रंगीत माती : (ऑकर). रंगद्रव्य म्हणून वापरण्यात येणारे मुख्यतः पिवळे, तांबडे अथवा तपकिरी रंगाचे लोह ऑक्साइडयुक्त मातकट सूक्ष्म चूर्णरूप मिश्रण. इतर धातूंच्या (उदा., अँटिमनी, बिस्मथ, निकेल) ऑक्साइडाने युक्त असलेल्या अशा रंगीत मिश्रणासही ही संज्ञा वापरतात. अशाच प्रकारच्या पण जांभळट, हिरवट, पांढऱ्या इ. छटांच्या मात्या कमी महत्त्वाच्या आहेत.

 

रंगीत मातीमध्ये सामान्यतः सजल (पिवळे), निर्जल (तांबडे) लोह ऑक्साइडी खनिजे (अनुक्रमे लिमोनाइट व हेमॅटाइट), तसेच अतिसूक्ष्म चूर्ण रूपातील सिलिकेटी, चूर्णीय वा इतर मातकट द्रव्ये व कधीकधी ॲल्युमिनियम ऑक्साइड यांचे मिश्रण झालेले असते. या द्रव्यांचे प्रमाण निरनिराळ्या मात्यांमध्ये निरनिराळे आढळते. लोह व मँगॅनीज ही दोन्ही असली, तर माती पिवळसर तपकिरी दिसते. अशा मातीचे इटलीतील सिएना येथे मोठे साठे असल्याने तिला सिएना म्हणतात. पूर्वी छपाईची शाई बनविताना हिचा वापर करीत. मँगॅनीज ऑक्साइडाचे प्रमाण आणखी वाढल्यास गडद तपकिरी अंबर माती बनते.

 

रंगीत मात्यांचे मृत्तिकामय व चुनामय असे मुख्य गट पडतात. मृत्तिकामय मात्यांचा रंग अधिक निर्मळ व गडद असतो. माती रंगाचे स्वरूप तिच्यातील लोहेतर घटकांचे प्रमाण व गुणवत्ता यांवर अवलंबून असते. रंगांवरून यांचे तांबडा, पिवळा, तपकिरी, हिरवा, पांढरा इ. प्रकार केले जातात. उदा., पर्शियन, ऑक्सफर्ड, इंडियन, स्पॅनिश वा व्हेनेशियन रेड (तांबडा), चायनीज यलो (पिवळा) इत्यादी.

 

रंगाचा गडदपणा रंगलेप बनविताना लागणाऱ्या तेलाचे (उदा., जवसाच्या तेलाचे) प्रमाण, पोत, विशिष्ट गुरुत्व आणि रासायनिक संघटन यांच्यावर रंगीत मातीचे मूल्य अवलंबून असते. तिच्यातील मृत्तिका ही बंधक व भरण द्रव्य म्हणून उपयुक्त असते. काही मात्या सुकविणे, दळणे, धुणे व चाळणे यांसारख्या सोप्या संस्करणानंतर सरळ बाजारपेठेत पाठविता येतात. मात्र काहींवर अधिक कष्टपूर्वक संस्करणे करावी लागतात. उदा., रंग सुधारण्यासाठी म्हणजे मुख्यत्वे तो अधिक आकर्षक असा गडद होण्यासाठी माती भाजतात. तिच्यातील मातकट द्रव्याचा भाजताना वेगवेगळा परिणाम होतो. अशा तऱ्हेने मृत्तिकामय मातीला भाजल्यावर तांबडी वा जांभळी छटा येते, तर चुनामय मातीला भाजल्यावर तपकिरी छटा येते. उदा., टेरा डी सिएना या विख्यात इटालियन मातीला भाजल्यावर सुंदर मॅहॉगनी तपकिरी रंग प्राप्त होतो व त्यामुळे तिला कलाकार अधिक किंमत मोजतात. जैव द्रव्यांचे प्रमाण जास्त असलेली माती कधीकधी भाजतात कारण त्यामुळे तिचा व्हार्निशमधील वा तेलातील सुकण्याचा गुणधर्म सुधारतो. भाजल्याने मातीत १०−१२ % घटही होते.

 

कोणत्याही लोहयुक्त खडकावर वातावरणक्रिया होऊन तांबडी व पिवळी वा तपकिरी रंगीत माती बनत असते. ज्या ठिकाणी वातावरणक्रिया खोलवर व पूर्णतया झालेली असते, अशा ठिकाणी यांचे बहुसंख्य साठे आढळले आहेत. फेरोमॅग्नेशियम सिलिकेटे, ग्रीनस्टोन अथवा क्लोराइट हे खनिज विपुल असणारे खडक यांच्यापासून हिरवी, तर जिप्सम, बराइट, संगजिरे इत्यादींपासून पांढरी माती तयार होते. रंगीत मात्या सामान्यपणे स्तरित खडकांत आढळतात. अशा खडकांत त्यांचे थर अथवा पट्टे आढळतात. क्वचित यांचे मोठे साठेही आढळतात.

 

जगात सर्वत्र या आढळतात. कॅनडा, द. आफ्रिका, भारत, इटली, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन इ. देशांमध्ये यांचे चांगले निक्षेप (साठे) आहेत. भारतात रंगीत मातीचे निक्षेप विस्तृत भागांत विखुरलेले आढळतात. राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, गुजरात, आंध्र प्रदेश, काश्मीर, तामिळनाडू इ. प्रदेशांत तांबडी, पिवळी व क्वचित तपकिरी माती आढळते. प. बंगाल व बिहारमध्ये हिरवी माती सापडते. १९८० साली भारतात १०३ (५९ उघड्या व ४४ भूमिगत) खाणी होत्या व त्या सर्व खाजगी क्षेत्रातील होत्या. यांपैकी १९ खाणींतून देशातील ७५% उत्पादन झाले. त्या वर्षी काढण्यात आलेल्या एकूण ९२,९३८ टन मातीपैकी ४६% तांबडी व ४३% पिवळी माती होती, तर १०% लोहाचे तांबडे ऑक्साइड होते. यांपैकी ९४% उत्पादन राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक व उत्तर प्रदेश या चार राज्यांत झाले होते. त्या वर्षी भारतातून रंगीत मातीची थोडीच निर्यात इराण, केन्या, कुवेत, फिलिपीन्स व झांबिया या देशांना झाली. तथापि आयात थांबली. भारतात रंगीत मातीचा वापर मुख्यत्वे लघू व कुटीर उद्योगांमध्ये केला जातो. महाराष्ट्रात नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड व सातारा या जिल्ह्यांत तांबडी, पिवळी व तपकिरी मात्यांचे साठे आहेत.

 

आकर्षक रंग व अधिक क्षेत्र व्यापण्याचा गुणधर्म यांमुळे माणसाचे लक्ष रंगीत मातीकडे आकर्षिले गेले असावे. प्रागैतिहासिक काळापासून किंवा त्याही आधीपासून माणूस रंगीत मातीचा उपयोग करीत आलेला आहे. त्या काळी मातीची भांडी रंगविणे, चित्रे काढणे, भित्तिलेपचित्रे (भिंतीवरील उठावाची चित्रे) तयार करणे वगैरे सुशोभनाच्या कामांसाठी रंगीत माती वापरली जाई. थीओफ्रॅस्टस (इ. स. पू. सु. ३७२−२८७) यांच्या लेखनात रंगीत माती वापरल्याचा उल्लेख आढळतो.

 

सुकी व दळलेली रंगीत माती मुख्यतः योग्य त्या वाहकात (उदा., जवसाचे तेल) मिसळून रंगलेप, डिस्टेंपर, तैलरंग, लॅकर वगैरे बनण्यासाठी वापरली जाते. यांशिवाय कागद, सिमेंट, खते, ॲस्बेस्टसाच्या वस्तू, रबर, अपघर्षक (घासून व खरवडून पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी वापरण्यात येणारा पदार्थ), फर्निचर, फरशी इ. उद्योगधंद्यांत रंगीत माती वापरतात. काही प्लॅस्टिकांमध्ये रंगद्रव्य व भरण द्रव्य म्हणूनही रंगीत माती वापरतात. पांढरी माती गिलाव्यासाठी व भिंतीला पांढुरका रंग देण्यासाठी वापरतात.

 

कृत्रिम रीतीनेही रंगीत माती बनविता येते. शुद्ध सजल फेरिक ऑक्साइड अथवा या ऑक्साइडाचे मृत्तिकामय वा चूर्णीय द्रव्याबरोबरचे मिश्रण म्हणजे ‘मार्स’ पिवळी माती होय. ही भाजून ‘मार्स माती’ नावाने ओळखली जाणारी नारिंगी, जांभळी व तांबडी रंगद्रव्ये बनविता येतात, तर ॲल्युमिनियम सिलिकेट, तसेच लोह व मँगॅनीज यांची कार्बोनेट भाजून सिएना वा अंबर माती तयार करता येते.

 

रंगीत मातीसाठी असलेला ‘ऑकर’हा इंग्रजी शब्द पिवळा (वा मंद) या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून आलेला आहे. गेरू वा काव व पिवडी या रंगीत मात्याच होत.

 

पहा : रंगद्रव्ये लिमोनाइट हेमॅटाइट.

 

ठाकूर, अ. ना.