतात. श्वास कष्टाने घेता येतो व वेणा उत्पन्न होत नाहीत. अशा वेळी योनीवर कोमट पाणी शिंपडून सुरा, दारूचा गाळ, गूळ व सैंधव एकत्र करून लेप करावा तसेच तूप-युक्त सावर व आळशीची बुळबुळीत चटणी योनीत पुन:पुन्हा भरावी, याशिवाय वार पडण्याकरिता सांगितलेले उपचार करावेत. हाताने शक्य तर, सावरीच्या बुळबुळीत चटणीत तूप घालून, हाताला व योनीला ती चोपडून हात आत घालून तो ओढून काढावा. मूढ गर्भ वेडेवाकडे अवयव होऊन तो अडला असेल, तर तो योनीतून कमीत कमी त्रासाने यावा असे वळण गर्भाच्या अवयवांना द्यावे व तो काढावा. याकरिता अवयव वर ढकलणे, बाजूला दाबणे इ. ( उत्पीडन, संपीडनादी  ) क्रिया कराव्यात. हात, पाय व डोके वेड्यावाकड्या अवस्थेत योनीत येऊन किंवा एक पाय योनीत व एक पाय गुदाकडे येऊन वाकडे होऊन अडकले की शस्त्रक्रियेशिवाय इलाज नसतो. मंडलाग्र व अंगुली शस्त्रानेच अवयव कापून गर्भ काढावा. तीक्ष्ण टोकाचा चाकू वापरू नये. शस्त्राच्या प्रथम कक्षेत जो अवयव येईल तो फोडावा, कापावा आणि काख, टाळू , हनुवटी, गाल, डोळ्याची खोबण इत्यादींमध्ये गर्भशंकू घालून तो ओढावा. खांद्याने अडल्यास बाहू व पोट फुगलेले असल्यास ते कापून आतडी बाहेर काढून काढावा. ढुंगण, कंबर अडकल्यास ती हाडे फोडावीत व गर्भिणीला वाचवावे. जिवंत गर्भ तोडू-फोडू नये, तो स्वत:बरोबर मातेलाही मारक होतो तसेच मृत गर्भाची क्षणभरही उपेक्षा करू नये. योनी मिटलेली किंवा स्थानभ्रष्ट, थंड अंग, दुर्गंधी ढेकर, श्वासाला त्रास व मक्कल्लशूल असलेल्या मूढ गर्भाची चिकित्सा करू नये. वार पडत नसेल, तर धुरी इ. उपचारांनी वा हात घालून सोडवून काढावी. शेवटी नि:शल्य स्त्रीच्या अंगावर गरम पाणी शिंपडावे. अंग पुसून वातहर तेलाचा अभ्यंग करून बोळा योनीत ठेवावा. यामुळे योनी मृदू होऊन शूल थांबतो. ओवादी चूर्ण वा काढा पाजावा, नंतर कुटकी, अतिविषादी तीन दिवस पाजावा. म्हणजे दोषस्राव होऊन वेदनानाश होईल. नंतर सकाळी स्नेह व रात्री अरिष्ट किंवा आसव सात दिवस द्यावेत व शिरीषादींच्या काढ्यात भिजविलेला बोळा योनीत ठेवावा. नंतर जेवणास दहा दिवस वातहर द्रव्यांनी सिद्ध दूध, नंतर दहा दिवस तसाच मांसरस, नंतर हलके पथ्यकर व कमी प्रमाणात भोजन सेवन करावे. बला तेलाचा अभ्यंगही करावा अशा रीतीने चार महिने वागून नंतर हळूहळू नित्याच्या आहारावर यावे. मृत स्त्रीचा जिवंत गर्भ कुशीमध्ये होणार्‍या प्रस्पंदनावरून ओळखावा व लगेच पोट फाडून तो बाहेर काढावा.

प्रतिबंधक चिकित्सा : गर्भशरीर जास्तीत जास्त निरोगी व्हावे, शुक्र-रजातील व मातेचे इतर दोष बाधू नयेत या दृष्टीने निसर्गाचा प्रयत्न चालू असतो. त्या प्रयत्नाला साथ दिली नाही किंवा ती अपुरी पडली किंवा अपथ्य सेवनच घडले, तर गर्भस्रावपाताची खोड लागते. विशिष्ट महिन्यात विशिष्ट धातूंचे पोषण इतरांपेक्षा अधिक जोमाने होत असते. ह्याचा फायदा घेऊन, त्या धातूंच्या पोषण कार्याला मदत करणारी औषधे त्या महिन्यात दिली, तर गर्भगर्भिणीचे बाधक दोष कमी होऊन गर्भपोषण सुधारून स्रावपात होत नाही. गर्भिणीला पहिल्या महिन्यापासून दुधाबरोबर ज्येष्ठ-मधादी आपटा इ. चूर्णे दुधाबरोबर किंवा दूध सिद्ध करून द्यावीत. आनु-वंशिक वैगुण्ये ही या कालात तन्नाशक औषधे देऊन नाहीशी करता येतात. 

बालोपचार : जन्मत:च बाळाच्या अंगाला सैंधव तूप लावून अंगा-वरील वारेचे घटक काढून टाकावेत. बला तेल अंगावर शिंपडावे म्हणजे प्रसवक्लेश कमी होतील. त्याच्या कानाजवळ दगडावर दगड आपटून आवाज करावा. बाळ स्वस्थ झाल्यावर बेंबीपासून चार अंगुलांवर नाळ दोर्‍याने बांधून कापून, दोरा मानेवर गुंडाळावा. बेंबी व नाळ यांवर कुष्ठतेल शिंपडून स्नान घालावे. वड, उंबर इत्यादींचा, चंदनादींचा काढा किंवा सोने, रुपे ( चांदी ) लाल तापवून पाण्यात विझवून ते पाणी स्नाना-करिता वापरावे. नंतर उजव्या तर्जनीने टाळू उचलून डोक्यावर तेलाच्या बोळ्याने ती झाकावी. वेलदोडे, ब्राह्मी इ. तूपमधाबरोबर बुद्धी, आयुष्य व बल वाढण्याकरिता चाटवावे. सोने, वेखंड इ. किंवा सोने, आवळाकठी तूपमधाबरोबर चाटवावे. नंतर सैंधव तूप चाटवून पोटातील पाणी ओकवावे. आहार म्हणून पहिल्या दिवशी तीन वेळा धमासा घालून मधतूप मंत्रून द्यावे. दुसर्‍या व तिसर्‍या दिवशी पांढर्‍या रिंगणीने सिद्ध तूप तिन्ही इत्यादी द्यावे. चवथ्या दिवशी बालकाच्या तळहातावर राहील एवढे लोणी दोन वेळा व तिसर्‍या वेळी अंगावरचे दूध द्यावे. पाचव्या दिवसापासून दूध पचेल तसे लोणी कमी करून दूध द्यावे. आईचे दूधच पाजावे, तेच उत्कृष्ट शरीरवाढ करते, ते विकृत असेल, तर दोन दायांचे दूध पाजावे. त्या दाया वर्ण व प्रकृतीने आईसारख्या, अव्यंग, निरोगी, मध्यम वयाच्या, मूल जिवंत असणार्‍या, लोलुप नसणार्‍या व वात्सल्ययुक्त असाव्यात. त्यांनी हिता-हारविहार ठेवावा. मातेचे दूध शुद्ध करून वाढविण्याचे उपचार करावेत. अंगावरचे दूध मिळाले नाही, तर शेळीचे किंवा गायीचे दूध आईच्या दुधाच्या गुणांसारखे करून द्यावे. लहान पंचमुळे किंवा सालवण, पिठवण सिद्ध दूध साखर घालून द्यावे. सहाव्या दिवशी षष्टीपूजन, दहाव्या दिवशी कुळाला योग्य असे समाक्षरी नामकरण करावे व नंतर प्रकृती सारासार, अंगप्रत्यंगप्रमाण परीक्षण करून आयुष्याचे मान ठरवावे. वैगुण्यांना अनु-सरून तन्नाशक अन्नौषधांची योजना करावी. शय्यावस्त्रे धुतलेली, पवित्र, जंतुनाशक, धुरी दिलेली, मऊ व वळ्या विरहित असावीत. साजूक असे  तूप जाळावे व त्याची धुरी बाळाला द्यावी. तसेच बाळाच्या हाताला, गळ्यात, डोळ्यांवर सतत ब्राह्मी, एैद्री, जीवक इ. औषधी विशेषत: वेखंड, मणी, रत्ने बांधावीत. याने जंतूंपासून रक्षण आणि आयुष्य, आरोग्य, स्मृती, बुद्धी यांची वाढ होते. सहा ते आठव्या महिन्यात कान नैसर्गिक छिद्र म्हटले जाणार्‍या जागेवर टोचावे, म्हणजे रक्त येत नाही व उपद्रव होत नाहीत. इतरत्र टोचल्यास कालिका, मर्मरी व रत्ना यांपैकी शिरा विंधली जाऊन रक्त येते व उपद्रव होतात. नंतर सुईने तेलात भिजविलेला दोरा घालावा व कानाच्या पाळीवर कच्चे तेल सोडीत रहावे. दात आल्यावर क्रमाने स्तनपान सोडवावे आणि वरीलप्रमाणेच आणि हलके पौष्टिक अन्न द्यावे. चारोळ्या, ज्येष्ठमध, भाताच्या लाह्या, खडीसाखर व मध यांचा लाडू बालकांना पोषक होतो. बाळबेल, लाह्यांचे पीठ, साखर व वेलची यांचा लाडू अग्निदीपक होतो व धायटीची फुले आणि साखर घातलेली लाह्याची पेज ज्या मुलाला पातळ शौचास होण्याची खोड असते, त्याचा मल बांधून होण्याच्या दृष्टीने द्यावी. पुढील नियम पाळावेत : (१) बालकांना सौम्य व तिटकारा, क्षोभ उत्पन्न होणार नाही अशी औषधे द्यावीत. (२) शीघ्रकारी विकार झाल्याखेरीज रेचक देऊ नये. (३) त्यांना भीती दाखवू नये. (४) खरखरीत वस्त्र, झोंबणारा वायू व लंघन यांपासून त्याला दूर ठेवावे.

नित्य सेवनीय रसायन योग : हे योग बालकाची पुष्टी, वाचा, मेधा, बुद्धी, स्मृती चांगली करून आयुष्यवर्धक होतात. ब्राह्मी आदी वनस्पती विशेषत: जंतुघ्न, तर अष्टांग घृते सुखी आयुष्यकर, तर सारस्पद घृत अग्निवर्धक होते. तसेच सोने, पांढरे वेखंड इत्यादींबरोबर वरीलप्रमाणेच गुणदायक होते. वचादी योग वाचा शुद्ध करतो. हे योग वर्षभर द्यावेत. 

बालामय व उपचार : दूध व अन्न चांगले असेल, तर बाळाचे आरोग्य टिकते व दूषित असेल, तर त्याला रोग होतात. विशुद्ध दूध पाण्यात टाकले असता पाण्याशी एकरूप होते. वातदुष्ट दूध तुरट, रूक्ष, फेसाळ पाण्यावर तरंगणारे व मलमूत्रांचा अवरोध करणारे असते. पित्तदुष्ट दूध उष्ण, आंबट, तिखट, पाण्यावर टाकले असता पिवळे तरंग येणारे असते. पिवळे तरंग अंगाचा दाह करते. कफदुष्ट दूध दाट, बुळबुळीत, खारट पाण्यात बुडणारे व अनुत्साह, जडपणा, सुस्ती इ. करते. दोन दोषांच्या दुष्टीने त्या  दोघांची व तिघांच्या दुष्टीने तिघांची लक्षणे होतात. वेदना ज्ञान रडण्यावरून होते. जोराच्या रडण्यावरून तीव्र वेदना समजाव्यात. मूल पुनःपुन्हा ज्या भागाला हात लावते व ज्या भागास स्पर्श करू देत नाही, तेथे विकार व वेदना आहेत हे समजावे. डोळे मिटल्याने, डोक्यात जीभ व ओठ चावणे, मुठी आवळणे व श्वास यांनी हृदयात अवरोध ओकारी, पोटफुगी, गुरगुर, पाठीत वाकणे व स्तनाला चावणे यांनी कोठ्यात मलमूत्र यांचा संचय, त्रासिकपणा व इकडेतिकडे पाहणे यांनी गुद व बस्तीत विकृती समजावी. दोष व रोग यांना अनुसरून आईला व मुलाला उपचार करावेत. वाता-त्मकावर आईला दशमुळे वा चित्रकादी दूध शुद्धीकरिता पाजून काही दिवसांनंतर वातव्याधिहर तूप द्यावे व त्यावर सुरा द्यावी. विरेचन, बस्ती, वातनाशक शेक इ. द्यावेत. बालकाला रास्नादी तूप, खडीसाखर घालून द्यावे. पित्तदुष्टावर गुडुच्यादी, त्रिफलादी, सारिवादी, पटोलादी, पद्मकादी काढे किंवा घृते दोघांना द्यावीत. रेचक, थंड अभ्यंग लेप, शेक इ. द्यावेत. कफजन्यावर बालकाला ज्येष्ठमध सैंधवयुक्त किंवा सैंधवपिंपळी मधयुक्त तूप पाजावे. नंतर गेळफळाच्या फुलांचे चूर्ण आईच्या स्तनाला व मुलाच्या ओठांच्या आत लावून दूध पाजून ओकवावे. आईला तीक्ष्ण वामकांनी ओकारी करवावी. पेयादी क्रमाने अन्न द्यावे. मुस्तादी, तगरादी, अतिविषादी काढे दोघांना द्यावेत.

त्रिदोषमलिनाने दुर्गंधी तसेच पाण्यात बुडणारे गाठाळ, स्वच्छ, चोथापाणी, फेसाळ किंवा पाण्यासारखे, अनेक रंगांचे व वेदनांचे शौचास होते. लघवी पांढरी, पिवळी व दाट होते. ज्वर, अरुची इ. व हातपाय आपटणे, कंप, भ्रम, अंग फुटल्याप्रमाणे वेदना, नाक, डोळे, तोंड येणे इ. चिन्हांचा दुःसह व मारक क्षीरालसक होतो. पुढील उपचार करावेत : आईला व मुलाला वमन द्यावे. पेयादी अन्न देऊन वचादी, निशादी व माद्य्रादी काढे द्यावेत. नंतर जो विकार चालू राहील त्याचे उपचार करावेत, पाठादी काढा व उत्तम दूध दोषहर आहे. दात येणे सर्व रोगांना कारण होते. विशेषतः ज्वर, ओकारी, अतिसार, डोळे येणे, खुपर्‍या इ. विकार होतात.

उपचाराचे पुढील नियम आहेत : रोग त्याचे स्थान व दोष, दोषांचा व रोगाचा उद्रेक, बालक व रोग यांचे बलाबल यांना अनुसरून देश-कालादींचा विचार करून औषधे द्यावीत. ज्या अर्थी ज्वरादी रोग, दोष दूष्ये मोठ्या माणसात असतात, तेच बालरोगांत असतात. त्या अर्थी त्यांच्याकरिता त्या त्या रोगाचे जे जे उपचार सांगितले आहेत ते तेच बालांच्या रोगातही उपयुक्त होतात. मात्र त्यांची मात्रा कमी करावी व सौम्य औषधे द्यावीत. कारण मुलांचे शरीर लहान, सुकुमार आणि सर्व तर्‍हेचे अन्न पचविण्यास असमर्थ असते. विरेचनाने साध्य रोगावर बस्ती, प्रतिमर्शाने साध्य होणार्‍यावर मर्शनस्य द्यावे, विरेचनादी उपचार आईलाच जरूर करावेत. आईच्या स्तनाला लेपन लावून दीड तासाने धुवून नंतर मुलाला अंगावर पाजावे. कफावस्था व नेहमी दुधातुपाचा आहार म्हणून बालक नेहमीच स्निग्ध असते, म्हणून त्याला स्निग्ध करण्याची आवश्यकता नाही. दूध व अन्नावर असणार्‍या बालकाला तूप घातलेली पातळ पेज पोटभर पाजून मृदू वामक द्यावे. मूर्वादी अवलेह दुधाचे उत्तम दोषनाशक आहे. पिंपळीचूर्ण किंवा धायटी व आवळाचूर्ण मधा-बरोबर हिरड्यांना चोळावे. लावा किंवा तितर पक्ष्यांच्या मांसाचे चूर्ण मधातून चाटविल्याने मुखकमलात केसरांप्रमाणे दात येतात. वचादी घृत, रजन्यादी लेह व संमगादी घृत दात येताना होणार्‍या सर्व रोगांवर उपयुक्त आहे.

दंतोद्भव रोगावर कडक पथ्यापथ्य देऊ नये, कारण दात आल्यावर ते आपोआप शमतात. शोष कफदुष्ट दूध, अतिनिद्रा, थंड पाणी व दिवसाची  झोप घेणार्‍या मुलाची रसवह स्रोतसे कफाने रुद्ध होऊन ज्वर, पडसे, खोकला व अरुची उत्पन्न होतात. नंतर मूल सुकत जाते. तोंड व डोळे तेलकट व फिकट पांढरे होतात. यावर सैंधवादी, पंचकोलादी, बदर्यादी चूर्णे चाटवावीत. विकार जुना झाल्यास स्थिरादी व सिंह्यादी घृते स्रोतसांचे शोधक यष्टाव्हादी व तालीसादी घृते शोषनाशक आणि शृंग्यादी पुष्टिकर होत. ती अवस्थांनुरूप द्यावीत. अभ्यंगाकरिता वचादी व लाक्षादी तेल उपयुक्त. चाटण्याकरिता अतिविषा किंवा ती पिंपळी, काकडशिंगीसह मधाबरोबर द्यावी खोकला, ताप, ओकारी नष्ट करते. जे मूल दूध प्यायल्याबरोबर ओकते त्याला रिंगणी, डोरलीफलरस व पंचकोल एकत्र, पिप्पल्यादी, कृमिजितादी, त्रिकटु किंवा खवले मांजरे, साळई, घोरपड, अस्वल, मोर यांचे कातडे व केस यांची मशेरी मधतुपांत चाटवावी. ही बरेच दिवसांची खोड असल्यास खदिरादी घृत द्यावे.

जन्मतः दात येणे, वरचे अगोदर येणे असे अपवादाने घडते.तालुकंटक विकारात टाळूतील मांसात कफ कुपित होऊन डोक्यावर टाळूचा भाग दबतो. दूध न पिणे, जबरदस्तीने थोडे पिणे, मल पातळ, तहान, तोंडाला कंड, डोळे दुखणे, वांती व मान सावरता न येणे ही लक्षणे होतात. यावर टाळू वर उचलून तिच्यावर मधातून पिंपळी, सुंठ, सैंधव, गायीच्या शेणाच्या रसातून सारवावा. सुंठ्यादी पुटपाकाचा रस टाळू व तोंड यांना लावावा आणि डोळ्यांवर शिंपडावा. हरीलक्यादी अंगावरच्या दुधाबरोबर पाजावे. गुदव्रणाला मातृकादोष, अहिपूतन, पृष्टारू, गुदकुट्ट , अनामिक असेही म्हणतात. गुदाला मलाचा लेप किंवा घाम यांनी रक्तकफ दुष्ट होऊन गुदामध्ये तांबडा, खाजरा व पुष्कळ उपद्रवयुक्त व्रण होतो. यावर पित्त-कफनाशक औषधांनी आईचे दूध शुद्ध करावे. तापवून थंड केलेले पाणी रसांजन व मध घालून मधून मधून मुलाला पाजावे आणि त्यांचाच व्रणाला लेप करावा. बोर व पिंपरीची साल आणि त्रिफळा यांच्या काढ्याने शिंपडावे. कासीसादी चूर्ण व्रणावर भुरभुरावे किंवा आंबट द्रव्यातून त्याचा लेप करावा. यष्ट्यादी, सारिवादी किंवा असाणा साळ चूर्ण लावावे. लाली व कंडू जास्त असल्यास जळवांनी रक्तस्राव करावा. सर्व पित्तव्रणाची चिकित्सा करावी. माती खाल्ल्याने झालेल्या रोगावर पाठादी घृत उत्तम उपयुक्त होते. 

पहा : वंध्यत्व सुप्रजाजननशास्त्र स्रोतसे.

जोशी, वेणीमाधवशास्त्री