रोंडेलीशिया ओडोरॅटो : (इं. स्वीट स्मेलिंग रोंडेलीशिया कुल-रुबिएसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] बागेत शोभून दिसणारे एक सु. ०·९५ – २·५० मी. उंच झुडूप. याचे मूलस्थान क्युबा व मेक्सिको असून हे इतरत्र उद्यानांतून सामान्यपणे आढळते. रोंडेलीशिया या प्रजातीत एकूण सु. ८५ जाती असून त्यांचा प्रसार अमेरिकेच्या उष्ण भागात विशेष आहे वेस्ट इंडीजमध्येही काही जाती आढळतात. रोंडेलीशिया प्रजातीचा अंतर्भाव हल्ली टारेना प्रजातीत केला असून त्यातील एकूण सु. ३५० जातींपैकी भारतात फक्त ९ ते १२ आढळतात.
रों. ओडोरॅटा हे सदापर्णी, केसाळ व कठीण झुडूप असून त्याला साधी, समोरासमोर, सोपपर्ण (तळाशी दोन देठांमध्ये लहान उपांगे दोन बाजूंस असणारी), वरच्या बाजूस गर्द हिरवी आणि खरबरीत व खालच्या बाजूस फिकट हिरवी, अंडाकृती-कुंतसम (भाल्यासारखी) व अत्यंत लहान देठाची पाने असतात. फुलोरे [गुलुच्छ ⟶ पुष्पबंध] सु. १० सेंमी. रुंद फांद्यांच्या शेंड्यांवर असून त्यांवर सु. १०-३० लालसर शेंदरी किंवा नारिंगी, काहीशी सुगंधी, सु. २·५ सेंमी. व्यासाची फुले जून ते सप्टेंबरमध्ये येतात. संवर्त घंटेसारखा आणि पाकळ्या ४-६, बाहेरच्या बाजूस गोलसर आणि खाली नलिकाकृती (पुष्पमुकुट) असतात. फुलाच्या मध्यभागी (कंठाशी) पिवळा ठिपका असतो. केसरदले पाकळ्यांइतकी असतात किंजपुट अधःस्थ व त्यात दोन कप्पे असतात. छदे आणि छदके (फुलाच्या तळाशी असलेली उपांगे) असतात [⟶ फूल]. बोंडे (फळे) गोलसर व पुटकमिदुर (कप्प्यांच्या बाजूस तडकणारी) असतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ रुबिएसी अथवा मंजिष्ठ कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. नवीन लागवड छाट कलमे किंवा दाब कलमे लावून करतात.
हर्डीकर, कमला श्री. परांडेकर, शं. आ.