ऱ्येका : (फ्यूमे). यूगोस्लाव्हियातील सर्वांत मोठे सागरी बंदर व क्रोएशिया प्रजासत्ताकातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. लोकसंख्या १,९३,०४४ (१९८१). देशाच्या वायव्य भागात, झाग्रेवच्या नैर्ऋत्येस सु. १३० किमी.वरील हे शहर एड्रिॲटिक समुद्रातील क्व्हार्नेर आखातावर वसलेले आहे. देशाचे व मध्य यूरोपातील-प्रामुख्याने हंगेरी-प्रदेशांचे निर्यातबंदर म्हणून हे प्रसिद्ध आहे.
रोमन वसाहत म्हणून हे शहर अस्तित्वात आले. रोमन लोक याला तार्सातिका किंवा थर्सातिकम या नावाने ओळखत असत. मध्ययुगीन काळापासून ‘फ्यूमे’ या नावाने ते ओळखले जाऊ लागले. इटालियन लोक याला ‘फ्यूमे’ व यूगोस्लाव्ह ‘ऱ्येका’ असे म्हणतात. या दोहोंचा अर्थ ‘नदी’ असा असून एड्रिॲटिक समुद्राला या बंदरात येऊन मिळणाऱ्या एका लहान नदीमुळे याला हे नाव देण्यात आले. नवव्या ते चौदाव्या शतकापर्यंत हे शहर क्रोएशियन ड्यूकांच्या ताब्यात होते. १४६६ मध्ये ऑस्ट्रियाने ते घेतले. १७२३ मध्ये खुले बंदर म्हणून जाहीर करण्यात आले व १७७६ मध्ये क्रोएशियाचाच एक भाग बनले. पुढे तीन वर्षांनी हे बंदर ऑस्ट्रियाने हंगेरीला दिले. या काळात एक प्रमुख बंदर म्हणून याचा विकास झाला. नेपोलियन युद्धांत काही काळ फ्रेंचांकडे, नंतर ऑस्ट्रियाकडे व १८२२ मध्ये पुन्हा हंगेरीकडे या बंदराची सत्ता गेली. पहिल्या महायुद्धापर्यंत क्रोएशियन व हंगेरियन यांच्यात या शहराच्या अधिकाराबाबत वाद चालू होता. या युद्धानंतर याच्या सत्तेविषयी इटली व यूगोस्लाव्हिया यांच्यात वाद निर्माण झाला. १९१५ च्या लंडन तहान्वये ते यूगोस्लाव्हियाला देण्याचे ठरले, परंतु शहरात इटालियन भाषिकांची संख्या जास्त असल्याने इटलीने त्यावर हक्क दाखविला. या संघर्षातच इटालियन कवी व साहसी गाब्रिएले दान्नूत्त्स्यो याने १९१९ मध्ये शहराचा ताबा घेतला. १९२० मधील रापाल्लॉ तहान्वये हे शहर स्वतंत्र राज्य म्हणून ठेवण्यास इटली व यूगोस्लाव्हियाने मान्यता दिली परंतु १९२२ मध्ये ते इटलीने पुन्हा घेतले. १९२४ च्या रोम तहान्वये हे शहर इटलीच्या आधिपत्याखाली ठेवण्याचे ठरले व त्याचे पूर्वेकडील सूशाक हे उपनगर यूगोस्लाव्हियाला देण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतर १९४७ च्या पॅरिस तहान्वये फ्यूमे शहर यूगोस्लाव्हियाच्या ताब्यात आले व तेव्हापासून त्याचे ‘ऱ्येका’ हे नाव रूढ झाले.
यूगोस्लाव्हियातील एक महत्त्वाचा नौसेना तळ येथे असून देशातील सर्वांत मोठा जहाजबांधणी कारखानाही आहे. याशिवाय शहरात डीझेल एंजिने, कागदनिर्मिती, अभियांत्रिकी, रसायने, तेलशुद्धीकरण इ. उद्योगांचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. या बंदरातून प्रामुख्याने कृषिउत्पादने लाकूड, तंबाखू, मद्य यांची निर्यात होते. शहरात इ. स. पहिल्या शतकातील रोमन कमान, सोळाव्या शतकातील मनोरा, सतराव्या शतकातील सेंट व्हायटस चर्च इ. उल्लेखनीय स्मारके आहेत. यांशिवाय शहरात अनेक ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये, ‘नॉर्थ एड्रिॲटिक इन्स्टिट्यूट’ ही यूगोस्लाव्ह विज्ञान अकादमीची शाखा इ. शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत.
चौधरी, वसंत चौंडे, मा. ल.