ऱ्हंब रेषा : लोक्झोड्रोम. पृथ्वीगोलावरील रेखावृत्तांना समान कोनात छेदून तिरप्या दिशेने काढलेली रेषा. हिलाच ‘एकदिशनौपथ’ असे म्हणतात. पृथ्वीगोलाच्या संदर्भात या रेषेचा विचार केल्यास विषुववृत्तावरील एका बिंदूपासून ही रेषा सरळ पूर्वेस काढली, तर ती प्रत्येक रेखावृत्ताशी ९००चा कोन करेल. परंतु त्याच बिंदूपासून ईशान्येकडे म्हणजे ४५० चा कोन करून काढली, तर प्रत्येक रेखावृत्तावर एका बाजूस ४५० चाच कोन होईल. जसजशी ही रेषा उत्तर ध्रुवाकडे वळेल, तसतशी ती वक्राकार होऊन शेवटी उत्तर ध्रुवबिंदूस मिळेल. या तिर्थक मार्गालाच ‘लोक्झोड्रोम मार्ग’ अथवा ‘समकोणीय वलयाकार’ म्हणतात.
इ. स. १५३३ मध्ये पोर्तुगीज गणितज्ञ व भूगोलज्ञ पेद्रू नूनीश याने या रेषेची (लोक्झोड्रोमिक मार्ग) प्रथम आखणी केली. स्पॅनिश भाषेत ‘रंबो’ म्हणजे दिशा, कोन अथवा मार्ग. यावरूनच ऱ्हंब (रम्) रेषा हे नाव रूढ झाले. मर्केटरच्या प्रक्षेपणापूर्वी नौवहनात ऱ्हंब रेषा सर्वांत उपयुक्त ठरत असे. होकायंत्राने दर्शविलेली दिशा व नकाशावर या रेषेने दाखविलेला मार्ग तसेच दोन ठिकाणांतील अंतर हे तंतोतंत जुळत असल्याने जल आणि हवाई वाहतुकीस ही उपयोगी पडते. ही रेषा सरळ यावी यासाठी मर्केटर प्रक्षेपणावर आधारित नकाशे जास्त उपयुक्त ठरतात. [प्रक्षेपण, नकाशाचे].
वाघ, दि. मु. चौंडे, मा. ल.