ऱ्हीनियम : अत्यंत दुर्मिळ धातुरूप मूलद्रव्य. रासायनिक चिन्ह Re. अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ७५ अणुभार १८६·२. ⇨आवर्त सारणीतील (इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांच्या कोष्टकरूप मांडणीतील) गट ७ ब ऑक्सिडीकरण अवस्था ० ते ७ + [⟶ ऑक्सिडीभवन] वितळबिंदू ३,१८० से. उकळबिंदू ५,९०० से. घनता २१.०४ ग्रॅ./ घ. सेंमी. (२० से. ला) विद्युत विन्यास (अणुकेंद्राभोवतील विविध कक्षांतील इलेक्ट्रॉनांची मांडणी) २, ८, १८, ३२, १३, २. नैसर्गिक समस्थानिक (एकाच अणुक्रमांकाचे पण भिन्न अणुभार असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) दोन असून स्थिर समस्थानिकाचा द्रव्यमानांक (अणुकेंद्रातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकूण संख्या) १८५ आणि किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) समस्थानिकाचा द्रव्यमानंक १८७ असून त्याचे अर्धायुष्य (किरणोत्सर्गाची मूळची क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा कालावधी)  ५×१०१० वर्षे कृत्रिक किरणोत्सर्गी समस्थानिकांचे द्रव्यमानांक १८२, १८३, १८४ आणि १८८. अत्यंत कठीण व रुपेरी रंगाची धातू. संयुजा (इतर अणूशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक) १, ४, ७.

इतिहास : १८७१ मध्ये मेंडेलेव्ह यांनी मँगॅनिजासारखे गुणधर्म असणारी धातू आढळेल असे भाकीत केले होते व तिला त्यांनी द्वि-मँगॅनीज असे नाव दिले होते. १९२५ मध्ये वॉल्टर नोडॅक, आय. टॅक व ओ. बेर्ख यांना खनिजांचे विश्लेषण करीत असताना टँटॅलाइट, वुल्फ्रॅमाइट व कोलंबाइट या खनिजांमध्ये हे मूलद्रव्य आढळले. नंतर हे मॉलिब्डेनाइट (MoS2) या खनिजांमध्ये आढळले व ते त्यापासून मिळविण्यातही आले.

आढळ : विश्वात आढळणाऱ्या मूलद्रव्यांच्या विपुलतेच्या प्रमाणानुसार ऱ्हीनियमचा ७५ वा क्रमांक लागतो. पृथ्वीच्या कवचात ते विरळाच आढळते. ते मॉलिब्डेनम सल्फाइड खनिजामध्ये प्रत्येक दशलक्ष भागांत जास्तीत जास्त १० ते २० भाग एवढ्या प्रमाणात आढळते. त्याचे डायसल्फाइड (ReS2) स्थिर आहे.

निर्मिती : मॉलिब्डेनाइट खनिजाचे प्रगलन केले असता त्यातील धूममार्ग वायूतील बाष्पनशील (उडून जाणाऱ्या) हेप्टॉक्साइडापासून (Re2O7) ऱ्हीनियम मिळवितात. निष्कर्षित मूलद्रव्याचे विद्राव्य पोटॅशियम परऱ्हीनेट (KReO4) स्वरूपात पुनर्स्फटिकीकरण करतात. या द्रव्याचे परत अमोनियम लवणात रूपांतर करतात आणि हायड्रोजनाच्या साहाय्याने ⇨क्षपण करून धातूचे काळे चूर्ण मिळवितात.  याची तार किंवा वर्ख बनविता येते.

रासायनिक गुणधर्म : ऑक्सिजनामध्ये धातू तापविली असता तिची पुढील ऑक्साइडे मिळतात. ReO2 काळे, Re3O8 निळे, ReO3 तांबडे, Re2O7 पिवळे व ReO4 पांढरे. Re2O7 ची पाण्याबरोबर विक्रिया होऊन रंगहीन परऱ्हीनिक अम्ल (HReO4) तयार होते. परऱ्हीनिक अम्ल हे प्रबल अम्ल आहे परंतु ते परमँगॅनिक अम्लाइतके प्रबल ऑक्सिडीकारक नाही. या धातूवर हायड्रोक्लोरिक व हायड्रोफ्ल्युओरिक या अम्लांचा काही परिणाम होत नाही इतर अम्लांचा थोडा फार परिणाम होतो.

संयुगे : ऱ्हीनियमापासून अनेक हॅलाइडे व ऑक्सिहॅलाइडे तयार होतात. ही धातू क्लोरिनाबरोबर तापविली असता प्रत्यक्ष विक्रियेने ReCI5 मिळते परंतु हे संयुग नायट्रोजन असलेल्या वातावरणात तापविले असता ReCI3 मिळते. तिची ReCI4 आणि ReCI6 संयुगेसुद्धा मिळतात. तसेच ही धातू फ्ल्युओरिनाबरोबर तापविली असता प्रत्यक्ष विक्रियेने ReF6 व ReF7 मिळतात व त्यांचे क्षपण करून ReF4 मिळते. या हॅलाइडांची ऑक्सिजन किंवा ऑक्साइडे किंवा ऑक्सिअम्ल लवणे यांच्याबरोबर विक्रिया होऊन अनेक ऑक्सिहॅलोजन संयुगे मिळतात उदा., ReOF4, ReO2F2, ReO2CI2, ReO2Br2, ReO3F आणि ReO3CI. ऱ्हीनियमाची अनेक जटिल संयुगे असून त्यांवर विशेष संशोधन झालेले नाही. तिची ट्रायामिथिल ऱ्हीनियम [Re(CH3)3], (CO)5Re.Re (CO)5, (C5H5)ReH ही संयुगेसुद्धा मिळतात.

उपयोग : ऱ्हीनियम धातूचा आणि तिच्या मिश्रधातूंचा उपयोग फाउंटनपेनांच्या निफांची टोके, रासायनिक विक्रियांमधील उत्प्रेरके (प्रत्यक्ष विक्रियेत भाग न घेता तिची गती बदलणारे पदार्थ), उच्च तापमानाची तपयुग्मे, अर्धसंवाहक, अणुकेंद्रीय विक्रियक, विद्युत् संपर्कबिंदू, विजेची उपकरणे इत्यादींमध्ये होतो.

अभिज्ञान : (अस्तित्व ओळखणे). ऱ्हीनियमाच्या संयुगांमुळे बन्सन ज्योतीला फिकट हिरवा रंग येतो. यावरून तिचे अस्तित्व कळते.

जमदाडे, ज. वि.