आहार व औषधि : (आयुर्वेद). आहाराचे मुख्य कार्य शरीर घटकांचे पोषण व वर्धन करणे हे आहे. शरीर घटकांना ज्या प्रकारच्या अन्नाची जरूरी असते ते अन्न जरूर तितक्या प्रमाणात दिले तर शरीराचे आरोग्य उत्तम राहते नाहीतर रोग निर्माण होतात. आहार घटक स्वतः शरीर घटक बनतात. शरीरात ज्या घटकांची पूर्तता झालेली असते व जे घटक जरूरीपेक्षा अधिक प्रमाणात शरीरात संचित होतात ते घटक शरीराला नकोसे होतात. म्हणून ते घटक उत्पन्न करणाऱ्या आहाराची इच्छा न होता द्वेष उत्पन्न होतो. जो आहार नकोसा वाटतो तो आहार घेणे शरीराला घातक होते. शरीराला जो आहार हवासा वाटतो तो आहार शरीराला पुरविणे अत्यावश्यक आहे. त्याची इच्छा शरीर व्यक्त करीत असते. शरीराची ही इच्छा मात्र तपासली पाहिजे. शरीराला घातक अशा आहाराचीही सवयीने चटक लागलेली असते. जिभेला ती चटक असते म्हणून ती त्या आहाराची इच्छा व्यक्त करते. जिभेची केवळ चटक म्हणून ज्या आहाराची इच्छा असेल तो आहार वर्ज्य केला पाहिजे. ह्या आहाराने शरीरात विकार होतो, तो मानवत नाही, हे अनुभवाने लक्षात येते.

रस, त्याचा वास ह्यावर शरीराचीही इच्छा व द्वेष प्रामुख्याने व्यक्त होतात. ज्या रसाचा व वासाचा आहार नको असेल तो घेऊ नये व जो घ्यावासा वाटेल त्यांपैकी जो शरीराला हितकर असेल तो अवश्य घ्यावा. आहाराचा रस व गंध तसेच रूपादी गुण जितके इष्ट असतील तितका तो हितकर होतो. ह्याच्या विपरीत गुणांचा आहार शरीराचे आरोग्य नाहीसे करून रोग उत्पन्न करतो. शरीराची झीज ज्या प्रमाणात होत असेल त्या प्रमाणाला अनुसरून तो दोनदा, तीनदा किंवा अधिक वेळा द्यावा लागतो. लहान मुलांना तो अनेक वेळा द्यावा लागतो. आहार हा दररोज भुकेच्या वेळी घ्यावा लागतो. आहार द्रव्ये द्रव्यत: शरीराचे कार्य करतात. आहार हा संस्कारार्ह असतो.

औषध शरीराचे घटक बनतेच असे नाही. ते शरीर घटकांतील दोष नाहीसे करते. दोष नाहीसे करणे व दोषजन्य रोग नाहीसे करणे हे औषधाचे मुख्य कार्य आहे. आरोग्यसंपन्न शरीरात दोष व तज्जन्य रोग उत्पन्न होऊ नयेत म्हणूनही औषध घेतले जाते. औषधाचे दोषनाशक व रोगनाशक कार्य पाहून त्याची योजना केली जाते. त्यामुळे त्याचा रस, वासइ. गुण शरीराला ते घेताना आवडतीलच असे नाही. औषध हे प्राधान्याने त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याच्या रसाने, वीर्याने, विपाकाने, प्रभावाने कार्य करते.

आहार व औषध यांची तुलना: (१) आहार द्रव्ये रस, आस्वाद आणि गंध या दृष्टीने मनाला आनंद देणारी असतात. औषधी द्रव्ये बहुधा अशी नसतात. (२) आहार द्रव्ये शरीराची घटक बनतात, म्हणजे द्रव्यत: कार्य करतात. औषधी द्रव्ये शरीर घटक बनतातच असे नाही. ही द्रव्ये क्वचित द्रव्यत: कार्य करतात. (३) आहार द्रव्ये रस, वीर्यादी गुणकर्मांनीही कार्य करतात. औषधी द्रव्ये रस, वीर्य, विपाक, प्रभाव इ. गुणकर्मांनीही प्राधान्याने कार्य करतात. (४) शरीराची घटक बनणारी ही आहार द्रव्ये शरीराच्या झिजलेल्या घटकांची परिपूर्ती करण्याइतकी शरीरात घेतली जातात.औषधी द्रव्ये शरीराच्या झिजलेल्या घटकांची पूर्ती होण्याला ते अनुरूप बनविण्याला वाढलेले घटक (दोष) शरीरातून काढून टाकण्यास (शोधन) वा पचनादी कार्ये करून ते आत्मसात करण्यास मदत करतात. (५) आहार हा शरीर घटकांचे पोषण करणारा व शरीर घटक वाढविणारा असतो. औषध हे शरीर वर्धन व पोषण या आहार कार्याला मदत करीत असते. (६) आहार हा रोज घ्यावा लागतो. औषध हे नैमित्तिक आहे. जरूरीप्रमाणे घ्यावे लागते. (७) आहाराचे प्रमाण पुष्कळ असते. आहाराच्या मानाने औषधाचे प्रमाण अल्प असते. सिद्धौषधींचे प्रमाण तर फारच अल्प असते. (८) आहार शरीराला सवय वा सात्म्य असलेल्या द्रव्यांचाच घेणे श्रेयस्कर असते. औषधे बहुधा शरीराला सवयीची नसतातच. (९) आहार संस्कारार्ह असतो. औषध हे आहारावर संस्कार करणारे असते. (१०) आहार हे एक प्रकारचे औषधच आहे, परंतु औषध हे आहार नसते.

जोशी, वेणीमाधवशास्त्री