रसखान : (सु. १५४८−सु. १६२८). रसखानि या नावानेही प्रसिद्ध. हिंदीतील कृष्णभक्त मुसलमान कवी. त्याचे जन्मस्थान काहींच्या मते पिहानी, तर काहींच्या मते दिल्ली सांगितले जाते. त्याचे मूळचे नाव वेगळेच असावे. शिवसिंह सेंगर यांच्या मते त्याचे मूळ नाव सय्यद इब्राहिम पिहानीवाले असे असावे पण काव्यात मात्र सर्वत्र रसखान किंवा ‘रसखानि’ (प्रेमाची खाण) हेच नाव आढळते. आपण बादशाही वंशातील आहोत, असा कवीने स्वतःचा उल्लेख केला आहे. त्यावरून त्याचे बालपण चांगल्या स्थितीत गेले असावे, असे अनुमान निघते. भागवताचा फार्सी अनुवाद वाचून त्याच्या हृदयात श्रीकृष्णाबद्दल भक्ती उत्पन्न झाली. या संदर्भात अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्याचे तात्पर्य इतकेच, की त्याला अनेक प्रसंगामुळे कृष्णभक्तीची ओढ लागली. वल्लभाचर्यांचे पुत्र विठ्ठलनाथ यांनी त्याला कृष्णभक्तीची दीक्षा दिल्यानंतर मुसलमान असूनही त्याने वैष्णव भक्ताप्रमाणे जीवन व्यतीत केले.

त्याने प्रेमवाटिका हे काव्य १६१४ मध्ये रचले आणि ते वृंदावन येथून १८६७ मध्ये प्रकाशित झाले. बावन दोह्यांच्या या काव्यात प्रेमाची महती वर्णिली आहे. सुजान रसखान या केवळ १२९ स्पुट पदांच्या संग्रहातील वर्ण्यविषय मुरलीने गोपींना मोहित करणारा श्रीकृष्ण हा आहे. हा ग्रंथ बनारस येथून १८९२ मध्ये प्रकाशित झाला. यातील ‘कवित्तसवैय्ये’ अतिशय लोकप्रिय आहेत. ‘ऐकवा एखादी कविता’ या अर्थी ‘सुनाओ कोई रसखान’ असा वाक्यप्रयोगच या संदर्भात केला जात असे. मनुष्याचा, पशूचा, पक्ष्याचा किंवा दगडाचा, कसलाही पुढील जन्म मला मिळो, पण मला ब्रजभूमीतच राहाण्यास मिळावे, एवढीच प्रार्थना आहे आणि कृष्णाची काठी व कांबळे यांवर आठ सिद्धी व नऊ निधींचे वैभवही ओवाळून टाकावे, अशा शब्दांत त्याने आपली भक्ती प्रकट केली आहे. ब्रजभाषेत कविता रचणाऱ्या या कवीचा भागवतादी संस्कृत ग्रंथांशी चांगलाच परिचय होता. त्याच्या कवितेत अरबी, फार्सी, अपभ्रंश वगैरे भाषांतील शब्दांचाही विपुल वापर आढळून येतो. त्याची भाषा सरस व साधी सरळ असून त्याने दोहा, कवित्त, घनाक्षरी व सवैय्या छंदांचा वापर अधिक प्रमाणात केला.

संदर्भ : १. अमीरसिंह, रसखान और घनानंद, काशी, १९५१.

     २. पांडेय, चंद्रशेखर, रसखान और उनका काव्य, अलाहाबाद, १९५४.

     ३. मिश्र, विश्वनाथप्रसाद, संपा. रसखानि, वारणसी, १९५३.

दुबे, चंदूलाल द्रविड. व्यं. वि.