वयःस्थापन : (आयुर्वेद). मानवी जीविताचे अंतिम ध्येय मोक्ष आहे, योग हा मोक्षप्रवर्तक आहे, मोक्ष देहत्यागानंतर मिळावयाचाअसतो, योग हा देहत्यागाच्या अगोदर साधलेला असावा लागतो, योग उपान्त्य ध्येय आहे. शारीर व मानस घटक विशुद्धतम असल्यावाचून योग साधत नाही. हे जन्मतः विशुद्धत्तम लाभणे−जन्मतः योगी असणे यापरते श्रेष्ठ भाग्य नाही. परंतु तसे घटक जन्मतः न लाभल्यास ते तसे संपादन करणे व राखणे हेच स्वभावतः कर्तव्य आहे. याकरिता वयःस्थापक अशा औषधान्नाविहाराची मतत घेतली पाहिजे. 

वयःस्थापनाचा अर्थ : वय याचा अर्थ तारूण्य, ते स्थापन करणे, अर्थात दीर्घ काल टिकविणे म्हणजे वयःस्थापन होय. वयात येत असता ते सर्वगुणसंपन्न मिळावे. तसे मिळण्याचा संभव नसल्यासतसे मिळावे, तसे मिळाले नसल्यास ते प्राप्त व्हावे, झाल्यास ते चिरकालटिकावे म्हणून योग्य त्या औषधान्नविहाराचा उपयोग करणे म्हणजे वयःस्थापन होय. 

आदर्श तारूण्य : स्वस्थ व अष्टधातू उत्तम सारवान व्यक्तिचे तारुण्य हे आदर्श तारुण्य होय. अर्थात हेच तारूण्य अमिलक्षणीय होय. समाजात असा तरूण अती विरळाच असतो. बहुसंख्य तरूण सुरटलेले पाहण्याची सवय झालेल्या आपल्या डोळ्यांना बास वर्षाचाबालक अठरा वर्षाचा व पन्नास वर्षांचा प्रौढ तीस-पस्तीसचा वाटला की, आनंद व आश्चर्य वाटले. आदर्श तारूण्याच्या दर्शनाने तर डोळ्यांचे पारणे फिटले असा अप्रतिम आनंद होईल.  

रसायन लक्षण : स्वस्थ मनुष्याला शारीरिक व मानसिक सामर्थ्य व उत्साह देणारे तसेच सारवान रसादि धातू, स्मृतिबुद्धादी मानसभावयांचा लाभ करून देणारे तसेच म्हातारपण नाहीसे करून तारुण्य देणारे व रोगनाशक औषध अन्न व विहार रसायन होय.वयःस्थापनकार द्रव्यांच्या रसवीर्यादिकाचे अयन-लाभोपाय म्हणजे रसायन असाही एक अर्थ रसायन शब्दाचा आहे.  

वयस्थापन शब्दाची योजना : तारूण्यप्राप्ती हे रसायनाचे प्रधान कार्य आहे, रसायन शब्दाचे वाईट अर्थही समाजात रूढ आहेत. त्या अर्थांनी संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून रसायन शब्दाच्या ऐवजी वयःस्थापनास हा शब्द येथे योजला आहे.  

वयःस्थापनास योग्य व्यक्ती : सत्य पण प्रिय बोलणारी, शांत, धैर्यवान, तपस्वी, दयाळू, निरहंकारी, मनोनिग्रही, अहिंसक, पावित्र्यानेजप करणारी, देवब्राम्हणगाय-आचार्य-गुरू-वृद्ध यांना पूज्य मानूनत्यांची सेवा करणारी, देशकाल प्रमाण युक्ती जाणणारी, आवश्यक तितकीच झोप घेणारी व अधिक जागरण न करणारी, मद्य व मैथुन यांचे सेवन न करणारी, नेहमी गाईचे दूध व तूप यांचे सेवन न करणारी, अनेक रसांचे पदार्थ एकत्र कालवून न खाणारी, सदाचारी, आस्तिक, धर्मशास्त्राप्रमाणे वागणारी, अध्यात्मचिंतक व भूतदयेने व्याप्त असणारी व्यक्ती वय स्थापून सेवनास योग्य असते.  

अयोग्य व्यक्ती : इंद्रियांवर ज्यांचा ताबा नाही, अव्यवस्थित गाफील असल्यामुळे ज्यांच्याकडून नेहमी चुका होतात, पापे करणाऱ्या औषधाचा अपमान करणाऱ्या, आळशी, व्यसनी, दरिद्री अशा व्यक्तिवयःस्थापनास अयोग्य आहेत. अशा व्यक्ती निरोगी राहणेही अशक्य आहे.  

वयःस्थापन स्वयमेव उपयुक्त : अयोग्य व्यक्तिंनीही त्यांच्या अपरिहार्य दोषांना त्यांना आळा घालता आला नाही, तरी त्या दृष्टीने प्रयत्न करीत राहून जेवढे साधले तेवढे साधले या मनोभूमिकेने आपणासयोग्य अशा सौम्य वयःस्थापक औषधान्नविहाराची तज्ञाकडून माहिती घेऊन त्याचे सेवन नित्य करीत असावे. यापासून तोटा नाहीच, झाला तर फायदाच होईल. वयस्थापन व्यर्थ नाही.  

प्रकृतिस्थापन हेही वयःस्ताप होय : बातप्रकृतीसारख्या एक दोष प्रकृतीच्या तसेच दोन दोषांच्या प्रकृतीच्या व्यक्तींना लाभणारे तारूण्य हे स्वस्थ व सर्वसार व्यक्तींच्या तारूण्याच्या मानाने निकृष्ट प्रतीचे असते. म्हणून दोष प्रकृती नाहीशी करून समप्रकृती प्राप्त करून देणारी चिकित्सा म्हणजेच प्रकृतिस्थापन हे एक प्रकारचे वयःस्थापनच होय.

बाल्य संपण्याच्या सुमारास निसर्गतःच वयःस्थापन कार्याबरोबरच प्रकृतिस्थापनकार्य सुरू होते म्हणून याच काळात प्रकृती दोषविपरितगुणी वयःस्थापक द्रव्यांचे आहारविहाराचे सेवन करावे म्हणजे समप्रकृती व चांगले तारूण्य प्राप्त होईल.  

प्रकृतिस्थापनकर वयःस्थापने : थंड पाणी, गाईचे दूध, गाईचे तूप व मध एकेक, दोन दोन, तीन तीन किंवा मिळून घ्यावयाची असतात. ही १५होतात. स्वस्थ मनुष्याने थंड पाणी, पित्त प्रकृतीने दूध, कफ प्रकृतीने मध, वात प्रकृतीने तूप, इतर मिश्र प्रकृतिने यथानुरूपमिश्र द्रव्ये घ्यावीत. तसेच तिळाचे तूप, इतर मिश्र प्रकृतिने यथानुरूप मिश्र द्रव्ये घ्यावीत. तसेच तिळाचे तेल वात प्रकृतीस हितकर आहे.त्याचे सतत सेवन हे समप्रकृती करणारे आहे.  

तारूण्य उत्पन्न करणारी वयःस्थापने : वर्धमान पिप्पली (पिंपळी), सणाची फळे, पुनर्नवा, मूर्वादियोग ब्राह्मरसायन, च्यवनप्राश, आवळा, ब्राह्मी, ब्राम्हीघृत, भुईकोहळा कल्प हे तारूण्य उत्पन्न करतात. शेवटचे दोन कल्प तारण्याचा स्थिरधर्म वाढविणारे आहेत.  

सर्वच वयःस्थापने तारूण्यवर्धक आहेत पण काही विशेषत्वाने असतात. त्यांपैकी काही वर दिली आहेत.  

सारत्व दर्शन : सार म्हणजे विशुद्धतर धातू असणे. काही व्यक्तीमध्ये जन्मतः वा तारुण्यात काही उत्कट गुण किंवा सामर्थ्य दिसून येतात. हे शारीर धातूपधातू इंद्रिये, अवयव इ. शरीर घटकांच्या सारत्वामुळे प्रकट होतात. सारत्वाची प्रत जितकी अधिक तितका तो गुण वा ते सामर्थ्य अधिक उत्कट असते. न्याय निष्ठुरता, पुनःपुन्हा येणाऱ्या अपयशाने हताश न होता, अथक सातत्याने प्रयत्न करणे, नवा कठीण विषयही चटकण समजणे (ग्रहणशक्ती), त्याच्या सूक्ष्म छटा लक्षात येणे (सूक्ष्मबुद्धी), त्याची व्याप्ती ध्यानात येणे (तैल बुद्धीव्यव्यापक बुद्धी), तो विषय लगेच बुद्धीतून निघून न जाता तो राहणे (धारणाशक्ती), पुष्कळ दिवसांनी तसाच तो व्यक्त करता येणे (स्मरणशक्ती), स्वतः त्यावर विचार करून त्यात अधिक सूक्ष्मता व व्यापकता यांच्या छटा व मर्यादा दाखविणे (मती), अनायास यश कीर्ति, मानसन्मान मिळणे इ. सर्व जे जे उत्कट भव्य जीवनात लाभते वा व्यक्तिंकडून प्रकट होते ते ते सर्व शरीर घटकांच्या सारत्वाने होते.  

 

असारत्वाचे दर्शन : प्रयत्न करूनही यश न मिळणे वा यश मिळूनही त्याचे फल न मिळणे, तसेच योग्य मानसन्मान, किर्ती न मिळणे, आलस्य, अकर्तृत्व, मित्रेपणा इ. तसेच ग्रहणशक्ती, धारणाशक्ती, बुद्धी, स्मृती इ. कमी असणे हे असारत्वाचे दर्शक आहे. 

व्यक्तिच्या ठिकाणचे अलौकिकत्व हे उत्म सारत्वाचे दर्शक आहे.  

वय:स्थापन द्रव्ये : योग्यता विशुद्धतरतरम धातू निर्माण करणे हेवयःस्थापनाचे प्रधान कार्य, शरीराची शुद्धी करून प्रज्ञापराध, असात्म्येंद्रियार्थ संयोग, कालार्थकर्मांचा हीनमिथ्यातियोग होऊ न देता विशुद्ध मनाने श्रद्धेने सेवन करण्याची व्यक्तिच्या बाजूने सर्व व्यवस्था झाली असली पण द्रव्य जर वयःस्थापक नसले, तर काही उपयोग नाही. उपयोगात आणावयाचे द्रव्य त्या योग्यतेचे असले पाहिजे.  

वऱ्याचे तांदूळ, लकुच (ओटीचे फळ, क्षुद्र फणस), पुष्ट पक्का मुळा, मोडाचे धान्य, काकवी इ. द्रव्ये ही मानवी शरीराच्या दृष्टीने  अत्यंत घातक दोषकर आहेत. कारक या द्रव्यांचेच घटक विशुद्धतर नाहीत तेव्हा मानवी शरीरातील धातुघटक त्यांच्याकडून विशुद्धतरतम असतील अशी द्रव्ये वयःस्थापन योग्य होतात. इतर द्रव्ये याला हानिकर होतात.  


 कार्यपद्धती : शरीराशी द्रव्याचा संबंध आल्यानंतर त्याच्या रसवीर्यादी गुणाप्रमाणे ते कार्य करू लागते. काही द्रव्ये अग्निदीपक, काही द्रव्ये पाचक, तर काही दीपक-पाचक असतात. काहीस्त्रोतःशोधक तर काही जननकायवर्धक, तर काही पुष्टी देणारी असतात. असे वैशिष्ट्य प्रत्येक द्रव्यात असते. वयःस्थापक द्रव्यांची ही वैशिष्ट्ये ध्यानात घेतली, तर त्यांची कार्यपद्धती समजते. चिकित्स्य व्यक्तीच्या शरीरातील घटकांना कोणत्या वैशिष्ट्याची आवश्यकता आहे, हे ठरलिले पाहिजे.  

निवड : वयःस्थापन करण्याच्या वेळी ज्याला ते करावयाचे त्याच्यातले कोणते वैगुण्य नाहीसे करावयाचे आहे किंवा कोणत्या गुणांची प्रत वाढवावयाची आहे, हे निश्चित करावे. हे इष्ट निर्माण न होण्याला शरीरात कशाचा अडथळा होतो किंवा आहे हे पहावे. हा अडथळा नाहीसा करून इष्ट साध्य करण्याच्या योग्यतेचे द्रव्य निवडावे. स्त्रोतसे रुद्ध व अग्निमंद असताना धारणशक्ती वाढवावयाची आहे, तर बिब्बा हवा. मेंदूतील घटकांना पोषक द्रव्ये मिळत नाहीत तर ब्राम्ही, गाईचे तूप ही बुद्धी कार्यकर द्रव्ये द्यावीत. स्त्रोतसे रूद्ध आहेत. पोषकांचा अभाव आहे, तर वेखंडसिद्ध गाईचे तूप द्यावे, एखाद्या व्यक्तीला मनोनिग्रहच करता येत नाही, हे वैगुण्य आहे. त्याचे कारण अस्थिधातू क्षीण झाला आहे. नियमात्मिका धृती हा अस्थिसारत्वाचा गुण आहे. येथे केवल धृतिधारक मेंदूतील घटकाचे पोषक न देता अस्थिसारत्व निर्माण करणाऱ्या मोती, प्रवाळ, आनंदसूत इ. द्रव्यांची निवड करणेअत्यावश्यक आहे.

वयस्थापनाचे शरीरातील प्रधान कार्य : (१) केवल घटनात्मक कार्य : शरीरात विशुद्धतरतम धातू क्रमाने निर्माण करणे व तसे सातत्याने पुढेही निर्माण होत राहतील अशी योग्यता शरीरघटकात निर्माण करणेहे वयःस्थापनाचे प्रधान कार्य आहे. ब्राम्हीरस, गुहुची, यष्टीमधु, नागबला, गोखरू इ. कुटीप्रावेशिक रसायनांचे कार्य असेच होते.  

शुद्ध घटकांचे विशुद्ध, विशुद्धांचे विशुद्धतर व विशुद्धतरांचेविशुद्धतम घटक बनविण्याचे एकमेव कार्य व तेही जोमाने व्हावे याकरिता शरीराची झीज जितकी कमी होईल तितकी कमी व्हावी म्हणून ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांची कर्मे शक्य तितकी कमी व्हावीत याकरिता व्यवस्था करणे जरूर असते. योग्य ठिकाणी एकांतात अनुरूप कुटी बांधून तेथेच निवास असणे आवश्यक आहे. अपवाद फक्त मलमूत्रोत्सर्जक इंद्रिये होत. त्यांच्या कर्माला प्रतिबंध करू नये.  

मनाचा क्षयही मनोव्यापारांनी होऊ नये व होणारा क्षय भरून मनाचे पोषण व्हावे म्हणून मन एकाग्र करून जप करीत ध्यानमग्न ठेवावे.  

वयस्थापन सेवनानंतर जुने असार घटक शरीर आपल्या अग्नीने पचवून त्यालाच सार बनविते, विशुद्धालाच विशुद्धतर बनविते, असे सूक्ष्म घटकांचे परिवर्तन विशुद्धतरतमत्वात होत असते, तसेच शुक्रधरा कला बलवान करून विरल कार्याबरोबर सुधारलेल्या प्रतीचे नवे घटकही निर्माण करते. वयःस्थापनाचे सर्वांत प्रधान कार्य पित्तधरा कला व शुक्रधरा कला यांवर होत असते.  

(२) पूर्णत : विघटन व नंतर घटनात्मक कार्य : वावडिंगाचे तांदूळ, सोम, अजागरी इ. तसेच ब्रह्मसुवर्चला इ. दिव्य वनस्पतींच्या सेवनाने शरीराचे जवळजवळ संपूर्ण विघटन होते. मृदू धातू बहुतेक नष्ट होतात. वांती, रेच व त्वचा यातून कृमी निघतात. शरीर निर्मांस होते, त्वचा व अस्थी मात्र बाकी राहतात व नंतर नवे पोषण सुरू होऊन पुन्हा नवे घटक बनून, अवयव होऊन नवे विशुद्ध धातू अवयव यांचे नवे शरीर होते.  

(३) घटना विघटनात्मक कार्य : शरीरातील काही जुने स्थूलघटक नष्ट होऊन नवे निर्माण होणे.पळसाच्या खोडात शिजविलेल्या आवळ्याचा योग असा आहे. या योगाच्या सेवनात ११व्या दिवसानंतर केश, दात व नखे गळतात व नंतर ते नवे येतात. यांत सूक्ष्म परिवर्तनाने स्थूल घटक बदलत नाहीत, तर शरीरातून ते बाहेर जातात व त्यांच्या जागी नवे घटक येतात.  

वयःस्थापन योगाचे प्रकार : (१) मूल द्रव्ये : मध, हिरडा, आवळा अशी वनस्पतिज, दूध, तूप प्राणिज, पाणी, सुवर्णमाक्षिकभस्म, लोहभस्म, शिलाजित, मनशीळ इ.भौतिक द्रव्ये होत. वरीलपैकी वनस्पतिज, प्राणिज व पाणी एकाकी घेतली, तरी चालतात पण बाकीची अनुपानाबरोबर घ्यावी लागतात. 

(२) संयुक्त योग : हे शेकडो योग आहेत. वनस्पतिमिश्र वनस्पतिप्राणिज मिश्र वनस्पति-प्राणिज व पार्थिव, द्रव्यामिश्रित असे प्रकार त्यात आहेत. 

वयःस्थापनाचा काळ : याचे दोन विभाग पडतात, नैसर्गिकचिकित्साई काळ.  

नैसर्गिक काळ : वय १४ते ४०हा नैसर्गिक काळ आहे. १४वर्षाच्या वयाच्या आत जर आईपासून मुलगा बाहेर गावी गेला आणि तो एकदम विसाव्या वर्षी आईच्या पुढे येऊन उभा राहिला, तर तो तिला ओळखू येणार नाही इतका चांगला बदल त्यात झालेला आढळतो आणि केवळ तो वयामुळे झालेला असतो. हा बदल बहुतेक मुलांत वयाच्या १४ते २५व मुलींत १२ते १८मध्ये घडून येतो.  

 

या काळात शरीरात नवे घटक निर्माण होण्याच्या कार्याला बहर येतो. जनन कार्याला वेग येतो. रसादि धातूंचे नवे घटक क्रमाने आवर्तनाने निर्माण होत असतात. नवे घटक विशुद्धांचे विशुद्धतर आणि विशुद्धतरांचेविशुद्धतम होतात. त्या दृष्टीने जठराग्नी व धातू अवयव इत्यांदींचे अग्नीचे कार्यही सुरू होते, अन्नातील पोषक घटकही विशुद्धतरतम बनविण्याचा प्रयत्न सुरू होतो. म्हणून हा काळ वयःस्थापनाचा उत्कृष्ट नैसर्गिक काळ होय.  

 

या काळात जर अन्नपान व औषध विशुद्धतर विशुद्धतम असले, आचरणही शास्त्रोक्त असले, तर वयःस्थापनाचे उत्कृष्ट फळ मिळेल.  

दुसरा नैसर्गिक काळ : गर्भधारणेनंतरचा गर्भावस्थेचा काळ, जीवाच्या आयुष्यातील पहिला नैसर्गिक काळ. आनुवंशिक रोग वैगुण्ये नाहीशी करून सुप्रजाजननाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा हा काळ आहे. 

चिकित्साई काळ : पहिल्या काळानंतरचा ७०वर्षापर्यंतचा काळ स्वभावतः वयःस्थापनाचा नाही परंतु हा काळ औषधे-अन्न देऊन तारूण्याचे रक्षण व ते कमी झाले असल्यास त्याची वाढ करण्यास अनुकूल आहे. ४०वर्षांपर्यंतचा काळ पुढील काळापेक्षा अधिक अनुकूल असतो कारण या काळात सर्व बाजूंनी शरीराची वाढ, शरीरभावांचा विकास चालू असतो. या काळाच्या पुढील काळात शारीर घटक क्षीण होण्याकडे किंचित प्रवृत्ती होते, ती नाहीशी करतायेते. हे काळ नैसर्गिक काळापेक्षा थोडे गौणच होत.  


 नैसर्गिक काळाचे महत्त्व : काळा रंग, ठेंगूपणा, कमी स्मरणशक्ती, बुद्धिमांद्य इ. आनुवांशिक दोष व श्वासरोग इ. रोग भावी पिढीमध्ये येऊ नयेत यासाठी मातपित्यांनी तत्तदोषनाशक व रोगनाशकआहार व नित्य घेता येण्यासारख्या वनस्पती यांचे सेवन नित्य ठेवून शिवाय गरोदरावस्थेत जर स्त्रीने त्यांचे व तज्ञाच्या सल्ल्याने आहाराषौधे तसेच मासानुमासिक योग घेतल्यास मुलाचे ते दोष व रोग कमी किंवा नष्ट होऊ शकतात. शरीरातील वैगुण्य असलेले घटक निरोगी व बलवान होतात. जन्मल्यानंतर त्याच औषधाहाराची चव त्याच्या जिभेवर रूढ करावी म्हणजे तो चवीने ते घेत राहील. तारुण्यात येताना व आल्यावरही पुन्हा तज्ञाच्या सल्ल्याने योग्य उपचार करावे म्हणजे आनुवंशिक दोषांचे व रोगाचे निर्मूलन होते. योग्य वेळी केलेले उपचार शीघ्र व स्थिर परिणाम करतात.  

अकाल नाहीच : वयःस्थापन जराव्याधिविनाशक आहे. वृद्धावस्था व रोगनाशक आहे. च्यवन ऋषींनी म्हातारपणीच च्यवनप्राश घेतला होता. जन्मापासून हे करावयाचे असते, जन्मानंतर न्हाऊघालण्याच्या पाण्यात सोने व चांदी लाल तापवून त्यात विझवून त्याने स्नान घालावे व पहिल्या दिवशीसुद्धा तीन वेळा सोने मध तुपातूनद्यावे. शैशवातही वयःस्थापन करावे. सारांश वयःस्थापनाला अकाल नाहीच.  

अवधी : एक दिवसापासून तो तीन वर्षापर्यंत सेवनकालसांगितला आहे. सोमरस एकदाच घ्यावयाचा, तर बाह्मीरस तीन आठवडे, पळसाच्या झाडात शिजविलेले आवळे एक महिना, त्रिफळा, नागबला एक वर्ष व हिरडा कल्प तीन वर्षे सेवन करावा. दूध, तूप नित्ये सेवन करावे. सारांश वयःस्थापन हे नित्य सेवनीय आहे.  

दिनकाल : बहुधा सकाळी सेवन करावे. दिवसाच्या इतरा कालापेक्षा सकाळीच शरीर निर्मल असते, पोट रिकामे असते, औषध चांगले पचते वपचतानाही आमाशय, ग्रहणी यांवर चांगले कार्य करते. दोषनाश व अग्निवृद्धी करते. नंतरही शरीरात सर्वत्र आपल्या गुणांचेसंवर्धन करते. औषधाला आदल्या रात्री पचलेल्या आहारांशाची अडचण नाही, औषध पचल्यानंतरच बहुधा आहार घ्यावयाचा असतो. औषधाने अगोदर पोषणाकरिता भूमिका करून ठेवल्याने आहाराचे कार्यही चांगले होते. पांढरी बावची उगवलेल्या सूर्याचा तांबडा रंग गेल्यानंतर म्हणजे उदयानंतर एक−दीड तासानंतर घ्यावयाची असते. त्रिफळ्याचे तीन काळ आहेत.जेवणापूर्वी, नंतर व अन्न जिरल्यानंतर क्रमाने बेहडा, आवळा व हिरडा हे घ्यावयाचे असतात, तर दृष्टीकरिता त्रिफळा झोपताना घ्यावयाचा असतो.  

ऋतुकाल : केवलामलकपौष, माघ, फाल्गुन या तिन्हीपैकी ज्या महिन्यात आवळे परिपक्व मिळतील तेव्हा घ्यावे. शतावरी आश्विन−कार्तिकात, माका भाद्रपद−आश्विनात घेणे चांगले, हेमंतातनिसर्ग व शरीर दोन्ही बलवान म्हणून अनुकूलता असते. लसूण हेमंत−शशिर−वसंत आणि वर्षाकालातही घेण्यास सांगितला आहे. ग्रीष्म ऋतूत बलक्षय अधिक होऊ नये म्हणून तेव्हाही वयःस्थापन करावे.  

वयःस्थापन विधीचे प्रकार : मुख्य दोन प्रकार आहेत. कुटीप्रादेशिक व वातातपिक. नित्याच्या व्यवहारातून मुक्त होऊन कुटीत राहून सेवन करावयाचे किंवा नित्याचे व्यवहार न सोडता योग्य ते थोडेसे नियंत्रण ठेवून सेवन करावयाचे. पहिल्या विधीत वारा, ऊन यांच्यापासून संरक्षण करून त्यांचा शरीराला होणारा उपसर्ग टाळून इंद्रिये व मन यांच्या उत्तेजकापासून अलग राहून, त्यांना जास्तीत जास्त विसावा देऊन, ती अंतर्मुख करून आत्मचिंतनात मन एकाग्र स्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो. यालाच व्यवहारात कायाकल्प म्हणतात.  

कुटीस्थान : पुण्यवान राजा, वैद्य, ब्राम्हण, साधु यांच्या निर्भय निवासस्थानी कुटी करावी, आवश्यक ती साधनसामग्री सहज उपलब्धहोईल अशी शहराजवळ पूर्व किंवा उत्तर दिशेला चांगल्या शुची भूमीवर कुटी बांधावी.  

रचना : विस्तृत उंच एकात एक तीन दालनांची कुटी असावी, तिच्या भिंतींना लहान छिद्रांची जाळी किंवा झरोके असावेत. ऋतुचे वातावरण सुखकर होईल अशी पण प्रशस्त मनाला आवडणारी असावी धूर, ऊन, धूळ, हिंस्त्र प्राणी, मुर्ख लोक, नकोसे आवाज व वास, घाण यांचा उपसर्ग कुटीला होऊ नये. साधक पुरुष असल्यास स्त्रीचा व ती स्त्री असल्यास पुरूषाचा संपर्क होऊ नये. त्यांचे दर्शनही वर्ज्य आहे. जरूरीच्या सर्व उपकरणांचा व औषधांचा संग्रह तेथे असावा, वैद्यांची उपस्थिती सतत असावी.  

शास्त्रात कुटीची लांबी, रूंदी आणि उंची सांगितलेली नाही. कायाकल्पाच्या एका प्रदेशात बांधलेल्या कुटीचे बाहेरचे दालन १८×१८× ३.६मी. होते, मधले दालन १०.८×१०.८×४.८ मी. चे व आतले दालन ३.६×३.६×५.४मी.चे होते. बाहेरच्या दालनाला पूर्वेकडे वापरता दरवाजा एक, मधल्या दालनाला दक्षिणेकडे एक व आतल्या दालनाला उत्तरेकडे एक होता. अगदी जरूरीच्या प्रसंगी उपयोग करता यावा म्हणून बाहेरच्या व आतल्याला एकेक दरवाजा अधिक होता पण ते सतत बंद होते. कोकणच्या हवेत, ऋतूच्या सुखकर वातावरणाच्या दृष्टीने कुटी कारवीच्या कुडाची बांधली होती.  

कायाकल्प विधीला योग्य व्यक्ती : प्रथम सांगितलेले सर्व व्यतिगुण याचा विधीला अत्यावश्यक आहेत, शिवाय ती व्यक्ती निरोगी, बलवान, धनवान, बुद्धिमान, मनोनिग्रही, स्वतंत्र परिवार, साधनसामग्री अनुकूल असलेली असावी. बाकीच्यांनी हा विधी करू नये. त्यांनी वातातपिक विधी करावा.  

शय्यासन : निरनिराळ्या विधीला निरनिराळी शय्या व आसन सांगितले आहे. खाटेवर झोपण्यास कापसाची गादी, उशी, चादर व पांघरूण व बसण्यास दर्भांची वा गवताची चटई आणि तिच्यावर काळ्या हरिणाचे कातडे असावे. हे झोपण्याकरिताही चालेल. चादर शय्या व  तिच्यावरही चादर आवश्यक आहे. ब्रह्मुसवर्चलादी दिव्य वनस्पती−कल्पाच्या वेळी पळसाच्या ओल्या पानांची डोणी शय्येकरिता व त्या पानांना तूप लावून त्यांच्यावर नग्न निजून वर तुपाने माखलेली तीच पाने पांघरून म्हणून अंग झाकण्यास घ्यावीत.  

आहार : औषधाचे अनुपान म्हणून मध, तूप तेल इ. जे सांगितलेले असेल ते पोटात जाते. अनुपान बहुधा आहार्य द्रव्य असते. औषध जिरल्यावर भूक लागली की, दूध, दूधभात, दूधतूपभात, मुगाच्या आवळे घातलेल्या कढणाशी तूपभात असा सामान्यतः आहार असतो. मीठ, सैंधव वर्ज्य करावयाचे असते.  

 

जल : आमलकी कल्पाच्या वेळी थंड पाण्याचा स्पर्शही वर्ज्य आहे. तर सोमभल्लातकादींमध्ये थंड पाणी पिण्यास सांगितले आहे.

 

विहार : बहुतेक विधींमध्ये रात्री वेळेवर झोपून परिमित झोप घेऊन उठावे, अवश्य कर्म वेळेवर करून बाकीच्या वेळी ध्यानस्थअसावे, असा संकेत आहे. सोमसेवनानंतर मधूनमधून फेऱ्या घालाव्यात, उभे रहावे, बसावे आणि रात्री झोपावे, तर आमलक रसायनात वनात आवळीच्या झाडावर चढून आवळा हातात घेऊन फांदीवर बसून ॐकाराचा जप करून प्रत्येक आवळा खावा, तृप्ती होईपर्यंत खावे. अगोदर वर्षभर गाईच्या दुधावर राहून त्यांच्यातच रहावे, गायत्री जप करावा व शेवटी तीन दिवस उपवास करून आवळ्याचे सेवन वरील विधिप्रमाणे करावे.  

हवा, प्रकाश : कुटीत उन्ह येऊ नये, पण काळाकुट्ट अंधार असावा असे नाही. कुटीला झरोके ठेवण्यास सांगितले आहे. झरोक्यांनी बाहेरच्या कुटीत थोडे उन्ह, वारा येणारच. आतल्या कुटीत वारा नाही पण अत्यल्प प्रकाश सचार करीलच. डोळ्याला प्रकाशाचा अयोग न होता पूर्ण विश्रांती मिळेल.  


 पथ्यापथ्य : पथ्यापथ्याचा विशेषतः पथ्याचा उल्लेख येतोच पण काही ठिकाणी अपथ्येही सांगितली जातात. काही अपथ्ये तात्पुरती असतात. बिब्याला ऊन पाणी आवळ्याला थंड पाणी. पण काही अपथ्ये जन्मभर पाळावी लागतात. शिलाजित सेवन केलेल्याने कुळथ, पारवा, कावळी व विदाही जड आहार वर्ज्य करावा, सुवर्णमाक्षिक सेवन केलेल्याने पहिले दोन जन्मभर वर्ज्य करावे. 

विधी विभाग : दोन्ही वयःस्थापन विधींचे (१) पूर्वकर्म, (२) प्रधान कर्म, (३) पश्चात कर्म असे तीन विभाग होतात.  

पूर्वकर्म : शरीर प्रथम निर्दोष करणे आवश्यक असते. शरीरातूनदेश−काल−प्रकृती ह्यांना अनुसरून असलेले दोष काढून टाकावेत.  

कालदो ष असल्यास श्रावणात, कार्तिकात व चैत्रात वात−पित्त−कफ ह्यांच्या शुद्धीकरिता क्रमाने बस्ति−रेचक−वामक देऊ न ते दोष काढून शरीर शुद्ध करावे. शरीर शुद्ध केल्यावाचून वयःस्थापन दिले, तर इष्टफल मिळणार नाही. निरोगी व्यक्तिंच्या शरीरातही वरील काळातच पूर्वकालात संचित झालेले वातादि दोष तसेच शुद्ध करावे. 

शरीर शुद्ध झाल्यावर नित्याच्या सवयीचे पण पथ्यकर पदार्थ अगदी पातळ, नंतर क्रमाने अधिकाधिक घट्ट दाट देऊन नेहमीच्या पण पथ्यकर आहारावर आणावे. 

मलशुद्धी : यानंतर हीन, मध्य, उत्तम शुद्धीप्रमाणे तीन, पाच, सात दिवस जवाचे अन्न तूप घालून द्यावे म्हणजे शुद्धीनंतरच्या काळातही संचित झालेला जुना मळ शौच्याच्या वेळी निघून जाईल व शरीर निर्मळ होईल. 

कुटिप्रसक्शपूर्व विधी : सुमुहूर्तावर शौचमुखमार्जन, स्नान करून देवता व पूज्य व्यक्तींचे पूजन करून त्यांना उजवे घेऊन सर्व जीवमात्रांची मित्रत्वाच्या भावनेने प्रेरित होऊन व्यावहारिक संकल्प-विकल्प व तज्जन्य रागरोषादी भावना कुटीच्या बाहेर सोडून श्रद्धेने कुटीत प्रवेश करावा.  

प्रधान कर्म : कुटीत प्रविष्ट झाल्यावर विधीप्रमाणे औषध, आहार इ. तज्ञांच्या आदेशानुसार घ्यावेत व निमाने वागावे.  

कुटीस्थ चर्या : मानवी जीवनाचे सर्वोच्च ऐहिक ध्येय सर्वोत्तम समत्व−योग साधण्याला योग्य शारीर व मानस घटक बनविण्याचा हा महान प्रयत्न आहे, तपस्याच आहे. इंद्रिये व मन बाह्य सृष्टीपासून निवृत्त करून, स्थिरबुद्धी होऊन आत्मचिंतनात समावस्थेत ठेवणे अत्यावश्य आहे. 

ॐकार जप : इष्ट देवता निरनिराळ्या गुणोत्कट्याने युक्त असतात. त्यांचे ध्यान व जप करताना तेच गुण चिंतनात येतात, त्यावेळी मनही त्यांना अनुरूप हेलवते. वीरत्वाने वीरत्व संचारते, यात मनसमरहात नाही. विषम होते. हे गुण समत्वाच्या दृष्टीने मनबुद्धी यांत अचल ठेवणारा ॐकार ध्यान व जपाकरिता उपकारक आहे. जप मानसिक करावा, तो अचलत्वाला परिपोषिक आहे. 

मलमूत्रादीकांचे वेगविसर्जन, औषध व आहार घेणे ह्या कर्मांनी ध्यानकालाचे विभाग होतात. तेही नियमित असल्यामुळे ते टप्पे विचलत्व निर्माण करीत नाहीत. वातावरण निरव, शांत, पवित्र श्रम अत्यल्प म्हणून शरीर व मन यांची कमीत कमी झीज शुक्राचा जननाचा मानसिक स्थायी भाव आनंद आहे. ध्यानातील आनंदाने प्रसाद घटक जननाच्या औषधी कार्याला चालना मिळते. प्रसाद घटक जसजसे अधिक तशी मनाची प्रसन्नता अधिक. त्याचप्रमाणा आत्मचिंतन अधिक होते. तज्जन्य आनंदाने पुन्हा सर्व कार्याला आरंभापासून अधिक गती आहे. 

चिकित्सकाचे कर्तव्य : चिकित्सकाच्या आदेशाप्रमाणेच सर्व करावयाचे असते. चिकित्सकाने सर्व बारीक सारीक गोष्टींवर व घडामोडींवर त्या आखणीप्रमाणे होतात की नाही, हे पाहिले पाहिजे. घडलेल्याबरोबर आणि चुकीच्या घटनांची तसेच प्रगती व परागतीची नोंद ठेवून तिचा नंतरच्या घटनांबाबत मार्गदर्शनासाठी उपयोग केला पाहिजे. विधी पुरा झाल्यानंतर शारीरिक मानसिक सारासारत्वाच्या दृष्टीने तपासणी करून फलाचे मूल्यमापन केले पहीजे.

कुटीनिर्गमन : औषधसेवनाची मुदत पुरी झाल्यावर अंतःकुटीमधून मधल्या परिसरात साधकाला आणावे. तेथे दहा दिवस ठेवून नंतर दहा दिवस तिसऱ्या बाह्य परिसरात ठेवावे व नंतर बाहेर आणावे. अंतःकुटीमधून एकदम बाहेर आणू नये. 

औषध वाढत्या प्रमाणात सेवन केले, तर ते क्रमाने कमी करीत आणावे. केवळ युक्त आहार किंवा दुधावर काही काळ ठेवावे व तेव्हाही साधकाला अंतःकुटीतच ठेवावे. स्नान एकदम घालू नये, दुधातून वाळा इ. द्रव्ये अंगाला लावून पुसून टाकावीत. दहा दिवसानंतर स्नान घालावे, दुग्धाहार असल्यास नित्याच्या आहारावर प्रथम पातळ पेज किंवा कढणनित्याच्या सवयीच्या अन्नाचे देऊन क्रमाने घन अन्नावर आणावे, या कालातही ध्यान−जप चालूच असावे.

उपद्रव : या काळात काही उपद्रव झाला, तर त्याने उपचार करावेत, उपद्रव औषधाचा असेल, तर ते बंद करून उपचार करावेत. अशावेळी अगोदर निश्चित केलेला औषधसेवन कालही वाढविण्यास हरकत नाही.  

यशस्विता : व्यक्तिचे साध्य, तदनुरूप साधकाची शारीरिक व मानसिक योग्यता, प्रयत्नशीलता, मनोनिग्रह व सेवनकालातील व नंतरची यथोक्त, दिनचर्या, साध्यसिद्धीच्या दृष्टीने कार्यकर औषधांची निवड, प्राप्ती व सेवनकाल, अनुरूप वातावरण, साधनसामग्री, योग्य मार्गदर्शन यांवर यशस्विता अवलंबून आहे.  

अनुभव : वातातपिक वयःस्थापनाचे चांगले परिणाम वैद्यवर्गनेहमीच पहात आहे पण कुटीप्रावेशिकाचा परिणामही चांगलापहावयास मिळाला आहे. तारूण्य निश्चित वाढले. ह्या सर्वांचा आपणजो विचार केला त्या दृष्टीने वयःस्थापन विधी पुरुषाचा पुरुषोत्तमबनविण्याच्या दृष्टीने निश्चित अत्युपयुक्त आहे. असे म्हणावयास हरकत नाही. 

 

वयःस्थापन कर्म : शरीराचे गुण वाढावे म्हणून मानव अहर्निश गुणवान अन्नपान शरीराला पोहतचे करतो पण शरीरात त्यांची मागणी निर्माण होतो.शरीराची हालचाल तीही नियमित, प्रमाणात आणि प्रकृती, वय, देश व काळ यांना अनुरूप करणे म्हणजे व्यायाम करणे हा मागणी निर्माण करण्याचा उत्तम उपाय आहे.

व्यायामाने दोष (पडीत पुरवठा) नष्ट होतात व भूक लागते, भूक म्हणजे मागणीच होय. याबरोबरच पचनशक्ती (अग्नी) वाढते. मागणी पचन करून आत्मसात करून घेण्याचे सामर्थ्य वाढते, नंतर फक्त मागणीचा उत्कृष्ट प्रतीचा माल पाठविण्याचे कार्यच फक्त बाकी राहाते.

 

व्यायामाचे सुपरिणाम : दीप्ताग्नित्व पुष्टी, रेखीवपणा, उत्तम कांती, सुरूपता, स्थिरत्व, हलकेपणा, अनालस्य, उत्साह, तारुण्य प्राप्त होते व शरीर निर्दोष परमारोग्य संपन्न होतो.


दोषनाश, अग्निदीप्तीत आणि आहाराचे पचन, विभाजन, शोषण, व आत्मसात करणे ही कार्ये एकटे व्यायामकर्म करते. व्यायाम धात्वग्नी वाढवून नंतर जठराग्नी वाढवितो, त्यामुळे आहार चांगला पचतो व आत्मसात होतो.

काही वयःस्थापने : मानसिक भावांची प्रत वाढविणारी द्रव्ये: धी: लौहादि, विदाऱ्या दि, हिरडाकल्प धी म्हणजे बुद्धी वाढवितात. आमलकायस, पाचवा हरीतकी योग व चौथे आमलकी रसायन हेही बुद्धीचे बल वाढवितात, नारसिंह घृत बुद्धीची समृद्धी वाढविते.

मेघा : ब्राह्मीचा रस, ज्येष्ठमधाचे चूर्ण, फुले व मुळे यांसह गुळवेलाचा रस, वर्धमान पिंपळी, वेखंड ही धारणशक्ती वाढवतात. नारसिंह घृत समृद्ध मेधाकर आहे. बिब्बा अतिशय मेधाकर आहे, तर वेखंडसिद्ध तुपाबरोबर सोने व बेलाचे चूर्ण दिले, तर अशी मेधा निर्माण होईल की, शास्त्राभ्यास सहजगत्या होईल.

वर धी व मेधावर्धक कल्प दिले, त्याच धीचे व मेधाचे काही विशेष सूक्ष्म धर्म वाढविणारे कल्पही उदाहरणाकरिता दिले आहेत काही कल्प दोन, काही तीन, तर काही अनेक भाव व त्यांची प्रत वाढवितात.

धी व मेधाकर : आमलक कल्प ही दोन्ही करतो. 

ग्रहणधारणशक्ती : वावडिंगाच्या तांदुळाच्या सेवनाने ह्या वाढतात.

स्मृती : अजागरी इ. दिव्य वनस्पती, ब्राह्मी, हिरडा, च्यवनप्राश, बिब्बा, दुसरे ब्राह्म रसायन, लौहादि, नलदाही रसायने वाढवितात, द्विपाठी : ब्राह्मीरसाने दोनदा पाठ केले की पाठ होते. एकपाठी : माकारस व नारसिंह धृत सेवनाने एकदा वाचले की, पाठ होते, लक्ष्यात राहते. पुष्कळ विषयांचे स्मरण : सोम रसायनाने वाढते, चित्रक सिद्ध तेलाच्या नस्त्याने स्थिर-स्मृती व ऐकलेल्याची स्मृती वाढतात. ऐन्द्र व विदाऱ्या दि योग स्मृतिमेधा अतिशय वाढवितात. ऐन्द्र व विदाऱ्या दि योग स्मृतिमेधा अतिशय वाढवितात. स्मृतिमेधा व पाठशक्ती पांढरी बावची, चित्रकमूल, हळद ही वाढवितात. भल्लातक कल्पाने ज्ञानशक्ती वाढते. ब्राह्मीने ग्रंथ निर्माण सामर्थ्य उत्पन्न होते. ऐन्द्ररसायन मेधास्मृतिज्ञाननाशक रोग नष्ट करते.

सोम व अजागरी इ. अमोघ संकल्प सामर्थ्य निर्माण करतात, तर नलहादी कल्प प्रतिभा वाढवितो व पंचारविंद कमी झालेली प्रतिभा वाढवितो.

मन : वावडिंगाचे तांदूळ, आमलककल्प व शिवण फळ सत्त्वगुणवर्धन करतात. प्राण : मनाचे बळ लौहादि, भल्लातक व शिवण फळ वाढवितात. दुसरे ब्राह्म रसायन ऋषींच्या मनोवृत्तीसारखी. वृत्तीब्राह्मसत्त्व बनविते. भल्लातक रसायनाने समृतिमतिबलमेधासत्त्वारत्व निर्माण होते. इंद्रोक्त व शिलाजितकल्प उत्साह वाढवितात. भल्लातक रसायनाने अध्यात्मध्यानसामर्थ्य वाढते. 

अमूर्त भाव वाढविणारे कल्प : अनेक कर्तृत्वान व्यक्ती सारख्या खपत असतात पण यश मिळत नाही. यश लाभले, तर त्याचे श्रेय  त्याला मिळत नाही. अशा तऱ्हेच्या निरनिराळ्या अनेक वैगुण्यांचे चमत्कारिक दर्शन व्यक्तीच्या कर्तृत्वात आढळते. हे वैगुण्यकरभाव कमी करणारे योग शास्त्रकारांनी सांगितले आहेत.

बुद्धि स्मृती इ. मानस भाव आहेत. यश, भाग्य इ. भाव अतर्क्य आहेत. यांचे भावावभाव मानवी आयुष्यात उत्कटत्वाने आश्चर्यकारक असे आढळतात. हे भाव ज्यांच्या उत्कटत्वाने दिसतात ते सुदैवी व हे ज्यांच्यात नसतात ते दुर्दैवी वाटतात. त्या भावांना अमूर्त भाव म्हणून संबोधिले आहे. हे भाव वाढविणाऱ्या कल्पांपैकी काही कल्प उदाहरणार्थ दिले आहेत.

यश : इंद्रोक्त कल्प, लौहादि रसायन, सोने-रुपे इत्यादींचे कल्प यांच्या सेवनाने यशस्विता प्राप्त होते. सौभाग्य : सोने, गव्हला इत्यादींनी युक्त वचा घृत मिश्रण, सोने व कमलसिद्ध घृत, गोखरू कल्प हे भाग्यशाली बनवितात. धन्यत्व : आपल्या कृतीचे जनतेकडून असे स्वागत व्हावे की, आपल्याला धन्यता वाटावी. त्रिफला रसायनाने हे होते. वीर्य : माक्याने. पराक्रम : दुसऱ्या ब्राह्मी रसायनाने निर्माण होतो. प्रशस्तिपूजासुखचित्तभाव : आपल्याबद्दल दुसऱ्याच्या मनात पूज्यभाव निर्माण व्हावा, त्यांनी प्रशंसा करावी व आपले मन सुखी व्हावे असे आकर्षक भाव निर्माण करणारे सार घटक आमलक घृत निर्माण करते.

इंद्रियबल वाढविणारी वयःस्थापने : सर्वेंद्रिय बल : आमलकायस च्यवनप्राश, चौथे आमलक, पाचवा हरीतकी कल्प सर्व इंद्रियांचे बल वाढवितात. अविबलेंद्रियत्व : आमलक धृत, लौहादि रसायन निर्माण  करतात व स्थिरबलेंद्रियत्व आमलक घृत निर्माण करते. नेत्रबल : बीजकसार, अरणी, पांढरा वेखंड निर्माण करतात. श्रोत्रबल : वावडिंग, शिवण फळ वाढवितात. वाग्बल : वाढविणाऱ्या  कल्पांपैकी स्वरप्रसादन ऐंद्र, स्वच्छ, सुसंस्कृत व गोड वाचा वचा व नारसिंह धृत मेघाप्रमाणे गंभीर व मोठा आवाज आमलक धृत वाक्समृद्धी नारसिंह घृत करतात. केवलामलक रसायनाने वाक्देवीच जिभेवर वास करते. लौहादीने वाचासिद्धी प्राप्त होते.

शारीरभाव वाढविणारे कल्प : ओज व बल : ओजाची समृद्धी करणारे ऐंद्र व बल वाढविणारे वावडिंगाचे तांदूळ, शिवण फळ, भुईकोहळा, शतावरी, सोम, दुसरे ब्राह्म, माका, पाचवा हरीतकी कल्प, चौथा आमलक योग, आमलक घृत, लौहादि, विदार्यादि, चित्रक हे कल्प होत. नारसिंह धृत रानरेड्याप्रमाणे अतिबलकार व हरीतकी चिरस्थायी बलकर होय. अश्वगंधा, ऐंद्र, वर्धमान पिप्पली, गोखरू, चित्रक, चित्रक तेल ही पुष्टी करतात. शिलाजित देहधातू पूरण, आमलक घृत लांगल्यादि कल्प मोठे धिप्पाड शरीर करतात. देशमूलादी योग हा बाल, वृद्ध उरःक्षताने क्षीण कृश यांचे अंगवर्धन करणारा आहे. ब्राह्म रसायन पर्वतासारखे, तर आमलक घृत पर्वताच्या सारासारखे लोखंडासारखे सारत्व निर्माण करते. 

स्थिरत्व : आपत्तीने चटकन कृश, दुबळे आणि आपत्ती संपली की, लगेच पुष्ट व बलवान न होणारे शरीर स्थिर होय. ह्याच्या उलट धर्माचे अस्थिर होय. नारसिंह घृत, हरीतकी, आमलक योग शरीर स्थिर करते. काळे तीळ, चित्रकसिद्ध तेल, तुवरकास्थी तेल दात बळकट करतात. तुवरक तेल, चित्रक तेल, गोक्षुर कल्प, नारसिंह घृत यांनी केश गळत नाहीत.

गती : वावडिंगाचे तांदूळ, शिवण फळ, वर्धमान पिंपळी, ब्रह्मसुवर्चला इ. वेग वाढविणारी आहेत, चालण्याची शक्ती वाढवितात. सोम अप्रतिहत गती करतो. रुप : गोखरू सुरूपत्व आमलकी, वावडिंग, ब्राह्मी लावण्य च्यवनप्राश नारीनयमनंदन असे नवयौवन रुप, चित्रक व सोम मदनासारखे सुंदर रुप निर्माम करतात.

वर्ण : ऐंद्र ब्राह्मीरस, ज्येष्ठमध चूर्ण, गुळवेल, शंखपुष्पी, आमलकी घृत, इंद्रोक्त रसायन, ब्रह्मसुवर्चला इ. वर्ण चांगला करतात.


 कांती : सोम, ब्राह्म, च्यवनप्राश, आमलकी धृत, अजागरी इ. दिव्य वनस्पती कांती वाढवितात. तेज : दुसरे ब्राह्म रसायन, ब्रह्मसुवर्चला इ. वावडिंग व शिवण फळाने सूर्याच्या तेजासारखे तेजस्वी शरीर होते. वशीकरण : शतावरी घृत, मध, सोने यांच्या सेवनाने राजा वश होतो. श्रीतेजकान्तिदीप्तिमान : ब्राह्मी वचादी कल्पाने होतो. चित्रकादी तेलाने तोंडावरच्या वळ्या नष्ट होतात. पलित नाश : पांढरे केश चित्रकादी तेलाचे नस्य व लोहचूर्णादी कल्प, माका यांच्या सेवनाने काळे होतात, अग्नी : नारसिंह घृत, चित्रक घृत, भल्लातकाचे सर्व कल्प अग्नी प्रदीप्त करतात. घृताने प्रदीप्त झालेला अग्नी अती बलवान होतो, तो अतिजडान्नही पचवितो. अविषस्व : ब्राह्म, हरीतकी, आमलक, सर्वसुवर्ण कल्प सेवन केल्याने विषाची बाधा होत नाही.

रोगनाशक वयःस्थापने : रोग ज्या स्थानाचा आश्रय करतात ते स्थान अवल होते. दोषांशी प्रतिकार करण्याला असमर्थ ठरते तेव्हा तेथे दोष आश्रय (स्थानसंक्रय) करून रोगोत्पत्ती करतात. रोगनाशक वयःस्थापन रोगनाश व त्या स्थानाला बलवान-तरूण करणारे निवडले व रसायन विधीने घेतले वा नित्य सेवन केले तर रोगनाश होतो. 

असाध्य रोग मरणदर्शक रोगावस्था यांमध्ये रसायनावाचून दुसरा उपायच नाही. शेवटच्या अवस्थेत मध, आवळा, सुवर्ण ही किंवा महालक्ष्मीविलास, सुवर्णसूतशेखर, सुवर्ण भूपती, चिंतामणी, त्रौलोक्यचिंतामणी, हेमगर्भ ही अवस्थांनुरुप अनुपानांतून वाढत्या प्रमाणात द्यावीत म्हणजे रुग्ण मरणाच्या दारातूनही मागे फिरण्याचा संभव असतो.

जीर्णज्वर : वाताबलासक ज्वर, वर्धमान पिप्पली योग विषमज्वर : ब्राह्मी घृत जुना विषमज्वर ऐंद्र व पिप्पली योग नाहीसे करतात श्वास : ब्राह्मी रसायन, पिप्पली रसायन खोकला : च्यवनप्राश, पिप्पली योग तसेच हे उचकी नाहीसे करतात गुल्म प्लीहावृद्धी, स्वर विकृती, पीनस, गळ्याचे रोग, वातरक्त सूज : हे पिप्पली योगाने नाहीसे होतात प्लीहा गुल्म व उदर : ऐंद्र रसायनाने नाहीसे होतात. कृमी : वावडिंग व ब्राह्म रसायनाने नाहीसे होतात पांडुरोग : पांढरी बावची, चित्रकमूळ, हळद व पिप्पलीने गलगंड अपची (गंडमाळा), श्लीपद : हे वेखंड, शतावरी घृताने स्वरभेद : वचाझत धृत, बावची  व पिप्पलीने ग्रहणी : पिंपळीने मूळव्याध : वावडिंग व पिप्पली रसायने, कुष्ठ : पांढरी बावची, चित्रकमूळ, हळद, ब्राह्मी ऐंद्र योगाने कोड : ऐंद्र व नागरसायनाने नष्ट होतात वातरोग, आवृत वायू : लशुन, महायोगराज- गुग्गुळ इत्यादींनी नष्ट होतात, कोणताही रोग वयःस्थापन चिकित्सेने साध्य होतो किंवा आटोक्यात आणता येतो.

रसग्रंथोक्त काही रसायनेधातू, पारद व पारद कल्प : आतापर्यंत चरक, सुश्रुत, वाग्भट यांच्या ग्रंथांतील काही वयःस्थापने दिली. आता रसग्रंथोक्त काही रसायने येथे दिली आहेत. यात पाऱ्याची रससिंदुर, रसकापूर इ. भस्मे म्हणजे केवल पारद, केवल धातुभस्मे आणि पारा, धातू व वनस्पती यांचे मिश्र कल्प म्हणजे वटिका मात्रा अशा तीन प्रकारच्या कल्पांचा समावेश होतो. चरकादि ग्रंथातील योगांत लोह, मंडूर, शिलाजित, सुवर्णमाक्षिके व सुवर्ण ही खनिजे आली आहेत पण इतर खनिजे व मुख्यतः पारा ही नाहीत.

केवल पारा : नुसता द्रव पारा हा कधीही पोटात दिला जात नाही, तर तो गंधक इत्यादी द्रव्यांच्या सहाय्याने भस्म करून वा बद्ध करून दिली जातो. रसकापूर, रससिंदुर व इतर भस्मे आणि रसपर्पटी हा बंध ही दिली जातात.

क्षेत्रीकरण व पंचकर्म : केवल पारद भस्मही शरीर पंचक्रमानी शुद्ध केल्यावरच द्यावयाचे असते. ही पंचकर्मे पूर्वीसारखी वमनादि नाहीत, तर पाचनादि आहेत. दोषांचे पाचन, शरीराला स्नेहाने स्नेहन, नंतर स्वेदन (घाम काढणे), नंतर वमन व रेचन ही पंचकर्मे होत. या शुद्धीला क्षेत्रीकरण असेही म्हणतात.

केवल रेचक : सुकुमार अशक्त रोग्यांना केवल रेचक देऊन नंतर पारद सेवनाकरिता दिला तरी चालतो. 

शामक क्षेत्रीकरण : रोगी अगदीच सुकुमार असला, रेचकही सहन होणे अशक्य आहे अशाला प्रथम एक महिना अभ्रक भस्म द्यावे.

बलोत्पादन : वरील तिन्ही प्रकारांपैकी शक्य ते देऊन नंतर साळीचा भात, जांगल रस, मुगाचे कढण यांनी बलवान रोगी झाला की क्षेत्रीकरण पूर्ण झाले असे समजून पारद भस्म व इतर मिश्र कल्प द्यावेत.

रसभक्षण : एक गुंज पारद भस्म सकाळी आदल्या दिवसाचे अन्न जिरल्यावर त्या त्या रोगनाशक अनुपानातून घ्यावे. विड्यातून घेतले, तर मळ घट्ट होत नाही, मळ ढिला होतो. मळ ढिला होतो. मळ घट्ट असेल, तर पिंपळी व गुळवेल रात्री घेऊन झोपावे. शक्तीप्रमाणे भस्माचे प्रमाण एकेक गुंज वाढवून एक मासा प्रमाण जास्तीत जास्त एका वेळी द्यावे.

पथ्य : दूधभात, तूप, मूग ही नेहमी घ्यावीत पुनर्ववा, तांदुळजा, चाकवत या भाज्या, सैंधव इ. द्रव्ये वापरावीत. आत्मज्ञानात रात्रंदिवस सतत ध्यानस्थ असावे.

अपथ्य : ही फार कडक आहेत. कोहळा, काकडी, कोंबडा इ. आठ ककार, लंघन व अजीर्ण वर्ज्य, तसेच मल-लघवी ओलांडू नये, वादविवाद, क्रोध इत्यादीही वर्ज्य आहेत.

स्नानादि : औषध जिरल्यानंतर नारायण, बला इ. तेलाने अभ्यंग व खूप जोराने मर्दन करून लवंग, हळद, केशर इ. द्रव्ये मसूर, मूग, सातू यांच्या पिठात मिसळून उटणे लावावे व कोमट पाण्याने स्नान करावे. रात्री झोप घ्यावी.

फल : वातादी दोष व तज्जन्य रोग नाहीसे होऊन बल, वर्ण, रुप, तेज, पुष्टी व तारुण्य उत्पन्न होऊन मनाला शांती लाभते.

सर्वरोगनाशकर : हेमसुंदर मृत्युंजय रस, आनंदसूत इ. रस तत्तरोगानुसार अनुपानाने सर्वरोगहर. हेमसुंदर जरा व मृत्युहर आहे. आनंदसूत राजासारख्या सुकुमार प्रकृतीलाही मानवणारा आहे.

राजयक्ष्मा, पाच खोकले, अठरा कुष्ठे, पांडू, प्रमेह, शूल, श्वास, हिक्का, अम्लपित्त, आढयवात, व्रण, विसर्प, विद्रधी, मूळव्याध, मंदाग्नी, अपस्मार, ग्रहोन्माद हे सर्व रोग, त्या त्या दोषाला व रोगाला अनुरुप अनुपानाबरोबर दिल्याने नष्ट होऊन ते पौष्टिक बल्य आयुष्यवर्धक व पुत्रदायक आहेत. असे शेकडो मिश्र कल्प आहेत.

वयःस्थापक धातू, पारद व रत्ने : मेधाकर रौप्य, बुद्धिप्रबोधन गोमेद, प्रज्ञाकर वैक्रांत व वैदूर्य धीस्मृतिप्रभाकर सुवर्ण होय. कांतिवर्धक मौक्तिक, मृत्युहर हीरक, अपमृत्युहारक सुवर्णमाक्षिक, अतिशीघ्रगुणदायक हीरक, तर जीर्णरोगनाशक रौप्य, विषनाशक मनःशिला (मनशीळ), मोती, प्रवाळ व सुवर्ण होत. डोळ्याला हितकर हिराकस, मोती, प्रवाळ, तर कर्मज रोगनाशक माणिक्य होय. भूतनाशक सुवर्ण, मनःशिला शुक्रधातुवर्धक सुवर्ण, हीरक व राजावर्य, अतिशुक्रवर्धक सुवर्ण व पारद, कामोद्दीपक रससिंदुर आणि फिरंगोपदंश नष्ट करून शुक्रवर्धक रसकापूर अग्निदीपक रससिंदुर आमवातनाशक कांत भस्म क्षयनाशक रौप्य, मनःशिला वैक्रांत, अभ्रक, गोमेद, प्रवाळ व राजावर्त उरःक्षतहर वैक्रांत व सुवर्ण रक्तपित्तहर वैदूर्य प्रवाळ दाहनाशक प्रवाळ, मोती, रौप्य, व पोलाद कासनाशक प्रवाळ, नालमणी, अभ्रक व मनःशिला श्वासनाशक नीलमणी, अभ्रक पांडुनाशक पोलाद, मंडूर, कासीस, कांत, गोमेद प्रमेहनाशक पोलाद, सुवर्ण, वैक्रांत, राजावर्त, सुवर्णमाक्षिक मूळव्याधनाशक नील, पोलाद, कांत भस्म उदरनाशक पोलाद कुष्ठनाशक गंधक, गंधक रसायन, सुवर्णमाक्षिक, कासीस, पोलाद, हरयाळ, नागरसायन कोडनाशक हरयाळ, कासीस, तुरटी नागरसायन इ. होत. याप्रमाणे अनेक पार्थिव मूलद्रव्ये नानारोगनाशक आहेत. त्यांचा उपयोग करताना ती शुद्ध करून, त्यांचे भस्म करून व ती शरीरात निःशल्य जावीत असे स्वरूप त्यांना आणून ती द्यावीत.


 रोगानुसार मिश्र कल्प : ज्वर: मृतसंजीवन रस  मरणोन्मुखावस्थेत टाळूवरचे केस काढून तेथे शस्त्राने सड काढावे व सुई पाण्यात ओली करून ती औषधीच्या चूर्णाने माखून त्या सुईने त्या जखमेवर औषध लावावे, नंतर ते रक्तात मिनेल असे दाबून चोळावे व नंतर तिळाचे तेल लावून रोग्याच्या भोवतालचे वातावरण निर्वात ठेवावे. दीडपावणेदोन तासांनी रोग्याला लघवी व शौचाला होते, ती शुद्धीवर येतो. डोके हालवतो, नंतर रोग्याला होणाऱ्या  चिन्हांनुरुप या वेळी करावयास सांगितलेली ती ती उपाय योजना करावी. ही  मात्रा बहुतेक रोगांच्या मरणोन्मुख अवस्थेत द्यावयाची असते. सूचिमुख हा रसही अशा अवस्थेत तंद्रित संन्निपात ज्वरात, तसेच हातपाय थंड झालेल्या धनुर्वातात ज्यावा. खोकला, श्वास, बडबड, कंप, उचकी, मूकत्व, बहिरेपणा, उन्माद, अपस्मार यांत हा रस उपयुक्त आहे.

रक्तपित्तावर वसंत कुसुमाकर, चंद्रकला खोकल्यावर रत्नकरंडक रस श्वासावर रत्नकरंडक, लोबान सोमल तत्त्व, उदयभास्कर उचकीवर रत्नकरंडक, सूतशेखर स्वरभेदावर पर्पटीरस राजयक्ष्यावर राजमृगांक, मृगांक पोटली, लोकनाथ, मकरध्वजगुटी आनंदसूत, महालक्ष्मीविलास, सिद्धलक्ष्मीविलास इ, रस मूळव्याधीवर कनकसुंदर ग्रहणीवर निरनिराळ्या पर्पटी, सर्वारोग्यवटी उदावर्तावर वातगजांकुश अतिसारावर सुधासार, लोकेश्वर मुतखड्यावर पाषाणभेदी, त्रिविक्रम रस प्रमेहावर महाविद्यारस, कासीसबद्ध, वसंत कुसुमाकर, हिमांशू इ. विद्रधीवर सर्वेश्वर पर्पटी अंडवृद्धी व आंत्रवृद्धीवर वातारी रस गुल्मावर वैश्वानर, सर्वांगसुंदर शूलावर अग्निमुख, त्रिनेत्र कुशत्वावर अमृतार्णव स्थूलत्वावर अग्निकुमार अम्लपित्तावर लीलाविलास, ताम्रदुती हंसमंडूर, कलविध्वंसन इ. कामलेवर कामलाप्रणुद, त्रियोनिरस विसर्पावर विसर्पाजित कुष्ठावर वातकुष्ठघ्न, कफकुष्ठध्न रस, कृष्णमाणिक्य, तालेश्वर इ. कोडावर श्वित्रारी, चंद्रप्रभा, उदयादित्य रस इ वातारोगावर सर्वेश्वर, स्पर्शवातारी, गंधाश्मगर्भ, महावात विध्वंस, समीरपन्नग, वातगजांकुश वातरक्तावर त्रियोनिरस, त्रिनेत्र आमवातावर वातारी अपस्मारावर पर्पटी अपस्मारनाशन रस, उन्माद पर्पटी सर्वेश्वर एकांग वातावर पर्पटी सर्व वात विकारांवर महायोगराज-गुग्गुळ योगराजगुग्गुळ, वडवानल, चतुःसुधा, वातविध्वंसन घनुर्वातावर प्रभावती वटी, दुसरा वडवानल अर्धागरूपवातावर त्र्यंबकेश्वर वंध्यत्वावर जयसुंदर, रत्नभागोत्तर वर्धमान रस सूतिकारोगावर पर्पटिका रस उपयुक्त होतो.

याप्रमाणे उक्तानुक्त कोणत्याही रोगावर चिकाटीने उपचार केला, तर धातू वरच्या प्रतीचे निर्माण होऊन इष्ट सिद्धी मिळाल्यावाचून राहाणार नाही.

मानवाच्या भोवतालची यच्चावत सचेतन-अचेतन सृष्टी मानवाच्या सेवेला अतिशय उत्सुक आहे. मानवी शरीराचे घटक होण्यास स्वतःला ती धन्य समजते. पुरुषाला पुरुषोत्तम करून मानवी जीवनाचे सार्थक करून स्वतःला कृतार्थ करावे अशी ती सतत इच्छिते व ती मानवाकडे त्या अपेक्षेने पहाते. 

मानवाने तिच्यातील औषधान्नरुपी श्रेष्ठ मित्र तज्ञ वैद्यांच्या साहाय्याने निवडून त्यांचे सतत स्वागत करून त्यांना आत्मसात करून, आत्म घटक बनवून त्यांना कृतार्थ करून आपणही पुरुषोत्तम व्हावे.

पहा : वाजीकरण.    

                                                                                                                                

जोशी, वेणीमाधवशास्त्री