रोहिणी – २ : हृदयापासून ऊतकाकडे (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहाकडे) अन्नपदार्थांनी परिपूर्ण व ऑक्सिडीभूत (ऑक्सिजनयुक्त फुप्फुस रोहिण्यांचा अपवाद वगळता) रक्त वाहून नेणाऱ्या वाहिनीस रोहिणी म्हणतात. हृदयाच्या आकुंचनाबरोबर ढकललेले रक्त उच्च दाबाने रोहिण्यांतून वहाते. त्यासाठी नीलेच्या तुलनेत रोहिणीभित्ती जाड व मजबूत असून तीत स्थितिस्थापक (ताण काढून घेतल्यावर मूळ स्थिती प्राप्त होणाऱ्या) ऊतकाचा व अरेखित (आडव्या रेषा नसलेल्या, अनैच्छिक) स्नायूंचा भरणा अधिक असतो.
इतर चतुःष्पाद पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांप्रमाणेच, मानवातही फुप्फुस वाहिनी तंत्र (संस्था) व शरीर वाहिनी तंत्र ही दोन प्रमुख एकमेकांपासून अलग असलेली रक्तवाहिन्यांची तंत्रे असतात. त्यांतील हृदयापासून ऊतकांपर्यंत जाणाऱ्या वाहिन्या या रोहिण्या होत. मोठ्या रोहिणीला शाखा, उपशाखा याप्रमाणे फाटे फुटत त्या लहान लहान होत जातात व प्रत्यक्ष ऊतकामध्ये त्यांचे सूक्ष्म केशवाहिन्यांत रूपांतर होते. उजव्या निलयातून (रोहिण्यांमध्ये रक्त ढकलणाऱ्या हृदयाच्या कप्प्यातून) फुप्फुस प्रकांड रोहिणी सुरू होते आणि ती विभागून तिचे डावी व उजवी फुप्फुस रोहिणी हे फाटे अनुक्रमे डाव्या व उजव्या फुप्फुसांत जातात. या रोहिणीच्या फाट्यांपासून बनणाऱ्या केशवाहिन्यांचे जाळे फुप्फुसातील वायुकोशांभोवती पसरते व त्याचा वायूंच्या अदलाबदलासाठी उपयोग होतो. डाव्या निलयातून महारोहिणी सुरू होते. तिचे आरोही भाग, चाप व अवरोही भागाचे वक्षीय व उदरगुहीय याप्रमाणे भाग केले आहेत. आरोही भागाच्या सुरुवातीला महारोहिणी कोटरांतून (फुगवट्यासारख्या भागांतून) दोन (उजवी व डावी) हृद्-रोहिण्या निघतात. त्या हृदयाच्या ऊतकाला रक्तपुरवठा करतात. चापापासून (अनुक्रमे उजवीकडून डावीकडे) अनामिका (पुढे विभागून उजवी अधोजत्रुक-गळपट्टी खालील व उजवी समाईक ग्रीवा-मानेतील-रोहिणी या शाखा), डावी समाईक ग्रीवा रोहिणी व डावी अधोजत्रुक रोहिणी याप्रमाणे दोन्ही बाहू व डोक्याच्या सर्व भागांना पुरवठा करणाऱ्या रोहिण्या निघतात. अवरोही भागाच्या वक्षीय भागातून वक्षातील अवयवांना (उदा., फुप्फुसाच्या ऊतकाला) पुरवठा करणाऱ्या व उदरगुहीय भागातून उदरगुहेतील अवयवांना (उदा., लहान आतडे (लध्वांत्र) व मोठे आतडे (बृहदांत्र), वृक्क (मूत्रपिंड), प्लीहा (पानथरी), यकृतांचे ऊतक इ.) पुरवठा करणाऱ्या शाखा निघतात. चौथ्या कटिकशेरुकाजवळ (कमरेपासच्या चौथ्या मणक्याजवळ) अवरोही महारोहिणी विभागून उजवी व डावी समाईक श्रोणिरोहिणी (धडाचा खालचा भाग व पायांचा वरचा भाग यांना जोडणाऱ्या खोलगट भागांतील रोहिणी) बनते आणि ती विभागून बाह्य व अंतःस्थ श्रोणिरोहिण्या (उजव्या व डाव्या) बनतात. यातील अंतःस्थ श्रोणिरोहिण्या श्रोणिभागातील अवयवांना (उदा., जननेंद्रिये, मूत्राशय इ.) व बाह्य श्रोणिरोहिण्या (मांडीत शिरताच तिला उरुरोहिणी म्हणतात) दोन्ही पायांना रक्तपुरवठा करतात [⟶ रक्ताभिसरण तंत्र].
रचना : रोहिणीची सर्वसाधारण रचना पुढीलप्रमाणे असते : रोहिणी-भित्ती जाड व मजबूत (नीला-भित्तीच्या तुलनेत) असून त्यामुळे रोहिणीचा निपात (भित्ती एकमेकींस येऊन भिडणे) होऊ शकत नाही. ही भित्ती तीन स्तरांची बनलेली असते. यांतील सर्वांत आतील किंवा अवकाशिकेजवळील (अंतर्गत पोकळीजवळील) अंतःस्तर सर्व स्तरांत पातळ असून तो अंतःकला कोशिकांचे गुळगुळीत अस्तर, त्याला आधारभूत संयोजी ऊतक व स्थितिस्थापक तंतूंच्या जाळीचे आवरण (अंतःस्थ स्थितिस्थापक पटल) यांचा मिळून बनलेला असतो. संयोजी ऊतकातही काही स्थितिस्थापक व काही कोलॅजेन या प्रथिनाचे तंतू असतात व मध्यम आकारमानाच्या रोहिण्यांत लांबीच्या दिशेने रचना असलेले काही अरेखित स्नायूही असतात. या रोहिण्यांना फाटे फुटतात तेथे या अरेखित स्नायूंचे प्रमाण अधिक असते. मध्यस्तर सर्वांत जाड स्तर असून त्यात प्रामुख्याने, वर्तुळाकार दिशेने रचना असलेले अरेखित स्नायू व थोड्या प्रमाणात, स्थितिस्थापक तंतू असलेले संयोजी ऊतक असते. या स्तरातील अरेखित स्नायूंचे प्रमाण रोहिणीच्या व्यासाप्रमाणे वाढत जाते (लहान रोहिण्यांत ३ ते ४ थरांपासून मध्यम रोहिण्यांत ४० थरांपर्यंत) व अगदी मोठ्या रोहिण्यांत ते पुन्हा थोडे कमी होते. तसेच या स्तरातील संयोजी ऊतकातील स्थितिस्थापक तंतू लहान रोहिण्यांत विखुरलेले, मध्य रोहिण्यांत जाळीदार रचनेत सर्व मध्यस्तरभर पसरलेले व मोठ्या रोहिण्यांत सर्पिल रचनेत गुंडाळलेले असतात. सर्वांत बाहेरील बाह्यस्तर संयोजी ऊतकाचा बनलेला असून त्यात स्थितिस्थापक व कोलॅजेन तंतूंचे प्रमाण अधिक असते. हा स्तर लहान रोहिण्यांत पातळ, मध्यम रोहिण्यांत जाड (कधी कधी मध्यस्तराइतका जाड) व मोठ्या रोहिण्यांत पुन्हा (मध्यस्तराच्या तुलनेत) पातळ असतो. याच्या आतील भागात मध्यस्तराभोवती स्थितिस्थापक तंतूंचे जाळीदार आवरण (बाह्यस्थ स्थितिस्थापक पटल) तयार होते व बाहेरील भाग रोहिणीभोवतालच्या संयोजी ऊतकात मिसळून गेलेला असतो. याचे कार्य संरक्षक असते.
अगदी लहान (१ मिमी.पेक्षा कमी व्यासाच्या) रोहिण्या व रोहिणिका सोडल्यास, प्रत्यक्ष रोहिणी-भित्तीच्या ऊतकांना रक्तपुरवठा करण्यासाठी, निराळ्या वाहिन्या रोहिण्यांच्या अवकाशिकेतून सुरू होऊन रोहिणी-भित्तीच्या ऊतकांत शिरतात. त्यांना ‘वाहिनी-वाहिन्या’ म्हणतात. शिवाय रोहिणीच्या अवकाशिकेतून वाहणाऱ्या रक्तातून झिरपलेल्या ऑक्सिजन व अन्नपदार्थांवर अंतःस्तराच्या व मध्यस्तराच्या आतील काही भागाचे पोषण होते. लहान रोहिण्या व रोहिणिकांचे पोषण सर्वस्वी याच प्रकाराने होते. रोहिणी-भित्तींना पुरवठा केल्यावर अशुद्ध झालेले व ऑक्सिजनरहित रक्त दुसऱ्या वाहिनी-वाहिन्यांत गोळा करून ते शेजारून जाणाऱ्या नीलेत सोडले जाते.
स्वायत्त तंत्रिका तंत्रातील अनुकंपी (वाहिनी आकुंचन) व परनुकंपी (वाहिनी विस्फारक) तंत्रिकांचा [⟶ तंत्रिका तंत्र] रोहिणी-भित्तीतील अरेखित स्नायूंना पुरवठा असतो. त्याद्वारे या स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणावर व पर्यायाने रोहिणीच्या अवकाशिकेच्या आकुंचन-विस्फारणावर आणि त्याद्वारे रक्तदाबावर व पुढील भागातील रक्तपुरवठ्यावर स्वायत्त तंत्रिका तंत्राचे नियंत्रण असते.
प्रकार : रोहिणी-भित्तीची सूक्ष्म रचना सर्वसाधारण वरीलप्रमाणे असली, तरी या रचनेतील बदल, निरनिराळ्या ऊतकांचे भित्तीतील प्रमाण व अवकाशिकेचा व्यास यांवरून रोहिण्यांचे चार ते पाच प्रकार करता येतात. अर्थात अवकाशिकेच्या व्यासातील व सूक्ष्म रचनेतील हे बदल क्रमाक्रमाने होतात आणि ते त्या त्या प्रकारच्या रोहिणीच्या कार्यानुरूप असतात.
सर्वात मोठ्या रोहिण्यांना (उदा., महारोहिणी व तिच्या प्रमुख शाखा आणि फुप्फुस प्रकांड रोहिणी व तिच्या दोन शाखा) स्थितिस्थापक रोहिण्या म्हणता येईल. हृदयाच्या आकुंचनाबरोबर उच्च दाबाने ढकलेले गेलेले रक्त पुढील लहान रोहिण्यांपर्यंत वेगाने पोहोचविणे हे या रोहिण्यांचे कार्य असते. त्यासाठी त्यांच्या भित्ती जाड व मजबूत असून उच्च रक्तदाब सहन करण्यासाठी त्यांच्या मध्यस्तरात, अरेखित स्नायूंच्या तुलनेत, स्थितिस्थापक पिवळ्या तंतूंचा भरणा अधिक असतो आणि अंतःस्तरातील आधारभूत संयोजी ऊतकाभोवतीही स्थितिस्थापक ऊतकाचा अनिश्चित स्वरूपाचा थर असतो (अंतःस्थ स्थितिस्थापक पटल). हृदयातून रक्त ढकलेले जाताच या रोहिण्या फुगतात आणि हृदयाच्या प्रसरण कालात मूळ स्थितीला येऊन रक्त पुढे ढकलण्यास, रक्ताचा दाब कमी करण्यास व नाडीच्या तरंगाची लांबी वाढविण्यास त्या मदत करतात. त्यामुळे मध्यम व लहान रोहिण्यांत रक्त येईपर्यंत मूळचा उच्च दाबाचा व खंडित रक्तप्रवाह कमी दाबाचा व त्यामानाने अखंड होतो. प्रत्यक्ष ऊतकांना होणारा रक्तपुरवठा कमी दाबाचा व अखंड असतो. मध्यम व लहान (किंवा स्नायुमय) रोहिण्यांचे काम म्हणजे शरीराच्या सर्व भागांना रक्तपुरवठा करणे व जरुरीप्रमाणे त्यावर नियंत्रण ठेवणे हे होय. त्यामुळे या रोहिण्यांचा मध्यस्तर प्रामुख्याने जाड असून तो मुख्यतः अरेखित स्नायूंच्या वर्तुळाकार थरांनी बनलेला असतो आणि त्याच्या आतून व बाहेरून स्थितिस्थापक ऊतकाचे आवरण असते. या स्नायूंना असलेल्या स्वायत्त अनुकंपी व परानुकंपी तंत्रिकांच्या मुबलक पुरवठ्यामुळे स्नायूंचे कमीअधिक आकुंचन होते आणि या रोहिण्यांच्या अवकाशिकेवर व त्यायोगे त्यातून पुढे होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर नियंत्रण ठेवता येते.
अगदी लहान रोहिण्यांत हळूहळू अंतःस्थ व नंतर बाह्यस्थ स्थितिस्थापक पटल नष्ट होत जाते आणि रोहिणिकांत स्नायूंचे आवरणही कमी होत जाते. सर्वांत लहान रोहिणिकांच्या भित्ती फक्त अंतःकला कोशिकांचा स्तर व बाहेर अरेखित स्नायूंचे पातळ आवरण यांच्याच बनलेल्या असून त्यांनाही स्वायत्त तंत्रिकांचा मुबलक पुरवठा असतो. त्यामुळे जरुरीप्रमाणे त्यांच्या अवकाशिका पूर्ण उघडता किंवा पूर्ण बंद करता येतात. त्यामुळे केशवाहिन्यांतील रक्तप्रवाहात अथवा रक्तघनफळात त्या मोठे बदल घडवू शकतात आणि त्यायोगे ऊतकाच्या जरूरीप्रमाणे रक्तपुरवठ्यावर सूक्ष्म नियंत्रण ठेवणे या प्रकारचे झडपांचे काम त्या करू शकतात. त्या इतर रोहिणिका आणि नीलिकांनाही जोडलेल्या असतात. त्याचा उपयोग रक्त जरुरीप्रमाणे केशवाहिन्यांतून फिरवणे किंवा जरूर नसल्यास केशवाहिन्या टाळून सरळ नीलिकांत सोडणे यासाठी आणि जरूर तेव्हा पार्श्विक अभिसरण स्थापन करणे यासाठी होतो. जास्त जरूर असलेल्या अवयवाकडे मोठ्या प्रमाणावर रक्त पुरवठा वळवणे (उदा., भोजनानंतर जठर व आतड्याकडे, व्यायामानंतर स्नायूंकडे, निरनिराळ्या परिस्थितींत उद्भवणारी शोथ-दाहयुक्त सूज-प्रक्रिया इ.) आणि विशेष परिस्थितीत (उदा., मोठा रक्तस्त्राव) जीवनावश्यक अवयवांकडे (उदा., हृदय, मेंदू इ.) रक्तपुरवठा मोठ्या प्रमाणावर वळवणे त्यामुळे शक्य होते.
(या वेळी कमी जरूरीच्या अवयवांना-उदा., त्वचा, आतडी इ.- कमी प्रमाणात रक्तपुरवठा होत असल्याने त्वचा थंड लागते व भूक मंदावलेली असते).
याशिवाय लहान रोहिण्यांच्या व रोहिणिकांच्या अवकाशिकेवरील नियंत्रणामुळे परिसरीय विरोध कमीजास्त करता येऊन नेहमी निरनिराळ्या शरीर-अवस्थांमध्ये व विशेष परिस्थितीत रक्तदाबावर सूक्ष्म नियंत्रण ठेवता येते. या कामी, स्वायत्त तंत्रिका तंत्राचे रक्तवाहिन्यांच्या अवकाशिकेवरील नियंत्रण, वृक्कांच्या रक्तपुरवठ्यातील बदलांमुळे घडून येणारे रेनिन अँजिओटेन्सीन इ. हार्मोनांच्या (उत्तेजक स्त्रावांच्या) रक्तातील पातळीतील बदल आणि महारोहिणी चाप आणि समाईक ग्रीवा रोहिण्यांतील ग्रीवा कोटरांतील दाब-ग्राहक यांची मदत होते. [⟶ रक्तदाब].
रोग : रोहिण्यासंबंधीच्या रोगांचे अपकर्षजन्य व शोथजन्य (दाहयुक्त सूज आल्यामुळे होणारे) असे वर्गीकरण करता येते. या रोगांसंबंधी ‘रक्ताभिसरण तंत्र’ या नोंदीत माहिती दिलेली आहे.
संदर्भ : 1. Abrahamson. D. I., Ed, Blood Vessels and Lymphatics, New York, 1962.
2. Guyton, A. C. Textbook of Medical Physiology, Tokyo. 1976.
3. Warwick, R. Williams, P., Ed., Gray’s Anatomy, Edinburgh, 1973.
प्रभुणे, रा. प.
“