रोझडी : गुजरातमधील हडप्पा संस्कृतीच्या अवशेषांचे स्थळ. राजकोट जिल्ह्यातील गोंडल तालुक्यात गोंडलच्या ईशान्येस सु. २१ किमी.वर व राजकोटच्या दक्षिणेस ५५ किमी.वर भादर नदीच्या काठी ते वसले आहे. येथील उत्खननात हडप्पा आणि हडप्पानंतरच्या काळातील त्याचप्रमाणे गुप्त व मुसलमान या ऐतिहासिक काळांतील विविध अवशेष उपलब्ध झाले आहेत. लोकसंख्या ९०४ (१९६१). १९५७ ते १९५९ या काळात आणि नंतर १९६३ साली झालेल्या उत्खननात इतिहासपूर्व आणि ऐतिहासिक काळातील वस्त्यांचा पुरावा मिळाला. पहिल्या वस्तीत हडप्पा संस्कृतीची खापरे, त्यांवर मत्स्य, बैल, झाडांची पाने, काळ्या रंगात रंगविलेली चित्रे आढळली. यांशिवाय भोके असलेली मृत्पात्रे, सोन्याचे दागिने, तांब्याच्या बांगड्या, उत्कृष्ट मणी आणि गारगोटीच्या छिलक्यांची हत्यारेही वापरात होती, असे अवशेषांवरून दिसले. या वस्तीभोवती दगडगोट्यांचा कोट होता आणि चुन्याने सारवलेले मातीचे चौथरे राहण्याच्या वास्तूंशी संलग्‍न असत. हडप्पा खापरांशिवाय तांबडी व पिवळसर रंगांची खापरेही प्रचारात होती. इतिहासपूर्व दुसऱ्या वस्तीचे स्वरूप बहुतांशी असेच होते पण या काळात हडप्पा संस्कृतीचा संपर्क कमी झाल्याचे आढळले. रंगपूर येथील परिपक्वता येथे आढळत नाही. वास्तू मात्र दगडगोट्यांच्या व मातीच्या बनवीत आणि घरांतील जमिनी चिखल चोपून त्यांवर चुन्याचा थर देऊन बनवीत. याच काळातील तिसऱ्या वस्तीत हडप्पाच्या उत्तरकालातील खापरे वापरात होती. घरे दगडगोट्यांची आढळली. ऐतिहासिक काळात, इ.स. तिसऱ्या-चौथ्या शतकांत, विशेषतः क्षत्रप-गुप्तकाळात इथे पुन्हा बसती झाली. त्या काळातील दगडी वास्तू आढळल्या असून काही ओबडधोबड मृत्पात्रेही सापडली आहेत. व्यापारी संपर्काने या काळातील रोझडीच्या रहिवाशांच्या वापरात रोमन बनावटीची खापरे आल्याचा पुरावाही मिळाला आहे. तिसरी वस्ती मुसलमान काळात झाली. त्यांची काही काळी-तांबडी मृत्पात्रे उत्खननात उपलब्ध झाली. यांशिवाय पहिल्या सुलतान मुहम्मदाची नाणी व चलनातील कवड्या उपलब्ध झाल्या आहेत. या काळात गावाला तटबंदी असावी. अलीकडे हे श्रीनाथगढ या नावाने प्रसिद्ध आहे.

रोझडी येथे १९८३-८४ साली गुजरात सरकारचे पुरातत्त्व खाते आणि अमेरिकेतील फिलाडेल्फिया संग्रहालय यांनी संयुक्तपणे उत्खनन केले. अद्यापि याचा तपशीलवार वृत्तान्त प्रसिद्ध व्हावयाचा आहे तथापि उत्खननातील अश्मपेटिका तसेच मेंढी, बकरा, डुक्कर, नीलगाय, कासव इ. अवशेषांवरून तेथे इ. स. पू. २००० ते १५०० दरम्यान पहिली वस्ती झाली. ही वस्ती हडप्पा आणि नंतरच्या वस्त्या यांमधील प्रगत वस्ती होती आणि येथील लोक कृषि-पशुपालक या संमिश्र अर्थव्यवस्थेत मोडतात.

संदर्भ : 1. Archaeological Survey of India, Indian Archaeology : A Review (1957-59), New Delhi, 1965-66.

           2. Gazetteer of India, Gujrat State Gazetteers : Rajkot District, Ahmedabad, 1965.

देव, शां. भा.