प्रज्ञापराध : प्रज्ञा म्हणजे बुद्धी. तिने केलेला प्रमाद अपराध. प्रज्ञा शब्दाने धी (बुद्धी), धृती व स्मृती समजून, यांचा भ्रंश होऊन जे कर्म मनुष्याकडून होते, ते प्रज्ञापराधज कर्म होय. त्यांचा भ्रंश प्रज्ञापराध होय. प्रज्ञापराधाने सर्व दोषांचा प्रकोप होतो. प्रज्ञापराध हे रोगाचे मूळ कारण होय. हा रज व तम या मानसिक दोषांनी होतो.

  रोगाची दृश्य कारणे काल, अर्थ व कर्म यांचा हीनमिथ्यातियोग आहेत. शरीराच्या गरजेनुसार ऋतू (काळ) गरजेइतका आहार, पानादि द्रव्ये व व्यायाम, झोप इ. कर्मे यांचा गरजेइतकाच योग होणे, उपयोग करणे हा समयोग होय. यापेक्षा कमी, जास्त किंवा विकृत (मिथ्या) उपयोग हे रोगोत्पादक होत. ज्याची प्रज्ञा (धी, धृती, स्मृती) स्थिर असते, तो कालादिकांचा हीनमिथ्यातियोग होऊ देत नाही. ती भ्रष्ट झाली तर तो होतो. 

लक्षण : चुकीची समजूत होणे तसेच चुकीचे वर्तन होणे म्हणजे प्रज्ञापराध होय. हितकर, अहितकर, सुखी, दुःखी आयुष्य (शरीर) कोणते, तसेच आयुष्याला (शरीराला) हितकर व अहितकर काय याबद्दल चुकीच्या समजुती होणे आणि त्यांचे (काल, अर्थ, कर्म) चुकीचे सेवन करणे प्रज्ञापराध होय. चुकीच्या समजुतीने आहारविहारांचे सेवन करणे हा प्रज्ञापराध होय.

जोशी, वेणीमाधवशास्त्री