यकृत : सर्व पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांत आढळणारा हा एक मोठा ग्रंथीवजा अवयव आहे. तो आद्य अग्रांत्रापासून (आतड्याच्या सुरुवातीच्या भागापासून) निर्माण झालेला असतो. मानवासहित सर्व पृष्ठवंशी प्राण्यांत त्याची रचना आणि कार्य सारखेच असते. ‘यम्‌’ व ‘कृ’ या मूळ संस्कृतातील धातूंपासून ‘यकृत’ हा शब्द बनलेला असून शरीरातील अनेक क्रियांचे नियमन करणारा अवयव असा अर्थ त्यात अभिप्रेत आहे. जवळजवळ पाचशे निरनिराळ्या प्रकारची कार्ये यकृतामार्फत होतात आणि हा जीवनावश्यक अवयव काढून टाकल्यास १ ते ५ दिवसांच्या आत हमखास मृत्यू ओढवतो. यकृताच्या रचनेत कोशिकांच्या (पेशींच्या) भित्तिका असतात. आंत्रामधून येणारे रक्त आणि पोषक द्रव्ये विपुल प्रमाणात असलेले के शिकांतून (सूक्ष्म वाहिन्यांतून) येणारे रक्त यांचे यकृतात अभिसरण होते. या रक्तावर यकृतातील एंझाइमांचे (जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणाऱ्या प्रथिनांचे) नियंत्रण असते. फायब्रिनोजेन, रक्तरस, अल्ब्युमीन, कोलीनएस्टरेज या रक्तातील महत्त्वाच्या घटकांचा उगम यकृतातच होतो. पृष्ठवंशी प्राण्यांच्या भ्रूणावस्थेत रक्तातील कोशिकांची पैदास यकृतातच होते. दैहिक अभिसरणावाटे वाहणाऱ्या रक्तातून विषारी द्रव्ये बाजूस काढून टाकणे व त्यांचे अवक्रमण (रेणूंचे तुकडे करण्याची क्रिया) करणे, तसेच रक्तात जर हॉर्मोनांचे (अंतःस्रावी ग्रंथींकडून येणाऱ्या उत्तेजक स्रावांचे) प्रमाण वाढले, तर ऑक्सिडीकरण [⟶ ऑक्सिडीभवन], हायड्रॉक्सीकरण [हायड्रॉक्सी गटाचा (OH) समावेश करण्याची क्रिया] किंवा संयुग्मन करून हे प्रमाण कमी करणे या क्रियाही यकृतातच घडतात. रक्तातील कणरूपी द्रव्याचा यकृतातील कोटरिकांच्या (नीला कोशिकांनी बनलेल्या क्षेत्रांच्या) भित्तीत असलेल्या भक्षिकोशिकांद्वारे नाश केला जातो. रक्ताची गाळणक्रिया, शर्करा व जीवनसत्त्वे या उपयुक्त पदार्थांचा साठा करणे, प्रथिने, प्रतिपिंडे (शरीरात आलेल्या बाह्य पदार्थांचा प्रतिकार करण्यासाठी निर्माण होणारी प्रथिने), अन्न पाचकरस यांची निर्मिती करणे व निरुपयोगी द्रव्यांचे उत्सर्जन करणे ही यकृताची काही महत्त्वाची कार्ये आहेत. आपल्या आहारात यकृताचा समावेश केला, तर प्रथिने, वसा (स्निग्ध पदार्थ), अ, ब, ड व ई ही जीवनसत्त्वे, तसेच लोह व तांबे हे आवश्यक घटक आपल्या शरीराला मिळतात. रक्तशुद्धी व रक्तवृद्धी होत असतानाच यकृतात पित्ताचे स्रवण होत असते. हा स्राव प्रथम पित्ताशयात साठविला जातो आणि नंतर तो ग्रहणीत (लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात) सोडला जातो. पित्तामुळे वसेचे पायस (एकमेकांत न मिसळणाऱ्या द्रवांपासून बनणारे दृढ मिश्रण) तयार होते व यामुळे तिचे पचन सुलभ होते.

मानवेतर प्राण्यांतील यकृत : अपृष्ठवंशी प्राण्यांना यकृत नसते. फक्त कवचधारी प्राण्यांत यकृत-अग्निपिंड या नावाची एक लहान ग्रंथी असते. पृष्ठवंशी प्राण्यांच्या भ्रूणात यकृताची वाढ झपाट्याने होते पण पूर्ण वाढ झालेल्या प्रौढ प्राण्यात यकृताच्या कोशिकांचे विभाजन होताना आढळत नाही. मात्र शस्त्रक्रिया किंवा अशा काही कारणास्तव जर यकृताचा लहानसा भाग कापला गेला, तर तेथील कोशिकांचे झपाट्याने विभाजन होऊन पूर्ववत यकृत तयार होते. कृंतक (भक्ष्य कुरतडून खाणाऱ्या) प्राण्यात यकृताचे वजन त्याच्या शरीराच्या वजनाच्या ५% असते, तर मानवात हे सु. २% म्हणजे सरासरी १.५ किग्रॅ. इतके असते. यकृताचे आकारमान जरी निरनिराळ्या प्राण्यांत वेगवेगळे असले, तरी त्यातील रक्ताभिसरणाचा आराखडा सारखाच असतो. यकृत हे सर्व पूर्ण वाढ झालेल्या पृष्ठवंशी प्राण्यांत आढळते व वरवर सारखे दिसते पण त्यात विकासाच्या दृष्टीने फरक आहेत. यकृत व रक्ताभिसरण यांसंबंधीची माहिती यकृताचे कार्य समजण्यास आवश्यक आहे. जीवरसायनशास्त्राच्या दृष्टीने यकृताचे कार्य जटिल स्वरूपाचे आहे. मानवी यकृताचे कार्य जरी जटिल स्वरूपाचे असले, तरी रचनात्मक दृष्टीने त्याचा अभ्यास करणे सुलभ आहे. पृष्ठवंशी प्राण्यांतील आदिम प्राण्यांत हॅगफिश व लँप्री यांचा समावेश होतो. लँप्रीचे यकृत आकारमानाने लहान व फक्त एक खंडाचे असते. हॅगफिशमध्ये मात्र द्विखंडी यकृत आढळते. माशांचे यकृत मोठे व रचनात्मक दृष्ट्या इतर पृष्ठवंशी प्राण्यांसारखे असते. काही माशांत भ्रूणविकास होत असताना पित्ताशय व पित्तनलिका यांचा नाश होतो व यामुळे प्रौढावस्थेत, विशेषकरून उपास्थिमत्स्यांत (ज्यांचा सांगाडा कूर्चेचा बनला आहे अशा माशांत) यांचा अभाव असतो. अस्थिमत्स्यांत पित्ताशय आढळतो व त्याचे आकारमानही मोठे असते. माशाच्या यकृताचे महत्त्व त्याच्या वसा संश्लेषणक्षमतेत आहे. याचीच परिणती माशाच्या यकृतापासून तेल व जीवनसत्त्वे मिळण्यात होते. उभयचर (जमिनीवर व पाण्यातही वास्तव्य करणाऱ्या) प्राण्यांचे यकृत खंडयुक्त असते व त्यांना पित्ताशयही असतो. यकृताला रक्ताचा पुरवठा उदरीय नीलेपासून व यकृत प्रवेशिका नीलेपासून होतो. सरीसृप (सरपटणाऱ्या) प्राण्यांपैकी सापात एकाच खंडाचे लांब यकृत असते. कासव, मगर इत्यादींत यकृत दोन खंडांचे असून हे दोन खंड जोडलेले असतात. बहुतेक सर्व सरीसृप प्राण्यांत पित्ताशय आढळतो. पक्ष्यांचे यकृत खंडयुक्त असले, तरी सुटसुटीत असते. पित्ताशयाचा अभाव असला, तरी भ्रूणावस्थेत पित्ताशयाची आद्यावस्था आढळते. कबुतरात यकृताच्या प्रत्येक खंडापासून एक पित्तनलिका ग्रहणीत जाते. सस्तन प्राण्यांचे यकृत खंडयुक्त असते इतकेच नव्हे, तर खंडाच्या रचनेतही फरक आढळतात. जर हे फरक वरवरचे असतील, तर यकृत एकीकृत समजले जाते. असे यकृत मानवी शरीरात, देवमाशात व इतर अनेक रवंथ करणाऱ्या प्राण्यांत आढळते. अशा यकृतात प्रवेशिका नीला व यकृत नीला एकमेकांशी काटकोन करतात. याउलट जेव्हा यकृताचे खंड निश्चित असतात तेव्हा प्रवेशिका नीला व यकृत नीलेच्या मोठ्या शाखा एकमेकींशी समांतर असतात. एकीकृत यकृताचा भाग कापून काढणे निश्चित खंड असलेल्या यकृताच्या भागापेक्षा कठीण असते.

लँप्री सोडून इतर सर्व पृष्ठवंशी प्राण्यांत यकृत हे त्रिमितीय जालिकेसारखे असते. या जालिका अधिस्तराच्या पट्टिकांनी जुळविलेल्या असतात. यालाच मूलोतक म्हणतात. या रचनेतच रिक्तिका तयार होतात व त्यांतून कोटरिकांची निर्मिती होते. यकृताचा पृष्ठभाग मूलोतकाच्या एककोशिक स्तराने आच्छादिलेला असतो. मानवासह सर्व पृष्ठवंशी प्राण्यांचे यकृत म्हणजे कोशिकांचा एक सलग समूह असतो. या समूहात दंडगोलीय नलिका इतस्ततः विखुरलेल्या असतात. यकृताची तुलना एखाद्या इमारतीशी केली, तर या इमारतीत अनेक अनियमित दालने असून ती एकमेकांशी जोडलेली असतात. या दालनांच्या भिंती यकृत कोशिकांच्या बनलेल्या असतात. अशा संयोजित भित्तीच्या रचनेस ‘म्युरालियम’ असे म्हणतात. कोटरिका यकृतातील रिक्तिकांत लोंबत्या स्थितीत आढळतात. कोटरिकांच्या भित्तीतील कोशिकांस के. डब्ल्यू. कुफर या जर्मन शरीरविज्ञांच्या नावावरून कुफर कोशिका असे म्हणतात. या कोशिकांत भक्षिकोशिकांची क्षमता असते. यकृताच्या कोशिकांवर रिक्तिकांच्या बाजूस सूक्ष्म रसांकुर असतात. यामुळे कोशिकांचा पृष्ठभाग वाढतो व या पृष्ठभागातून अन्नद्रव्ये असलेला विद्राव शोषला जातो. या शोषलेल्या अनावश्यक द्रव्यांचे उत्सर्जन कोशिकांतून कोशिकांच्या बाजूस असलेल्या पित्ताच्या सूक्ष्म कोशिकांत होते.


मानवी यकृताच्या कोशिकांत सपाट पण खडबडीत अंतःप्राकल जालकाच्या [⟶ कोशिका] थप्प्या असतात. तसेच संख्येने मर्यादित व आकाराने दंडगोलाकृती असे कलकणू (ज्यांचा स्राव कोशिका श्वसन व पोषण या कार्यात उपयोगी पडतो असे घटक) असून त्यांना शिखा नसतात. उंदराच्या यकृतात कोशिकेवर खुंट्यासारखी रचना असते व ही खुंटी शेजारच्या कोशिकेवरील खाचेत घट्ट बसते आणि अशा रीतीने कोशिका एकमेकींस जोडल्या जातात. मानवाच्या यकृतात मात्र कोशिकेच्या आवरणावर असलेल्या डेत्मोसोम या रचनेने किंवा कोशिकांच्या दरम्यान असलेल्या पित्ताच्या सूक्ष्म कोशिकांच्या साहाय्याने कोशिका एकमेकींस जोडल्या जातात. या सूक्ष्म कोशिकांचे जाळे सर्व यकृतभर पसरलेले असते व यामुळेच यकृतास मजबुती येते. यकृताच्या प्रत्येक कोशिकेत एक, दोन किंवा तीन केंद्रके (कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारे जटिल गोलसर पुंज) असतात. कोशिकेचे घनफळ तीत असणाऱ्या केंद्रकांच्या संख्येवर व म्युरालियमामध्ये त्या कोठे स्थिर आहेत यांवर अवलंबून असते. आंत्रातून येणाऱ्या रक्तप्रवाहात अन्न व कधीकधी विषद्रव्येही मिसळलेली असतात. असे रक्त यकृतात आले की, तेथे ते गाळले जाऊन न लागणारी द्रव्ये बाजूस काढली जातात व विषासारखे पदार्थ रासायनिक विक्रियेने उदासीन (निष्प्रभ) केले जातात. रक्तातील सूक्ष्मजंतूचा नाश व अतिरिक्त लैंगिक हॉर्मोनांना निष्क्रीय बनविणे या क्रियाही यकृतात साध्य होतात. ग्लायकोजेनाच्या स्वरूपात शर्करेचा साठा यकृतात केला जातो. तेव्हा ऊर्जेकरिता शर्करेची जरूरी भासते तेव्हा ग्लुकागॉन या हॉर्मोनाच्या साहाय्याने ग्लायकोजेनाचे शर्करेत परिवर्तन होते. वसा व जीवनसत्त्वे यांचा साठा यकृतातच असतो. यकृतातून रक्ताभिसरण होत असताना रक्तात अल्ब्युमीन, फायब्रिनोजेन, ग्लोब्युलीन, प्रोथ्राँबीन व हेपारीन यांसारखी महत्त्वाची रक्तरस प्रथिने मिसळली जातात. तसेच प्रतिपिंड निष्प्रभ करणे हेही यकृतातून रक्तप्रवाह जात असताना साध्य होते. पित्तनलिकेद्वारेही यकृत आंत्राशी जोडलेले असते. वसेच्या पचनासाठी उपयुक्त असणारी पित्ताम्ले व पित्त लवणे [⟶ पित्तरस] तसेच वसेमध्ये विरघळणारी अ, ब, ड व ई ही जीवनसत्त्वे यकृतातूनच मिळतात. रक्तातील बऱ्याचशा तांबड्या कोशिका अस्थिमज्जा (अस्थींच्या पोकळ भागांतील मऊ पदार्थ), प्लीहा व यकृत यांमध्ये नाश पावतात व त्यांत असलेले रक्तारुण (हिमोग्लोबीन) नावाचे रंगद्रव्य रक्तात मिसळते. यकृतात हे द्रव्य रक्तातून विलग केले जाते व त्याचे रूपांतर लालरंगाच्या पित्तारुण (बिलीरूबीन) व हिरवट रंगाच्या पित्तहरिती (बिलीव्हर्डीन) या द्रव्यांत केले जाते. ही द्रव्ये पित्ताबरोबर आंत्रात उत्सर्जित होतात. पित्तातच यकृतातून यूरिया व यूरिक अम्ल यांचेही उत्सर्जन होते. पित्तात असलेले कोलेस्टेरॉल हे द्रव्य मात्र आंत्रातून परत शोषिले जाते. पित्ताचा साठा तात्पुरता पित्ताशयात केला जातो. आंत्रात वसा किंवा मांसाहार किती आहे यावर पित्ताशयातून किती प्रमाणात पित्त आंत्रात जावे हे अवलंबून असते. या प्रवाहावर हॉर्मोनांचेही नियंत्रण असते. [⟶ पित्तारुण]. पृष्ठवंशी प्राण्यांचे भ्रूणविकासाचे समालोचन केले, तर असे आढळून येईल की, आदिम पृष्ठवंशी प्राण्यांच्या बाबतीत पीतककोशापासून [पोषक द्रव्ययुक्त पिशवीसारख्या संरचनेपासून ⟶ भ्रूणविज्ञान] यकृताची निर्मिती होते. उभयचर प्राण्यांच्या भ्रूणविकासात याविषयी बरीच माहिती मिळते. बेडकाची मादी जेव्हा अंडी घालते तेव्हा त्या अंड्यात वसा, प्रथिने व शर्करा यांचे बनलेले पीतक भरपूर प्रमाणात असते. हे अंडे फलित झाले, तर यथाकाल त्यातून भ्रूण बाहेर पडतो व याचेच रूपांतर भैकेरात होते. भैकेराच्या पोटाजवळ नव्यानेच अस्तित्वात आलेल्या हृदयाखाली पीतकाच्या कोशिका असतात. काही काळाने या कोशिकांच्या झुबक्यात कोटरे निर्माण होतात व ती एकमेकांशी संलग्न होतात. या कोटरांत रक्त कोशिका निर्माण होतात. ही कोटरे हृदयाशीही जोडलेली असतात. पीतकातील या आदिक रक्तवाहिन्यांद्वारे पीतक कोशिकांत असलेली जीवनावश्यक द्रव्ये सर्व शरीरभर पुरविली जातात. याच सुमारास आंत्राची निर्मिती होते. आंत्राच्या आसपास निर्माण झालेले रक्तवाहिन्यांचे जाळे व पीतककोशातील रक्तवाहिन्यांचे जाळे एकमेकांशी संलग्न होते. पीतक कोशिकांतील पीतक संपुष्टात येते याच सुमारास भैकेरास मुख प्राप्त होते. मुखाद्वारे घेतलेल्या अन्नाचे आंत्रात पचन होऊन ते रक्तात मिसळते. हे रक्त पीतककोशात आल्यावर त्यातील अन्नद्रव्याचा साठा रिकाम्या पीतककोशिकांत होतो व अखेर या सर्व कोशिकांचे रूपांतर यकृतात होते. यकृताची निर्मिती झाल्यावर पूर्वीच्या पीतनलिका आता यकृतातील कोटरिका म्हणून काम करू लागतात. यकृतात पित्ताची निर्मिती होते व हे पित्त आंत्रात वाहून नेण्याकरिता यकृत कोशिकांच्या नलिका तयार होतात. यातूनच पुढे पित्तकौशिका निर्माण होतात. सर्व पित्तनलिका एकमेकींस मिळून एक मुख्य पित्तनलिका तयार होते व ती आंत्रास जाऊन मिळते.


मानवाच्या यकृताची वाढ निरनिराळ्या आकाराने होते. येथे भ्रूणाची वाढ मातेच्या गर्भाशयात होत असल्याने भ्रूणास अन्नपुरवठा मातेच्या रक्तातून होतो. यामुळे मानवाच्या अंड्यात पीतकाचा साठा असत नाही. मानवाचा क्रमविकास (उत्क्रांती) आदिम पृष्ठवंशी प्राण्यांपासून झाला असल्यामुळे त्याच्या भ्रूणावर रिक्त असा पीतककोश आढळतो व त्यावर पीतक रक्तकोशिकांचे जाळेही आढळते. काही काळाने या भ्रूणावर नाभीशी संलग्न असलेल्या रक्तवाहिन्यांचा उगम होतो. या रक्तवाहिन्यांद्वारे गर्भाशयातून भ्रूणास रक्त आणि अन्नाचा पुरवठा होतो. पीतक नीला आणि नाभी नीला एकमेकींस मिळून नंतर हृदयात जातात. ज्या ठिकाणी या दोन नीलांचा संयोग होतो तेथे बऱ्याच कोशिका निर्माण होतात व त्यांचे जाळे तयार होते. हे संयोजी ऊतकाचे (जोडण्याचे कार्य करणाऱ्या कोशिका-समूहाचे) असते आणि त्यास अनुप्रस्थ पट असे म्हणतात. ह्या जाळ्यातील रक्त हृदयात जाते. आदिम आंत्राच्या अधरावर एक कोष्ठ निर्माण होतो व त्याच्या अंतःस्तरीय कोशिका विलग होतात. याच वेळी या भागातील शरीरभित्तीवर असलेल्या अस्तराच्या मध्यस्तरीय कोशिकाही विलग होतात. या दोन्ही प्रकारच्या विलग झालेल्या कोशिका अनुप्रस्थ पट या रचनेत स्थिर होतात व याचेच यकृत बनते. हे झाल्याबरोबर यकृताची सर्व कार्ये या रचनेमार्फत होऊ लागतात. नाभी नीलेच्या रक्तप्रवाहातून येणारे गर्भाशयातील अन्नद्रव्य साठविणे, पित्त तयार करणे व नलिकेद्वारे ते आंत्रात सोडणे इ. क्रियांस आरंभ होतो. पक्षी वर्गात यकृताची उत्पत्ती आंत्रातून विस्तार पावलेल्या नलिकेपासून होते. भ्रूणावस्थेत रक्तकोशिकांची उत्पत्ती यकृतातच होते. प्रौढावस्थेत हे कार्य अस्थिमज्जेत होते. पृष्ठवंशी प्राण्यांत यकृताच्या विकासाचे सु. २० प्रकार ज्ञात आहेत. कोणत्याही प्रकारे यकृताचा विकास झाला, तरी शेवटी म्युरालियम हे ऊतक निर्माण करणे आणि सर्वसाधारणपणे सारखीच कार्ये करणे हे सर्व यकृतांत आढळते.

इनामदार, ना. भा.

मानवी यकृत : यकृत हा मानवी शरीरातील सर्वांत मोठा अवयव असून त्याचे वजन शरीर वजनाच्या १/४० (पुरुषांत ते १·४ ते १·८ किग्रॅ. व स्त्रियांत १·२ ते १·४ किग्रॅ.) असते. त्याचा आकार पाचरीसारखा असतो. गर्भावस्थेत प्रौढावस्थेपेक्षा त्याचे आकारमान पुष्कळ मोठे असते. रंगाने लालसर-करडा, दाबून पाहिल्यास घट्ट व लवचिक परंतु भुसभुशीत व सहज विदारित होणाऱ्या या अवयवात रक्तवाहिन्यांने प्रमाण अधिक असल्यामुळे त्याच्या जखमांतून अती रक्तस्रावाची नेहमीच शक्यता असते.

आ. १. आद्य अग्रांत्रापासून तयार होणारे यकृत व इतर शरीरभाग (३७ दिवसांच्या भ्रूणाचा मध्य अग्र-पश्च छेद) : (१) मुखपथ, (२) अवटू ग्रंथी अंधवर्ध, (३) परावटू ग्रंथी व यौवनलोपी ग्रंथी अंधवर्ध, (४) श्वासनाल, (५) ग्रसनी, (६) फुफ्फुस कलिका, (७) जठर, (८) ग्रहणी, (९) अग्निपिंड, (१०) यकृत व पित्ताशय.भ्रूणविज्ञान : भ्रूणातील आद्य अग्रांत्राच्या ज्या भागापासून ग्रहणी तयार होते त्याच्या अभ्युदरीय (उदराच्या बाजूच्या) पृष्ठभागापासून निघणाऱ्या अंधवर्धापासून (पिशवीसारख्या विस्तारापासून) चौथ्या आठवड्यात यकृत तयार होऊ लागते. या अंधवर्धाच्या दोन शाखा तयार होतात. (अ) अग्रशाखा : हिच्यापासून यकृताचे मूलोतक तयार होते आणि (आ) पश्चशाखा : हिच्यापासून पित्ताशय, पित्ताशय नलिका व समाईक पित्तनलिका हे भाग बनतात.मूलोतकांची सुरुवात नलिकावजा रज्जू रचनेपासून होते. मूलोतकातील कोशिका आद्य अंतःस्तरापासून बनतात. सहाव्या आठवड्यात अग्रशाखा निरनिराळ्या भागांत विभागली जाते व त्यांपासून यकृताचे ‘खंड’ तयार होतात. मूलोतक कोशिकांच्या विभाजनातून सूक्ष्म पित्तनलिकांचे जाळे तयार होते आणि आद्य मध्यस्तरापासून कोटरिका बनतात.यकृत निर्मितीपासून सर्वसाधारणपणे बाराव्या आठवड्यात कार्यक्षम पित्तोत्पादक रज्जू तयार होतात. या सुमारास यकृत बहुतेक सर्व उदरगुहा व्यापते. त्याचे दोन्ही प्रमुख खंड आकारमानाने सारखेच असतात. त्यानंतर मात्र डाव्या खंडाची वाढ जवळजवळ थांबते. एवढेच नव्हे, तर अपकर्ष होऊन डावा खंड उजव्यापेक्षा पुष्कळच लहान बनतो व ही अवस्था पुढे कायम टिकते.शारीर : प्रौढामध्ये यकृत उदरगुहेत उजव्या व वरच्या भागात असते व ते गुहेचा जवळजवळ चौथा भाग व्यापते. त्याची आडवी लांबी ३० सेंमी. व पुढून मागे रुंदी १५ ते १७·५ सेंमी. असते. पुष्कळसा भाग मध्यरेषेच्या उजव्या बाजूस, छातीच्या खालच्या फासळ्यांनी (वक्ष भित्तीखाली) आच्छादित असतो. पाचरीचा रुंद भाग उजवीकडे व निमुळता भाग डावीकडे असतो. यकृताचे उजवा मोठा ५/६ भाग ‘उजवा खंड’ आणि उरलेला लहान १/६ भाग ‘डावा खंड’ असे दोन प्रमुख भाग पाडता येतात. याशिवाय पश्चभागाकडून पाहिल्यास ‘चतुरस्र खंड’ व ‘पुच्छक खंड’ असे दोन लहान खंडही ओळखता येतात.

आ. २. यकृताचे पश्चदर्शन : (१) उजवा खंड, (२) पित्ताशय, (३) चतुरस्त्र खंड, (४) डावा खंड, (५) पुच्छक खंड, (६) अधोमहानीला, (७) यकृत प्रवेशिका.उजव्या खंडाच्या पश्चपृष्ठ भागावरील त्रिकोणी भाग वगळता (अनाच्छादित क्षेत्र) संपूर्ण यकृत पर्युदराच्छादित (उदरगुहेत भित्तींच्या आतील बाजूवर व तीमधील अंतर्गत इंद्रियांवर पसरलेल्या पातळ पटलाने आच्छादित) असते. जठर व ग्रहणी आणि मध्यपटल (उदरगुहा व वक्षगुहा यांना अलग करणारे स्नायुयुक्त पटल) व अग्र उदरभित्ती यांच्याशी यकृत काही पर्युदर घड्यांनी जोडलेले असते आणि या घड्यांना ‘बंध’ म्हणतात. बंधांना निरनिराळी नावे आहेत. यकृतासारखा वजनदार अवयव उदरगुहेत एका जागी स्थिर ठेवण्यास बंध आणि उदरगुहांतरीय दाब मदत करीत असावेत.

जठर व ग्रहणी यांशिवाय उदरगुहेतील अधोमहानीला, उजवी ⇨अधिवृक्क  ग्रंथी, उजवे वृक्क (मूत्रपिंड), बृहदांत्राचा (मोठ्या आतड्याचा) उजवा बाक व पित्ताशय या भागांशी यकृताचा निकट संबंध असतो. कशेरुक दंडाचा (पाठीच्या कण्याचा) उदरगुहेकडील बहिर्वक्र भाग यकृतावर पश्चभागी अंतर्वक्र खाच निर्माण करतो. मध्यपटलाच्या वर उजवे फुप्फुस, हृदय व डाव्या फुप्फुसाचा अल्पभाग यकृताशी संबंधित असतात. यकृताचे उदरगुहेतील इतर अवयवांशी असलेले संबंध शरीर अंगस्थिती आणि श्वसनक्रिया यांवर अवलंबून असतात. उजव्या अधःपर्शुक (बरगड्यांखालील) क्षेत्रात परिस्पर्शन (हाताने चाचपडून पाहणे) तपासणीत यकृताची खालची कडा सहसा हातास लागत नाही. मात्र कधी कधी निरोगी व्यक्तीतही तशी लागू शकते.


शरीररचना दृष्ट्या वर्णिलेल्या वरील खंडांशिवाय शरीरक्रियाविज्ञान दृष्ट्या यकृताचे दोन भाग पाडता येतात. ही विभागणी प्रवेशिका नीला व यकृत रोहिणी यांच्या प्रमुख दोनपैकी एकेका शाखेने ठरते आणि या दोन भागांतील पित्त उजव्या व डाव्या पित्तनलिकांमार्फत वाहून नेले जाते. रक्तपुरवठा : यकृताला रक्तपुरवठा करणारी दुहेरी यंत्रणा आहे : (१) यकृत रोहिणी आणि (२) प्रवेशिका नीला. (१) यकृत रोहिणी : उदरगुहीय रोहिणी ही महारोहिणीची शाखा असून तिच्या अंतिम दोन शाखांपैकी एक समाईक यकृत रोहिणी बनते. तिच्या उजवी जठर व जठर-ग्रहणी शाखा निघाल्यानंतर तिला मूळ यकृत रोहिणी नाव मिळते. यकृत प्रवेशिकेतून पुढे तिच्या उजवी व डावी अशा शाखा गाभ्यात शिरतात. त्यांच्या अनेक उपशाखा सर्वत्र विखुरल्या जातात. सर्व छोट्या रोहिण्या (रोहिणिका) अंत्य रोहिण्या असतात म्हणजेच त्यांचे मीलन होत नाही. रोहिणिका आणलेले शुद्ध रक्त कोटरिकांमधील (प्रवेशिका नीलेच्या कोशिकांतील) रक्तात आणून टाकतात. (२) प्रवेशिका नीला : संपूर्ण आंत्रमार्गाकडील व प्लीहेकडील अशुद्ध रक्त प्रवेशिका नीलेमार्फत यकृतात आणले जाते. या रक्तातून आंत्रमार्गातून अवशोषित झालेले ग्लुकोज, ⇨ॲमिनो अम्ले  व वसा भाग हे अन्न घटक यकृतात येतात. काही औषधे व विषारी पदार्थही याच मार्गाने यकृतात येतात. या नीलेच्या डावी व उजवी प्रमुख व नंतर अनेक उपशाखा होतात. अगदी छोटी केशिका कोटरिका म्हणून ओळखली जाते. या सर्व कोटरिकांतील रक्त प्रथम अनेक मध्यवर्ती नीलांत व तेथून यकृत नीला शाखांत व शेवटी यकृत नीलेमार्फत अधोमहानीलेत जाते. यकृत रोहिणी व प्रवेशिका नीला या दोन्ही मिळून यकृतामध्ये दर मिनिटास १,२०० मिलि. रक्त आणतात.

आ. ३. यकृताचा रक्तपुपवठा : (१) यकृत रोहिणी, (२) प्रवेशिका नीला, (३) समाईक पित्तनलिका, (४) पित्ताशय, (५) यकृत नीला, (६) अधोमहानीला.सूक्ष्मरचना : यकृतात जवळजवळ तीनशे महापद्म कोशिका असतात. एका मध्यवर्ती नीलेत रक्त वाहून नेत असलेल्या सर्व कोटरिका आणि सभोवतालच्या यकृत कोशिका मिळून बनलेल्या घटकाला ‘यकृत खंडिका’ म्हणतात. प्रत्येक खंडिका दंडगोलाकार असून तिचा व्यास ०·८ ते २ मिमी. असतो. ती अनेक कोशिका पट्टिकांची बनलेली असते व दोन पट्टिकांच्या मध्ये कोटरिका असतात. प्रत्येक यकृत कोशिका बहुभुज असून जास्त बाजू कोटरिकांशी संलग्न असतात आणि निदान एक बाजू पित्तकेशिकेशी संलग्न असते. कोटरिका भित्तीमध्ये काही विशिष्ट कोशिका असतात. त्यांना कुफर कोशिका म्हणतात. या भक्षिकोशिकांसारखे कार्य करतात. प्रत्येक खंडिकेत पित्तनलिका, प्रवेशिका नीला शाखा व यकृत रोहिणीची शाखा असतेच आणि या त्रयीला ‘यकृत त्रयी’ म्हणतात.


आ. ४. यकृत खंडिकारचना : (१) मध्यवर्ती नीला. (२) यकृत कोशिका, (३) कुफर कोशिका, (४) पित्तकोशिका, (५) पित्तनलिका, (६) यकृत रोहिणी शाखा, (७) प्रवेशिका नीला शाखा, (८) लसीकावाहिनी, (९) अंतिम लसीकावाहिनी, (१०) डिसे अवकाश, (११) कोटारिक.रक्तवाहिन्यांच्या जाळ्याप्रमाणेच पित्तनलिकांचे जाळे प्रत्येक खंडिकेत असते. पित्तकेशिका पित्त अंतिम पित्तनलिकांकडे वाहून आणतात. सर्व पित्त यकृत पित्तनलिका व समाईक पित्तनलिका यांद्वारे पित्ताशय व ग्रहणीकडे नेले जाते. कोटरिकांच्या भित्तींची पारगम्यता अधिक असल्यामुळे कोटरिका व यकृत कोशिका यांच्यामध्ये असलेल्या जागेत लसीका (रक्तद्रवाशी साम्य असलेला व ऊतकांतून रक्तात जाणारा द्रव पदार्थ) बऱ्याच मोठ्या प्रमाणात गोळा होत असते. या जागेला अथवा अवकाशाला जे. डिसे या जर्मन शारीरविज्ञांच्या नावावरून ‘डिसे अवकाश’ म्हणतात. तेथून लसीका अंतिम लसीकावाहिन्यांमार्फत मोठ्या लसीकावाहिन्यांत व शेवटी आंत्रीय लसीकावाहिन्यांतून पायसाशयात जाते [⟶ लसीका तंत्र].

तंत्रिका पुरवठा : (मज्जा पुरवठा). उदरगुहीय तंत्रिका जालापासून निघणाऱ्या यकृत जालापासून यकृताला तंत्रिका पुरवठा होतो व त्यामध्ये अनुकंपी व परानुकंपी या दोन्ही प्रकारच्या तंत्रिका तंतूंचा समावेश असतो [⟶ तंत्रिका तंत्र]. हे तंतू प्रवेशिकेतून शिरणाऱ्या रक्तवाहिन्या व त्यांच्या शाखांबरोबर यकृतात पसरतात. त्या शेवटी कोठे संपतात हे अनिश्चित आहे. यकृत जालात उजव्या व डाव्या प्राणेशा तंत्रिकांचे तंतू असतात. शरीरक्रियाविज्ञान : यकृताचे आकारमान मोठे असले, तरी ते त्याचे कार्यबाहुल्य व त्याची जटिलता यांस साजेसेच आहे. एखाद्या छोट्या रासायनिक कारखान्याप्रमाणे यकृतामध्ये अनेक कार्ये अहोरात्र चालू असतात. निदान शंभरापेक्षा जास्त कार्ये अगदी वैशिष्ट्यपूर्ण असली, तरी यकृताच्या प्रमुख कार्यांची विभागणी सात प्रमुख विभागांत करता येते. (अ) कार्बोहायड्रेट चयापचयाचे  नियंत्रण : (चयापचय म्हणजे शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडी). प्रवेशिका नीलेतून येणारे रक्त ग्लुकोज व इतर मोनोसॅकॅराइडांनी समृद्ध असते. यकृत कोशिका या सर्व पदार्थांचे अवशोषण (सुलभ पारगम्यतेमुळे) करतात आणि त्यांचा अविद्राव्य (न विरघळणाऱ्या) जटिल बहुवारिक (लहान, साध्या रेणूंच्या संयोगाने बनलेले जटिल रेणूंचे संयुग) अशा ग्लायकोजेन स्वरूपात संचय करतात. परिणामी यकृत नीलेमार्फत अधोमहानीलेत मिसळणाऱ्या रक्तामध्ये फक्त प्राकृतिक (सर्वसाधारणतः आढळणारी) ग्लुकोज पातळी (प्रती १०० मिलि. रक्तात ८० ते १०० मिग्रॅ.) कायम ठेवली जाते. ज्या वेळी प्रवेशिका नीलेतून (दोन अन्न ग्रहणांच्या दरम्यान) ग्लुकोज येण्याचे प्रमाण कमी असते त्या वेळी ही पातळी कायम ठेवण्याकरिता संचयित ग्लायकोजेनाचे यकृतात विघटन (रेणूचे तुकडे होण्याची क्रिया) चालू असते. या क्रियेला ‘ग्लायकोजेन विघटन’ म्हणतात. मेंदूमधील सर्व जीवनावश्यक केंद्रांची कार्यक्षमता ग्लुकोजावरच अवलंबून असल्यामुळे ग्लुकोज नियंत्रण अतिशय महत्त्वाचे ठरते. दीर्घकालीन उपवासाच्या वेळी ग्लुकोजाचा पुरवठा अपुरा पडू नये म्हणून यकृतातील ग्लायकोजेनाचा संचय कमी पडू लागताच यकृत कोशिका ॲमिनो अम्ले, वसा यांसारख्या अन्नघटकांपासून ग्लुकोज बनवितात, या क्रियेला ‘ग्लुकोज नवनिर्मिती’ म्हणतात. रक्तातील ग्लुकोज पातळी नियंत्रित करण्याकरिता इन्शुलीन व ग्लुकागॉन [⟶ अग्निपिंड], ॲड्रेनॅलीन [⟶ अधिवृक्क ग्रंथि], वृद्धी हॉर्मोन [⟶ पोष ग्रंथि] इ. हॉर्मोनांची रक्तातील पातळी यकृतातील ग्लुकोज संचय व ग्लुकोज मुक्तता या दोन्हींवर परिणाम करते. (आ) वसा चयापचय : शरीरातील सर्व कोशिकांमध्ये वसा चयापचयाची क्षमता असते परंतु यकृत कोशिका त्यामधील काही क्रिया अतिशय जलद करू शकतात. सर्वसाधारणपणे यकृतात ३ ते ५% वसा असते. वसा चयापचयाच्या पुढील क्रिया यकृताचे वैशिष्ट्य आहेत : (१) वसाम्लांच्या बीटा ऑक्सिडीकरणाचे प्रमाण अधिक असते तसेच ॲसिटो-ॲसिटिक अम्ल निर्मितीची गती अधिक असते. (२) वसा प्रथिनांची [⟶ प्रथिने] निर्मिती,

(३) कोलेस्टेरॉल व फॉस्फोलिपॉइडांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि (४) कार्बोहायड्रेटे व प्रथिनांचे मोठ्या प्रमाणावर वसेमध्ये रूपांतर करणे.

ॲसिटो-ॲसिटिक अम्ल अतिशय विद्राव्य असल्यामुळे निर्मितीनंतर सहज कोशिकाबाह्य द्रवात मिसळते व तेथून इतर ऊतक कोशिकांपर्यंत पोहोचवले जाते. तेथे त्याचे ॲसिटिल को-एंझाइम-ए मध्ये रूपांतर होऊन ऑक्सिडीकरण होते. अशा प्रकारे वसा चयापचयात यकृत प्रमुख भाग घेते. [⟶ चयापचय].

आ. ५. यकृतातील वसा चयापचयउत्पादित कोलेस्टेरॉलापैकी ८०% भागाचे पित्त लवणांत रूपांतर होते. उरलेले रक्तातून वसा प्रथिनांसमवेत शरीरातील इतर ऊतक कोशिकांत पोहोचते. फॉस्फोलिपीड लेसिथीन याप्रमाणेच कोशिकांपर्यंत पोहोचते. या पदार्थाचा उपयोग कोशिका-भित्तींच्या निर्मितीकरिता होतो.

यकृतातील वसा साठा त्यातील वसा संचय किंवा निर्मिती आणि त्यातून बाहेर पडणारी वसा यांच्या संतुलनावर अवलंबून असतो. यकृतातील वसा ही अन्नातील वसा, शरीरातील इतर वसा संचय आणि यकृतातील संश्लेषित वसा मिळून बनलेली असते. विघटनाचे किंवा इतर ठिकाणच्या संचयाकडे वाहून नेल्यामुळे यकृतातील वसा कमी होत असते. (इ) प्रथिन चयापचय : कार्बोहायड्रेट व वसा चयापचयाचे यकृताचे कार्य महत्त्वाचे असले, तरी शरीर त्याच्या अभावातही जिवंत राहू शकते. प्रथिने चयापचयाचे यकृताचे कार्य काही दिवसच बंद पडले, तर मात्र मृत्यू हमखास येतो. प्रथिन चयापचयाची पुढील अतिशय महत्त्वाची कार्ये यकृतात होतात : (१) ॲमिनो अम्लांचा ॲमिनो-निरास (ॲमिनो गट काढून टाकण्याची क्रिया), (२) शरीरद्रव्यातील अमोनिया काढून टाकण्याकरिता यूरियाचे उत्पादन, (३) रक्तरसातील प्रथिनांची निर्मिती आणि (४) निरनिराळ्या ॲमिनो अम्लांचे आंतर-रूपांतरण. (१) ॲमिनो अम्लापासून ऊर्जा मिळण्यापूर्वी, तसेच त्यांचे कार्बोहायड्रेटात किंवा वसेत रूपांतर होण्याकरिता ॲमिनो-निरास आवश्यक असतो. (२) आंत्रमार्गात सूक्ष्मजंतू अमोनियाचे सतत उत्पादन करीत असतात व हा अमोनिया प्रवेशिका नीलेतून यकृतात येत असतो. ॲमिनो-निरासातून यूरिया तयार होतो व यूरियामुळे रक्तरसातील अमोनियाचे प्रमाण वाढत नाही. जर अमोनियाचे प्रमाण वाढले, तर यकृतजन्य बेशुद्धी आणि मृत्यू संभवतो. (३) गॅमाग्लोब्युलिनांचा काही भाग वगळता कोलीनएस्टरेज, अल्ब्युमीन, प्रोथ्राँबीन, फायब्रिनोजेन व इतर सर्व प्रथिने (८५%) यकृतात तयार होतात. दिवसाला ५० ते १०० ग्रॅ. प्रथिन निर्मितीची क्षमता यकृत कोशिकांत असते. यामुळे प्रथिने निम्म्यावर घटल्यास यकृत ती तूट चार ते सात दिवसांत भरून काढू शकते. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळी रक्तरसातील प्रथिनांची घट होते त्या वेळी यकृत कोशिकांचे जलद समविभाजन [⟶ कोशिका] होते व प्रत्यक्ष यकृताच्या आकारमानातही वाढ होते. (४) शरीरास आवश्यक अशा चयापचयाकरिता ॲमिनो अम्लांचे आंतर-रूपांतरण यकृतात होते. काही ॲमिनो अम्ले संश्लेषणाने यकृतात तयार होतात, तसेच इतर काही रासायनिक संयुगांचीही संश्लेषणाने निर्मिती होते. (ई) रक्तकोशिका जनन : भ्रूणावस्थेत तिसऱ्या महिन्यापासून रक्तकोशिका जननाचे प्रमुख स्थान यकृत असते. गर्भावस्थेच्या शेवटच्या तीन महिन्यांत अस्थिमज्जा हे प्रमुख स्थान बनते. (उ) निर्विषीकरण : शरीरात शिरणाऱ्या अनेक विषारी पदार्थांची हानिकारकता कमी करण्याची योजना यकृतात असते. यात संयुग्मन, मिथिलीकरण [मिथिल गटाचा (CH3) समावेश करण्याची क्रिया], ऑक्सिडीकरण व इतर अनेक जटिल प्रक्रिया वापरून विषारी पदार्थ निरुपद्रवी बनवले जातात. विशिष्ट यकृत कोशिका बार्बिच्युरेटे, शांतके (मनःशांतीची व चिंता मुक्ततेची अवस्था निर्माण करणारी द्रव्ये) व लायसर्जिक अम्ल डायएथिलामाइड (एल्‌एस्‌डी) यांसारख्या हानिकारक औषधांचे निर्विषीकरण करतात. (ऊ) पित्ताचे उत्पादन : दर चोवीस तासांत सु. ०·९५ लि. पित्त यकृतात तयार होते. पित्तरंजके, पित्तलवणे, प्रथिने, कोलेस्टेरॉल व अकार्बनी लवणे पित्तात असतात. रक्तातून येणाऱ्या तांबड्या कोशिकांचे अपघटन होऊन उत्पन्न होणाऱ्या ‘हीम’ या पदार्थापासून पित्तरंजके तयार होतात. कोलेस्टेरॉलापासून पित्तलवणे बनतात. दर दिवशी ०·५ ग्रॅ. पित्तलवणे यकृत बनवते. पित्तलवणे आंत्रमार्गातील वसा अवशोषणाकरिता तसेच वसाविद्राव्य जीवनसत्त्वांच्या अवशोषणास आवश्यक असतात. [⟶ पचन तंत्र पित्तरस].


(ए) जीवनसत्त्वे व खनिजांचा संचय : वसाविद्राव्य अ, ड, ई व के जीवनसत्त्वे आंत्रमार्गातून अवशोषित होऊन प्रवेशिका नीलेमार्फत यकृतात पोहोचतात. जरूरीप्रमाणे ती रक्तप्रवाहाद्वारे शरीर कोशिकांना पुरविली जातात. तत्पूर्वी त्यांचा यकृतात संचय होतो. एक ते दोन वर्षे पुरेल एवढा अ जीवनसत्त्वाचा साठा यकृत करू शकते. ड व ब१२ ही जीवनसत्त्वे काही महिने पुरतील एवढी संचयित होतात. लोह, जस्त, तांबे, मॅग्नेशियम व मँगॅनीज ही खनिजे यकृतात संचयित होतात. शरीरातील रक्तारुणातील लोह वगळल्यास बहुतेक लोह संचय यकृतात फेरिटिनाच्या स्वरूपात असतो. वरील महत्त्वाच्या कार्यांशिवाय यकृत हॉर्मोनांच्या अवक्रमणाचे कार्य सतत करते. अवटू ग्रंथी, अधिवृक्क ग्रंथी व जनन ग्रंथी अतिशय प्रभावी हॉर्मोनांचे स्रवण करीत असतात. या हॉर्मोनांचा परिणाम मर्यादित स्वरूपात ठेवण्याकरिता यकृत प्रमाणापेक्षा जादा असलेली हॉर्मोने रक्तातून काढून घेऊन त्यांचे अक्रिय स्वरूपात रूपांतरण करते. उदा., स्त्रीमदजन (इस्ट्रोजेन) हे हॉर्मोन यकृत कोशिकांत ग्लुकुरॉनिक अम्लाबरोबर संयुग्मित होऊन जलविद्राव्य अक्रिय पदार्थ बनून मूत्रावाटे उत्सर्जित होते. यकृतातील एकूण कोशिकांपैकी जवळजवळ २०% कोशिका एककेंद्रकी कोशिका व महाभक्षिकोशिका (कुफर कोशिकांसहित) असतात. क्षीण तांबड्या कोशिका व सूक्ष्मजंतू यांच्या भक्षणाशिवाय कुफर कोशिका अज्ञात प्रतिरक्षात्मक (रोगप्रतिकारात्मक) कार्य करीत असाव्यात. निरनिराळे प्रतिजन प्रवेशिका नीलेतून यकृतात येत असतात त्यांचेही भक्षण या कोशिका करतात व हानिकारक प्रतिरक्षात्मक प्रतिक्रियांना अडथळा उत्पन्न करतात. विकृती : यकृताचा जवळजवळ अर्धा भाग रोगग्रस्त होऊन नाश पावला किंवा शस्त्रक्रियेने काढून टाकला, तरी मानवी शरीरावर गंभीर परिणाम झाल्याचे आढळत नाही. निरोगी शरीराप्रमाणे सर्व गरजा उरलेला यकृत भाग पुरवितो. या कारणामुळे यकृत रोग पुष्कळ वाढेपर्यंत लक्षणहीन असतो. याशिवाय सुरुवातीस वेदनांचा अभाव हेही रोग उशिरा लक्षात येण्याचे कारण असते. अनेक यकृत रोगांत ⇨कावीळ   हे एक लक्षण असते. यकृत विकृतींची अनेक कारणे आहेत. आहार व चयापचयजन्य दोष, विषारी पदार्थ (औषधासहित), संसर्गजन्य रोग, पित्तनलिका रोध, रक्ताभिसरण दोष व अर्बुदे (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गाठी) ही प्रमुख रोगोत्पादक कारणे आहेत. सर्वांत जास्त रोग अपपोषणजन्य असतात. अलीकडे व्हायरसजन्य विकृतींचे प्रमाण वाढले आहे. ⇨पीतज्वर, ⇨क्षयरोग , ⇨आंदोलज्वर (ब्रूसेलोसिस), व्हाइल रोग (आडोल्फ व्हाइल या जर्मन वैद्यांच्या नावाने ओळखण्यात येणारा रोग), अमीबाजन्य विकार, ⇨खंडितकायी-कृमिरोग  इ. सार्वदेहिक रोगांत यकृतावर दुष्परिणाम होतो. वरील सर्वसाधारण विकृतींशिवाय ‘यकृतशोथ’ व ‘यकृत-सूत्रण रोग’ या दोन प्रमुख विकृतींवर स्वतंत्र नोंदी आहेत. रोगनिदान : यकृताच्या विकृतींच्या निदानाकरिता व उपचारांची परिणामकारकता ठरवण्याकरिता अनेक परीक्षा उपलब्ध आहेत. रासायनिक परीक्षा, ऊतक विश्लेषण, शरीरक्रियाविज्ञानात्मक परीक्षा आणि क्ष-किरण परीक्षा असे या परीक्षांचे सर्वसाधारण वर्गीकरण करता येते. शंभरापेक्षा जास्त निरनिराळ्या रासायनिक परीक्षा यकृत रोगनिदानाकरिता उपलब्ध आहेत. या सर्व परीक्षा रक्तातील रासायनिक घटकांतील रोगजन्य बदलांची माहिती मिळवण्याकरिता असतात.

‘यकृत क्रियात्मक परीक्षा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या काही जीवरासायनिक परीक्षा यकृताच्या मूलोतक कोशिकांचा रोग किंवा पित्तोत्पादक यंत्रणेचा रोग हे ओळखण्यास मदत करतात. तसेच त्या एकूण हानीचे प्रमाण व रोगाची प्रगती याबद्दल माहिती देऊ शकतात. प्रत्यक्षात या परीक्षा यकृताच्या कार्याबद्दल तपासणी करीत नाहीत. एवढेच नव्हे, तर यकृताच्या कार्याची तपासणी ही वैद्यकीय तपासणीचा भागही नसते. वस्तुतः या परीक्षांना दिलेले नाव चुकीचे असून ते सर्वसाधारण वापरामुळे तसेच राहिले आहे. या ठिकाणी हे नमूद करावयास हवे की, कोणताही अपसामान्य परिणाम विशिष्ट रोगदर्शक नसतो आणि नेहमी वापरात असणाऱ्या सर्व परीक्षा अगदी प्राकृतिक परिणाम दर्शवित असल्या, तरी यकृत विकृती नसल्याची खात्री नसते. यकृत विकृती मूलोतकजन्य, भ्रूण मध्यस्तरीय कोशिकाजन्य किंवा पित्तोत्पादक यंत्रणाजन्य आहे, हे ठरवणे मूलतःच अव्यवहार्य आहे. कारण या अतिशय जटिल अवयवात सर्व क्रिया परस्परावलंबी आहेत. यामुळे फक्त काहीच परीक्षा नेहमी वापरात आहेत. यकृताची ⇨जीवोतक परीक्षा (जिवंत शरीरातून काढून घेतलेल्या ऊतकाची करण्यात येणारी स्थूल व सूक्ष्मदर्शकीय तपासणी) निष्णात व अनुभवी वैद्यानेच करावयाची असून त्याकरिता रुग्णाचे पूर्ण सहकार्य अत्यावश्यक असते. अत्यल्प ऊतक तपासणीकरिता मिळत असल्यामुळे रोग प्रसृत (पसरत जाणाऱ्या) प्रकारचा असल्यासच ही परीक्षा उपयुक्त ठरते. उदरगुहादर्शन (उदरगुहादर्शक नावाच्या उपकरणाने उदरगुहेतील भागाचे प्रत्यक्ष दर्शन) तंत्र वापरून यकृत, पित्ताशय, पर्युदर, प्लीहा इ. भागांचे निरीक्षण करता येते. यांशिवाय काही निरनिराळ्या क्ष-किरण तपासण्याही उपलब्ध आहेत. ⇨जलोदर  असल्यास उदरगुहेतील द्रवाची प्रयोगशालेय तपासणी रोगनिदानास उपयुक्त असते. वरील सर्व प्रकारच्या परीक्षांनंतरही जर रोगनिदान अनिश्चितच राहिले, तर शेवटचा उपाय म्हणून उदरच्छेदन शस्त्रक्रियेचा उपयोग करतात. या शस्त्रक्रियेनंतर मूळ रोगाचे गांभीर्य वाढण्याचा धोका असतो व मृत्यूप्रमाणही अधिक असते. वर उल्लेखिल्याप्रमाणे यकृत रोगनिदानाकरिता विविध परीक्षा उपलब्ध असल्या, तरी वैद्याने रोगाचा काळजीपूर्वक गोळ केलेला पूर्वेतिहास आणि संपूर्ण सखोल शारीरिक तपासणी यांना अनन्यसाधारण महत्त्व असते, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे.

भालेराव, य. त्र्यं.

आयुर्वेदीय वर्णन : यकृत पित्तधरा, रक्तधरा, मलधरा अशा तीन कलांचे अधिष्ठान आहे. ह्यामध्ये तीन कलांचे कार्य चालते. पित्तधरा कलेचे पित्तोत्पादन-पचन, रक्तधरा कलेचे रक्तोत्पादन आणि मलधरा कलेचे अन्नरसाचे पचन करून मलनिष्कासन अशी तीन मुख्य कार्ये आहेत. यकृत रक्त ह्या धातूच्या रक्ताच्या सारघटकापासून निर्माण झालेला अवयव आहे. रक्तापासून निर्माण झालेला आणि नवीन रक्त निर्माण करणारा हा अवयव जेव्हा बिघडतो तेव्हा रक्ताची दुष्टी ही यकृत विकाराला कारण असते. केव्हा रक्तदुष्टीच्या कारणांनी यकृत दुष्ट होऊन रक्तदुष्टी होते. पित्तदुष्टी ही यकृतदुष्टीला कारण होते. उपचार : कोणत्याही यकृतविकारावर रेचक व उजव्या हाताच्या शिरेतून रक्तस्रुती आणि यकृत प्रदेशावर जळवा, तुंबडी आणि शिंग लावून रक्तस्राव करणे हे मुख्य उपचार होत. पित्ताशी वाताचा संबंध असला तर शिंग आणि कफाचा संबंध असला तर तुंबडी लावून रक्त काढावयाचे असते. पित्ताशी वाताचा संबंध असेल तेव्हा बृहत्यादी गण, कफाचा संबंध असेल तेव्हा पटोलादी गण, पित्तरक्ताची दुष्टी असेल तेव्हा काकोल्यादी गण, सारिवादी गण, अंजनादी गण, न्यग्रोधादी गण, उत्पलादी गण ह्यांची चूर्णे किंवा काढे द्यावे म्हणजे यकृतोद्‌भव विकार नाहीसे होतात. रक्तपित्त हा विकार यकृत संबद्ध आहे. शिवाय पित्ताश्मरी उत्पन्न होते [⟶ पित्ताश्मरी]. पहा : पित्तरस पित्तारुण पित्ताशय.

पटवर्धन, शुभदा अ.

संदर्भ : 1. Berkow, R. and others, Ed., The Merck Manual of Diagnosis and Therapy, Rathway , 1982

2. Guyton, A. C. Textbook of Medical Physiology, Tokyo, 1976.    3. Macleod, J. and others, Ed., Davidson’s Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1984

4. Popper, H. Schaffner, F. Liver : Structure and Function, New York, 1957.

5. Warwick, R. Williams, P. L., Ed., Gray’s Anatomy, London, 1973.